-अशोक उजळंबकर

93 years of Alam Ara widely regarded as the first sound film of India

आज मोठा ऐतिहासिक दिवस आहे. भारताचा पहिला बोलपट ‘आलम आरा’ ९३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, म्हणजेच १४ मार्च १९३१ साली प्रदर्शित झाला होता. राजपुत्र आणि एक जिप्सी गर्ल ची प्रेमकहाणी दर्शविणाऱ्या या चित्रपटात संगीत आणि पार्श्वसंगीत यांचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. अर्देशीर इराणी दिग्दर्शित आलम आरा हा एका पारशी नाटकाचे चित्रपट रूपांतर होते. ९३ वर्षे पूर्ण झालेल्या, आजच्या या ऐतिहासिक दिवशी या सिनेमाविषयी पुढील ९ रंजक गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे: 

१. हिंदी भाषेत बनलेला हा पहिला भारतीय बोलपट होता. 

२. संपूर्णतः भारतात चित्रीकरण झालेला हा पहिला पूर्ण लांबीचा फीचर फिल्म सदरात मोडणारा सिनेमा होय. 

३. पहिला बोलपट असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याने, प्रदर्शनावेळी झालेल्या गर्दीला काबूत आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते. 

४. या सिनेमातील दे दे खुदा के नाम पर हे गाणे भारतीय सिनेमातील पहिले गाणे म्हणून ओळखले जाते. 

५. चित्रीकरणासाठी उभारलेला स्टुडिओ रेल्वे ट्रॅक जवळ होता त्यामुळे दिवसा शूटिंगदरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेच्या आवाजाचा त्रास होत असे व तो आवाज रेकॉर्डिंग मध्ये येत असे म्हणून या सिनेमाचा बहुतांश भाग रात्री १ ते ४ दरम्यान चित्रित करण्यात आला. 

६. नायिका झुबेदा यांच्या जागी आधी रुबी मायर्स यांच्या नावाचा विचार झाला होता परंतु त्यांना उर्दू व हिंदी व्यवस्थित बोलता येत नसल्याने झुबेदा यांचे नाव फायनल झाले. नायकासाठी म्हणून मदर इंडिया चे दिग्दर्शक मेहबूब खान यांच्या नावाचा विचार झाला होता परंतु व्यावसायिक दृष्ट्या जास्त फायदेशीर नाव हवे असल्याने स्टंटमॅन मास्तर विठ्ठल यांचे नाव फायनल झाले. चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांचीही महत्वाची भूमिका आहे. 

७. १९६७ साली या सिनेमाची उपलब्ध असलेली एकमेव प्रिंट हरवली. 

८. सध्या या सिनेमाच्या फिल्मची एकही कॉपी उपलब्ध नाही. 

९. “All Living. Breathing. 100 Per Cent Talking” ही या सिनेमाची प्रसिद्धी करिता वापरण्यात आलेली इंग्रजी टॅग लाईन होती. हिंदी टॅग लाईन होती- “७८ मुर्दे इन्सान जिंदा हो गये, उनको बोलते देखो.”

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment