-अशोक उजळंबकर

हिंदी चित्रपटसृष्टीला बंगालने अनेक कलावंत दिले आहेत. बंगाली भाषेत चित्रपटनिर्मिती करीत असतानाच अचानक प्रादेशिक चित्रपटाची मर्यादा ओळखून मुंबईकडे अनेकांनी धाव घेतली. कोलकाता येथून मुंबईत आल्यावर लगेच काम मिळालं असं कधी झाल्याचं उदाहरण येथे नाही. अनेकांना कित्येक वर्षे वाट पाहून मुंबई नगरी सोडून जावे ही लागले आहे. फिल्मीस्तान, फिल्मालय या कंपन्यांनी अनेक नामवंत दिग्दर्शक, नायक, संगीतकार येथे जन्माला घातले व त्यांना पुढे भरघोस यशदेखील मिळाले आहे. चित्रपट या माध्यमाचा समाज सुधारणेसाठी उपयोग करून घेण्याचा विचार मनी घेऊन निर्मिती करणारे जे काही बोटावर मोजता येणारे दिग्दर्शक आहेत, त्यापैकी एक नाव म्हणजे सत्येन बोस यांचे. त्यांचे नुसते नाव जरी आठवले, तरी त्यांच्या नीटनेटक्या, स्वच्छ चित्रपटांची यादी समोर उभी राहते. ‘सत्य घटना’ चित्रित करणारे सत्येन बोस’ अशी त्यांची ख्याती आहे. कोलकाता येथून मुंबईत आल्यावर अनेक वर्षे सत्येन बोस यांना सहायक म्हणून वावरावे लागले. येथे काम मिळणे अवघड आहे, हे लक्षात येताच ही नगरी सोडून जाण्याचा त्यांनी अनेकदा विचार केला, परंतु येथेच राहिले.

1948 च्या सुमारास सत्येन बोस मुंबईत आले व त्यांनी आपल्या कोलकाता येथील अनुभवाच्या बळावर अनेकांकडे काम मागितले; परंतु त्यांच्या कामगिरीवर कोणाचाच विश्‍वास नव्हता. फिल्मीस्तान हे बॅनर त्या काळी आघाडीवर होते व या बॅनरखाली एक लहान मुलांवर आधारित चित्रपट निघत आहे, अशी बातमी सत्येन बोस यांना लागली. अभिभट्टाचार्य, प्रणोती घोष, बिपिन गुप्ता, रतनकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जागृती’ या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून त्यांना सर्वप्रथम संधी मिळाली. ‘जागृती’चे संगीत हेमंतकुमार तयार करीत होते, तर गाणी कवी प्रदीप यांची होती. अनेक बालकलावंतांच्या ताफ्यात अभिभट्टाचार्यसारखा जाणता कलावंत सत्येन बोस यांच्या बरोबर होता. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे सत्येन बोस यांनी सर्वांवर छाप टाकली. आपल्या आईसोबत जाणाऱ्या निरागस मुलांच्या ओठावर ‘चलो चले, माँ, सपनों की गाँव में’ हे आशा भोसलेंच्या आवाजातील गाणे खूपच अर्थपूर्ण होते. स्वतः गीतकार प्रदीप यांचीच एक रचना त्यांनी स्वत: गायलेली होती. या देशभक्तीपर गीताला तोड नव्हती. कवी प्रदीप यांचा थोडासा अनुनासिक स्वर खूप चांगला उतरला होता. ‘आओ बच्चो तुम्हे दिखाये झाँकी हिंदुस्थान’ हे गाणं आजही गुणगुणण्यात येतं. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी रोजी सर्वत्र वाजणारे आशा भोसले यांच्या आवाजातील ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे देशभक्तीपर गीत कोण विसरू शकेल? हेमंतकुमार, प्रदीप व सत्येन बोस यांच्या ‘जागृती’ने सर्वत्र देशभक्तीपर वातावरणनिर्मिती केली होती. त्यानंतर आलेल्या ‘परिचय’ला मात्र एवढे यश मिळाले नाही.

jagriti movie poster

अशोककुमार, मीनाकुमारी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बंदीश’ थोडा वेगळ्या धर्तीचा होता. त्यालादेखील हेमंतकुमार यांनीच संगीत दिले होते. महंमद रफीच्या आवाजातील ‘ले लो जी गुब्बारे, हमारे प्यारे प्यारे’ हे गाणं गाजलं. अशोक, अनुप, किशोर या त्रिकुटाला घेऊन काढलेला ‘बंदी’ फारसा गाजला नाही. यात नंदा, बिना रॉय यांच्यादेखील खास भूमिका होत्या. ‘बंदी’ नंतर आलेला ‘चलती का नाम गाडी’ मात्र तुफान यशस्वी ठरला. के. एस. पिक्चर्सच्या बॅनरखाली तो तयार झाला होता. ‘चलती का नाम गाडी’ पूर्वी तयार झालेले सत्येन बोस यांचे चित्रपट जरा गंभीर वातावरणाचे होते, तर ‘चलती का नाम गाडी’ मात्र हास्यकल्लोळात बुडवून टाकणारा होता. सत्येन बोस यांनी खूपच मनोरंजक आखणी करून या चित्रपटाला दिग्दर्शन दिले होते. संगीताची बाजू एस.डी. बर्मन यांनी सांभाळली होती. ‘बाबू समझो इशारे’, ‘एक लडकी भिगी भिगीसी’, ‘दे दो मेरा पांच रुपया बारा आना’, ‘हम थे वो थी और समा रंगीन समझ गये ना’, ‘हाल कैसा है जनाब का’ ही गाणी केवळ धमालच!

chalti ka naam gaadi movie poster

 ‘चलती का नाम गाडी’नंतर आलेला ‘सवेरा’ कौटुंबिक कथा होती, तर ‘सितारोंसे आगे’ एक हलकी फुलकी प्रेमकथा होती. ‘सवेरा’ व ‘सितारोसे आगे’ या दोन्ही चित्रपटांचा नायक होता अशोककुमार, तर नायिका होत्या मीना कुमारी व वैजयंतीमाला. ‘गर्ल फेंड’ मध्ये किशोरकुमार, वहिदा रहेमान यांच्यावर एक हळुवार प्रेमकथा चित्रित केली होती. किशोरकुमारच्या आवाजातील, ‘आज रोना पडा तो समझे हंसने का मोल क्या है’, आणि ‘आज मुझे कुछ कहाना है’ हे किशोरकुमार व सुधा मल्होत्रा यांच्या आवाजातील गाणे गाजले. गर्ल फ्रेंडची कहाणी धीरगंभीर गाणी आणि वेगळ्या वातावरणात नेऊन सोडणारी होती. ‘जागृती’ नंतर त्यांनी परत एकवार लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या ‘मासूम’ची तयारी केली होती. बनी रूपा चित्रने ‘मासूम’ची निर्मिती केली होती. अशोककुमार, सरोज इराणी, हनी इरानी यांच्या यात भूमिका होत्या. लहान मुलांच्या भावनांवर चित्रपटाचे कथानक गुंफले होते. ‘दाल मे काला’ एक हलकी फुलकी कॉमेडी होती. त्या चित्रपटात निम्मी, किशोरकुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘दाल मे काला’चं संगीत सी. रामचंद्र यांचे होते.

कौटुंबिक, लहान मुलांकरिता, हळुवार प्रेमकथा असे वेगवेगळ्या धर्तीचे चित्रपट सत्येन बोस हाताळीत असल्यामुळे त्यांची खूपच प्रसिद्धी झाली होती. राजश्री हे ताराचंद बडजात्या यांचे बॅनर त्यावेळी नुकतेच उदयाला आले होते. या राजश्री बॅनरचा ‘आरती’ हा चित्रपट खूप गाजला होता. ताराचंद बडजात्या यांचा उद्देश समाजप्रबोधनाचा होता. चित्रपट या माध्यमाचा उपयोग पैसा कमावण्याकरिता करीत असताना काही सामाजिक बाबींकडेदेखील लक्ष वेधता आले पहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. दोन अपंग मित्रांची कथा त्यावेळी राजश्रीकडे होती व या कथेवर आधारित ‘दोस्ती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सत्येन बोस यांच्याकडे आले. राजश्रीतर्फे संगीताची जबाबदारी नव्या दमाचे संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यावर सोपवली होती, तर सुशीलकुमार व सुधीरकुमार यांना प्रमुख भूमिकेकरिता घेण्यात आले होते.

still from the Hindi Movie Dosti 1964
still from the Hindi Movie Dosti 1964

 ‘दोस्ती’ चित्रपटाची सगळी गाणी महंमद रफीच्या स्वरात होती. ‘चाहूंगा मै तुझे शाम सवेरे’, ‘मेरा तो जो भी कदम है’, ‘मेरी दोस्ती तेरा प्यार’ ही गाणी खास गाजली. ‘दोस्ती’करिता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अनेक सन्मान मिळाले होते. सत्येन बोस यांनी दिग्दर्शित केलेल्या नंतरच्या अनेक चित्रपटांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचेच संगीत लाभले होते. ‘दोस्ती’ नंतर त्यांनी ‘आसरा’चे दिग्दर्शन केले. पुन्हा एकवार एक कौटुंबिक प्रेमकथा त्यांनी पेश केली होती. माला सिन्हा-विश्‍वजीत ही जोडी तेव्हा फॉर्मात होती व ‘आसरा’ मध्ये त्यांच्याच प्रमुख भूमिका होत्या. ‘आसरा’मध्ये बलराज सहानी व निरुया रॉय यांचे पण काम खूपच छान झाले होते. ‘नींद कभी रहती थी आँखो में, अब रहते है सांवरिया’, हे लताचं गाणं खास गाजलं होतं. याशिवाय, ‘तुम कौन हो बताओ तुम्हारा नाम है क्या, इक अजनबी नजर का यहाँ काम है क्या’ हे गीतदेखील गाजलं. ‘आसरा’ महिला वर्गाला आकर्षित करू शकला. माला सिन्हाचे काम चांगलेच झाले होते. ‘आसरा’ नंतर आलेल्या ‘मेरे लाल’ मध्ये त्यांनी परत माला सिन्हाला प्रमुख भूमिका दिली होती. देवकुमार ‘मेरे लाल’चा नायक होता. एका अनाथ मुलाची हळुवार कथा ‘मेरे लाल’ मध्ये बघायला मिळाली. खरं तर ‘मेरे लाल’ गाजला तो गाण्यांमुळे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताची सगळी गाणी खूपच सुंदर जमली होती. त्यापैकी ‘पायल की झंकार रस्ते रस्ते, ढूंढे तेरा प्यार रस्ते रस्ते, मेरी पतली कमर लंबे बाल रे, साँवरीयाँ मै खडी रहूँ के चली जाऊँ रे, ये कहते है बाबा तेरे, बादल रोया नैना रोये’ ही गाणी गाजली. नर्गीसला त्यांनी फार वर्षापूर्वी ‘रात और दिन’ करिता करारबद्ध केले होते. लग्नानंतर तिने चित्रपट संन्यास घेण्याचे ठरविल्यामुळे रात और दिन लांबणीवर पडला होता; परंतु सत्येन बोस यांनी नर्गीसच्या तारखांची योग्य जुळवाजुळव करून कसातरी तो चित्रपट पूर्ण केला. प्रदीपकुमार, फिरोज खान यांच्या ‘रात और दिन’ मध्ये प्रमुख भूमिका होत्या, तर नर्गीसची दुहेरी भूमिका होती. कथानकातच मुळात फारसा दम नव्हता व नर्गिसचा एक लांबणीवर पडलेला चित्रपट, त्यात पुन्हा प्रदर्शनाला खूपच उशीर झालेला. शंकर-जयकिशन या दुकलीच्या संगीतावर ‘रात और दिन’ थोडा फार चालला. ‘रात और दिन दिया जले’, ‘आवारा ऐ मेरे दिल जाने कहाँ तेरी मंजील’, ‘न छेडो कल के अफसाने’, ‘जीना हमको रास न आया हम जाने क्यू जीते है’ ही गाणी लताच्या आवाजात होती.

1968 च्या सुमारास मराठी रंगभूमीवर वसंत कानेटकर यांचे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक खूप गाजत होते. सुधा करमरकर, फैय्याज, प्रभाकर पणशीकर आणि डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या नाटकावर आधारित त्यांनी ‘आँसू बन गये फूल’ हा चित्रपट तयार केला. काशीनाथ घाणेकरांची भूमिका देब मुखर्जी याने केली होती, तर अशोककुमार, निरुपा रॉय, हेलन, अलका, प्राण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची बरोबरी हा चित्रपट करू शकला नाही; पण सत्येन बोस यांनी आपली कामगिरी चांगली पार पाडली होती.

 ‘एक तेरा साथ हमको दो जहाँसे प्यारा है, तू है तो हर सहारा है’ या एकाच गाण्याकरिता ‘वापस’ हा त्यांचा चित्रपट लक्षात राहिला. हे द्वंद्वगीत लता – रफीच्या आवाजात होते व हे आजही बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. आपण प्रामाणिक असताना देखील फसवले गेलो व आपल्यावर चोरीचा आळ आला तेव्हा रूप बदलून बदला घ्यावा, हा विचार करणारा नायक त्यांनी ‘जीवन – मृत्यू’ मध्ये दाखविला. सत्येन बोस यांची राजश्री कडची ही दुसरी पेशकश. राखी या नंतरच्या काळात गाजलेल्या नायिकेचा हा पहिलाच चित्रपट. धर्मेंद्रने ‘जीवन – मृत्यू’ मध्ये प्रमुख भूमिका पार पाडली होती. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, हे लता-रफीचं द्वंद्वगीत ‘जीवन-मृत्यू’चे खास आकर्षण ठरले.

Jeevan mrityu movie poster

 1954 पासून सत्येन बोस यांनी दिग्दर्शन हाती घेतले व 1970 पर्यंत त्यांनी आपल्या परीने अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. ‘जीवन-मृत्यू’ नंतर मात्र सत्येन बोस यांचा एकही चित्रपट लक्षात राहण्याजोगा राहिला नाही. 1970 नंतर चित्रपटांचा ढंग बदलत चालला होता. ‘अनोखी पहचान’, ‘अनमोल तसवीर’, ‘मस्तान दादा’, ‘सारे ग म प’, ‘बीन माँ के बच्चे’, ‘कायापालट’, केवळ त्यांच्या एकूण संख्येत भर घालणारे चित्रपट ठरले. आपल्या अनेक चित्रपटात त्यांनी गांगुली बंधूंना म्हणजेच अशोक, किशोर, अनुप यांना संधी दिली. अशोककुमार हा त्यांचा आवडता नायक होता. लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांच्या संगिताचा त्यांच्या यशात सिंहाचा वाटा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट संपूर्ण कुटुंबासह पाहण्याजोगे होते. काही चित्रपट तर अगदी राष्ट्रीय स्तरावरील सन्मानास पात्र ठरणारे होते.

अगदी शेवटच्या काळात त्यांनी ‘वो दिन आयेगा’ हा चित्रपट दिव्या राणा या नव्या नायिकेला घेऊन काढला होता व त्यातदेखील अशोककुमार यांची भूमिका होती. सत्येन बोस यांची कामगिरी रौप्यमहोत्सवी चित्रपट देणारी ठरली नसली तरी अगदीच सामान्य मात्र नव्हती.

***

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment