– धनंजय कुलकर्णी

आपल्याकडे सिनेमात ‘अंडर प्ले अ‍ॅक्टिंग करणार्‍या कलावंताला फारसा न्याय मिळत नाही. त्यामुळे मोतीलाल, संजीवकुमार, नसिरूद्दीन शहा, ओम पुरी आणि बलराज सहानी हे पहिल्या फळीचे नायक बनू शकले नाही. बलराज सहानी (Balraj sahni) या कलाकाराचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याच्या सर्वांग सुंदर अभिनयाची दखल आपल्या सिनेसृष्टीने म्हणावी तशी घेतली नाही हे दुर्दैव आहे. बलराजचा अभिनय समकालीन अभिनेत्यांपेक्षा खूप पुढचा होता. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे गरीब व श्रीमंत या दोन्ही व्यक्तिरेखात शोभून दिसायचा. संपूर्ण आयष्य डाव्या विचारसरणीत गेल्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वाला व प्रतिमेला नैसर्गिक बौद्धिक सौंदर्य लाभलं होतं. अशा या महान कलावंताच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्याच्या कलाकृतीचा आढावा.

काही चित्रपट अन् काही व्यक्तिरेखा रसिक मनाच्या खोल गाभार्‍यात कायमचं वास्तव करीत असतात. काळाचं परिमाण त्याला जुनं होऊ देत नाही की, त्या प्रतिमेला छेद देऊ शकत नाही, इतक्या त्या व्यक्तिरेखा मनातील भावनांशी तादात्म्य पावलेल्या असतात. ख्यातनाम बंगाली दिग्दर्शक बिमल रॉय (Bimal Roy) यांच्या ‘दो बिघा जमीन’ (Do Bigha Zameen) मधील शंभू महातो ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते बलराज सहानी यांनी साकारलेली व्यक्तिरेखा अशीच मनाला कोपर्‍यात कायमची वास्तव करणारी आहे. या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम अन् त्यातील बलराज सहानींचा ‘लूक’ अद्याप डोळ्यांपुढे आहे. सार्‍या चित्रपटात तो एक वेदना चेहर्‍यावर घेऊन वावरला. दुष्ट जमीनदार (सप्रू) च्या तावडीतून त्याला आपल्या जमिनीचा दीड एकराचा तुकडा सोडवायचा असतो. याकरिता कोर्टाने फर्मावलेली दोनशे पस्तीस रुपये आठ आण्याची भली मोठी रक्कम (त्याच्या दृष्टीने असलेली!) त्याला तीन महिन्यांत भरावयाची असते. याकरिता तो कलकत्त्याला महानगरीत येऊन रिक्षा ओढू लागतो. शोषित समाजाची होणारी शेकांतिका बलराजने आपल्या समर्थ अभिनयाने सार्थ ठरवली. कोर्टाची दंडाची रक्कम ऐकून हा गरीब/फाटका शेतकरी हतबल होतो. राब राब राबतो. आपल्या दो बिघा जमिनीवर जाऊन ऊर फुटेस्तोवर रडतो अन् म्हणतो, ‘मैने जिंदगी में पचास रुपये कभी एक साथ नहीं देखे तो इतने सारे पैसे कैसे चुकाऊँगा?’ काळजाला डागण्या देणार्‍या या सवालाने बलराज सहानीने तमाम रसिकवर्गाची मने जिंकली! बलराज सहानींसारख्या सर्वांग सुंदर अभिनय करणार्‍या अभिनेत्याची दखल आपल्या चित्रसृष्टीने घेतली नाही हे बलराजपेक्षाही आपलं अधिक दुर्दैव आहे. कारण बलराजचा अभिनयप्रवास हा समकालीन अभिनेत्यांपेक्षा कमालीचा पुढच्या पावलाचा होता. आता चित्रशताब्दीच्या निमित्ताने जी पुस्तकं येताहेत त्यात बलराजच्या अभिनयाचं नव्यानं मूल्यमापन होते आहे. यावरून त्याच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती येऊ शकते. बलराज सहानीच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्याच्या अभिनयाच्या कालखंडाला पुन्हा एकवार उजाळा देऊ.

ऐ मेरे प्यारे वतन

खरं तर बलराज सहानीच्या सशक्त अभिनयाची अनेक उदाहरणं डोळ्यांपुळे असली तरी हवी तितकी लोकमान्यता त्याला लाभली नाही. हवा असलेला ‘लाऊडनेस’ त्याच्या अभिनयात औषधालाही सापडत नाही. तो सदैव अंडरप्ले अ‍ॅक्टिंग करायचा. व्यक्तिरेखेवर कधीही त्याचं व्यक्तिमत्त्व आक्रमण करीत नव्हतं. त्यामुळे त्याची प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी परिपूर्ण वाटायची. (अंडरप्लेचा हाच वारसा पुढे संजीवकुमारने आणि आता ओमपुरी चालवताहेत.) बलराजच्या वाट्याला त्यामुळेच विविधांगी भूमिका आल्या. बलराजचं व्यक्तिमत्त्व तसं कसदार अभिनयाला साजेसंवाटतं. मला राहून राहून वाटतं, बलराज तर हॉलीवूडला गेला असता तर अधिक यशस्वी प्रतिभावंत ठरला असता. अर्थात इथेही तो कमालीचा यशस्वी ठरला यात शंकाच नव्हती. कुठल्याही प्रकारची भूमिका त्याला वर्ज्य नव्हती. चरित्र, अभिनेत्याच्या रूपात तो रसिकांना विशेष आवडला. त्याचा चेहरा, आत्मविश्वास गर्द डोळे, मोठं नाक, रुंद हनुवटी अन् त्यावरील तो सुप्रसिद्ध चामखीळ! यामुळे त्याचा चेहरा जबरदस्त ‘तयारीचा’ वाटायचा. गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या काबुलीवाला (Kabuliwala) चित्रपटातील बलराजची भूमिका अजूनही डोळ्यांपुढे आहे. त्यात त्याने रंगवलेला पठाणी काबुलीवाला, सुका मेवा विकणारा एका छोट्या निरागस चिमुरड्या मुलीच्या प्रेमाचा भुकेला असतो. तीदेखील त्याला ‘काबुलीवाले…’ म्हणून साद द्यायची. या दोघांच्या निर्मळ मैत्रीला ग्रहण लागते. पोलिस काबुलीवाल्याला तुरुंगात टाकतात. चिमुरड्या मुलीच्या हे सर्व आकलनाच्या चिमुरडीच्या आठवणीत आला. दिवस पुढे ढकलत असतो.

गुरुदेवाच्या या कथेला बिमलदानी फारच हृदयस्पर्शी रीतीने फुलवले. बलराज सहानींचा रांगडा पठाण; पण मनाने हळवा असलेला ‘ऐ मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान’ हे गाणं गाणारा काबुलीवाला आजही रसिकांना ओलावतो. शंभू महातोप्रमाणेच त्याची ही व्यक्तिरेखाही बिमलदांच्या परीस्पर्शाने झळाळून निघाली.

विविध अदा

बलराज सहानींसारखा उच्च विद्याविभूषित कलावंत रूपेरी पडद्यावर आला हेच आश्चर्य होतं. इंग्रजी विषयात एम. ए. केल्यानंतर काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. साहित्याची विलक्षण आवड होती. 1 मे 1913 साली त्यांचा रावळपिंडीत जन्म झाला. 1 मे जागतिक कामगार दिन अन् याच दिवशी जन्मलेल्या बलराजने आयुष्यभर आपल्या डाव्या विचारसरणीच पुरस्कार केला. कम्युनिझमच्या त्यांच्या राजकीय प्रवासाने त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत, उपक्रमात भाग घेतला. सुरुवातीच्या पत्रकारितेनंतर त्यांनी कलकत्याला शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. याच काळात म. गांधींसमवेतही त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. 1940 च्या सुमारास बीबीसीवर वृत्तनिवेदक म्हणून चार वर्षे काम केले. त्यावेळी तिकडच्या नाटकात कामेही केली. जागतिक रंगभूमीला अभ्यासण्याची चांगली संधी मिळाली. रंगभूमी, चित्रपट या माध्यमाची ताकद त्यांच्या लक्षात आली. पुढे इंग्लंडहून इकडे आल्यावर त्यांचा ‘इप्टा’शी सबंध आला. इतकी समृद्ध पायाभरणी झाल्यानंतर साहजिकच बलराजच्या अभिनयाची इमारत टोलेजंग झाली यात शंकाच नाही. नेहमीच्या चाकोरीबद्ध नायकाची इमेज त्यांनी तोडून टाकली. झाडाभोवती फिरत गाणी गायची अन् नायिकेच्या मागे फिरत गोंडा घोळायचा हे त्यांच्या रक्तातच नव्हते. त्यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका पॉलिश्ड होती! त्यांच्या एकेका चित्राचा आढावा घ्यायचा म्हटलं तरी प्रचंड लिखाण होईल. तरीही काही व्यक्तिरेखांचा उल्लेख उल्लेख करावाच लागेल. हृषिकेश मुखर्जींच्या ‘अनुराधा’ (Anuradha) चित्रपटातील (जाने कैसे सपने मे खो गयी आँखिया साँवरे साँवरे ही लताची जोड गाणी असलेला) बलराजने साकारलेला डॉक्टर अपुपमेय होता. अहोरात्र पेशंटच्या सेवेचा ध्यास घेतलेला हा डॉक्टर निर्मल चौधरी कळत नकळतपणे आपल्या सुसंस्कृत पत्नीकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष त्याच्या लक्षात येत असतं; पण सभोवतालची परिस्थिती, समाजसेवेचं व्रत यापुढे तो हतबल असतो. शेवटी पत्नीला समजावताना तो म्हणतो, ‘अगर तुम्हारा ख्याल कभी नहीं किया तो अपना भी तो ख्याल कभी नहीं किया’… शेवटी तू अन् मी वेगळे का आहोत? कर्तव्यतत्पर पतीची हतबलता बलराजने मोठ्या उंचीवर नेली होती.

 

Balraj sahni in Anuradha
Balraj sahni in Anuradha

 

उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत स्वत:चा बचाव करावा म्हणून गरम कोट घ्यायचा विचार करणारा; पण आर्थिक दुर्बलतेच्या फेर्‍यात सापडल्याने एवढीशी इच्छाही पुरी न करू शकणारा ‘गर्मकोट’ (GaramKoat) मधील पोस्टातील आर्डिनरी क्लार्क त्यानं काय अफलातून रंगवला होता! ‘भाभी की चुडियाँ’मधील गरीब थोरला भाऊ श्याम, पत्नीच्या चारित्र्याच्या संशयाने वेडा पिसासलेला ‘देवर भाभी’मधील संशयखोर नवरा, प्रेमचंदच्या कथेवरील ‘हिरा मोती’मधील स्वाभिमानी शेतकरी, आपल्या मालकिणीला अपत्य सुख लाभावे म्हणून आपले मूल तिला देऊन टाकणारा नोकर रामदिन त्यानं ‘औलाद’मध्ये रंगवला होता. परदेसी या भारत-रशिया दोहोंच्या सहकार्याने तयार झालेल्या चित्रपटात त्याने अदा केलेल्या मराठी शाहीर अफलातून होतो. इस्मत चुगताईच्या ‘सोने की चिडिया’ (Sone Ki Chidiya) चित्रपटात त्याच्यासमवेत नूतन होती. यात नूतन नामवंत चित्रपट कलावंत असते तर बलराज प्रतिथयश कवी! या दोहोंत मैत्री झाल्यावर तो चित्रीकरणाच्या तिथे पोहचतो. ग्लॅमरपेक्षा त्याचं लक्ष वेधलं जातं तिथल्या एक्स्ट्रा कलावंतावर! तिथं तो प्रेमबिम सारं विसरतो अन् उद्गारतो ‘जब दुनिया में लोगो को जीनेतक का हक हाँसिल नहीं तो मुझे मुहोब्बत करने का क्या अधिकार है?’

 

Bhabhi Ki Chudiyan Movie Poster

 

‘संघर्ष’चा ठाकूर

बलराज साहनीच्या गाजलेल्या भूमिकादेखील पुष्कळ आहेत. अमिया चक्रवर्तींच्या ‘सीमा’ चित्रपटातील त्यांनी रंगवलेल्या महिलाश्रमाचा संचालक बाबूजी अन् गायलेलं ‘तू प्यार का सागर है’ हे गीत आजही अंगावर काटा आणते. नीलकमल चित्रपटातील ‘बाबूल की दुवाएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार’ या गीताने तमाम वधूपित्यांचं दु:ख बलराजने चेहर्‍यावर दाखवले. साधनाच्या ‘एक फूल दो माली’ चित्रपटात अनौरस मुलाचा सांभाळ करताना गायलेलं ‘तुझे सुरज कहूँ या चंदा’ किती नैसर्गिक स्वाभाविक वाटतं ना? संघर्ष चित्रात त्याचा सामना दिलीपकुमारसमवेत होता. संघर्षाचा सुडाग्नी घेऊन चित्रपटभर वावरलेला त्याचा ठाकूर जबरदस्त होता. हकीकत, हिंदुस्थान की कसम या चेतनदाच्या चित्रातील करारी मेजर अनफरगेटेबल होता. बी. आर. चोप्रांच्या ‘वक्त’मधील लाला (ओ मेरी जोहराजबी) आणि ‘हमराज’मधील इन्स्पेक्टर अफलातून होता!

Dilip Kumar and Balraj sahni in Sanghursh
Dilip Kumar and Balraj sahni in Sanghursh

 

अजोड अभिनेता

सर्वसाधारण व्यावसायिक कलावंतामध्ये अपवादानेच आढळणारी एकनिष्ठता, विचारांची तात्त्विक बैठक, चिंतात्मक विचारशैली, माध्यमाची ताकद व स्वत:च्या कर्तृत्वाची मर्यादा हे सर्व गुण एकट्या बलराज साहनीत होते. त्याच्या अखेरच्या ‘गर्म हवा’ चित्रपटानेही इतिहास घडवला. फाळणीच्या काळातील राष्ट्रप्रेमी मुस्लिमांची मानसिकता त्यांनी मिर्झाच्या रूपाने पडद्यावर साकारली होती. लाजवंत, हमलोग, हसते जख्म, परायाधन, दो रस्ते, नौनिहाल, छोटी बहू, कठपुतली, राही, भाभी, अनपढ, नया रास्ता, तलाश, मैं भी लडकी हूँ, पवित्र पापी, टांगेवाला, दो रोटी, टकसाल या आणि इतर कितीतरी भूमिकांमधून बलराज सहानी आजही अजरामर आहे. त्याचा मुलगा परिक्षित साहनीत वडिलांचे फार कमी गुण दिसतात. 13 एप्रिल 1973 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने बलराज गेला. मृत्यूची चाहूल कदाचित त्याला आधीच लागली असावी. कारण आदल्या दिवशी त्याने हट्टाने ‘गर्म हवा’चं संपूर्ण डबिंग पूर्ण केले. बलराज साहनीच्या डोळ्यांत मला नेहमीच आश्वासक आशावाद दिसायचा, जगायला हुरूप देणार्‍या या नजरेतच आम्हाला चांगल्या चित्रपटांवर प्रेम करायला शिकवले.

Balraj Sahni in Waqt
Balraj Sahni in Waqt
Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment