– अजिंक्य उजळंबकर 

एखादा चित्रपट त्यातील मुख्य कलाकारांपैकी एकाच कलाकाराला अशी काही ओळख मिळवून देतो की जरी तो चित्रपट त्याच्या करिअरचा पहिला नसला आणि जरी त्याला फारसे व्यवसायिक यश अथवा समीक्षकांचे कौतुक मिळाले नसले तरी खऱ्या अर्थाने त्या कलाकारासाठी ब्रेक देणारा ठरतो. नेटफ्लिक्सवर (Netflix film Haseen Dillruba)  काल प्रदर्शित झालेला ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात तापसी पन्नू (Taapsee Pannu), विक्रान्त मासी (Vikrant Massey) आणि हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०१७ साली कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित ‘अ डेथ इन दि गुंज’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी बेस्ट ऍक्टर क्रिटिक्स चे फिल्मफेअर नामांकन मिळवूनही विक्रांत मासी या कलाकाराची फारशी नोंद घेतली गेली नाही. या वर्षीचा पहिला प्रदर्शित चित्रपट रामप्रसाद की तेहरवी, अतिशय उत्तम दर्जाचा असूनही कोरोनाच्या गोंधळात दुर्लक्षित झाला ज्यात विक्रांत ची छोटीशी भूमिका होती. पण आता मात्र विक्रांत ची प्रतीक्षा संपेल असे दिसतेय. ‘हसीन दिलरुबा’  चित्रपटाचे प्लस पॉईंट आहेत तसे मायनस पण आहेत.  पण एक गोष्ट नक्की. प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांनाही आवडेल अशी भूमिका यात विक्रांतने केली आहे. चित्रपटाचा काय निकाल लागेल तो लागेल पण चित्रपटातील त्याची पत्नी राणी च्या  प्रेमात ‘पागलपन की हद पार करणारा’ विक्रांतने रंगविलेला रिशू मात्र झकास जमलाय यात वाद नाही. आणि त्यामुळे हसीन दिलरुबा हा विक्रांतसाठी खऱ्या अर्थाने ब्रेक देणारा चित्रपट ठरेल हे नक्की. (Movie Review Haseen Dillruba) 

आपल्या पूर्व आयुष्यात एक-दोन अफेअर असलेल्या, दिल्लीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय पण डोळ्यात रंगबिरंगी स्वप्ने असलेल्या राणी (तापसी पन्नू) चे लग्न ठरते ऋषभ सक्सेना उर्फ रिशू (विक्रांत मासी) या ज्वालापूर नामक एका छोट्या शहरात राहणाऱ्या सध्या-भोळ्या व प्रामाणिक इंजिनियर तरुणाशी. रिशूचे पहिल्याच भेटीत राणीवर जीवापाड प्रेम बसते त्यामुळे आई-वडिलांच्या अपेक्षांनुसार राणीला कुठलेच घर-काम, स्वयंपाक वैगरे येत नसूनही रिशू तिला सांभाळून घेत असतो. उलट रिशूची आई मात्र या सर्व प्रकारावर खूप नाराज असते. रिशू आणि राणीच्या एकमेकांमधील अत्यंत खाजगी गोष्टीही रानी तिच्या घरी आईला फोनवर सांगताना रिशू ऐकतो व त्यामुळे कमालीचा नाराज होतो. या घटनेने राणी आणि रिशू मध्ये दुरावा निर्माण होतो. याचदरम्यान रिशूच्या घरी येतो त्याचा चुलत भाऊ नील (हर्षवर्धन राणे). नवऱ्यापासून दुरावलेल्या राणी आणि नील मध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होते. राणी एकेदिवशी नील ला ‘मी तुझ्यासाठी घर सोडू शकते’ अशी कबुलीही देते पण ती ऐकून नील तिथून पळ काढतो. राणीला आपली चूक लक्षात आल्यावर या सर्व प्रकारची ती रिशूकडे कबुली देते मात्र त्यांच्यातील दुरावा यामुळे अजूनच वाढतो. ‘तू माझ्या आयुष्यातून निघून जा’ असे रिशूने सांगूनही पश्चातापाने ग्रासलेली राणी काही त्याला सोडत नाही व सातत्याने त्याची माफी मागत असते. राणीला खरंच पश्चाताप होतोय हे एके दिवशी रिशूला लक्षात येते. हळूहळू सर्व सुरळीत होत असते व नेमका तेंव्हाच नील पुन्हा येतो. रिशू राणीला मला नील सोबत काही बोलायचे आहे तू बाहेर जाऊन ये म्हणून सांगतो आणि जेंव्हा बाहेरून राणी परतते तेंव्हा घरात झालेल्या गॅस सिलेंडर च्या स्फोटात रिशूच्या शरीराचे ओळखू न येण्यासारखे अवशेष राणीला सापडतात. इथून पुढे इन्स्पेक्टर किशोर रावत (आदित्य श्रीवास्तव) राणीला रिशूच्या हत्येची मुख्य सूत्रधार समजून तिची चौकशी सुरु करतात. चौकशी अंती जे धक्कादायक घटनाचक्र समोर येते ते इथे सांगणे उचित नव्हे. 

चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवाद या तीनही जबाबदाऱ्या प्रसिद्ध लेखिका कनिका धिल्लों यांनी सांभाळल्या आहेत. मनमर्ज़ियाँ, केदारनाथ, जजमेंटल है क्या हे याआधीचे कनिका यांचे कथा-पटकथा असलेले चित्रपट होते. स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. दिग्दर्शक विनील मॅथ्यू यांचा २०१४ चा हंसी तो फंसी नंतर आलेला हा दुसराच चित्रपट. हसीन दिलरुबा च्या कथेच्या केंद्रस्थानी असलेली व्यक्तिरेखा म्हणजे राणी. कनिकाची मुळात ही व्यक्तिरेखा लिहितांना झालेली गफलत हाच चित्रपटाचा मोठा ड्रॉबॅक आहे. नवऱ्याकडून हवे ते सुख मिळत नसतांना लगेचच म्हणजे लग्नाच्या काही दिवसांतच, दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होणारी राणी, त्या दुसऱ्या पुरुषाने पळ काढल्यानंतर, लगेच झालेल्या चुकीची नवऱ्याकडे कबुली देते आणि तिला काही दिवसातच आपला नवरा देव-माणूस असल्याचा साक्षात्कार होतो..इतका की त्यासाठी ती कुठलेही बलिदान देण्यासाठी तयार होते. बरं रिशू सुद्धा सर्व विसरून तिला पुन्हा स्वीकारतो? हे सर्व न पटण्यासारखे आहे. बरं त्यात भर चित्रपटाच्या अखेरी ज्या प्रकारे कथेला वळण देण्यात आले आहे तेसुद्धा पचनी पडत नाही. एकमेकांचा विश्वास गमावलेले नवरा-बायको अखेरीस एकमेकांसाठी इतके सर्व कसे काय करू शकतात हे काही लॉजिकली लेखिकेला पटवून देता आलेले नाही. असे असले तरी पटकथा अत्यंत वेगाने पुढे सरकत असल्याने प्रेक्षकाला या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास फारसा वेळच मिळत नाही ही चित्रपटाची जमेची बाजू होय. इथे लेखक कमी पडला असला तरी दिग्दर्शकाने सावरून घेतले आहे. छायाचित्रण, पार्श्वसंगीत व इतर तांत्रिक बाजू व्यवस्थित. 

Haseen Dillruba Movie Review

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सिनेमाचा विनर आहे विक्रांत मासी. हसीन दिलरुबा हा विक्रांत चा खऱ्या अर्थाने ब्रेक ठरेल. त्याने रिशू ची भूमिका अत्यंत परिणामकारक रित्या साकारली आहे. तापसीने राणीच्या भूमिकेला न्याय दिला आहे. हर्षवर्धन राणे मात्र खूपच कमी पडलाय. इतर कलाकारांमध्ये आदित्य श्रीवास्तव यांनी रंगविलेले इन्स्पेक्टर आणि रिशू च्या आईच्या भूमिकेत विनोद निर्माण करणारी अल्का कौशल यांच्या भूमिका चांगल्या जमल्या आहेत. गीत-संगीताच्या बाबतीत चित्रपट कमी पडतो. “मिला यूं” हे एकमेव गीत वगळता संगीतकार अमित त्रिवेदी फारसा परिणाम साधू शकलेला नाही. 

वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर लॉजिकल रिजनिंग बाजूला ठेवण्याची तयारी असेल तर दोन-सव्वा दोन तासाची ही करमणूक एकदा बघण्यास हरकत नाही. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.