– अजिंक्य उजळंबकर 

 

आस्तिक आणि संध्या गिरी या नवविवाहित तरुण दाम्पत्याच्या लग्नाला इन मीन पाच महिने झालेले असतांना दुर्दैवाने आस्तिकचे ‘दुःखद’ निधन होते. दुःखद या शब्दाकडे लक्ष वेधण्यासाठी इथे त्याला कॉमा मध्ये लिहिले आहे. हो. कारण इथे त्या शब्दाकडे लक्ष वेधणे खूप गरजेचे आहे. कारण निधन हे दुःखद जरी अपेक्षित असले तरीही काही ठिकाणी त्याला अपवाद असतात. आणि हा अपवाद घडतो संध्याच्या बाबतीत. अपवाद इतका की नवऱ्याच्या तिसऱ्या दिवशीचे विधी चालू असतांना हिला आपल्या मैत्रिणीसोबत पाणी पुरी खायची हुक्की येते. तिची जिवलग मैत्रीण तिला या अपवादाबाबतीत प्रश्न विचारते तेंव्हा ती उत्तरते ” बचपनमें  हमारी घर की बिल्ली मर गई थी ना, तब भी हम बहोत रोए थे, इस बार ऐसा कुछ फील ही नही हो रहा है यार!” आता बोला! कुणीही म्हणेल वेड बीड लागलेय की काय? ज्याला हिंदीत पगलैट असे संबोधतात. अशा काही आशयाचा पगलैट आज नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय.

संध्या च्या भूमिकेत सान्या मल्होत्रा आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून आस्तिकचे निधन झालेले आहे त्यामुळे शेवटपर्यंत त्याचे पात्र अनुपस्थित असते. मुळात संध्या आणि आस्तिक यांच्यात नवरा बायको हे नाते या ५ महिन्यात कधी फुललेच नसते हे कथेच्या पुढील भागात स्पष्ट होते. आस्तिक आणि संध्याचे लग्न म्हणजे रूढी-परंपरावादी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात आई-वडिलांच्या मर्जीने झालेले टिपिकल अरेंज्ड मॅरेज असते. दोघांमध्ये काहीच संवाद नसतांना अचानक पणे आस्तिक हे जग सोडून जातो. आस्तिकच्या राहत्या घरावर कर्ज आहे व सर्व कुटुंब त्यावर अवलंबून असते. आस्तिक च्या निधनानंतर संध्याचे आई-वडील व इतर सर्व नातेवाईक १३ दिवसांच्या कार्यासाठी घरी येतात व त्यातून घडणाऱ्या घटनाक्रमातून कथानक पुढे सरकत जाते. यात संध्यासमोर बरेच प्रश्न उपस्थित होतात. काही घरच्यांकडून व काही प्रश्न असे की जे ती स्वतःला विचारत असते. याच्या उत्तराच्या शोधात ती स्वतःचा शोध लावत असते.

Sanya Malhotra and Shruti Sharma in Pagglait
Sanya Malhotra and Shruti Sharma in Pagglait

 

कथा-पटकथाकार उमेश बिस्त यांनी लिहिलेल्या या कथेचे विश्लेषण एका विधवा तरुणीने स्वतःच्या अस्तित्वाचा लावलेला शोध असे एका वाक्यात करता येईल. दिग्दर्शनही उमेशनेच केलंय. नवऱ्याच्या अकाली निधनानंतर ते १३ व्या च्या विधीपर्यंत संध्याला स्वतःचा शोध लागलेला असतो. या शोधात मुख्यतः तिची जिवलग मैत्रीण नाझिया (श्रुती शर्मा) आणि आस्तिकच्या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत काम करणारी आकांक्षा (सयानी गुप्ता) यांची मदत तिला होते. कुटुंबातील इतर पात्रेही या घटनाक्रमात तितकीच महत्वाची आहेत. चित्रपटाची कथा राज कपूर दिग्दर्शीत व ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे अभिनीत ‘प्रेमरोग’ वरून घेतली आहे किंवा प्रेरित आहे हे अगदी स्पष्टपणे लक्षात येते. आजच्या काळाला अनुसरून व आजच्या प्रेक्षकाला समोर ठेऊन उमेश यांनी त्यात अपेक्षित बदल केले आहेत जे नक्कीच स्तुत्य असे आहेत. कथेच्या अंती तर खूप पॉझिटिव्ह नोट वर येऊन चित्रपट संपतो हे विशेष. पटकथेची लांबी अतिशय नियंत्रित ठेवल्याने चित्रपट अवघा १ तास ५४ मिनिटातच संपतो. त्यातही बरेच रंजक असे प्रसंग व विनोदी संवादांची रेलचेल असल्याने चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही. 

अभिनयाच्या बाबतीत सान्या मल्होत्रा ने कमाल काम केले आहे. नवऱ्याच्या अकाली निधनानंतर खूप साऱ्या प्रश्नांच्या शोधात असलेली व विशेष म्हणजे ‘दुःखात’ नसलेली संध्या साकारतांना सान्याने ताकदीचा व तितकाच कंट्रोल्ड अभिनय केला आहे. निरागसतेचे भाव तिने खूपच सहजरित्या चेहऱ्यावर आणले आहे. इतर कलावंतात सयानी गुप्ता, आशुतोष राणा, रघुबीर यादव, शिबा चड्ढा, राजेश तैलंग यांनी छान अभिनय केला आहे. निलेश मिस्रा यांची गीते व अरिजित सिंग यांचे संगीत अपेक्षित परिणाम साधणारे. 

नाव जरी पगलैट असले तरी अतिशय प्रगल्भतेने व समंजसपणे सादर केलेला हा वेडेपणा आहे. त्याबद्दल दिग्दर्शक उमेश बिस्त व अभिनेत्री सान्या मल्होत्रा कौतुकास पात्र आहेत. नक्की बघावा असा. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment