-धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Legendary Music Director Naushad’s Early life and Story of Initial Struggle. भारतीय चित्रपट संगीताचे भीष्म पितामह म्हणून संगीतकार नौशाद यांचा उल्लेख करावा लागेल. तब्बल साठ वर्ष त्यांनी सिनेमा संगीताच्या दुनियेत काढले. कुंदन लाल सायगल यांचा स्वर देखील त्यांच्या चित्रपटातून रसिकांना ऐकता आला. संगीतकार नौशाद यांनी भारतीय संस्कृतीला साजेसं आणि पूरक असं संगीत दिलं. त्यांच्या संगीतातून भारतीय लोकगीतांचा गंध तर येतोच शिवाय त्यांनी असल भारतीय शास्त्रीय संगीताला चित्रपट संगीताच्या दुनियेत आणले. अनेक दिग्गज शास्त्रीय गायकांना त्यांनी चित्रपटासाठी गाण्यासाठी पाचारण केले. नौशाद यांच्या संगीतातील गोडवा आज पन्नास साठ वर्षानंतर देखील कायम आहे.

किंबहुना भारतीय संगीताची चर्चा त्यांच्या शिवाय होवूच शकत नाही अशी अतुलनीय सांगतीक कारकिर्द त्यांची आहे. त्यांनी संगीत देताना घाई कधीच केली नाही. अतिशय मन लावून आणि पूर्णपणे समर्पित होऊन त्यांनी चित्रपटांना संगीतबध्द केले. मुगल ए आझम या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या..’  या गाण्यासाठी रात्रभर गीतकार शकील बदायुनी आणि संगीतकार नौशाद जंग जंग पछाडले होते. एकदा नौशाद यांना “तुमचे संगीत आजही इतके आवडीने कसे काय ऐकलं जाते ?” असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले होते “ आमच्या संगीतासाठी आम्ही घेतलेले कष्ट, रात्रंदिवस घेतलेली मेहनत आणि स्वर/शब्द आणि सुरातून उत्कृष्ट कसे निर्माण होईल याचा घेतलेला ध्यास होता. या सर्वांच्या एकत्रित कर्तृत्वाचा  तो परिणाम असावा. “अर्थात नौशाद याना मिळालेलं यश सहज साध्य नव्हतंच. सुरुवातीच्या काळातत्यांना खूप संघर्ष करावा लागला. आज २५ डिसेंबर संगीतकार नौशाद यांचा जन्मदिवस! आज पाहूयात त्यांची सिनेमात येण्यापूर्वीची संघर्षाची कहाणी.

२५ डिसेंबर १९१९ या रोजी नौशाद यांचा लखनऊ येथे जन्म झाला . त्यांचे वडील अतिशय कर्मठ आणि सनातनी होते. गाणी बजावणी आणि संगीत त्यांना अजिबात आवडत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील नौशाद यांनी स्वतःला घडवले.त्यांना  लहानपणापासूनच संगीतामध्ये खूप रुची होती. विविध भारती वरील ‘विशेष जयमाला’ या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष सांगितला होता. लहानपणी एकदा ते बाराबंकी येथील देवा शरीफ येथील उरुसाला गेले होते. वेळी एका मशिदीत एका फकिराला त्यांनी एका झाडाखाली अतिशय तन्मय होऊन गाताना पाहिले होते. फकीराच्या सोबतच त्याचा जोडीदार  बासरीने त्याला साथ देत होता. शब्द कळत नव्हते; भाव कळत नव्हता पण हे काहीतरी निराळच आहे, गोड आहे याची जाणीव लहानग्यांना नौशाद ला  झाली. लखनौला त्यांचे बिऱ्हाड जिथे राहायचे त्यांच्या जवळच्या बाजारात एक संगीताचे ‘साजो-सामान’ विकण्याचे दुकान होते. तिथे हार्मोनियम, तबला, ढोलकी , वीणा , व्हायोलीन अशी वाद्य मांडून  ठेवली होती. शाळेत जाताना आणि येताना तासन तास ती वाद्य आणि त्यांना वाजवणारे लोक यांच्याकडे हा लहानगा टक लावून पाहत असे! हा जणू नादच लागला. हे काही तरी भन्नाट आहे ते आपल्याला कळले पाहिजे हि आंतरिक इच्छा उफाळून आली होती.  दुकानदाराने एक दोनदा त्यांना हटकले सुध्दा. नौशाद यांनी दुकानदाराला विनंती करून दुकानात कसाबसा प्रवेश मिळवला.

पण  यासाठी ते दुकानातली साफसफाई करू लागले. वाद्य आणि वादकांना पाहत ते मोठे होवू लागले.  त्यावेळी लखनौ ला रॉयल सिनेमा मध्ये मूक चित्रपट प्रदर्शित होत होते. त्यावेळी पडद्याच्या समोर काही वादक बसून मुख्य चित्रपटातील  दृश्यांना साजेसं असं संगीत आपल्या वाद्यातून देत असत.नौशाद त्या वेळी  चित्रपट पाहायला जात, त्या वेळी त्यांचं पडद्याकडे लक्ष कमी आणि त्या साजिंद्याकडेच जास्त असायचे. या थेटर मध्ये हार्मोनियम वाजवणारे लद्दन नावाचे गृहस्थ एकदा दुकानात आले. नौशाद त्यावेळी हार्मोनियम वर थोडे फार बोटे  फिरवीत होते. दुकानदाराने लद्दन साहेबांना विनंती करून नौशाद यांना हार्मोनियम शिकवण्याची विनंती केली. त्यांनीदेखील ती  आनंदाने मान्य करून नौशाद यांना प्राथमिक धडे द्यायला सुरुवात केली.

नौशाद यांच्या वडिलांचा या सगळ्या प्रकाराला प्रचंड विरोध होता पण नौशाद त्यांनी मनोमन याच क्षेत्रात जाण्याचे ठरवले होते. मूकपटाच्या समोर वाजविणाऱ्या साजिंद्यात ते पण सामील झाले. काही काळ भटकंती झाली. पण काही काळानंतर हा ग्रुप फुटला. नौशाद  यांना चुपचाप घरी यावे लागले. आता त्यांच्या अब्बाजान यांचा  रागाचा पारा खूप चढला होता. त्यांनी नौशाद यांना शेवटचा इशारा दिला. एक तर चुपचाप घरी राहायचं किंवा काय धंदे करायचे असतील तर बाहेर पडायचं. नौशाद यांनी दुसरा पर्याय स्वीकारला आणि ते महानगरी मुंबईच्या दिशेने निघून गेले. लखनौ मधील एकाच्या मुंबईच्या मित्राचा पत्ता घेवून ते मायानगरीत आले.

मुंबईतला संघर्ष तर खूप मोठा होता. पहिले काही दिवस तर त्या मित्राचा पत्ता शोधण्यातच गेली. शेवटी एकदाचा तो भेटल्यावर त्याने पेपर मधील एक जाहिरात त्यांना दिली. तिथे  संगीतकार झंडे खां यांच्याकडे ग्रँट रोडला जाऊन भेटले. तिथे गुलाम मोहम्मद हे संगीतकार देखील शागिर्दी करत होते. नौशाद यांना चाळीस रुपये महिना पगारावर पियानोवादक म्हणून झंडे खां यांनी आपल्याकडे ठेवून घेतले. त्यावेळी संगीतकार झंडे खांन्यू पिक्चर्स या कंपनीसोबत काम करत होते. या कंपनीचं ऑफिस चेंबूरला होतं. नौशाद यांचे  एक मित्र अत्तर साहेब त्या वेळी दादरला राहत होते . दिवसा ज्या दुकानात हा मित्र नोकरी करत होता रात्री त्याच दुकानाच्या बाहेरच्या फळ्यांवर ते दोघे झोपंत. उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही त्रिकाळ त्यांचा मुक्काम या पायर्‍यांवर असे.

नौशाद सांगतात “या दुकानाच्या रस्त्याच्या पलीकडे दुसऱ्या बाजूला  ब्रॉडवे थेटर होतं तिथे रात्रभर दिव्यांची उघडझाप चालू असायची.उद्याची स्वप्न पाहत त्या दिव्यांकडे बघत कित्येक रात्री जागून काढल्या.” बर्‍याच वर्षांनी नौशाद यांनी संगीत दिलेला ‘बैजू बावरा’ हा चित्रपटाने याच ब्रॉडवे थेटर मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला.नौशाद म्हणाले “रस्त्याच्या याकडेच्या फुटपाथ वरून पलीकडच्या बाजूच्या ब्रॉडवे थेटर पर्यंत जायला मला तब्बल पंधरा वर्षे लागली! “ या दुकानाच्या शेजारीच अभिनेत्री लीला चिटणीस देखील राहत असे. तिची ऐट काही औरच असायची. नौशाद यांच्या त्या वेळी मनातही  आलं नव्हतं की एक दिवस आपण याच अभिनेत्रीच्या  चित्रपटाला संगीत देणार आहोत!

पुढे न्यू पिक्चर्स च्या ‘सुनहरी मकडी’ या चित्रपटाला संगीत देताना झंडे खां यांना एका गाण्यासाठी अडचण आली त्यावेळी नौशाद यांनी   पियानोवर त्या गाण्याची धून ऐकवली. चित्रपटाचे निर्माते ती धून ऐकून खूपच खूष झाले आणि त्यांना पगार तोच ठेवून असिस्टंट म्युझिक डायरेक्टर ही पदवी दिली! मनासारखं काम मिळत नव्हतं आणि पैसा तर अजिबातच मिळत नव्हता. त्यांची धडपड चालू होती. त्यावेळी फिल्मसिटीमध्ये ‘बागबान’ या चित्रपटाची निर्मिती चालू होती संगीतकार मुश्ताक हुसेन यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी तिथे कामाला सुरुवात होते तिथेच त्यांची भेट रणजीत फिल्म कंपनीच्या चंदुलाल शहा यांच्याशी झाली त्यावेळी ते मिर्जा साहिबा ही पंजाबी मूवी बनवत होते या चित्रपटाचे नायक आणि  संगीतकार मनोहर कपूर नौशाद यांचे मित्र होते.

त्यांनी साठ रुपये महिना या पगारावर नौशाद यांना  आपल्याकडे ठेवून घेतले त्यांचे काम बघून गीतकार डीएम मधोक खूपच प्रभावित झाले. डी एन मधोक  संगीतकार नौशाद यांच्यासाठी ‘किस्मत के जादूगर’बनले. त्यांनीच नौशाद यांची सिफारिश चंदुलाल शहा यांच्याकडे केली. शहा यांनी नौशाद यांना त्यांच्या पुढील सिनेमाचे संगीत द्यायची जवाबदारी दिली. या सिनेमात त्यांनी लीला चिटणीस यांच्याकडून एक ठुमरी गाऊन घेतली. त्या वेळी इतर वादक नौशाद यांचा मत्सर करू लागले. कालपर्यंत त्यांच्यातील एक असणारा आज चक्क संगीतकार बनतोय हे त्यांच्या पचनी पडत नव्हते. पुढे हा सिनेमाच डब्यात गेला. नौशाद पुन्हा रस्त्यावर आले. पण आता आधीच्या अनुभवातून ते शिकले होते. मधोक त्यांच्या सोबत होतेच. त्यांच्याच शिफारसी वरून १९४० साली नौशाद यांना भवनानी संस्थेचा ‘प्रेमनगर ‘ हा सिनेमा मिळाला आणि हाच त्यांचा पहिला चित्रपट ठरला.

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment