– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

आधी खूपदा बघून झालेला असूनही काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर टीव्ही वर लागलेला ‘भाग मिल्खा भाग’ मी पुन्हा पूर्ण पाहिला. बहुतांश रसिकांनी याचा अनुभव घेतला असेल. सिनेमाच्या भाषेत ‘रिपीट व्हॅल्यू’ असणाऱ्या सिनेमांना यश तर मिळतेच आणि काही वर्षांनी त्यांना ‘कल्ट क्लासिक’ सदरात घेतले जाते. ‘भाग मिल्खा’ च्या कथेत असलेला ‘स्ट्राँग इमोशनल अंडर करंट’ हा त्याला मिळणाऱ्या रिपीट व्हॅल्यू चे मुख्य कारण आहे. कुठल्याही स्पोर्ट्स फिल्म मध्ये नायक अथवा नायिकेला खेळायला प्रवृत्त करणारा आणि त्याच्या किंवा तिच्या जिंकण्याने प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करणारा हा  ‘इमोशनल अंडर करंट’ चित्रपटाच्या यशाचा खरा दावेदार असतो. साधारणपणे देशप्रेम आणि त्या खेळाडूच्या कुटुंबातील एखादी प्रिय व्यक्ती अथवा घडलेली एखादी नाटकीय घटना या सर्व इमोशन्स अथवा भावनांना वाट करून देतात जे त्या खेळाडूच्या यशाचे मुख्य कारण बनते. ‘भाग मिल्खा भाग’ चे दिग्दर्शन जरी राकेश मेहरांचे असले तरी लेखक होते प्रसून जोशी ज्यांनी या सर्व कारणांची पुरेपूर काळजी घेतली होती. परंतु त्याच राकेश मेहरांनी दिग्दर्शित केलेल्या व  नुकत्याच अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर रिलीज झालेल्या ‘तुफान’ (Toofaan on Amazon Prime Video) मध्ये मात्र कथाकार अंजुम राजाबली, विजय मौर्य आणि फरहान अख्तर यांनी या कारणांची म्हणावी तशी दक्षता घेतलेली दिसून येत नाही. (Toofaan Movie Review)

मुंबईतील डोंगरी भागात भाईगिरी करीत आयुष्य व्यतीत करणारा अझीझ अली उर्फ अज्जू भाई (फरहान अख्तर) हा अनाथ असतो. अज्जू भाईच्या आयुष्यात बॉक्सिंग आणि नायिका डॉ अनन्या प्रभू (मृणाल ठाकूर) यांचा एकाचवेळी प्रवेश होतो. अनन्याच्या प्रेरणेने अज्जू भाईगिरीचे आयुष्य सोडून बॉक्सिंगमध्येच करिअर करण्याचे ठरवितो. अनन्या चे वडील नाना प्रभू (परेश रावल) हे बॉक्सिंगचे सुविख्यात कोच असतात. एकीकडे त्यांच्या मार्गदर्शनात बॉक्सिंग शिकत असलेला अझीझ अली दुसरीकडे अनन्याच्या प्रेमात पडलेला असतो व अनन्याचेही त्याच्यावर तितकेच प्रेम असते. परंतु नाना प्रभू हे माझे वडील आहेत ही बाब अनन्या अझीझ पासून लपवून ठेवते. या दोघांच्या प्रेमाची कल्पना नाना प्रभू यांनाही नसते. बॉक्सिंग मध्ये स्टेट लेव्हल पर्यंत अझीझ ज्या दिवशी मजल मारतो त्याच वेळी नेमके नाना प्रभू यांना अझीझ आणि अनन्या बाबत कळते. काही अनन्या लहान असतांना नाना प्रभू यांची बायको म्हणजेच अनन्याची आई एका बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेली असल्याने नाना प्रभू यांना मुस्लिम समाजाबद्दल प्रचंड राग असतो. त्यामुळे नाना यांची या प्रेमास संमती नसते व ते अनन्या ला घराबाहेर काढतात. अचानकपणे अनन्या ची जबाबदारी आल्याने अझीझ घराच्या शोधात असतो ज्याकरिता त्याला पैशांची आवश्यकता असते व त्यासाठी म्हणून तो बॉक्सिंग मध्ये नॅशनल लेव्हल फायनल हरण्यासाठी म्हणून एका बेटींग प्रकरणात अडकला जातो. पुढे काय होते ते इथे सविस्तर सांगणे योग्य नाही.  

सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कथानकाचा एकूण प्रवास हा अतिशय प्रेडिक्टेबल म्हणजेच पुढे काय होणार याचा सहज अंदाज येत होत राहतो. त्यात कथानकात नावीन्य नाही व दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी कथेची मांडणी सुद्धा अगदी सरळधोपट मार्गाने केली आहे. संकलनात नावीन्य आणून ही साधी सरळ कथा वेगळ्या ढंगाने पेश करता आली असती पण तसेही अजिबातच केलेलं नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कथेच्या केंद्रस्थानी असलेले पात्र अझीझ याचं नायिकेशी असलेलं प्रेमाचं भावनिक असं बंधन कुठेही प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नसल्याने अझीझ चे बॉक्सिंगमध्ये परतणे व जिंकणे यात प्रेक्षक अजिबातच  गुंतत नाही. तुफान आणि भाग मिल्खा मध्ये हाच सर्वात मोठा फरक आहे. यापेक्षा याच बॉक्सिंग वर आधारित २०१४ सालचा उमंग कुमार दिग्दर्शित व प्रियांका चोप्रा अभिनीत ‘मेरी कॉम’ खूपच प्रभावी होता. दुर्दैवाने तुफान त्याच्या आसपास पण पोहोचू शकलेला नाही. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने संगीताची जबाबदारी घेऊनही चांगल्या संगीताचा अभाव हा सुद्धा तुफान चा मोठा मायनस पॉईंट आहे. 

अभिनयाच्या बाबतीत परेश रावलने अपेक्षेप्रमाणे व नेहमीप्रमाणे झक्कास काम केले आहे. फरहान अख्तर ने अझीझ च्या पात्रासाठी घेतलेलीही प्रचंड शारीरिक मेहनतीला अगदी दिलसे सलाम. भाग मिल्खा नंतर हा अशा प्रकारे स्वतःला एखाद्या भूमिकेसाठी तन, मन आणि धनाने (निर्माता या नात्याने धन पण आलंच ना म्हणून …) झोकून देणे यासाठी फरहान हा एक आदर्श अभिनेता ठरतो. मृणाल ठाकूर ने अपेक्षेपेक्षा चांगले काम केले आहे. इतर कलावंतांपैकी सिस्टर डिसुझा च्या भूमिकेत सुप्रिया पाठक यांचेही काम छान आहे. 

विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने नैसर्गिक वादळ म्हणजेच तुफान येण्यापूर्वी ते कसे येणार आहे, त्याची तीव्रता किती असेल, ते कुठल्या दिशेने येईल आणि कुठल्या दिशेने त्याचा प्रवास होईल या सर्वांचा अंदाज आल्यावर बचावाची जास्तीत जास्त तयारी आपल्याला करून ठेवता येते .. म्हणूनच समीक्षकांचे समीक्षण वाचूनही ज्यांना या तुफानात उतरायचेच आहे त्यांनी निदान ‘यात काही नावीन्य नाही’ अशी स्वतःची मानसिक तयारी तरी करून ठेवलेली बरी. नाहीतरी ‘रंग दे बसंती’ दिलेल्या राकेश मेहरांनी लगेचच ‘दिल्ली-६’ नावाचा बाउन्सर टाकलाच होता… आता भाग मिल्खा नंतर ‘तुफान’ आणलाय.

हेही वाचा- MOVIE REVIEW HASEEN DILLRUBA; हसीन दिलरुबा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.