बर्थडे स्पेशल-‘बहनों और भाईयों’ ची साद देणारा जादुई आवाज- अमीन सयानी

– प्रसाद जोग, सांगली

अमीन सयानी यांचा आज वाढदिवस जन्म २१ डिसेंबर १९३२.

‘बहनों और भाईयों ’ हा आवाज रेडिओमधून आला की दर बुधवारी लोक सरसावून बसायचे , कारण बिनाका गीतमाला सुरु व्हायची. कोणताही कार्यक्रम असुदे , तो रंगतदार व्हायला पाहिजे तर त्याचा निवेदक देखील तसाच हुशार, अभ्यासपूर्ण असला पाहिजे म्हणजे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातोच जातो. एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो.गेली कित्येक वर्ष मा.अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करीत आहेत.

नभोवाणीवरील निवेदकांच्या बाबतीत जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा एका नावापुढे सर्वजण नतमस्तक होतात तो आवाज असतो अमीन सयानीचा. “जी हाँऽऽ प्यारे बहेनों और भाईयों, तो अब अगली पायदानपर पेश होने जा रहा है…” असा आवाज ऐकला, की आजही तो काळ सर्रकन डोळ्यांपुढे चमकून जातो.

थोडीथोडकी नाही तब्बल ४२ वर्षे त्यांनी ‘बिनाका गीतमाला’चे प्रसारण केले. आकाशवाणीच्या इतिहासातील हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला. आज वयाच्या ८८ व्या वर्षीही ते त्याच उत्साहाने रेडिओवर कार्यरत आहेत. वयाचे आकडे त्यांच्या शरीराला थकवू शकत नाहीत.

नभोवाणीच्या माध्यमातून भारतीय सिनेमाला घराघरापर्यंत पोचवण्यात अमीन सयानींचा फार मोठा सहभाग आहे. त्यांनी रेडीओवर अनेक प्रायोजित कार्यक्रम केले. त्या काळातील सर्वच कार्यक्रम ‘लाजवाब’ होते. एस. कुमार का फिल्मी मुकदमा, सॅरीडॉन के साथी, शालीमार सुपरलॅक जोडी, बोर्नव्हिटा क्वीज कॉन्टेस्ट, मराठा दरबार की महकती बाते, रिको मुस्कुराहटे.

ameen sayani birthday

जाहिरात आणि विपणन या शब्दांची जादू समाजापर्यंत पोचायच्या कितीतरी वर्षे अगोदर अमीन सयानी यांनी ती आयडिया यशस्वी करून दाखवली होती. १९५२ सालापासून रेडिओ सिलोनवर त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम सुरू झाला. आजच्या पिढीला कदाचित खोटे वाटेल पण प्रत्येक बुधवारी रात्री ८ वाजता रस्ते निर्मनुष्य असायचे. सारा देश त्यावेळी फक्त आणि फक्त बिनाका ऐकत असायचा. श्रोत्यांशी मनापासून साधलेला संवाद, सोपी-सुलभ भाषाशैली, उत्कंठा वाढवणारे रसाळ निवेदन आणि सोबतीला सिनेमाच्या अस्सल सुवर्णकाळातील गाणी! रसिकांचे या स्वराशी नाते जुळले ते कायमचेच.

साठच्या दशकात एकदा ‘बिनाका’ सादर करताना एका पित्याने त्यांना पाठवलेले पत्र त्यांनी वाचून दाखवले. त्या पित्याचा एकुलता एक मुलगा काही कारणाने रुसून घर सोडून गेला होता. आईवडील खूप दु:खात होते. त्या काळात संपर्काची माध्यमे अतिशय कमी होती. त्या कुटुंबाला ‘बिनाका’ ऐकायची भारी आवड होती. त्या पित्याने अमीनभाईंना विनंती केली, की जगाच्या पाठीवर माझा मुलगा कुठेही असला तरी बिनाका ऐकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या कार्यक्रमातून त्याला घरी परतण्याचा सल्ला द्या. तो जरूर तुमचे ऐकेल. अमीन सयानी यांनी ते पत्र वाचून दाखवले. आणि काय आश्चर्य! महिन्याभरात त्या पित्याचे पत्र आले, मुलगा सुखरूप आल्याचे.

त्या वेळेस तर गाणी ऐकण्याची साधने कमी होती . गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचा, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला.’’

Ameen Sayani with his wife
Ameen Sayaniji with his wife-Image Courtesy-Stars Unfolded

हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक. ३ डिसेंबर १९५२ ला बिनाका गीतमाला सुरु झाली आणि चित्रपटसंगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. मा.अमीनभाई सांगतात. ‘‘त्या वेळेस ‘हिट परेड’ नावाचा इंग्लिश कार्यक्रम रेडिओ सिलोनवर होत असे. सहज एक कल्पना निघाली, हाच कार्यक्रम हिंदीतून पेश केला तर! एक प्रयोग म्हणून गीतमाला सुरू झाली. सात-आठ गाणी वाजवायची त्यांची क्रमवारी बदलून, लोकप्रियतेनुसार त्यांना नंबर देऊन ऐकणाऱ्यांनी जॅकपॉट जिंकायचा. त्या वेळेस टपाल, पत्रं एवढं एकच माध्यम होतं. रेडिओ सिलोनच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास पत्रांची अपेक्षा ठेवत यंत्रणा सज्ज केली होती. प्रत्यक्षात नऊ हजार पत्रं आली. हा धक्का जोरदार होता आणि पहिलं वर्ष संपता संपता पत्रांचा आकडा प्रत्येक आठवडय़ाला साठ हजारांपर्यंत पोहोचला.’’

बिनाका गीतमालाचा इतिहास मा.अमीन सायानी यांना पाठ आहे. शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहनपर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना आहे. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व फुलले. 

इसलिये आप सभिसे गुजारिश है की,

बेहेनों और भाईयों, आज के दिन अमीन सयानिजिको उनके जन्मदिन पर बधाईया देना मत भुलिएगा

Prasad Jog, Sangli
+ posts

Leave a comment