-धनंजय कुलकर्णी 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी रसिकांचे भावजीवन नाट्य गीतांनी समृद्ध झाला होते. बालगंधर्व यांच्या गायकीचा फार मोठा पगडा संगीताच्या दुनियेत स्पष्टपणे दिसत होता; परंतु बोलपटांच्या आगमनानंतर आपोआपच संगीत नाटकांच्या प्रयोगना खीळ बसली. याच काळात मराठी संगीताच्या दुनियेत भावगीतांचा जमाना सुरु झाला. भावगीतांच्या संगीत युगाचे अनभिषिक्त सम्राट गजानन वाटवे होते. साध्या, सोप्या सहज गुणगुणता येतील अशा चाली ते मराठीतील कविताना देत असत. १९४० पासून वाटवे यांनी भावगीतांचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि भावगीतांना खऱ्या अर्थाने जनमान्यता मिळाली. गजानन वाटवे यांचे समकालीन अनेक कलाकार पुढे हाच कित्ता गिरवत यशस्वी ठरले. त्यापैकी एक होते बबनराव नावडीकर (Babanrao Navadikar)! अतिशय कष्टातून त्यांनी हे यश प्राप्त केले. आज १९ ऑगस्ट २०२१. बबनराव नावडीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आज पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने नव्या पिढीला या कलावंताचा परिचय व्हावा म्हणून हा छोटासा लेख. (Marathi BhaavGeet Singer Babanrao Navadikar Birth Centenary Special)

बबनराव नावडीकर यांचे मूळ नाव श्रीधर यशवंत कुलकर्णी असे होते. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील सुप्रसिद्ध कीर्तनकार होते. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. परंतु गाणं शिकण्यासाठी त्यांना चक्क त्यांच्या गावातून (कराडहून) पुण्याला पळून यावे लागले. पुण्यात आल्यानंतर इतस्ततः भटकत असताना, हुजूर पागा शाळेच्या फुटपाथवर ते दमून बसले होते. त्यांच्या वडिलांच्या मित्राने त्यांना ओळखले आणि त्यांची चौकशी केली . बबनराव यांनी‘मला गाणं शिकायचं आहे म्हणून मी घरातून पळून आलो आहे’ असे त्यांना स्पष्टपणे सांगितले. वडिलांच्या मित्रांनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले आणि टिळक रोड वरील गोखले बिल्डींग मधील गजानन बुवा जोशी यांच्याकडे त्यांचे गाण्याचे शिक्षण सुरू झाले. बबनराव यांना कराडला असल्यापासूनच गजाननराव वाटवे यांच्या स्वराचे मोठे अप्रूप होते. त्यांच्या सारखा गुरु आपला लाभावा अशी त्यांची आंतरिक इच्छा होती. एकदा रस्त्यात त्यांना गजानन वाटवे सायकलीवरून जाताना दिसले. बबनराव यांचा आनंद गगनात मावेना ते त्यांच्या मागे पळत जाऊन त्यांना भेटले! आणि इथून दोघांचे गुरु शिष्याचे नाते जमले.

खरं तर वाटवे आणि बबनराव यांच्यात पाच वर्षाचे अंतर. पण बबनरावांनी त्यांना गुरू मानले. वाटवे यांनी देखील आपला शिष्य खूप चांगल्या पद्धतीने घडवला. हे दोघेही सुधीर फडके यांच्या गीत रामायणात गायले होते. पुढे कित्येक वर्ष हे दोघे जण गीतरामायणाचे कार्यक्रम करत असत. दोघांचे भावगीतांचे स्वतंत्र कार्यक्रम देखील असायचे. वाटवे यांचे संगीत असलेले आणि बबनराव यांनी  गायलेले ‘रानात सांग कानात आपुले नाते’ हे भावगीत प्रचंड गाजले. (कवी: ग दि माडगूळकर) बबनराव नावडीकर यांचे हे सिग्नेचर सॉंग ठरले. त्यांनी अनेक भावगीते गायली. आम्ही दोघं राजाराणी, उदास तू आवर ते नयनांतिल पाणी (गीत रामायणातील गाणे), कुणी आलं कुणी गेलं, जा रे चंद्रा क्षणभर जा, पडले स्वप्‍न पहाटेला, बघू नकोस येड्यावाणी गं तुझ्या डोळ्याचं न्यारं पानी, राधिके ऐक जरा बाई, रानात सांग कानात, सांग पोरी सांग सारे, सुरत सावळी साडी जांभळी, ही नाव रिकामी उभी किनाऱ्याला, कशी तुझं समजावू सांग? का भामिनी उगीच राग?, कां अशी अकारण हसशी, काय ह्या संतांचे मानू, हरिनाम सदोदित गाई रे. 

 

बबनराव नावडीकर शाळेत संगीत आणि मराठी हे विषय शिकवत. वडिलांचा कीर्तनाचा वारसा  देखील त्यांनी सांभाळला. स्वच्छ, प्रांजळ असा नावडीकर यांचा प्रासादिक स्वर होता. बबनराव नावडीकर यांचा नातू आनंद अरविंद नावडीकर वीस वर्षापूर्वी आमच्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्याच्याकडून देखील मला त्यांच्या आजोबांची माहिती कळाली. डॉक्टरांनी उतारवयात मैफिलीत सलग तीन तीन तास गाऊ नका असा सल्ला दिला त्यामुळे बबनराव  पुण्यातील लग्न कार्यालयात जाऊन मंगलाष्टके म्हणण्याची सुरुवात केली! मंगलाष्टक रचणे  आणि चाल देऊन ते लग्नात गाणे ही कल्पना सर्वांनाच खूप आवडली. बबनराव यांच्या मंगलाष्टका शिवाय त्याकाळी लग्न लागत नसत असे लोक म्हणायचे. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की लग्नाकरता यजमानांनी मंगल कार्यालय ठरवले की लगेच ते नावडीकरयांच्याकडे जाऊन त्यांना ‘बुक’ करायचे! नावडीकर यांच्या स्वरातील मंगलाष्ट्क आणि त्यांची उपस्थिती एक ‘स्टेट्स सिम्बॉल’ ठरले होते. बालगंधर्व यांच्या स्वराचा आणि एकूणच व्यक्तीमत्वाचा त्यांच्यावर पगडा होता. बालगंधर्व यांच्या छायाचित्रांचे त्यानी गावोगावी प्रदर्शन भरवले होते.

आज नावडीकर यांच्या पुढच्या पिढ्यानी  देखील संगीताशी आपली नाळ जोडून ठेवली आहे.

(छायाचित्र सौजन्य- आठवणीतील गाणी; बबनराव नावडीकर यांच्या दोन गाण्यांच्या लिंक यु ट्यूब च्या सौजन्याने.) 

मराठी चित्रपट संगीताविषयीच्या इतर लेखांसाठी क्लिक करा

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.