– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Badhaai Do Movie Review पाश्चात्य संस्कृतीत विषय रुळला असला तरी एलजीबीटी (लेस्बियन/गे/बाय सेक्सुअल/ट्रान्सजेंडर) विषयी आजही भारतात उघडपणे चर्चा होत नाही हे सत्य आहे. गेल्या काही वर्षात भारतीय मानसिकतेत याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. अनैसर्गिक सेक्स्युअल ओरियंटेशन म्हणून आजही आपला बहुतांश समाज याकडे बघतो म्हणून यात मोडणाऱ्या स्त्री अथवा पुरुषांना आपल्या समाजव्यवस्थेने उघडपणे अजून स्वीकारलेले नाही. असे असतांना या विषयाभोवती एखाद्या व्यावसायिक व करमणूकप्रधान मेनस्ट्रीम सिनेमाचे कथानक जर गुंफलेले असेल तर त्याला ‘करमणूक म्हणून’ बघतांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देईल याबाबतीत अजूनही निश्चित असे काही सांगता येणे अवघड आहे. ओटीटी माध्यमाचा गेल्या काही वर्षात वाढलेला वापर आणि त्यावर नसलेली सेन्सॉरशिप यामुळे या विषयावर आधारित भारतीय कन्टेन्ट चे सिनेमे आणि वेबसिरीज चे प्रमाण खूप वाढत आहे. आज सिनेमागृहात प्रदर्शित झालेला राजकुमार राव व भूमी पेडणेकर चा ‘बधाई दो’ सुद्धा याच विषयाला वाहिलेला आहे. 

निर्माता विनीत जैन यांनी आपल्या २०१८ सालच्या बधाई हो चा आणलेला हा स्पिरिच्युअल सिक्वेल. २०१५ सालच्या ‘हंटर’ या आपल्या दिग्दर्शनातील पहिल्या प्रयत्नानंतर हर्षवर्धन कुलकर्णी चा हा दुसरा सिनेमा. खरंतर ऑफबीट आणि त्यातही सेक्स्युअल कन्टेन्ट असलेल्या ऑफबीट कथानकांचा सध्याचा बॉलिवूडचा एकमेव हिरो आहे आयुषमान खुराणा. अशात त्याचे याच विषयावर आधारित ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ व ‘चंदिगढ करे आशिकी’ हे दोन चित्रपट येऊन गेले. बधाई दो मध्ये मात्र अशा प्रकारच्या ऑफबीट चित्रपटांना स्वीकारण्याचे धैर्य दाखविणारा राजकुमार राव आहे. शुभमंगल प्रमाणेच यातही कथानकाला नॉन मेट्रो शहरातील मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आणि ट्रीटमेंट सुद्धा तशीच कॉमिक आहे. लॅव्हेंडर विवाह या भारतातील अप्रचलित विवाह पद्धतीवर आधारलेल्या कथानकावर एखादा मेनस्ट्रीम हिंदी चित्रपट निघण्याची बहुधा ही पहिलीच वेळ. लॅव्हेंडर विवाहात दोन पार्टनर्सचे विरुद्ध सेक्स्युअल ओरियंटेशन्स असतात (म्हणजे एखादा गे असेल तर दुसरा लेस्बियन किंवा इतर काही) आणि केवळ काही कारणांमुळे अथवा सामाजिक दबावामुळे अथवा एकमेकांच्या सामंजस्याने करार पद्धतीने हे विवाह होतात. 

बधाई दो चा देहरादून स्थित नायक शार्दूल ठाकूर (राजकुमार राव) गे आहे आणि नायिका सुमन सिंग (भूमी पेडणेकर) लेस्बियन. परंतु दोघांच्याही कुटुंबातील कुठल्याही सदस्याला याची कल्पना नसते आणि दोघांचेही कुटुंबीय लग्नासाठी म्हणून दोघांच्या हात धुवून मागे लागलेले असतात. शार्दूल पोलीस इन्स्पेक्टर असतो तर सुमन शाळेत पीटी टीचर. योगायोगाने दोघांची ओळख होते आणि शार्दुलला सुमन च्या लेस्बियन असण्याबद्दलचे सत्य कळते. ‘घरच्यांना शांत करण्यासाठी व समाजाला दाखविण्यासाठी म्हणून आपण दोघे लग्न करून घेऊ यात मग आपण आपले आयुष्य आपापल्या पार्टनरसोबत जगण्यास मोकळे’ या बोलीवर हे दोघे विवाह बंधनात अडकतात खरे पण नंतर एकानंतर एक समस्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात येण्यास सुरुवात होते ज्याबद्दल येथे सविस्तर सांगणे योग्य ठरणार नाही. 

विनोदी पद्धतीने वाटचाल करणारी चित्रपटाची कथा-पटकथा आहे हर्षवर्धन कुलकर्णी, सुमन अधिकारी व अक्षत घिल्दियाल यांची. एक बाब सुरुवातीलाच मान्य करावी लागेल की ही कथा सांगतांना कथाकाराचा अथवा दिग्दर्शकाचा उद्देश या कथेच्या आडून कुठलीही उत्तान दृश्ये, कामुक दृश्ये, अनैसर्गिक संभोग दृश्ये दाखविणे हा अजिबात नाहीए आणि त्याचा चित्रपटात शून्य वापर आहे. संवादांमध्ये अनुपस्थित असलेली शिवीगाळ सुद्धा अशात दुर्मिळ झाली आहे. आज ओटीटी जगतात जिथे अशा उत्तान दृश्य दाखविण्याच्या एकमेव उद्देशाने  कथानकं लिहिली जातात असे असूनही कथाकार व दिग्दर्शक मंडळींनी कमालीच्या संयमाने व अत्यंत प्रगल्भतेने हा विषय मांडला आहे जे खूपच कौतुकास्पद आहे. आक्षेपार्ह असे एकही दृश्य सिनेमात नाही. जे दाखवले आहे ते केवळ सांकेतिक. खरंतर हंटर च्या हर्षवर्धन कडून असे अजिबातच अपेक्षित नाही. त्यात एक पाऊल पुढे म्हणजे चित्रपट पाहिल्यावर हेसुद्धा स्पष्ट होते की कथाकार आणि दिग्दर्शकाला यातून केवळ एलजीबीटी कम्युनिटी ला सोसावा लागणारा सामाजिक बहिष्कार, त्यांची होणारी घुसमट, कुटुंबातून न मिळणारा सपोर्ट या मुद्द्यांना अधोरेखित करून प्रेक्षकांसमोर आणायचे आहे. थोडक्यात हेतू चांगला आहे व त्याला अनुसरून कथानकाचा शेवट करण्यात आलाय.

  

पण हेतू चांगला असूनही मुळात हा विषय सर्वसामान्य प्रेक्षकांच्या जवळचा/नेहमीचा/सर्वसमावेशक नसल्याने प्रेक्षक नायक नायिकेच्या भूमिकेमध्ये गुंतत नाही. त्यात मध्यंतरापूर्वी आणि नंतरही पटकथेचा वेग खूप ठिकाणी मंदावतो. खासकरून इमोशनल सीन्समध्ये. त्यामुळे चित्रपट रेंगाळतो आणि कंटाळवाणा होतो. रेंगाळलेल्या कथानकात जीव ओतणारे संगीतही चित्रपटात नसल्याने अजूनच निराशा होते. चित्रपटाची लांबी अडीच तासांची आहे जी सहज दोन तासात आटोपता आली असती. कथानकात विनोदाची पेरणी सुद्धा म्हणावी तितकी झालेली नाही आणि जेवढी झाली आहे ती तुम्हाला खळाळून हसवत नाही. छायांकन व संकलन अगदीच ठीक. 

अभिनयाच्या बाबतीत राजकुमार आणि भूमी दोघांनीही अपेक्षेप्रमाणे सुंदर काम केले आहे. इतर कलाकारात भूमीची लेस्बियन पार्टनर म्हणून छुम दरंग हिने व राजकुमार च्या आईच्या भूमिकेत शिबा चड्ढा यांनी छान काम केले आहे. 

तद्दन व्यावसायिकता बाजूला ठेऊन, अशा विषयांना हात घालण्यासाठी धैर्य लागते ज्याबद्दल टीमचे अभिनंदन करावयास हवे परंतु करमणुकीत कमी पडणारा व सर्वसामान्य प्रेक्षकाच्या जवळचा विषय नसल्याने ‘बधाई दो’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवेल अशी शक्यता वाटत नाही. 

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.