धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सिनेमाची दुनिया मोठी अजब असते इथे सगळं खोटं खोटं असतं पण ते सर्व  खरं खरं आहे असे दाखवून प्रेक्षकांना गुंगवून टाकायचं असतं! आणि सिनेमात जेंव्हा  खरोखरच खरं खरं दाखवलं जातं त्यावेळी मात्र प्रेक्षक कलाकृतीकडे पाठ फिरवतात!! सिनेमातले खरं-खोटं हे नेमकं काय असतं? कलावंतांची ‘रियल लाईफ’ जेव्हा ‘रील लाइफ’ म्हणून पडद्यावर येते त्या वेळी प्रेक्षक त्याला फारसा प्रतिसाद देत नाहीत. याची दोन उत्तम उदाहरण म्हणजे १९५९साली प्रदर्शित झालेला गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ आणि १९७० साली प्रदर्शित झालेला राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’. हे दोन्ही चित्रपट तशा अर्थाने त्या कलावंतांची रियल लाईफ दाखवणारे होते पण प्रेक्षकांनी या दोन्ही सिनेमांना अव्हेरले! असाच काहीसा प्रकार यश चोप्रा यांच्या १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटाच्या वेळी झाला.

सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात अमिताभ बच्चन आणि रेखा ही रुपेरी पडद्यावरील सर्वाधिक हिट अशी पेयर होती. मुकद्दर का सिकंदर, सुहाग, गंगा की सौगंध, मिस्टर नटवरलाल, दो अंजाने या आणि अशा अनेक चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांचे रंजन करत होती. त्याच वेळी या दोघांच्या प्रेम प्रकरणाची देखील मोठी चर्चा मीडियामध्ये होत होती. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचे १९७३ साली झाले लग्न झाले त्यानंतर जया भादुरी यांनी चित्रपट संन्यास घेतला होता. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमप्रकरणाची मोठी खमंग चर्चा त्यावेळच्या माध्यमातून होत होती. याच तीन कलावंतांना घेऊन यश चोप्रा यांनी ‘सिलसिला’ (Silsila 1981 Film) हा चित्रपट बनवला. आज १४ ऑगस्ट २०२१ रोजी सिलसिला हा चित्रपट 40 वर्ष पूर्ण करीत आहे. (प्रदर्शनाची तारीख १४ऑगस्ट १९८१) या सिनेमाच्या मेकिंग ची कहाणी मोठी रंगतदार आहे. (40 Years of Director Yash Chopra’s Musical Romantic Hindi Film Silsila)

मुळात यश चोप्रा यांनी हा चित्रपट ज्यावेळी निर्माण करायला सुरुवात केली त्या वर्षी म्हणजे १९७९ साली या चित्रपटाची स्टारकास्ट अमिताभ बच्चन ,परवीन बॉबी आणि स्मिता पाटील अशी होती. परंतु त्यानंतर ही स्टारकास्ट बदलून अमिताभ-जया आणि रेखा अशी झाली. त्यामुळे डे वन पासून हा चित्रपट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरला. अमिताभ- रेखा चे चालू असलेले प्रेम प्रकरण,जया भादुरी ची नाराजी याचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम हा विषयच मोठा जबरदस्त इंटरेस्टीग असा होता. जया भादुरी यांनी जवळपास सात आठ वर्षाच्या गॅपनंतर यात भूमिका केली होती. पूर्वीची जुनी स्टारकास्ट बदलून  रेखा आणि जया भादुरी घेण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला याबाबत जरी साशंकता असली तरी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सर्वानुमते हा निर्णय झाल्याचे सांगितले.

‘किंग ऑफ रोमान्स’ असा ज्यांचा लौकिक होता त्या यश चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची हळवी प्रेमकथा लिहिली होती प्रीती बेदी यांनी तर पटकथा यश चोप्रा आणि सागर सरहदी यांनी लिहिली होती. (सागर सरहदी यांना चोप्रांनी ‘कभी कभी ‘ पेक्षा तरल प्रेमकथा व्हायला हवी असे आवर्जून सांगितले होते.) तर संवाद रोमेश शर्मा यांनी लिहिले होते. या चित्रपटापासून संवाद लेखक जावेद अख्तर हे गीतकार बनले. खरंतर यश चोप्रा यांचे आवडते गीतकार होते साहिर लुधियानवी.‘वक्त’ पासून त्यांच्या बव्हंशी चित्रपटाची गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहीली होती. परंतु १९७९साली साहीर यांच्या आईचे निधन झाले. साहिर प्रचंड मातृभक्त होते. आईच्या  निधनाने ते अक्षरश: खचून गेले. पुढे एक वर्षातच २५ ऑक्टोबर १९८०रोजी साहिर यांचे निधन झाले. आता यश चोप्रा यांना नवीन गीतकार शोधणे भाग होते. लेखक जावेद अख्तर हे चांगल्या कविता करतात, हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी जावेदला या चित्रपटासाठी गाणी लिहायला सांगितले.

या चित्रपटातील एकूण दहा गाण्यांपैकी तीन गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेले पहिलेच गाणे ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे जबरदस्त हिट ठरले. या व्यतिरिक्त ‘ये कहा आ गयेहम’,’नीला आसमा सो गया’हि जावेद अख्तर ची गाणी होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे पिता श्रीहरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेले ‘ रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे होळी गीत देखील होते . मुळात या चित्रपटात आधी होळी गीताला कुठेच जागा नव्हती पण यश चोप्रा यांना अमिताभ- रेखा च्या प्रेमाचा एक मोठा ट्रिगर पॉईंट दाखवायचा होता त्यामुळे त्यांनी जावेद ला होळी गीत लिहायला सांगितले. पण जावेद अख्तर यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे हे गाणे कोणाकडून लिहून घ्यायचे हा प्रश्न पडला. त्यावेळी जावेद अख्तर यांनीच हरिवंशराय बच्चन यांचे नाव सुचवले आणि हे सिनियर बच्चन बऱ्याच कवी संमेलनातून हे पारंपारिक लोकगीत सादर करीत असतात असे सांगितले. यश चोप्रा यांनी ताबडतोब हरीवंशराय बच्चन यांची भेट घेऊन या पारंपारिक मुखड्याला आणखी काही अंतरे जोडा असे सांगितले. हे गाणे त्यांचे पुत्र अमिताभ वर चित्रित होणार असे लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब हे गाणे पूर्ण करून यश चोप्रांच्या हवाली केले.

यश चोप्रा यांनी हे गाणे अमिताभ बच्चन यांनीच गावे असा आग्रह यांच्याकडे धरला. अमिताभने देखील मोठ्या मस्ती मध्ये हे गाणे गायले. आज चाळीस वर्षानंतर देखील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे कल्ट क्लासिक Holi songबनले आहे. यातील अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते’ हे गाणे होते . परंतु या गाण्याचे रेकॉर्डिंग लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांचे वेगवेगळे झाले होते. त्यानंतर हे दोन्ही भाग एकत्र करून गाणे बनले होते.(या गाण्याचा किस्सा स्वतंत्र चौकटीत दिला आहे) लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत हे गाणे एकत्रित रेकॉर्डिंग व्हायला हवे होते असे सांगितले होते.गीतकार  हसन कमाल यांनी लिहिलेले ‘सर से सरके’ हे गाणे होते तर जुनेजाणते गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले ‘लडकी है या शोला’ हे गाणे होते. या चित्रपटात संत मीराबाई यांची एक पारंपरिक रचना ‘जो तुम तोडो पिया मै नाही तोडू रे’लताने गायली होती.  निदा फाजली यांची देखील एक रचना यात होती जी पामेला चोप्रा यांनी गायली होती.

‘सिलसिला’ या चित्रपटाचा मुहूर्त २० सप्टेंबर १९७९ रोजी झाला. त्यावेळी या चित्रपटाचे बजेट दोन कोटी ठरले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण चार कोटी रुपये कमावले. जगभरातून या चित्रपटाला आठ कोटी रुपये मिळाले. परंतु १९७९ सालच्या टॉप टेन चित्रपटात ‘सिलसिला’ ला आठव्या  क्रमांकाचे स्थान मिळाले होते. यावर्षीचा सर्वाधिक यशस्वी सिनेमा होता मनोज कुमार यांचा ‘क्रांती’ दुसऱ्या क्रमांकावर मनमोहन देसाई यांच्या ‘नसीब’ या चित्रपटाची वर्णी लागली तर तिसर्‍या क्रमांकावर जितेंद्र- हेमामालिनी अभिनीत ‘मेरी आवाज सुनो’ या चित्रपटाचा नंबर होता. (आज कुणाला हा सिनेमा आठवतो तरी कां?) चौथ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन- झीनत अमान यांचा प्रकाश मेहरा दिग्दर्शित‘लावारिस’ तर पाचव्या क्रमांकावर कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा चित्रपट होता.

‘सिलसिला’ हा चित्रपटाची  निर्मिती  अतिशय उत्कृष्ट झाली होती. आज देखील हा सिनेमा त्यातील तरल भावनात्मक प्रणयी त्रिकोणा सोबतच संगीतासाठी आठवला जातो. भलेही त्या काळी Average Success catagory मध्ये गणला गेला असला तरी! हळूहळू काही वर्षानंतर या चित्रपटाची लोकप्रियता वाढत गेली आणि नंतर हा सिनेमा आता भारतीय चित्रपटातील एक कल्ट क्लासिक रोमांटिक सिनेमा  म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी देखील त्यांच्या आवडत्या चित्रपटांमध्ये ‘सिलसिला’ आणि ‘लम्हे’ या चित्रपटाचे उल्लेख केलेला आहे. यात अमिताभ बच्चन – शशी कपूर आणि संजीव कुमार पुन्हा एकदा ‘त्रिशूल’ नंतर एकत्र आले होते. या चित्रपटात प्रथमच शशि कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्या मोठ्या भावाची भूमिका केली होती बाकी सर्व चित्रपटात शशि कपूर नेहमी अमिताभ चा छोटा भाऊ म्हणून दाखवले आहेत. संजीव कुमार खरं तर हा चित्रपट करायला फारसे उत्सुक नव्हते परंतु यश चोप्रा यांनी अशा तऱ्हेने चित्रपटाची कथा त्यांना ऐकवली की त्यांना नाही म्हणणे कठीण गेले! या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, सुषमा सेठ ,देवेन वर्मा यांच्या देखील भूमिका होत्या. या चित्रपटाचे संगीत शिव-हरी यांनी दिले होते. हा त्यांचा पहिला चित्रपट होता.ख्यातनाम संतूरवादक शिवकुमार शर्मा आणि जागतिक कीर्तीचे बासरी वादकहरिप्रसाद चौरसिया यांना चित्रपटात संगीतकार म्हणून घेणे ही मोठी रिस्क होती. पण यश चोप्रा यांना दोघांच्या मेरीट वर विश्वास होता. चित्रपटाला म्हणावे तसे त्या काळी यश न मिळाल्याने  अमिताभ आणि यश चोप्रा यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे यश चोप्रा यांना पुढील चित्रपट अमिताभ आणि रेखा यांना घेऊन करायचा होता तो प्रोजेक्ट बारगळला.( हा चित्रपट म्हणजे पुढे अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन बनवलेला ‘लम्हे’!) काही काळानंतर मात्र अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रांच्या चिरंजीवांच्या आदित्य चोप्राच्या दिग्दर्शनात ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट २००१साली केला होता. त्यानंतर चारच वर्षांनी २००५ साली यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘वीर-झारा’ या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती . 

या चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे गाणे ॲम्स्टरडॅम च्या ट्यूलिपगार्डन येथे चित्रीत केलं गेलं होतं त्याकाळची ही मोठी ब्रेकिंग न्यूज होती. चित्रीकरणाच्या दरम्यान रेखा ला अनेक रिटेक घ्यावे लागत होते या वरून  अमिताभने मजेमजेत सर्वांसमोर रेखाचा पाणउतारा केला होता. रेखा चिडून  आपल्या मेकअप रूम मध्ये जाऊन बसली आणि त्या दिवसाचे चित्रीकरण पॅकअप करावे लागले! नंतर यश चोप्राने दुसऱ्या दिवशी तिची समजूत काढून पुढील चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रपटाचे काही चित्रीकरण श्रीनगर च्या  विमानतळावर झाले होते.  त्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू झाल्याने तिकडे चित्रीकरण करणे शक्य नव्हते. सिलसिला नंतर तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे २०१६ साली Familyman या वेब सिरीज चे शूटिंग श्रीनगरला करण्यात आले. मुंबईच्या राजकमल आणि फिल्मसिटी मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. या चित्रपटानंतर जया भादुरी यांनी सिनेमापासून संन्यास घेतला आणि त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी त्यांनी ‘हजार चौरासो की मां’ या चित्रपटात भूमिका केली.

या चित्रपटातील ‘नीला आसमा सो गया हे ‘ गाणे अप्रतिम असे आहे. गंमत म्हणजे या गाण्याची ट्यून शिव-हरी यांची नाही! हि आहे शम्मी कपूर यांची. शम्मी संगीताचे मोठे शौकीन होते. कायम ते गिटार वर वेग वेगळ्या धून बनवत असत. १९७४ साली ‘जमीर’ या चित्रपटाच्या वेळी अमिताभ बच्चन आणि शम्मी कपूर हॉटेलमध्ये असेच गप्पा मारत असताना त्यांनी आपल्या गिटारवर एक धून वाजवली. ही धून अमिताभ बच्चन यांना बेहद्द आवडली ती त्यांच्या डोक्यात फिक्स राहिली.ज्या वेळी ‘सिलसिला’ या चित्रपटातील ‘नीला आसमा सो गया’ हे गाणे त्यांच्या समोर आले तेंव्हा त्यांनी शिव- हरी यांना ती ट्यून गुणगुणून  दाखवली.त्यांना देखील ती ठेवून खूप आवडली परंतु दुसऱ्या कलाकाराची ट्यून  कशी वापरायची? हा प्रश्न पडला. अमिताभने लगेच फोन करून शम्मी कपूर यांना ती ट्यून  वापरू का असे विचारले. त्यावेळी शम्मी कपूर अक्षरशः विसरून गेले होते. मग त्यांना आठवण करून दिल्यावर त्यांनी परवानगी दिली.

शशि कपूर आणि जया भादुरी यांचा हा एकमेव चित्रपट आहे तसेच जया भादुरी यांनी यश चोप्राच्या या एकमेव चित्रपटात काम केले होते. चित्रपटाचा प्रणयी त्रिकोण खरोखर खूप सुंदर होता. कथानकच काळजाला भिडणारे होते. संजीव कुमार यांनी यातील समंजस डॉक्टरची भूमिका केली होती आपली पत्नी एका परपुरुषाच्या प्रेमात आहे हे समजल्यानंतर त्यांच्या देहबोली तील बदल त्यांच्यातील कलावंतांची कलेची श्रीमंती  दाखवणारा होता. त्याप्रमाणे जया भादुरी यांनी देखील या चित्रपटात केलेल्या अंडरप्ले ॲक्टींगला रसिकांनी दाद दिली . पण खरं सांगायचं तर रेखाने या चित्रपटात जयावर अक्षरश: मात केली. रेखाचे या चित्रपटातील लुक्स, तिची स्टनिंग ब्युटी, तिचे ड्रेसेस, तिच्या साड्या, तिचा मेकअप, तिचे लिपस्टिक सारेच अफलातून होतं. अमिताभ आणि रेखा या जोडीचा हा शेवटचा चित्रपट ठरला.या चित्रपटासाठी फिल्म फेयर ची तीन नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट अभिनेता (अमिताभ)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (जया) सर्वोत्कृष्ट संगीतकार (शिव हरी) अशी ती नामांकने होती.

आज चाळीस वर्षानंतर आपण जेव्हा हा ‘सिलसिला’ या चित्रपटाचा स्वतंत्रपणे विचार करू लागतो त्यावेळी त्यातील सौंदर्यस्थळे मनाला मोहून टाकतात. यश चोप्रा यांनी खरोखरच या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. जया आणि रेखा यांच्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अबोला असला तरी त्यांच्या दोघींमध्ये कमी सीन्स असल्यामुळे यश चोप्रा यांना चित्रपट बनवणे सोपे गेले. विवाह बाह्य संबंध हा विषय आमच्या बॉलिवूडला नवा नाही. ‘सिलसिला’ या चित्रपटात हाच विषय यश चोप्रा यांनी मोठ्या कौशल्याने हाताळला होता. यातील शेवट बऱ्याच जणांना बाळबोध/नाटकी वाटला पण त्याकाळची सामाजिक परिस्थिती पाहता तो योग्य होता असे आज वाटते! 

हेही वाचा – आर के चा ‘प्रेमरोग’ चाळीशी त पोचला!

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.