– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Ghoomer Movie Review

क्रिकेट असो वा सिनेमा.. दोन्ही भारतीयांचे जणू दोन धर्म आहेत. पण या दोन्हीत परफेक्ट टायमिंग ला खूप महत्व असते. मग तो क्रिकेट मधील बॅट्समन अथवा बॉलर चा खेळण्याचा क्रम असो असो कि योग्य वेळी प्रदर्शित होणारा सिनेमा. आता तुम्ही म्हणाल या टायमिंग चा आज प्रदर्शित घूमर शी काय संबंध? सांगतो. २८५ कोटींचा पहिला आठवडा आहे गदर-२ चा आणि ८५ कोटींचा टप्पा गाठलाय ओएमजी-२ ने. अजूनही ही दोन्ही वादळे बॉक्स ऑफिसवर शांत होण्याची चिन्हे नसतांना आज घूमर प्रदर्शित झालाय. म्हणजे परफेक्ट टायमिंग पूर्ण चुकलंय. टायमिंग चुकलंय असं का म्हणावं लागतंय कारण हे टायमिंग सोडलं तर सिनेमात बरंच काही जमलंय म्हणून. 

थोडक्यात कथानक- अनिना दीक्षित (सयामी खेर) ही एक उत्कृष्ट क्रिकेट प्लेयर आहे आणि तिच्या मेहनतीमुळे तिचे सिलेक्शन झाले आहे भारतीय क्रिकेट टीम मध्ये जी लवकरच जाणार असते इंग्लंड च्या टूर्नामेंट साठी. पण दुर्दैवाने अनिना चा अपघात होतो आणि तिला अपंगत्व येते. या वेळी तिच्या आयुष्यात येतो पदम सिंग सोधी (अभिषेक बच्चन) जो स्वतः एक पूर्व क्रिकेटर आहे. अपघाताने खचलेल्या आणि आपले आयुष्य संपवायला निघालेल्या सयामी ला तो पुन्हा उभारी देतो आणि  स्वतःच्या हातावर कसा उभा करतो पुढील कथाभाग. हो तुम्ही बरोबर ऐकले.. स्वतःच्या पायावर नव्हे तर हातावर.. ते कसे हे इथे सांगितले तर स्पॉयलर होईल.

काय विशेष- राहुल सेनगुप्ता आणि ऋषी वीरमानी यांच्या सोबत आर बाल्की यांनी घूमर ची कथा-पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. ट्रेलर बघून यात काय विशेष असणार आहे असा समज ज्यांचा झाला असेल , म्हणजे माझा पण झाला होता काही प्रमाणात, त्यांना या तीन लेखकांच्या टीमने चित्रपटात आश्चर्याचा मोठा धक्का दिलाय. अनिना चे क्रिकेट वेड, सोधीची एंट्री, तिचे अपघाताने खचून जाणे, पुन्हा एकवार नेमक्या वेळी सोधी ची तिच्या आयुष्यात येणे, त्यानंतर अनिना ने पुन्हा उभारी घेणे, सोधी तिला देत असलेली हार्ड ट्रेनिंग आणि नंतर क्लायमॅक्स चा फिनाले हा सर्व प्रवास जेवढा उत्कंठावर्धक आहे तेवढाच तो भावनिक सुद्धा आहे. अपघातानंतर सोधी अनिनाला ट्रेनिंग देऊन इंडियन टीम मध्ये परत आणण्यासाठी एवढे प्रयत्न का करतो याचा अंडर करंट मध्यंतरानंतर तेही अगदी क्लायमॅक्स पर्यंत मेंटेन ठेवण्यात लेखक त्रयी यशस्वी झाले आहेत. आर बाल्की यांच्या उत्तम दिग्दर्शनामुळे साधारण वाटणारे कथानक बघायला सुद्धा मजा येते. अभिनयाच्या बाबतीत सयामी खेर आणि अभिषेक बच्चन या दोघांनीही दि बेस्ट असे काम केले आहे. सयामी या भूमिकेसाठी निश्चितपणे खूप सारे अवॉर्ड्स जिंकण्याची शक्यता मला वाटते. अगदी नॅशनल अवॉर्ड पर्यंत सुद्धा मजल मारू शकते. दारुड्या, फ्रस्ट्रेटेड पण तितकाच हुशार अशा पूर्व क्रिकेटर कम कोच च्या भूमिकेत अभिषेक ला बघतांना मजा येते. गुरु, युवा, बॉब बिस्वास सारख्या अभिषेक च्या अविस्मरणीय भूमिकांमध्ये आता याही भूमिकेचा समावेश होईल. इतर कलाकारांमध्ये अनिना च्या आजीच्या भूमिकेत शबाना आझमी यांचा संयमित अभिनय लाजवाब झालाय. अनिना च्या बॉयफ्रेंड च्या भूमिकेत अंगद बेदी च्या वाट्याला कथानकात फारसे सीन्स अथवा संवाद नसले तरी अंगद ने आपली भूमिका उत्तम सादर केली आहे. लेखक आणि दिग्दर्शनानंतर संकलक निपुण गुप्ता यांचे क्रिस्पी एडिटिंग चित्रपटाची लांबी केवळ २ तास १५ मिनिटापर्यंत रोखण्यात यशस्वी झाले आहे.

 

नावीन्य काय?- कथानकात तसे काही नावीन्य नाही पण सादरीकरणात असलेला इमोशनल कोशंट आणि पटकथेतील ट्विस्ट नावीन्य आणतात.

कुठे कमी पडतो?- कथानकाला तशी गरज वाटत नसली तरी चांगले संगीत इथे मिसिंग आहे. घुमर चे शीर्षक गीत छान आहे पण ओव्हरऑल संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतावर अजून मेहनत घेण्याची गरज होती असे वाटते. पार्श्वसंगीत आणि छायांकन या तांत्रिक बाबीसुद्धा आणखी उत्तम होऊ शकल्या असत्या. आणि सर्वात मोठी कमी पडणारी किंवा चुकलेली बाब म्हणजे सिनेमाच्या प्रदर्शनाचे टायमिंग. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गदर-२ आणि ओएमजी-२ हे अजूनही प्रचंड गर्दी खेचत असल्याने त्यांच्या गदारोळात आलेला घूमर त्याच्या मेरिट पेक्षा खूप कमी यश मिळवेल हे तितकेच खरे.

पाहावा का? – नक्की बघावा. सयामी खेर आणि अभिषेकच्या उत्तम अभिनयासाठी आणिक आर बल्की च्या दिग्दर्शनासाठी. अत्यंत दर्जेदार अशी ही कलाकृती आहे.

स्टार रेटिंग – ३.५  स्टार आउट ऑफ फाईव्ह. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment