-धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

१८ जुलै २०१२ ला रसिकांचा लाडका काका ’राजेश खन्ना’ मनाला ’चटका’ लावून गेला त्याला ही आता ९ वर्ष पूर्ण होताहेत.  आजही कुठेही राजेश वर चित्रित जीत ऐकलं , पाहिलं के लगेच त्याचा सारा जीवनपट नजरे समोर तरळून जातो. हा आमचा दिल का रिश्ता आहे आणि तो शेवटपर्यंत असाच रहाणार आहे! (Revisiting Superstar Rajesh Khanna’s Musical Journey)

हिंदी चित्रपटसृष्टीचं सदाबहार त्रिकूट तेंव्हा मावळतीच्या धुसर रंगात वेढलं जावू लागलं होतं. दिलीपचा ’गोपी’, राज कपूरचा ’जोकर’ आणि देव आनंदचा ’प्रेम पुजारी’ तिकिट खिडकीवर फारसा चमत्कार दाखवू शकले नव्हते. शम्मीच्या धसमुसळेपणातील शृंगारात शुष्कता आली होती हे त्याच्या ’प्रितम’,’पगला कहीं का’नं सिध्द केलं होतं. ज्युबली कुमारचं यशाचं वलय ’गीत’च्या अपयशाने खंडीत झालं होतं. मनोज कुमार, राज कुमार, जॉय मुखर्जी, खान बंधू हे कधी नंबर वनच्या रेसमध्ये नव्हतेच. एकूणच सत्तरचे दशक चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने कात टाकण्याचं होतं. एक जुनी पिढी अस्तगत होवून नव्या चेह‍र्‍याला सामोरं आणणारं होतं. आणि त्याचं वेळी आमचा काका रूपेरी पडद्यावर आला आणि बघता बघता सुपरस्टार बनला! सिनेमाची त्याकाळची परीस्थिती पहाता राजेशची ’एन्ट्री’ अगदी अचूक वेळी घेतली. तो स्टाईल बनला. त्याचं वागणं, बोलणं, चालणं यात एक कमालीचा स्टायलीश लूक होता. १९६९ ते १९७२ या चार वर्षात तो ’परीसा’चीच भूमिका करत होता कारण ज्या सिनेमाला तो हात लावी त्याचं सोनं होत होतं. याकाळात त्याने लागोपाठ तब्बल १५ हिट सिनेमे दिले. हा त्याचा विक्रम आजही अबाधित आहे. त्याची अदा, त्याचे सिनेमे, त्याची गाणी आणि लोकप्रियतेसोबत आलेले ’टॅन्ट्रम्स’ यात एक झपाटलेपणं होतं. तरूण पिढी गुरु शर्ट घालून मान वेळावत चालू लागली. तरूणीची मजल तर त्याला रक्ताने प्रेम पत्र लिहिण्यापासून त्याच्या कारची चुंबने घेण्यासाठी धावू लागल्या. हे आज सारे कपोलकल्पित वाटेल पण हे अक्षरश: खरे होते. एकूणच भाऊ पाध्येच्या भाषेत सांगायचं तर ’राजेश खन्ना कम्प्लिटली छा गया..’ आज तटस्थपणे त्याच्या कारकिर्दीचे विश्लेषण केले तर असे दिसते, दिलिपचा ’भावूक’पणा , राजचा ’निरागस’पणा आणि देवचा ’गुलाबी’पणा या गुणांचा एकत्रित समुच्चय त्याच्या अभिनयात आणून स्वत:ची विषिष्ट शैली विकसित केली. तरी देखील त्याच्या यशात त्याच्यावर चित्रित झालेली भावमधुर ’रोमॅंटीक’ गाण्याचा मोठा वाटा होता हे कसं नाकबूल करता येईल?

राजेश खन्नाचे रूपेरी पडद्यावर आगमन चेतन आनंदच्या ’आखरी खत’ द्वारे झालं. राज, औरत, बहारों के सपने नंतर आलेल्या १९६९ च्या ’आराधना’ने सिनेमाची सारीच गणितं बदलली. शक्ती सामंत यांचा हा सिनेमा तसा नायिकाप्रधान. पण त्यातील गाण्यांनी ’हंगामा’ केला. या सिनेमाने राजेश सोबतच किशोर कुमारचेही नशीब उजाडले. राजेश विथ किशोर हे कॉम्बिनेशन जबरदस्त चालून गेले. पुढे या जोडीला पंचम तथा आर.डी. बर्मन यांची साथ मिळाली आणि या त्रिकूटाने पुढे दशकभर साम्राज्य निर्माणकेले. ’आराधना’चं संगीत सचिनदाचं असलं तरी पंचमचा त्यात महत्वपूर्ण सहभाग होता. यातील ’रूप तेरा मस्ताना’ या पेटत्या श्वासाच्या मादक धुंदगीताने फ़िल्मफ़ेयर अ‍ॅवार्ड पटकावलं. यात किशोरची आणखी दोन गाणी होती. दार्जिलिंगच्या नयनरम्य परीसरात झुकझुक गाडीतून प्रवास करणार्‍या शर्मिलाचा पीछा करीत गायलेलं ’मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू’ आणि हिमालयाच्या गुलाबी थंडीत प्रेमाच्या गुलकंदी रंगाचं ’कोरा कागज था ये मन मेरा’ राजेशची ’रोमॅंटीक’ इमेज या सिनेमाने सिध्द झाली.

राजेश खन्ना -किशोर कुमार-आर.डी. बर्मन या त्रिकूटाचा पहिला सुपरहिट सिनेमा होता कटी पतंग. हा सिनेमादेखील तसा नायिका प्रधान होता. कथा गुलशन नंदाची होती. ’ये शाम मस्तानी मदहोश किये जा’, ’प्यार दीवाना होता है मस्ताना होता है’ आणि ’ये जो मुहोब्बत है’ ही तीनही सोलो गाणी या त्रिकूटाच्या पहिल्याच पदार्पणातील ’लखलखणारं’ यश होतं. या तिघांच्या गुणवत्तेला यशाचे धुमारे फुटले. या तिघांनी स्वतंत्ररित्या त्या काळात अमाप यश मिळविले. आरडीने राजेश व्यतिरिक्त इतरांच्या सिनेमाला दिलेले संगीत झकासच होते. काकाच्या सिनेमाला अन्य संगीतकाराने दिलेले संगीत गाजतच होते. किशोरच्या यशाचा तर तो  ’पिक पीरेद’ होता. पण या तिघांचा एकत्रित कलाविष्कार मनाला सुखावणारा होता. १९७२ सालच्या ’अमर प्रेम’ (दि.शक्ती सामंत) मध्ये ज्याला खर्‍या अर्थाने ’क्लास’ म्हणता येईल अशी तीन गाणी होती. ’चिंगारी कोई भडके’, ’कुछ तो लोग कहेंगे ’ ’ये क्या हुआ कैसे हुआ’ ही सरी गाणी राजेशच्या भावस्पर्शी चेहर्‍यावर विशेष खुलली’ ’नमक हराम’(दि. ॠषिकेष मुखर्जी) मधील ’दिये जलते है फूल खिलते है’ ’मै शायर बदनाम’ही गाणी सिनेमाच्या यशाला आणखी उंचावर नेणारी ठरली.

राजेशकरीता किशोर हे समिकरण इतकं पक्क झालं की प्रत्येक संगीतकार त्याचं अनुकरण करू लागला. हेमंत कुमार यांनी ’खामोशी’(दि. असित सेन) मध्ये ’वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है वो कल भी पास पास थी वो आज भी करीब है’ हे नितांत सुंदर गाणं कृष्णधवल रंगात देखील अप्रतिम ठरले. शंकर जयकिशन याण्च्या ’अंदाज’ (दि. रमेश सिप्पी) सिनेमात ’जिंदगी एक सफ़र है सुहाना’ या गीताने तर बिनाका टॉपचा बहुमान मिळाला. हॅंडसम राजेश सोबत कोवळी हेमा मालिनी आणि मोटरसायकलवरून केलेली नरीमन पॉंईंट, गेटवे ची सफर रोमहर्षक ठरली. कल्याणजी आनंदजी यांना राजेशसोबत फारसे सिनेमे करायला मिळाले नाही पण जे मिळाले त्यात होता ’सफर’(१९७० दि. असित सेन) यातील ’जिंदगी का सफर है ये कैसा सफर’ आणि ’जीवनसे भरी तेरी ऑंखे मजबूर करे जीने के लिये’ कोण विसरू शकेल?

सच्चा झूठा (मेरी प्यारी बहनीया बनेगी , दिलको देखो चे हरान देखो) जोरू का गुलाम (फिर कौनसी जगह है खाली) मर्यादा (चुपकेसे दिल दे नैदे शोर मच जायेगा) छोटी बहू (हेरे कन्हैया) ही गाणी काळाशी सुसंगत अशीच होती. एल.पी यांनी देखील राजेश करीता किशोरचा स्वर वापरला. यश चोप्रांच्या ’दाग’ (१९७३) सिनेमात ’मेरे दिलमे आज क्या है तू कहे तो मै बतादू’, ’हम और तुम तुम और हम खुष है यूं आज मिलके ’ ’अब चाहे मां रूठे या बाबा’ या गीताने युवा पिढी निहायत खूष झाली होती. १९६९ च्या ’दो रस्ते’(दि. राज खोसला) तील ’खिजाके फूल पे आती कभी बहार नही’ या किशोरच्या एकमेव गीताने रसिकांच्या दिलात घर केले.

सच्चाई छुप नही सकती , मैने देखा तुने देखा (दुश्मन), सुनजा आ ठंडी हवा (हाथी मेरे साथी), मेरे दीवानेपन की भी दवा नही (मेह्बूब की मेहंदी) यहां वहां सारे जहां मे तेरा , अच्छा तो हम चलते है (आन मिलो सजना) यार हमारी बात सुनो , ये जो पब्लिक है (रोटी) हलकीसी कसकमसक (अमरदीप) तसेच बुजुर्ग संगीतकार सचिनदा यांच्या संगीतात ’ये लाल रंग कब मुझे छोडेगा, जा जा मुझे ना अब याद आ तू (प्रेम नगर), राम करे बबुआ (अनुरोध) ही गाणी संस्मरणीय ठरली. पंचमच्या संगीतात ’करवटे बदलती रहे सारी रत हम, सुनो कहा सुना, जिंदगी के सफरमे गुजर जाते है जो मुकाम’(आप की कसम) रोना कभी नही रोना, कजरा लगा के (अपना देश) मै एक चोर तू मेरी रानी (राजा रानी) ऒ मेरे दिलके चैन, चला जाता हूं ,दिवाना करके छोडोगे (मेरे जीवन साथी) भीगी भीगी रातोमे, एक अजनबी हसिना से, हम दोनो दो प्रेमी (अजनबी)

काही संगीतकारांनी मात्र जाणीवपूर्वक राजेश करीता अन्य गायकाचा स्वर वापरला अन हा प्रयोगही यशस्वी ठरला. सलिल चौधरीनी ’आनंद’ (१९७० दि. ॠषिकेष मुखर्जी) सिनेमात मुकेश (मैने तेरे लियेही सात रंगके, कहीं दूर जब दिन ढल जाये) मन्ना डे (जिंदगी कैसी ये पहेली हाय) वापरला. पुढे मन्नाडेचा स्वर राजेशकरीता तुम बिन जीवन कैस जीवन (बावर्ची – मदन मोहन), हंसने की चाहने इतना मुझे रुलाया है (अविष्कार –  कन्नू रॉय), मुकेशचा स्वर ’जिस गलीमे तेर घर न हो बलमा (कटी पतंग – आर . डी) अन्वरचा आवाज ’हमसे क्या भूल हुयी जो ये सजा हमको मिली’ ’तेरी आंखोकी चाहत मे (जनता हवालदार-राजेश रोशन) सत्तरच्या दशकात रफ़ीचा आवाजही राजेश करीता फ़िट बसला. छुप गये तारे नजारे वोय क्या बात हो गयी , ये रेशमी जुल्फे (दो रास्ते-एलपी),कोई नजराना लेकर आया है (आन मिलो सजना), ये जो चिलमन है , इतना तो याद है मुझे (मेह्बूब की मेहन्दी) नफरतकी दुनिया छोडके (हाथी मेरे साथी) सर्व एल.पी आणि गुलाबी आंखे जो तेरी देखी (द ट्रेन- आरडी)!

राजेशच्या सुपरस्टार पदाच्या कालावधीतील (१९६९-१९७४) गीतांचाच इथे प्रामुख्याने आढावा घेतला आहे. त्यानंतरही अवतार, थोडी सी बेवफ़ाई, दर्द, सौतन, आखिर क्यूं, धनवान सिनेमातून तो सुखावह दर्शन देतच होता. त्याची गाणीदेखील तितकीच आल्हाद देणारीहोती. पण तो जमाना अ‍ॅक्शनचा होता. सुपरस्टारपदावरून पायउतार झाल्यावरही तो रसिकांच्या गळयतील ताईत राहिला. हेच त्याच्या यशाचं गमक होतं!

हेही वाचा – ये राते नयी पुरानी…रिटा भादुरी

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.