– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Movie Review Sooryavanshi; बरोबर २ वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१९ मध्ये अख्खे शूटिंग संपवून मार्च २०२० मध्ये प्रदर्शनाच्या तारखेसह सज्ज असलेला सूर्यवंशी हा सिनेमा अखेरीस आज प्रदर्शित झाला. तब्बल दीड वर्षांपेक्षाही जास्त काळ ओटीटी माध्यमांच्या प्रलोभनाला न जुमानता केवळ थिएटर प्रदर्शनासाठी थांबलेल्या दोन मोठ्या सिनेमांपैकी एक म्हणजे सूर्यवंशी. याकरिता निर्माता करण जोहर, अक्षय कुमार व रोहित शेट्टी यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कोवीड महामारीने डबघाईस आलेल्या थिएटर उद्योगास चालना मिळावी या एकमेव कारणासाठी, स्वतःची करोडो रुपयांची गुंतवणूक इतक्या मोठ्या कालावधीसाठी होल्ड करणे हे खरोखर मोठ्या संयमाचे काम आहे. असे धाडस दाखविणारा दुसरा निर्माता म्हणजे रणवीर सिंग अभिनीत ८३ या सिनेमाचा कबीर खान. ‘सूर्यवंशी’ च्या नंतर शूटिंग सुरु होऊन संपलेले कित्येक सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित होऊन मोकळे झाले पण ‘सूर्यवंशी’ व ‘८३’ ने ती वाट अखेरपर्यंत धरली नाही. ती वाट धरणे व्यावहारिक दृष्ट्या चुकीचे निश्चितच नव्हते परंतु थिएटर उद्योगावर अवलंबून असलेल्या सर्व मंडळींचा विचार या लोकांनी केला हे जास्त कौतुकास्पद आहे. असो. आता वळू यात ‘सूर्यवंशी’ कडे. कथेत  कवडीचेही नावीन्य नसतांना, केवळ विनोद व ऍक्शन यांच्या आधारावर उभारलेली सुपरफास्ट पेस्ड स्टायलिश पटकथा म्हणजे रोहित शेट्टीचा सिनेमा. त्याला वर दिलेली संगीताची व फोटोग्राफीची फोडणी. विनोदाच्या आधारावर उभारलेली ‘गोलमाल’ सिरीज असो की मग ऍक्शन च्या जोरावर सिंघम/सिम्बा व आता आलेले ‘सूर्यवंशी’ नावाचे पोलिसी जग. 

७० च्या दशकात मनमोहन देसाईच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसायचे परंतु त्याकाळातील प्रेक्षकांचे कमाल मनोरंजन होईल याची पुरेपूर काळजी मनमोहन देसाई घ्यायचे. रोहित शेट्टीला पण सध्याच्या प्रेक्षकांची टाईम पास करमणुकीची नस अचूक सापडली आहे. सिंघम किंवा सिम्बा प्रमाणेच सूर्यवंशी मध्येही व्हिलन चे दहशतवादी मनसुबे उधळणारा पोलीस हिरो यापेक्षा दुसरे काही नाही. एवढेच कशाला कथेच्या सादरीकरणातही अजिबात नावीन्य नाही. वीर सूर्यवंशी (अक्षय कुमार) हा मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे नेतृत्व करीत असतो. पाकिस्तानी दहशतवादी उमर हाफीज (जॅकी श्रॉफ), बिलाल अहमद (कुमुद मिश्रा), रियाझ हाफीज (अभिमन्यू सिंग) हे तीघे त्यांचा भारतातील साथीदार कादर उस्मानी (गुलशन ग्रोव्हर) च्या मदतीने मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला प्लॅन करतात. आता हा त्यांचा प्लॅन सूर्यवंशी कसा उधळतो असा चावून चोथा झालेला कथेचा विषय.

मग आता रोहितने यात अक्षय कुमार च्या काहीशा कॉमिक व फुल्ल टू ऍक्शन इमेज ला अनुसरून लिहिलेली पटकथा व संवाद यामुळे रटाळ कथाही तुमची बऱ्यापैकी करमणूक करण्यात यशस्वी होते. वीर सूर्यवंशी ला आपले सहकारी व इतर आजूबाजूंच्या लोकांची नावे लक्षात ना राहण्याचा आजार असल्याने होणारी विनोद निर्मिती इथे सामान्य प्रेक्षकांची करमणूक करण्यात यशस्वी होते. चित्रपट बघतांना अक्षयच्याच हॉलिडे/बेबी (स्लीपर सेल, दहशतवाद विरोधी पथक/मुंबईवर होणारा बाँम्ब हल्ला इत्यादी)या सिनेमांची अधूनमधून आठवण येते. चित्रपटाची लांबी अडीच तासांवरून कमी करून दोन-सव्वा दोन तासांवर गुंडाळता येणे सहज शक्य होते. पण ते न केल्याने मध्यंतरानंतर बऱ्याचदा चित्रपट रेंगाळतो. खासकरून कतरिना सोबत घातलेले टीप टीप बरसा पानी हे गाणे. ओव्हरऑल कतरिना या पात्राभोवती असलेले सीन्स उगाचच ताणल्यासारखे व कंटाळवाणे होतात. असो.

संगीताच्या डिपार्टमेंट मध्ये (संगीतकार तनिष्क बागची) विशेष उल्लेखनीय असे काहीही नाही. ऍक्शन नेहमीप्रमाणेच रोहित शेट्टी सिग्नेचर असलेली. म्हणजे प्रत्येक ऍक्शन मध्ये एकतरी गाडी हवेत उडालीच पाहिजे अशी. काहीशा ढिसाळ पटकथेला आधार देणाऱ्या प्रभावी संवादांचा (फरहाद सामजी, संचित बेंद्रे, विधी घोडगडणकर) व पार्श्वसंगीताचा (अनिल मोहिले व एस थमन) इथे जरूर उल्लेख करावा लागेल. दिग्दर्शनात रोहितने वेगळे काही जरी दिलेले नसले तरी “रोहित शेट्टीचा चित्रपट” या ट्रेडमार्क ला धक्का लागणार नाही याची किमान काळजी घेतली आहे. इतर कलावंतांपैकी अभिमन्यू सिंगचा अभिनय प्रभावी झाला आहे. 

माझ्यासारखे असे असंख्य सिनेरसिक आहेत ज्यांनी तब्बल २१-२२ महिन्यांपासून थिएटर ची पायरी नाही चढलेली. कारण जानेवारी २०२० मध्ये आलेल्या तान्हाजी नंतर मार्च मध्ये लॉक डाऊन सुरु झाले. मध्यंतरी काही काळ (पहिली लाट ओसरल्या नंतर) थिएटर उघडली होती परंतु दाखवले जाणारे सिनेमे फारसे विशेष नव्हते ज्यांच्यासाठी थिएटर मध्ये जाण्याची जोखीम पत्करावी. आता बऱ्यापैकी वातावरण निवळले आहे. दिवाळीचा मौसम पण आहे. बिग बजेट व मोठ्या पडद्यावर आनंद घेता यावा असे बरेच सिनेमे पण लाईनीत आहेत. सूर्यवंशी ने त्याचा श्रीगणेशा करण्यास हरकत नाही.

मौका भी है, दस्तूर भी है! हॅप्पी दिवाली. 

इतर लेटेस्ट हिंदी सिनेमांच्या रिव्युहज साठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Anand
    On November 6, 2021 7:12 am 0Likes

    Thank you. Apt review.

Leave a comment