देव, देश आणि धर्म यासाठी काम करणारी सिनेसृष्टीत अगदी मोजकी मंडळी आहेत. याबाबतीत भालजी पेंढारकर हे त्या सर्वांचे भीष्म पितामह होते. श्रीकृष्णाला व छत्रपती शिवरायांना आपले आराध्य दैवत मानून, आपल्या लेखणीतून, संवादातून, अभिनयातून आणि दिग्दर्शनातून त्यांनी केवळ आणि केवळ देशप्रेम, धर्माभिमान, सदाचार अशा समाजोपयोगी गुणांना वाहिलेल्या अभिरुचीसंपन्न कथा लिहिल्या व दिग्दर्शन केले. आज मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांना दिग्गज मानले जाते असे जवळपास सर्वच कलाकार म्हणजे भालजींची देण. हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कित्येक दिग्गज त्यांना आपल्या गुरुस्थानी मानत. अशा भालजींचा आज स्मृतिदिन. जाणून घेऊ यात त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी- 

१. भालजींची जन्मभूमी व कर्मभूमी कोल्हापूर. जन्म ३ मे १८९८ चा. 

२. वडील गोपाळ पेंढारकर कोल्हापूरचे नामांकित डॉक्टर परंतु भालचंद्राला लहानपणापासून कधीच अभ्यासात गोडी नव्हती.

३. शाळा सोडल्यामुळे घर सोडावे लागले व पुण्यात येऊन काही दिवस टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्रात नौकरी केली व नंतर परत कोल्हापूरमध्ये ‘मराठा लाईफ इन्फन्ट्री’ मध्ये काम केले. 

४. १९२५ साली त्यांनी पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे ‘बाजीराव मस्तानी’. 

५. १९३२ साली भालजींचे लेखन-दिग्दर्शन लाभलेला ‘श्यामसुंदर’ हा भारतीय बोलपटांच्या इतिहासात रौप्य्महोत्सवी ठरलेला पहिला चित्रपट आहे. मुंबईत तो २५ आठवडे चालला. 

६. भालजींना दादासाहेब तोरणे यांनी भालबा हे नाव दिले होते तर इतर सर्व जवळची मंडळी त्यांना आदराने ‘बाबा’ म्हणत. 

७. १९४८ साली गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत त्यांचा कोल्हापुरातील स्टुडिओ जाळण्यात आला. प्रचंड नुकसान झाले परंतु पुन्हा प्रचंड मेहनतीने त्यांनी तो स्टुडिओ पुन्हा उभारला. गांधीहत्येच्या खटल्यात संशयित म्हणून त्यांना अटकही झाली होती. 

८. स्टुडिओ उभारणीसाठी काढलेले कर्ज न फेडता आल्याने त्या स्टुडिओचा लिलाव झाला व तो लता मंगेशकर यांनी विकत घेतला. 

९. भालजींची राहणी गांधीवादी म्हणजे हातमागाचा पांढरा शर्ट व अर्धी चड्डी व विचारधारा हिंदुत्ववादी होती त्यामुळे ते सावरकर, हेडगेवार, गोळवलकर यांच्याकडे ओढले गेले. 

१०. कोल्हापूरचे संघसंचालक, इंदुसभेचे अधिकारी असूनही भालजींचे साम्यवादी, समाजवादी लोकांशी, पुढाऱ्यांशी घनिष्ट संबंध होते. 

११. ‘वाल्मिकी’ (१९४६) या चित्रपटातून राज कपूर यांना अभिनयाची प्रथम संधी देणारे भालजीच होते. 

१२. महाराष्ट्र शासनाने १९६० साली मराठी चित्रपटांसाठी पुरस्कार देणे सुरु केले व त्यासाठी चित्रपट पाठविण्याची त्यांना विनंती केली पण तरीही भालजींनी त्यास नकार दिला. 

१३. आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या प्रचंड आग्रहाखातर ‘साधी माणसं’ हा चित्रपट पुरस्कारासाठी पाठवला. त्याला एकूण ९ पुरस्कार मिळाले. 

१४. भालजींच्या प्रमुख चित्रपटात कालियामर्दन, सावित्री, महारथी कर्ण, कान्होपात्रा, स्वराज्याच्या सीमेवर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी, पावनखिंड, मोहित्यांची मंजुळा, बालशिवाजी, गनिमी कावा, सुनबाई, मीठभाकर, साधी माणसं, तांबडी माती इत्यादी काही चित्रपटांचा समावेश आहे. 

१५. शाहू मोडक, शांता आपटे, मा. विठ्ठल, जयशंकर दानवे, चित्तरंजन कोल्हटकर, दादा कोंडके, राजा परांजपे, रत्नमाला, रमेश देव, चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना इत्यादी काही दिग्गज कलाकार म्हणजे भालजींचीच देण. 

१६. १९८१ सालचा ‘गनिमी कावा’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून अखेरचा चित्रपट. निर्माता म्हणून आलेला ‘शाब्बास सुनबाई’ (१९८६)

१७. भालजींना १९९१ साली ‘चित्रभूषण’ व ‘जीवनगौरव’, ९२ साली ‘दादासाहेब फाळके’ व ९४ साली ‘गदिमा’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 

१८. १९९२ साली तत्कालीन खात्याचे मंत्री अजित पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. 

१९. भालजींनी असंख्य पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे लेखन, निर्मिती व दिग्दर्शन केले परंतु कधीही केवळ करमणूकप्रधान, व्यावसायिक व तद्दन गल्लाभरू चित्रपट काढले नाहीत. 

२०. १९९४ साली आजच्याच दिवशी, वयाच्या ९७ व्या वर्षी भालजींचे कोल्हापुरात निधन झाले. 

भालजींना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन, मुजरा व आदरांजली

– टीम नवरंग रुपेरी

Editor
+ posts

Leave a comment