– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Guns and Gulaabs Web Series Review

दि फॅमिली मॅन या प्रचंड गाजलेल्या वेब सिरीज चे सर्वेसर्वा राज अँड डी.के. नुकतीच एक फ्रेश वेबसीरीज नेटफ्लिक्सवर घेऊन आले आहेत. नाव आहे गन्स अँड गुलाब्ज. ९० च्या दशकाची पार्श्वभूमी असलेल्या या ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलर चे एकूण ७ चॅप्टर आहेत ज्यात राजकुमार राव, दुलकर सलमान, गुलशन देवैय्या, आदर्श गौरव आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. 

९० चे दशक. आपल्यापैकी बहुतांश प्रेक्षकांनी जगलंय. टेप रेकॉर्डर.. त्यावर वाजणारी कुमार सानू ची गाणी, एसटीडी-पीसीओ चे बूथ, लुना, यामाहा आणि हिरो होंडा मोटारसायकल, फियाट आणि अँबेसेडर च्या कार्स, आर्चिज चे ग्रीटिंग कार्ड्स इत्यादी बरेच काही जर अजूनही तुमच्या हृदयाच्या ९० च्या कोपऱ्यात तुम्ही सांभाळून ठेवले असेल तर गन्स अँड गुलाब्ज सिरीज तुमच्यासाठी आहे. हां एक गोष्ट सुरुवातीलाच सांगतो, वेब सीरिजच्या शिव्यांच्या कल्चरमध्ये या सिरीजमध्ये सुद्धा शिव्यांची लाखोली वाहिली गेली आहे. पण न्यूडिटी किंवा उत्तान दृश्ये अजिबात नाहीत. 

थोडेसे कथानकांबद्दल. उत्तर प्रदेशातील गुलाबगंज येथील दबंग गांची (सतीश कौशिक) आणि नबीद (निलेश देवकर) यांच्यात वैर आहे. गुलाबगंज कडील भाग गांची बघत असतो तर शेजारील गाव शेरपूर नबीद च्या अंडर असते. या भागात होत असलेल्या अफीम च्या शेतीतून होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर यांचे साम्राज्य चालू असते ज्यात काही सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची यांना साथ असते. गांची चा वारसदार आहे  त्याचा एकुलता एक मुलगा जुगनू (आदर्श गौरव). या भागात नव्याने ड्युटी जॉईन केली आहे एका प्रामाणिक नार्कोटिक्स ऑफिसर अर्जुन वर्माने (दुलकर सलमान). नबीद ने नुकतंच संपवलेले आहे गांची च्या एका खास माणसाला.. बाबू टायगर ला. आत्माराम (गुलशन देवैय्या) जो फेमस आहे चार कट आत्माराम या नावाने, एक सुपारी किलर असतो. बाबू टायगर ला यानेच मारले असते. या  बाबू टायगर चा मुलगा असतो टिपू (राजकुमार राव) ज्याचे गुलाबगंज मध्ये स्वतःचे गॅरेज आहे. टिपू तसा साधा सरळ माणूस असतो ज्याचे प्रेम असते गुलाबगंज येथील शाळेतील एका इंग्लिश टिचरवर जिचे नाव आहे चंद्रलेखा वर (टी जे भानू). आता होते असे की गांचीने एक मोठी अफीम च्या डिलिव्हरी ची डील केली आहे कोलकाता येथील एका माफिया गॅंग सोबत. गांची ची ही डील पूर्ण होऊ नये यासाठी मुख्यतः प्रयत्न करीत असतात नबीद आणि नार्कोटिक्स ऑफिसर अर्जुन. हा सर्व कथानकाचा मुख्य आशय असलेला भाग आहे. यात काही सब-प्लॉट्स पण आहेत ज्यात अर्जुन वर्माची मुलगी जोत्स्ना ज्या शाळेत शिकत असते, त्याच शाळेत चंद्रलेखा टीचर असते. जोत्स्नाच्याच वर्गात असतो गंगाराम नावाचा मुलगा ज्याने बाबू टायगर चा खून होताना पाहिलंय. आता हे सर्व सब-प्लॉट्स मुख्य कथानकाशी लिंक करून कथानक पुढे सरकते आणि अखेरीस काय होते हे सर्व मोठ्या उत्कंठावर्धक रीतीने बघायला मिळते.

बेसिकली अफीम च्या डीलिंग्ज वरून दोन गँग्ज मधील गॅंग वॉर आणि त्याला असलेले पोलिसांची छुपी साथ आणि अखेरीस सरकारी अधिकाऱ्याने या दोन्ही गँग्स ला केलेले डबलक्रॉस अशी फार काही नावीन्य नसलेली कथा असूनही कथाकार आणि दिग्दर्शक राज अँड डिके सुरुवातीचे दोन-तीन एपिसोड्स वगळता छान गुंतवून ठेवतात. कलाकारांची फौज असल्याने सुरुवातीचे एपिसोड्स कॅरेक्टर एस्टँब्लिश करून मूळ कथानक ट्रॅक वर आणण्यात जातात. ९० च्या दशकाची पार्श्वभूमी हे या सीरिजचे हायलाईट आहे. अगदी कुमार सानू च्या आवाजात एक लव्ह सॉन्ग सुद्धा आहे. ओव्हरऑल संपूर्ण सीरिजचे प्रेझेंटेशन सुद्धा ९० च्या दशकातील सिनेमाप्रमाणे आहे. पात्रांची नावे, त्यांची वेशभूषा यावर बारकाईने काम केले गेले आहे. संजय दत्त च्या लांब केसाच्या गेट-अप असलेला खलनायकी ४ कट आत्माराम हे पात्र विशेषत्वाने लक्षात राहण्यासारखे आहे. कथानकाला दिलेला ब्लॅक कॉमेडीचा तडका परफेक्ट बसलाय. अर्जुन वर्मा वगळता प्रत्येक पात्राला विनोदाची झालर आहे. सुमित अरोरा यांचे संवाद प्रत्येक प्रसंगाला अगदी चपखल बसले आहेत.

राज-डिके यांच्या दिग्दर्शनानंतर काय प्रभावी आहे विचाराल तर त्याचे उत्तर आहे सुमित अरोरा यांचे संवाद. यानंतर जमून आलाय तो म्हणजे प्रत्येक अभिनेत्याचा अभिनय. त्यातल्या त्यात राजकुमार राव, गुलशन देवय्या आणि आदर्श गौरव एकदम परफेक्ट. दुलकर सलमान ने सुद्धा अर्जुन वर्मा छान  रंगवला आहे पण ही व्यक्तीरेखा काहीशी मोनोटोनस वाटते. त्यापेक्षा राजकुमार राव च्या पाना टिपू या व्यक्तिरेखेत बरेच रंग आहेत. आणि नेहमीप्रमाणे राजकुमारने ती अफलातून साकारली आहे. सतीश कौशिक चा गांची, आदर्श गौरव चा छोटू गांची, टीजे भानू ने साकारलेली  टिपू ची लव्हा इंटरेस्ट चंद्रलेखा, निलेश देवकाराचा नबीद हे सर्व कॅरेक्टर्स या कलाकारांनी जमवून आणले आहेत. पार्श्वसंगीताच्या बाबतीत मला आवडून सुद्धा काहीशी खटकलेली बाब अशी की कथेला ९० च्या दशकाची पार्श्वभूमी असतांना पाश्वसंगीत मात्र सरळ ७० /८० च्या दशकातील वापरले आहे. ऐकायला जाम मजा येते, झक्कास रेट्रो फील येतो पण सरळ सरळ अमिताभचा डॉन बघतोय की काय अशी फिलिंग मला बहुतांश पाश्वसंगीत बघतांना झाली.

एकंदरीत फॅमिली मॅन नंतर राज अँड डिके ने पुनश्च एकवार अशी सिरीज आणली आहे ज्यातील पात्र येणाऱ्या काळात कल्ट क्लासिक म्हणून बघितले जातील, ज्यांच्यावर मिम्स तयार केल्या जातील. आणि ही सिरीज या दोघांची एव्हरग्रीन सिरीज म्हणून ओळखली जाईल. शिवीगाळ आणि खूनखराबा भरपूर आहे म्हणून संपूर्ण परिवारासोबत अव्हॉइड करा. बाकी आक्षेपार्ह काहीही नाही.

– ३.५ स्टार्स आउट ऑफ  ५.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment