आज सिनेमा माध्यमासाठी मोठा ऐतिहासिक दिवस आहे. आज जागतिक व्यावसायिक सिनेमा १२५ वर्षांचा झाला. आजच्या दिवशी १८९५ साली सिनेमाचा पहिला व्यावसायिक शो दाखविला गेला. कुठे? पॅरिस शहरातील ले सलोन ग्रँड कॅफे येथे. तिकीट लावून सिनेमा दाखविलेला जगातील पहिला सिनेमाचा प्रयोग. ल्यूमेरे ब्रदर्स (ऑगस्ट व लुईस ल्यूमेरे हे दोन सख्खे भाऊ) यांनी या व्यावसायिक शोचे आयोजन केले होते ज्यात १० शॉर्ट फिल्म्स दाखविल्या गेल्या. एक शॉर्ट फिल्म साधारण ५० सेकंदांची! होय…केवळ ४० ते ५० सेकंदांची आणि त्या पाहण्यासाठी लोकं तिकीट काढून आले!

Lumières La Sortie de l'Usine Lumière à Lyon 1895
still from the movie, Lumières La Sortie de l’Usine Lumière à Lyon 1895 (Workers Leaving the Lumiere Factory)

यात काही विशेष निमंत्रित पण होते. एका मिनिटापेक्षाही कमी लांबीच्या या फिल्म्समध्ये चित्रित काय केले होते तर माळी बागकाम करतोय, ल्यूमेरे ब्रदर्स यांच्या फॅक्टरीमधून वर्कर्स बाहेर पडत आहेत, लहान मूल नाष्टा करत आहे, समुद्रकिनारी लोकं आंघोळ करत आहेत इत्यादी. ल्युमेरे ब्रदर्स यांच्या १८९६ सालच्या शॉर्ट फिल्म मधील स्टेशनवर येणारी ट्रेन  बघून काही प्रेक्षक इतके काही घाबरले की ते शो सोडून सैरावैरा पळायला लागले होते. या सर्व फिल्म्सने त्या दिवशी सिनेमा माध्यमात क्रांती घडवत इतिहास रचला होता.  

बघा पहिला व्यावसायिक सिनेमा – 

या १० शॉर्ट फिल्म्सपैकी पहिल्या फिल्मचे (ल्यूमेरे ब्रदर्स यांच्या फॅक्टरीमधून वर्कर्स बाहेर पडत आहेत)  शूटिंग एक वर्ष आधी म्हणजे १८९४ च्या ऑगस्ट महिन्यात सुरु करण्यात आले होते जी फिल्म २२ मार्च १८९५ रोजी जवळपास २०० लोकांच्या एका समूहाला प्रथम दाखविण्यात आली. पण ही स्क्रिनिंग व्यावसायिक नव्हती. २८ डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या व्यावसायिक शो ला जवळपास ३० ते ४० लोकं तिकिटं काढून आली होती.

 

ज्या सिनेमाटोग्राफ कॅमेऱ्याने या शॉर्ट फिल्म्सचे चित्रण करण्यात आले तो कॅमेरा ल्यूमेरे ब्रदर्सनेच बनविला होता. १८९५ साली या शोच्या आधीसुद्धा काहीजणांनी स्क्रिनिंगचे प्रयोग करून पाहिले होते पण ते तितकेसे यशस्वी झाले नाहीत व सिनेमा माध्यमाला त्यामुळे पुढे गतीही मिळाली नाही. अशा प्रकारच्या पहिल्या शोची नोंद या शोच्या एक महिना अगोदर १ नोव्हेंबर १८९५ साली बर्लिन येथे झाल्याची पण आहे. परंतु या ल्यूमेरे ब्रदर्सच्या प्रयोगानंतर खऱ्या अर्थाने व्यावसायिक सिनेमा निर्मितीला चालना मिळाली.

या शोनंतर लगेचच ल्यूमेरे ब्रदर्स यांनी फ्रान्सच्या बाहेर पडत जगभरात काही मोजक्या शहरात या शॉर्ट फिल्म्सचे स्क्रिनिंग केले. १९९६ साली झालेल्या या स्क्रिनिंग्स मध्ये ब्रुसेल्स, मुंबई, लंडन, न्यूयॉर्क व इतर काही महत्वाच्या शहरांचा समावेश होता. 

Editor
+ posts

Leave a comment