— संपादकीय

———————————————————————–

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, दिवाळी रिलीज हा वर्षाचा सर्वात जास्त महत्वाचा कालखंड असतो जेंव्हा मोठे बॅनर्स व मोठे अभिनेते त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्साहित असतात. २०२० हे वर्षही याला अपवाद नाहीए. स्क्रिन्सची संख्या जरी रोडावली असेल तरी उत्साह मात्र तोच आहे. फरक इतकाच कि हा सर्व उत्साह ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दिसून येतोय, कारण अजूनही कोरोना अनलॉक झाले असले तरी स्क्रिन्सची संख्या व तिथे येणारा प्रेक्षक कमी आहे. अगदी नगण्यच.
मिर्झापूर-सीझन २, सुटेबल बॉय, सीरियस मेन, आश्रम-सीझन २, हर्षद मेहता च्या घोटाळ्यांवरील स्कॅम या सिरीज शिवाय लुडो, लक्ष्मी, छलांग इत्यादी सिनेमे थेट ओटीटी वर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षकांना करमणुकीसाठी सुट्ट्यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. फरक इतकाच की यावर्षी मोठ्या स्क्रिन्सची मजा नाही.
दिग्दर्शक अनुराग बासू ज्याच्या चित्रपटांच्या यादीत मर्डर, लाइफ इन ए मेट्रो आणि बर्फी सारख्या चित्रपटांचा समावेश आहे, त्याचा अभिषेक बच्चन-अभिनीत लूडो हा सिनेमा सिनेमागृहात नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. लुडो चे रिव्युह्ज सुद्धा खूप सकारात्मक व उत्साहवर्धक आहेत. या उत्सवाच्या आठवड्यात ओटीटी वर पॉप अप होणार्‍या बर्‍याच ‘दिवाळी रिलीझ’ मध्ये लुडो फक्त एक आहे. अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ओटीटी प्लॅटफ़ॉर्म डिस्ने + हॉटस्टारचे म्हणणे आहे की आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांमध्ये ओटीटीवर थेट प्रीमियर झालेल्या सर्व सिनेमांमध्ये त्याचे सर्वात मोठे ओपनिंग व्ह्यूअरशिप आहे.
पारंपारिक पद्धतीनुसार चित्रपट अगोदर सिनेमागृहात प्रदर्शित होतात व त्यानंतर टीव्ही प्रीमियर आणि डीव्हीडी रीलिझ होत असते ज्यातून निर्मात्यांना कमाई होत असते. गेल्या दोन दशकांपासून प्रदर्शना अगोदर होणाऱ्या व्यावसायिक टाय-अप्स व थेट चित्रपटात होणाऱ्या ब्रँड प्लेसमेंट्स या दोन पर्यायांनी सुद्धा निर्माते मंडळींना कमाईचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. परंतु कोरोनाने हे सर्व पर्याय उलथून टाकले आहेत आणि सिनेमा हॉल काही महिन्यांपासून बंद होते. सप्टेंबरच्या अखेरीस केंद्राकडून पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली असली तरी अनेक राज्य सरकारांनी परवानगी दिली नव्हती व अनेक हॉलने संसर्ग होण्याच्या भीतीने सामान्य लोक आत येण्यास उत्सुक नाहीत ही जाणीव ठेवून हे काम बंद ठेवण्याचे ठरविले आहे.

नेमका याचाच फायदा ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतला. याची सुरुवात मार्चमध्ये अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराना स्टारर ‘गुलाबो सीताबो’पासून झाली आणि त्यानंतर अनेक भाषांमध्ये असंख्य चित्रपट झाले. काही आठवड्यांपूर्वी हॉटस्टारवर प्रीमियर झालेल्या सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचरा’, नेटफ्लिक्सचा  ‘गुंजन सक्सेना’ आणि अमेझॉन चा ‘शकुंतला देवी’ हा  बायोपिक, विद्युत जमवाल चा खुदा हाफिज, लूटकेस, या प्रमुख चित्रपटांचा यात समावेश आहे. अनेक तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटदेखील या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स साठी मात्र कमाईचे एक वेगळे मॉडेल आहे जे कि टीव्ही अथवा डीटीएच सारखे नाहीए. टीव्ही वर जाहिरातीतून कमाई होते इथे मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म्सना केवळ सदस्यतांवर अवलंबून राहावे लागते. एखादा मोठा सिनेमा जेंव्हा थेट ओटीटी वर रिलीज होतो तेंव्हा तो बघण्याच्या निमित्ताने या प्लॅटफॉर्म्स चे सबस्क्रायबर अर्थातच सदस्य वाढतात ज्यातून यांना कमाई होते. परंतु चित्रपट निर्मात्यांना व रसिक प्रेक्षकांना अंधारा सिनेमा हॉल, रुपेरी पडदा आणि सवलतीच्या दारात मिळणाऱ्या पॉपकॉर्नचे आजही आकर्षण आहे. ओटीटी हे न्यू नॉर्मल आहे पण सिनेमागृहाची त्याला मजा नाही हेही तितकेच खरे.
कोरोना अनलॉक नंतर थेट सिनेमागृहात प्रदर्शित होणारा (१५ नोव्हेंबर रोजी) पहिला सिनेमा ठरला मनोज बाजपाई व दिलजीत दोसांज अभिनीत ‘सुरज पे मंगल भारी’.
Editor
+ posts

Leave a comment