– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Maharashtra Shahir Movie Review

कथानक थोडक्यात – साताऱ्यातील पसरणी गावचा, सर्वांचा लाडका बालगायक किस्ना ते महाराष्ट्र शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे या तब्बल ७ ते ८ दशकांच्या प्रवासातील मैलाचे दगड ठरलेले प्रसंग दर्शविणारा भावस्पर्शी प्रयत्न म्हणजे या चित्रपटाचे कथानक. अंकुश चौधरीने यात शाहिरांची भूमिका साकारली आहे. ‘गाण्याने कोणाचं पोट भरतं का?’ या आपल्या मतावर ठाम असणारी किस्ना ची आई त्याने गाणे सोडावे म्हणून दोनदा प्रयत्न करते. एकदा लहानपणी त्याला त्याच्या मामाच्या गावी, अमळनेर ला पाठवते व दुसऱ्यांदा तरुणवयात मुंबईला नौकरीसाठी. संयोगाने या दोन्ही गावातून कृष्णाला परत आपल्या गावी आणणारी व गाण्याकडे परत नेणारी एकच व्यक्ती ठरते व ती म्हणजे साने गुरुजी. कीर्तन, भजन, लोकगीते गात पुढे जाणाऱ्या कृष्णाच्या आयुष्यात एके दिवशी भानुमती (सना केदार शिंदे) येते. भानुमती एक उत्कृष्ट गीतकार असते. भानुमतीचे शब्द व कृष्णाचा आवाज असा सहजीवनाचा संगीतमय प्रवास इथून पुढे सुरू होतो. सोबतीला मित्रपरिवारही असतो. साधारण १९४६ चा काळ. स्वातंत्र्यसंग्रामचा अखेरचा टप्पा असतो. भानुमतीचे अर्थपूर्ण व प्रेरणादायी शब्द व कृष्णाचा दमदार आवाज याद्वारे दोघेही स्वातंत्र्यसंग्राम आंदोलनात उडी घेतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढे हा प्रवास लोक गीतांच्या आणि नाटकांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ७० च्या दशकातील मुंबईतील मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई इथपर्यंत शाहिरांनी कसा केला याचे दर्शन आपल्याला बघायला मिळते. या घटनाक्रमात वैयक्तिक आयुष्यात सुद्धा शाहिरांना बरेच धक्के बसतात. पत्नी भानुमती सोबत झालेली फारकत हा त्यातील मोठा धक्का ठरतो. नंतर ८० च्या दशकात नाटकांना ओसरत चाललेला प्रतिसाद, त्यातून सोसावी लागलेली आर्थिक तंगी या सर्वांवर वर मात करत नव्या पिढीच्या म्हणजेच मुलींच्या सहकार्याने उचललेले महाराष्ट्राची लोकधारा चे शिवधनुष्य इथपर्यंतचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो.

काय विशेष?- बरंच काही. दिग्दर्शन शाहिरांचा नातू (कन्या यशोधरा शिंदे यांचा मुलगा) व सुविख्यात दिग्दर्शक केदार शिंदे याचे आहे. शाहिरांच्या कन्या वसुंधरा साबळे यांनी लिहिलेल्या कथेला पटकथेत रूपांतरित केले आहे प्रतिमा कुलकर्णी आणि ओंकार दत्त यांनी. शाहिरांचा चरित्रपट रसिकांसमोर मांडायचा म्हटल्यावर सर्वात महत्वाची व आव्हानात्मक बाब ठरते ती म्हणजे संगीत. कारण गीत-संगीत हा शाहिरांचा प्राण. त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले लोकसंगीत. अजय-अतुल या प्रतिभाशाली जोडीने चित्रपटाच्या संगीताचे शिवधनुष्य उचलले आहे. साधारण १९३३ ते १९८३-८८ असा ५०/५५ वर्षांचा कालखंड दर्शविणाऱ्या पटकथेची लांबी केवळ अडीच तासांची आहे हे विशेष. याबद्दल पटकथाकारांचे कौतुक करावयास हवे. शाहिरांच्या आयुष्यातील निवडक महत्वाचे असे प्रसंग कसे जास्तीत जास्त नाट्यमय व मनोरंजक होतील याची काळजी कथा पटकथाकारांनी घेतली आहे. जोडीला केदार शिंदे यांचे दिग्दर्शन सुद्धा मस्तच.

मध्यंतरापर्यंत तर चित्रपट तुम्हाला पुरता बांधून टाकतो. पण खरी मजा आणली आहे ‘अजय-अतुल’ या जोडीने. हे शिवधनुष्य केवळ आणि केवळ हीच जोडी पेलू शकते याची खात्री चित्रपट संपल्यावर तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. ‘गाऊ नको किस्ना’ आणि ‘बहरला हा मधुमास’ ही गाणी तर निव्वळ अप्रतिम. सोबत ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘अंबाबाई गोंधळाला ये’, ‘जेजुरीच्या खंडेराया’, ‘विंचू चावला’, ‘पाऊल थकलं नाही’ इत्यादी व इतर सर्वच गाणी ऐकतांना आणि पडद्यावर बघतांना रोमांच उभे राहतात इतकी ती जमून आली आहेत. अभिनयाच्या बाबतीत अंकुश चौधरीला हॅट्स ऑफ. त्याने शाहीर साबळे नुसते साकारले नाहीत तर ती भूमिका तो अक्षरशः जगला आहे असे म्हणावे लागेल. सना केदार शिंदे ने साकारलेली भानुमती सुद्धा तितकीच छान. तब्बल ५ दशकांची पार्श्वभूमी असलेली पटकथा असल्याने, घडत जाणारी स्थित्यंतरे कला दिग्दर्शक एकनाथ कदम, वेशभूषाकार युगेशा ओंकार, आणि रंगभूषाकार जगदीश येरे आणि विक्रम गायकवाड यांनी हुबेहूब त्या काळातील कशी दिसतील यासाठी बराच अभ्यास केल्याचे जाणवते. वासुदेव राणे यांच्या छायांकनात चित्रपटाची प्रत्येक फ्रेम उठावदार झाली आहे.

नावीन्य काय?- महाराष्ट्राच्या अस्मितेचे, संस्कृतीचे, लोककलेचे आणि पुरोगामित्वाचे प्रतीक असलेले महाराष्ट्र भूषण शाहीर साबळे यांचा जीवनपट यातच सर्व नावीन्य दडले आहे. नाही का?

कुठे कमी पडतो? – मध्यंतरानंतर काही काळाने चित्रपट संथ होतो. साधारणतः प्री-क्लायमॅक्स म्हणजे चित्रपट संपण्याच्या १५-२० मिनिटांपूर्वीचा भाग. शाहिरांच्या आयुष्यात उत्तरार्धात आलेला ओसरणीचा कालखंड दाखविताना चित्रपटावरची पकड सैल झाल्याचे जाणवते.

पहावा का?- अर्थातच. तोही चित्रपटगृहात जाऊन. कारण हा खऱ्या अर्थाने आपल्या मराठी मातीचा सिनेमा आहे.

स्टार रेटींग – ३.५ स्टार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment