-पद्माकर पाठकजी, सातारा.

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

१९५७ ते २००० या ४३ वर्षांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीत ६०० हिंदी चित्रपट करता ४००० गीते लिहिणारे, हिंदी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक गीते लिहिण्याचा विक्रम करणारे, कारकिर्दीत चार वेळा उत्कृष्ट गीतकार म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारे, एक वेळा सिने अवॉर्ड आणि दोन वेळा स्क्रीन अवॉर्ड मिळवणारे गीतकार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते आणि आणि या व्यतिरिक्त दोन चित्रपटात स्वतःच्या स्वरात गाणे गाणारे, अशी ज्या व्यक्तिमत्वाची ओळख सांगता येइल ते व्यक्तिमत्व म्हणजे गीतकार ‘आनंद बक्षी’ (Lyricist Anand Bakshi) होय! ३० मार्च २००२ हा त्यांचा स्मृतिदिन ! आनंद बक्षी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या गीत लेखनाच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप टाकला असता काय दिसून येते? (Remembering one of the finest lyricist of hindi cinema Anand Bakshi) 

रावळपिंडी येथे जन्मलेल्या आनंद बक्षी ना, तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कविता लिहिण्याचा छंद लागला होता. भारतीय सेनेच्या सिग्नल विभागात स्विच बोर्ड ऑपरेटर च्या स्वरुपात काम करणारे आनंद बक्षी, चित्रपट गीतकार बनण्याचे स्वप्न बघत होते. आणि त्यासाठी सैन्यातील नोकरी सोडून ते मुंबईत आले. पण तेथे गीतकार म्हणून नावारूपास येण्याकरता त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईतून निराश होऊन ते परत गेले आणि १९५७ मध्ये पुन्हा मुंबईला आले. त्यावेळी भगवान दादांनी त्यांना, ‘भला आदमी’, या चित्रपटासाठी गीतकार म्हणून काम दिले. या चित्रपटांमधील दहा गीतांपैकी पाच गीते लिहिण्याचे, त्यांना त्यावेळी म्हणजे १९५८ मध्ये, दीडशे रुपये मिळाले होते. त्या काळात ती रक्कम तशी मोठी होती. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी त्यांना आणखीन चार चित्रपटांची कामे मिळाली. १९६१ पर्यंत त्यांनी जवळजवळ बारा चित्रपटांसाठी गीते लिहिली. पण आनंद बक्षी हे नाव खूप लोकप्रिय झाले नाही.

पण त्यांनी लिहलेले १९६१ च्या ‘रजिया सुलतान’ या चित्रपटातील, ‘ढलती जाये रात’, कहले दिल की बात’, या गाण्याने लोकप्रियता मिळवली. तसेच, ‘काला समुंदर’, चित्रपटातील ‘मेरी तस्विर लेकर क्या करोगे’ ही कव्वाली तसेच ‘फूल बने अंगारे’ चित्रपटातील, ‘चांँद आहे भरेगा’, हे गीत आणि ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ चित्रपटातील, ‘मेरे मेहबूब कयामत होगी’, अशा काही चित्रपट गीतांनी त्यांचे नाव चित्रपट सृष्टीत चर्चेत राहू लागले आणि नंतर 1970 पासून पुढील तीन-चार दशके तर सतत चर्चेत असणाऱ्या आनंद बक्षीनी अक्षरशः ढीगभर गाणी लिहिली. बंदुकीतून सटासट गोळ्या सुटाव्यात तशी त्यांच्या लेखणीतून गाणी कागदावर उतरवली जात होती. त्यामध्ये अनेक वेळा संगीतकाराच्या चालीत बसणारे अचूक शब्द निवडण्यात आनंद बक्षींचे कौशल्य दाद देण्याजोगे होते.

anand bakshi

आनंद बक्षी यांच्या गाण्याबद्दल काही चित्रपट प्रेमी हे फारसे बोलू इच्छित नाहीत, कारण त्यांच्यामते आनंद बक्षी यांची गाणी आशयसंपन्न, अर्थपूर्ण अशी नसतातच. अर्थात, ‘सोमवार को हम मिले मंगलवार को नैन’, ‘वन टू का फोर’, ‘आज मोहब्बत बंद है’, अशी काही गाणी जरी फारशी दखल घेण्याजोगी नसली तरी, ‘चांद सी मेहबूबा हो’ (हिमालय की गोद मे), ‘एक था गुल’ (जब जब फुल खिले), ‘बहारो ने मेरा चमन लूट कर’ आणि ‘आया है मुझे फिर याद वो जालिम’ ( देवर) ‘हम तुम युग युग से’ आणि ‘मुबारक हो सबको’ (१९६७ चा मिलन ) ही अशी काही गीते आहेत की जी, आशयसंपन्न व अर्थपूर्ण अशी आहेत. ‘अमर प्रेम’, ‘हरे राम हरे कृष्ण’, ‘तकदीर’ , ‘आये दिन बहार के’, ‘आपकी कसम’, ‘शालीमार’, ‘आशा’, ‘सरगम’, ‘कटी पतंग’ यासारख्या अनेक चित्रपटातील सर्वच्या सर्व नसली तरी दोन-तीन गीते का होईना पण मनाला भावणारी अशी आपणाला दिसून येतात.

चित्रपटाचे कथानक, प्रसंग , यास अनुषंगून गीत लिहिण्याची प्रतिभा पण त्यांचे ठायी होती म्हणूनच सुभाष घई, यश चोप्रा, प्रसाद प्रॉडक्शन, राजश्री प्रॉडक्शन, राज खोसला, शक्ती सामंता अशा दिग्गजांनी त्यांना प्राधान्य दिले. आणि , ‘बॉबी’ च्या वेळी खुद्द राज कपूरने त्यांचा हक्काचा गीतकार हसरत जयपुरी असतानाही आनंद बक्षीना आमंत्रित केले. हिंदी, ऊर्दू, आणि पंजाबी भाषेचे प्रचंड भांडार आनंद बक्षी जवळ होते व त्या आधारे ते साजेसे गीत लिहीत असत. लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, एस.डी. बर्मन, आर डी बर्मन या संगीतकारांच्या धून वर गीते लिहिणार्‍या आनंद बक्षीनी नंतरच्या पिढीतील शिवहरी, जतीन ललित तसेच ए .आर . रहमान या संगीतकारांच्या धूनवरही गाणी लिहिली.

आनंद बक्षी यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य सांगताना हे आवर्जून सांगावेसे वाटते की, एखादी गोष्ट काव्यातून सांगावी तर ती आनंद बक्षींनी! उदाहरणार्थ, ‘जब जब फुल खिले’ चित्रपटातील, ‘एक था गुल’ हे गीत ! १९८२ च्या ‘जीवनधारा’ चित्रपटातील ‘गंगाराम कवारा रह गया’ हे गीत! याखेरीज प्रश्नोत्तरे पद्धतीने लिहिलेली गीते उदाहरणार्थ, ‘अच्छा तो हम चलते है’ (आन मिलो सजना) ‘वो कौन है वो कौन है’ (अंजना) ‘वो क्या है’ (अनुराग) ‘मैने देखा’ (दुश्मन) या अशा गीतांव्यतिरीक्त, ‘एक दुजे के लिये’ चित्रपटात तर त्यांनी वेगळाच प्रकार केला. चक्क ६४ हिंदी सिनेमांची नावे एकापुढे एक ठेवली. ‘मेरे जीवन साथी, प्यार किये जा’ अशी नावे एकत्र करून अर्थ असणारे एक गीत बनवले. (चित्रपटाच्या कथानकाची ती गरज होती)

आनंद बक्षी यांचा मोठेपणा म्हणजे त्यांनी स्वतः कबुली दिली होती की, काव्याचे व्याकरण मला कळत नाही, मोठ्या उपमा अलंकार वापरून गीत तयार करणे मला जमत नाही. परंतु अशी कबुली देणारे बक्षी शब्दांचे वजन आणि संगीतकाराच्या चालीचा ठेका /मीटर पकडून, जाणून घेऊन अशी काही रचना करून जात असत कि ते गीत सहजासहजी आपल्या ओठात बसायचे. अशा एक दोन ओळीतच गहन अर्थ असायचा. त्यासाठी ‘अमर प्रेम’चे गीत बघा, “तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई’, तसेच ‘दोस्ताना’ चित्रपटातील, ‘वो ख्वाबोंके दिन, वो किताबोंके दिन, सवालों की राते, जवाबोंके दिन’!

‘मै शायर तो नही’ असे लिहणाऱ्या बक्षींनी, ‘जिक्र होता है जब कयामत का’, तसेच, ‘वो तेरे प्यार का गम’ (माय लव्ह) सारखी रचना करून अंतकरणात बसणारी गाणी लिहिली. बदलत्या काळात ही त्यांची ‘पल दो पल का ये सफर’ आणि ‘ओय राजू प्यार ना करियो’ ही गीते वेगळेपण दाखवुन गेली.

मानवी जीवन, मानवी जीवन जगण्याच्या पद्धती, या दृष्टिकोनातून भाष्य करणारी आनंद बक्षी यांची गीते हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. ‘ये जीवन है इस जीवन का ….’, ‘कैसे जीते है भला …..’, ‘बुरा मत सूनो बुरा मत देखो…..’, ‘देखो ओ दिवानो तुं ये काम ना करो…..’, ‘गाडी बुला रही है…..’ ही गीते लक्षपूर्वक ऐकून समजून घेतली तर पथदर्शक ठरतील यात संशय नाही. ‘एक बंजारा गाये …….’, सारखे गीत ऐकल्यावर आनंद बक्षी कामचलाऊ गीत लिहिणारे होते हे विधान करवत नाही.

असेच एक सत्य त्यांनी आपल्या गीतातून उतरवले आणि त्यातील आशया प्रमाणे आपल्या गीताद्वारे स्वतःची आठवण मागे ठेवून ३० मार्च २००२ रोजी ते या दुनियेतून निघून गेले. त्यांनी लिहिलेले ते सत्य होते,

“आदमी मुसाफिर है,
आता है जाता है
आते जाते रस्ते मे
यादे छोड जाता है”!

हेही वाचा- स्वर : भावूक , नशीला…..गीता दत्त

 

 

Padmakar Pathakji
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.