© विवेक पुणतांबेकर

रेडिओवर जुनी गाणी लागली की सिनेसंगीताचा सुवर्ण काळ आठवतो. सिनेमाला वाचा फुटल्यापासून १९७० सालापर्यंत एकूण १२५ संगीतकारांचे योगदान यात आहे. अनेकांची वाटचाल आधी वादक, मग सहाय्यक आणि संगीतकार अशीच झालेली आहे. कलेचे माहेरघर असलेल्या गोवा येथून आलेल्या वादकांनी हिंदी सिनेमासंगीत समृध्द केले. यातले फार थोडे स्वतंत्रपणे संगीतकार बनले. अश्याच एका कलाकाराची कारकिर्द उलगडण्याचा हा अल्पसा प्रयत्न. दत्ताराम वाडकरांचे (Music Composer Dattaram Wadkar) कुटुंब मूळचे गोव्याचे. पोर्तुगिज राजवटीत सावंतवाडी ला स्थलांतरीत झाले. दत्ताराम वाडकरांचा जन्म १९२९ सालचा. १९४२ साली वाडकर कुटुंब मुंबईत आले. ठाकुरद्वार ला एका चाळीत रहात होते. दत्ताराम ना अभ्यासात फारशी गोडी नव्हती. त्यांच्या आईला गाण्याची आवड होती. हौशी गायिका होती. एका गुरुवारी ती दत्ताराम ना आपले गुरु पंढरी नागेशकर यांच्याकडे घेऊन गेली. ते स्वतः उत्तम ज्योतिषी होते. त्यांनी दत्ताराम चा हात पाहून भविष्य सांगितले की हा उत्तम वादक बनेल.

गुरु पौर्णिमेला मी याला गंडा बाधून तबला शिकवायला सुरुवात करीन. त्या प्रमाणे दत्ताराम नीं त्यांच्याकडे तबला शिकायला सुरुवात केली. नंतर यशवंत केरकरांकडे ते शिकायला लागले. यशवंत केरकर सिनेमात वाजवात. केरकरांनी दत्ताराम ना संगीतकार सज्जाद हुसेन कडे पाठवले. दोन वर्षं सज्जाद कडे काम केल्यावर ती नोकरी संपली. काम शोधण्यासाठी स्टुडिओच्या चकरा मारायला सुरुवात झाली. दत्ताराम ना व्यायामाची आवड होती. व्यायामशाळेत नियमित जात. तिथे उस्तादांनी तबला आणला होता. फावल्या वेळात दत्ताराम तबला वाजवत. एके दिवशी संगीतकार शंकरसिंग रघुवंशी (शंकर जयकिशन जोडी मधले) व्यायामशाळेत आले. त्यांनाही व्यायामाची आवड होतीच. व्यायाम संपल्यावर त्यांची नजर तबल्यावर गेली. त्यांचे तबला वादन ऐकून दत्ताराम नी दिलेली दाद ऐकल्यावर शंकर नी त्यांना बोलावले. ओळख करुन घेतली. दत्ताराम ना तबला वाजवायला सांगितला. तबला वादन ऐकून खुश झालेल्या शंकर नी त्यांना पृथ्वी थिएटर्स मध्ये नेले. त्यांच्या शिफारसीवरुन पृथ्वीराज नी दत्ताराम ना नोकरीवर ठेवले.

पृथ्वी थिएटर्स मध्ये राम गांगुली, शंकर जयकिशन, राजकपूर, सप्रू, हसरत जयपुरी यांच्यांबरोबर दत्ताराम यांची दोस्ती जमली. त्या वेळी नाटकाच्या मध्यंतरात रेकाॅर्ड लावत नसत. त्या ऐवजी राम गांगुली सतार वाजवत. रामलाल सनई वाजवत आणि शंकरजी तबला वाजवत. नंतर दत्ताराम तबला वाजवायला लागले. याच सुमारास ‘आग’ सिनेमाची निर्मीती राज कपूर नी केली. अनुभवी संगीतकार म्हणून राम गांगूलीकडे संगीताची जवाबदारी दिली. ‘बरसात’ चे संगीत शंकर जयकिशन कडे आले आणि इथेच दत्ताराम आर.के. फिल्मस् मध्ये सामिल झाले. ‘बरसात’ च्या यशाने राजकपूर आणि त्यांची टीम लोकप्रिय झाली. इंपेरियल थिएटरवर ‘बरसात’ च्या टीम ला पहायला गर्दी जमायची. यात दत्ताराम ना ओळखणारे दिसले की दत्ताराम खुशीत येत. ‘बरसात’ मध्ये वाजवायची संधी मात्र दत्ताराम ना मिळाली नाही. तो योग ‘आवारा’ च्या वेळी आला. ‘एक बेवफा से प्यार किया’ गाण्याचे रेकाॅर्डिंग फेमस मध्ये व्हायचे होते. सगळे जमले होते पण ढोलक वादक पुण्यवान आले नव्हते. त्यांचा संपर्क पण होत नव्हता कारण आदल्या दिवशी चाळीत झालेल्या भांडणात गैरसमजाने पोलीसांनी त्यांना पकडले होते. रेकाॅर्डिंग खोळंबले. शंकर नी राज कपूरना सांगितले दत्तू बजायेगा. दत्ताराम नी वाजवलेला ठेका ऐकून राज कपूर खुश झाले. या नंतर ‘आह’ मधल्या ‘राजा की आयेगी बारात’ या गाण्यात तसेच ‘श्री ४२०’ मध्ये ‘इंचक दाना पिंचक दाना’ आणि ‘प्यार हुआ इकरार हुआ’ गाण्यात दत्ताराम नी ढोलक वाजवला. हा त्यांचा ठेका ‘दत्तू ठेका’ म्हणून लोकप्रिय झाला.

आर के फिल्म मधले ते दिवस भारलेले होते. यातल्या अनेक गोष्टींचे साक्षीदार दत्ताराम होते. राज कपूर चतुरस्थ होते. संगीताची जाण तर उत्तम होतीच. पण अनेक गाण्यांचे मुखडे पण त्यांनीच सुचवले होते. उदा. ‘श्री ४२०’ मधल्या ‘रमय्या वस्तावय्या’ आणि ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यांचे मुखडे त्यांचे होते. एकदा आर.के. ची टीम राज कपूर यांच्या खडाळ्याच्या बंगल्यावर चालली होती. गाडीत पुढे दत्ताराम बसले होते. चेंबूरमध्ये नवीन बांधकामे सुरु होती. दत्ताराम सारखे मागे वळून पहात होते. शैलेंद्र मिस्कीलपणे म्हणाले ‘मुड मुड के क्या देख रहा है दत्तू ?’ इथेच त्यांना सुचले ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’. ‘श्री ४२०’ च्या लोकप्रिय गाण्याचा जन्म असा झाला.

‘आवारा’ चे स्वप्नदृश्य रेकाॅर्ड होताना राज कपूरना जाणवले की मनासारखा ठेका येत नाही. रेकाॅर्डिंग थांबवले. दत्ताराम नी, शंकर जीं नी वाजवून पण त्यांचे समाधान होईना. फ्लुटीस्ट सुमंत राज नी लाला गंगावणे यांचे नाव सुचवले. लाला गंगावणे कोण हे राज कपूर ना माहित नव्हते. दत्ताराम नी सांगितले लाला तमाशात ढोलकी उत्तम वाजवतात. राज कपूरनी सांगितले माझी गाडी घेऊन जा आणि त्यांना आणा. रात्री १२ नंतर लाला आले कारण आधी ते तमाशा वाजवायला गेले होते. शंकरजींनी ठेका समजावला. रिहर्सल नंतर लालांनी ढोलकवर मारलेली थाप ऐकून खुश झालेल्या राज कपूर नी त्यांना शंभर रुपये बक्षिस दिले. घरी परत गेलेल्या लतादिदींना परत बोलावले आणि गाण्याचा टेक ओके झाला तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. हे गाणे होते ‘घर आया मेरा परदेसी’. दत्ताराम नी आठवणीत सांगितले आहे असे रेकाॅर्डिंग मी परत कधीच अनुभवले नाही. लाला गंगावणे यांच्या आगमनानंतरच ढोलक चे महत्व सिनेसंगीताला जाणवले. लाला आणि दत्ताराम यांच्या जुगलबंदीचा आस्वाद ‘जिस देश मे गंगा बहती है’ च्या गाण्यात जाणवतो.

आर.के. फिल्मस् तर्फे एक बाल चित्रपट तयार करत होता. यात राज कपूर दिग्दर्शन किंवा अभिनय करणार नव्हते. फक्त निर्मीती खर्च त्यांचा होता. हा चित्रपट होता ‘अब दिल्ली दूर नही’. या साठी शंकर जीं नी संगीतकार म्हणून दत्ताराम चे नाव सुचवले. त्यांनी राजकपूर ना सांगितले या साठी दत्ताराम ना लागेल ती मदत आम्ही करु. दत्ताराम नी पहिली चाल लावली ‘जीयो लाल मेरे तुम’ गाण्याला राज कपूर नी विचारले कोण गाणार??? दत्ताराम म्हणले अर्थातच लतादिदी. राज कपूर नी होकार दिला. यानंतर चे ‘यह चमन हमारा अपना है’ आशाताईंच्या आवाजात रेकाॅर्ड झाले. ‘चून चून करती आयी चीडीया’ गाण्याची चाल ऐकताक्षणीच राज कपूर म्हणले सगळी गाणी हिट होणारच. तसेच झाले. जरी हा सिनेमा विस्मृतीत गेला तरी गाणी लोकप्रिय झाली.

या नंतर दत्ताराम ना बाहेरचा सिनेमा संगीत करायला मिळाला निर्माते महिपतराय शहा यांचा ‘परवरिश’. आधी हा सिनेमा लो बजेट मध्ये निर्माण होणार होता. पण कथा ऐककल्यावर दत्ताराम नी राज कपूर चे नाव सुचवले. राज कपूर नी होकार दिला. सगळी गाणी हसरत जयपुरी यांची होती. नर्गिस आर.के. फिल्मस् मधून गेल्यावर राज कपूरनी तिला उद्देशून अनेक गाणी हसरतकडून लिहून घेतली होती. त्यातल्याच ‘आंसू भरी है यह जीवन की राहे’ गाण्याला दत्ताराम नी चाल लावली. मुकेशच्या आवाजात गाणे रेकाॅर्ड होणार होते. त्याच वेळी वादकांचा संप झाला. बरेच दिवस चालला. शेवटी दत्ताराम नी आकाशवाणी चे कलाकार बोलावले आणि रात्री बारा नंतर गाणे रेकाॅर्ड केले. पहाटे टेप राज कपूरकडे पाठवली. राज कपूर आणि मुकेश यांनी अनेकदा ते गाणे परत परत ऐकले.

आपल्या कारकिर्दीत १९ सिनेमांना दत्ताराम नी संगीत दिले. त्यातले परवरिश, कैदी नं ९११, श्रीमान सत्यवादी, डार्क स्ट्रीट, काला आदमी, बालक, संतान, जिंदगी और ख्वाब यातले संगीत अविस्मरणीय होते. संगीतकार बनल्यावर सुध्दा दत्ताराम कधीच विसरले नाहीत की आपण मूळचे वादक आहोत. अनेक संगीतकारांनी अडचणीत असताना बोलावले की ते लगेचच मदतीला जात. ‘मधुमती’ च्या ‘घडी घडी मोरा दिल धडके’ गाण्याच्या रेकाॅर्डिंग ला त्यांचा ढोलकवाला आला नाही. सलील चौधरींचा फोन आल्यावर ‘परवरिश’ ची सिटींग सुरु असताना पण दत्ताराम नी जाऊन ढोलक वाजवला. संगीतकार रोशन यांना पण ‘अजी बस शुक्रीया’ च्या ‘सारी सारी रात तेरी याद’ गाण्याच्या वेळी लगेच मदतीला ते गेले व ठेका त्यांनी वाजवला. रेशमी रुमाल, श्रीमान सत्यवादी, प्यार का मौसम, छाया, बेगुनाह, अनाडी, लाटसाहब, जमीन के तारे, प्यासे पंछी, लव इन टोकियौ अशा अनेक सिनेमात त्यांनी वाजवलेला ठेका विसरणे केवळ अशक्य.

शंकर जयकिशन चे दोन आधारस्तंभ होते दत्ताराम आणि सॅबेस्टियन डिसूझा. दोघेही गोवेकर. शंकर जयकिशन चे संगीत नटवायचे मोठे कार्य या दोघांनी केले. १९४८ ते १९७१ शंकर जयकिशन चे दत्ताराम सहाय्यक होते. शंकरजींशी झालेल्या गैरसमजाने ‘कल आज और कल’ नंतर ते काही काळ लक्ष्मीकांत प्यारेलाल कडे काम करत होते. त्याच वेळी ‘बाॅबी’ चे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल कडे आले. राज कपूर ना त्यांचा संगीताचा आवाका माहित होता. त्यांनी अटच घातली म्युझीक अॅरेंजींग सिर्फ दत्तू करेगा. या मुळेच ‘बाॅबी’ च्या संगीतात शंकर जयकिशन चा भास होतो. ‘सन्यासी’ सिनेमाच्या वेळी दत्ताराम परत शंकरजींचे सहाय्यक बनले.

त्यानंतर बदलत्या परिस्थितीमुळे मुंबई सोडून गोवा येथे ते स्थायिक झाले. शंकर जयकिशन च्या चहात्यांनी चित्रपट अभ्यासक श्री. अशोक राणे यांच्याकडून दत्ताराम यांच्यावर डाॅक्युमेंटरी तयार केली ‘मस्तीभरा है समा’. त्या नंतर काही दिवसातच दत्ताराम यांनी ८ जून २००७ साली या जगाचा निरोप घेतला. परत अशी वादक संगीतकारांची पिढी परत होणार नाही.

Music Composer Dattaram Wadkar

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment