– अजिंक्य उजळंबकर
ओटीटी नावाचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लोकप्रिय का झाला? याचे एकमेव कारण आहे, ज्या रसिकांना रुटीन एंटरटेनमेंट बघण्याचा कंटाळा आला होता त्यांना ‘आउट ऑफ दि बॉक्स’ कॉन्टेन्ट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला, तोही मोबाईलवर घरबसल्या! अशावेळी ‘अनुराग कश्यप’ सारख्या सातत्याने रिअल टाइम स्टोरीज वर काम करणाऱ्या दिग्दर्शकांची लॉटरी लागली. २००४ साली ‘ब्लॅक फ्रायडे’ सिनेमापासून अनुरागने आजपर्यंत नेहमीच वेगळ्या प्रकारचा रिऍलिस्टिक सिनेमा सादर केला आहे. लॉक-डाऊन दरम्यान जून महिन्यात नेटफ्लिक्स वर रिलीज झालेला ‘चोक्ड’ हा त्याचा लेटेस्ट सिनेमा पण असाच चाकोरी बाहेरचा. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘एके व्हर्सेस एके’ चे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानेचे आहे ज्याची पटकथा विक्रमादित्य सोबत अविनाश संपत यांनी लिहिली आहे व संवाद अनुरागचे आहेत. ट्रेलर बघताच या ब्लॅक कॉमेडीत काहीतरी हटके आहे याचा अंदाज येतच होता आणि सिनेमा पाहिल्यावर तोच अंदाज १०० टक्के खरा ठरला.
यात अनिल कपूर आहे अभिनेता अनिल कपूरच्याच भूमिकेत. अनुराग कश्यप आहे दिग्दर्शक अनुराग कश्यपच्याच भूमिकेत. कथा थोडक्यात अशी आहे की या दोघांनाही आपापल्या आतापर्यंतच्या करिअरचा अभिमान आहे व एकमेकांना पाण्यात बघण्याची सवय. अनिल कपूरने अनुरागला करिअरच्या सुरुवातीला मदत केली आहे. काही वर्षांनी अनुराग ने ऑफर केलेला चित्रपट अनिलने नाकारल्याने अनुरागच्या मनात त्याबद्दल राग आहे. एका फिल्म फेस्टिव्हल मध्ये दोघांची एकत्र थेट मुलाखत चालू असते ज्यात दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडते, ज्याचा शेवट अनुराग अनिलच्या तोंडावर पाणी फेकतो अशा प्रकारे होतो. दोघांच्याही प्रचंड अहंकाराला मोठी ठेच लागते. अनुराग याचा बदला घेण्याचे ठरवतो. अनिलच्या मुलीचे, सोनमचे अपहरण करतो व अनिल यांना आता खराखुरा अभिनय करून तिला शोधून दाखवा नाहीतर तिचे काही खरे नाही असे खुले आवाहन देतो. सुरुवातीला ही चेष्टा आहे असे वाटणाऱ्या अनिलला नंतर हा एक रिऍलिटी शो सारखा प्रकार असल्याची खात्री पटते. सोनमला शोधतांना पोलिसांची मदत घेता येणार नाही, बाहेरच्या कोणाचीही मदत घेता येणार नाही व या सर्व प्रकाराची सातत्याने रिअल टाइम शूटिंग होत राहील या अटी अनुराग अनिलसमोर टाकतो ज्या अनिलला मान्य कराव्या लागतात. यापुढचे नाट्य छोट्या पडद्यावर पाहिलेलेच उत्तम.
हो उत्तम. कारण सिनेमा कथा, पटकथा व सादरीकरण या तिन्हीत उत्तम जमलाय. कथेत नावीन्य आहेच पण त्याहीपेक्षा पात्रे काल्पनिक अथवा केवळ रीलवरची न ठेवता रिअल ठेवल्याने बघतांना मजा येते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण काहीतरी वेगळे बघत आहोत याचा आनंद मिळतो. अविनाश संपतने या कथेला पटकथेत रूपांतरित करतांना इतके टाईट ठेवले आहे कि ती प्रेक्षकांना ‘स्टार्ट-टू-एन्ड’ विचार करायला वेळच देत नाही. आणि त्यात भर म्हणजे शेवटच्या २० मिनिटात कथेत असलेले सरप्राईज अजूनच मजा आणते. किडनॅप झालेल्या सोनमचा शोध घेणारा बाप अनिल कपूर, अनिल कपूरने एकदम झकास साकारला आहे. या वयात त्याची एनर्जी, स्टॅमिना, अभिनय क्षमता, फिजिक, बॉडी लँग्वेज सर्वकाही अद्भुत आहे! अनिल कपूरची ही भूमिका केवळ आणि केवळ अनिल कपूरच साकारू शकतो. आता अनुरागबद्दल. हा दिग्दर्शक जेवढा ऑफ-बीट आहे तेवढाच कमालीचा कलाकार सुद्धा आहे हे सिनेमा बघताना अधोरेखित होते. अनिलला अभिनयात फाईट देणे ही काही खायची गोष्ट नाही पण अनुरागने ती खाल्ली आहे. अर्थात अंती अनिलच भाव खाऊन जातो हे सत्य नाकारता येत नाही. नेहमीप्रमाणे संवाद लेखकाचे काम करतांना अनुरागने यातही शिव्यांचा भडीमार केला आहे पण या ठिकाणी कथानकाच्या मागणीला अनुसरून ते आहेत. शिव्या सोडल्या तर सिनेमात ‘केवळ प्रौढांसाठी’ असे काहीही नाही पण शिव्या यथेच्छ आहेत, ज्यामुळे ‘एके व्हर्सेस एके’ कुटुंबासोबत एकत्र बसून बघणे ऑड वाटू शकते.
सिनेमात काय नवीन आहे? हा प्रश्न या सिनेमाच्या बाबतीत कधीच नाही विचारता येणार. अशा प्रकारची स्टोरीलाईन, पात्रांच्या करिअर व खाजगी आयुष्याबद्दल खरे भाष्य करणारे संवाद असला अनुभव देणारा एकही सिनेमा आतापर्यंत तरी बनलेला नाही, त्याकरिता खरेतर दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानेचं अभिनंदन करावयास हवे. उडान, लुटेरा, ट्रॅप्ड सारखे ऑफ-बीट सिनेमे आधीच ज्याच्या दिग्दर्शनाच्या यादीत आहेत, अशा विक्रमादित्यच्या करिअर मध्ये ‘एके व्हर्सेस एके’ हे आता आणखी एक फ्रेश एडिशन आहे. चाकोरीबाहेरचं बघण्याची सवय नसलेल्या प्रेक्षकांना हा अनुभव आवडणार नाही पण ओटीटी च्या खऱ्या प्रेक्षकांसाठी हा एक ‘झक्कास’ अनुभव आहे.