– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

१९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात इंडियन एअर फोर्स च्या वेस्टर्न कमांड च्या अधिपत्याखाली असलेल्या गुजरात येथील भुज एअरबेसला पाकिस्तानी एअर फोर्स ने संपूर्णतः उध्वस्त केले होते. त्या एअरबेस चे कमांडर स्कुआड्रन लीडर विजय कर्णिक या वीर मराठ्याने हा एअरबेस स्थानिक लोकांच्या मदतीने केवळ ३ दिवसात बांधून तयार केला आणि त्यानंतर त्या एअरबेसवर उतरलेल्या भारतीय सैनिकांनी मग पाकिस्तानी सैन्याचे सर्व मनसुबे उध्वस्त केले. पाकिस्तानने १४ दिवसात या एअरबेसवर ९२ बॉम्ब्स व २२ रॉकेट्सने हल्ला केला होता. कच्छ, गुजरात च्या या भारताच्या पश्चिमी भागावर कब्जा करून मग त्याबदल्यात भारतीय सैन्याने ताब्यात घेतलेला पूर्व पाकिस्तान (म्हणजे सध्याचा बांगलादेश) परत मागायचा सौदा करण्याचा डाव यामागे होता. (Movie Review: Bhuj The Pride of India)
या हल्ल्याची तुलना जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर केलेल्या हल्ल्याशी केली जाते.  यावेळी धैर्याने व चातुर्याने शत्रूचा मुकाबला करणाऱ्या विजय कर्णिक यांचे वय होते केवळ ३२ वर्षे. या घटनेवर आधारित व अजय देवगण ला विजय कर्णिक यांच्या मुख्य भूमिकेत घेऊन दिग्दर्शक अभिषेक दुधिया यांचा भुज: दि प्राईड ऑफ इंडिया आज डिस्ने प्लस हॉटस्टार वर प्रदर्शित झाला आहे. १५ ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला आपल्या वीर जवानांच्या अजरामर साहसाची ही गाथा प्रेक्षकांपर्यंत आणल्याबद्दल खरेतर निर्मात्यांचे कौतुक करावयास हवे.

चित्रपटात मध्यंतरापर्यंत भुज येथील हल्ल्याच्या आधी झालेला घटनाक्रम, त्यामागची कारणे, पाकिस्तानचे षडयंत्र यांचा अतिशय वेगवान आढावा घेण्यात आला आहे. मध्यंतरानंतर स्थानिकांच्या मदतीने विजय कर्णिक कशाप्रकारे भुज येथील एअर स्ट्रीप  ३ दिवसात कशी व्यवस्थित करतात हा घटनाक्रमही अतिशय वेगाने पुढे सरकतो. यात भारतीय सैन्याचा सुप्रसिद्ध गुप्तहेर रणछोडदास पागी (संजय दत्त), स्थानिक शूरवीर महिला सुंदरबेन जेठा (सोनाक्षी सिन्हा), पाकिस्तानातील भारतीय महिला गुप्तहेर हिना रहेमान (नोरा फतेही), मिलिटरी ऑफिसर राम करण (शरद केळकर) व फ्लाईट लेफ्टिनंट विक्रम सिंग (एमी विर्क) या सर्वांचा कसा हातभार लागतो याचे चित्रण आहे.

चित्रपटाची एकूण लांबी केवळ १ तास ५५ मिनिटांची आहे. गीत-संगीताला यात नगण्य स्थान असून केवळ युद्धाशी संबंधित घटनांनाच महत्व देण्यात आले असल्याने चित्रपट वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत राहतो. काही वेळा चित्रपटाची स्पीड इतकी वाढते की बऱ्याचदा समोर चालू असलेला घटनाक्रम नीट लक्षातही येत नाही. असीम बजाज यांचे छायाचित्रण सुरेख असून युद्धाची सर्वच दृश्ये अतिशय परिणामकारक रित्या चित्रित करण्यात आली आहेत. चित्रपटाची निर्मिती लॅव्हिश व ग्रँड असून सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर हा चित्रपट बघता न येणे हे खरेतर आपल्या सर्व रसिकांचे दुर्दैव.

अजय देवगण, संजय दत्त, शरद केळकर, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही  व एमी विर्क या सर्वांनीच आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. तान्हाजी नंतर अजय देवगण च्या तोंडी पुन्हा एकवार वीर मराठ्यांचे संवाद देण्यात आले आहेत ज्याची मजा सिनेमागृहातच आली असती. असो. चित्रपटात जाणवलेली उणीव इतकीच की एरवी चित्रपटाची गती इतकी कमी का असे वाटत असते परंतु भुज च्या सादरीकरणाची गती फारच जास्त असल्याने काही ठिकाणी थोडा गोंधळ उडतो इतकेच. आपल्या वीर सैन्याचे साहस दाखविण्यासाठी निर्मात्यांनी काही सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असल्यास त्यास आक्षेप घेण्याचे कारण नाही. विषयाचे नावीन्य हा भुज चा मोठा प्लस पॉईंट ठरावा.

वर्क फ्रॉम होम च्या या काळात सिनेमागृहाच्या लायकीची ही भव्यदिव्य निर्मिती सुद्धा एन्जॉय फ्रॉम होम शिवाय रसिकांकडे पर्याय नाही. 

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment