– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

De Dhakka 2 Movie Review. १४ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली एका मराठी सिनेमाने अनेकांना सुखद धक्के दिले. त्यात प्रामुख्याने नायक अथवा मुख्य अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे च्या करिअरला, सहाय्यक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधव ला, झी टॉकीज या मराठी चित्रपट निर्मिती कंपनीला, मराठी सिनेमा इंडस्ट्रीला आणि मराठी प्रेक्षकांनाही. दे धक्का हा तो अनपेक्षित असा सुखद धक्का होता. मुख्य म्हणजे मराठी सिनेमा इंडस्ट्रीला जेंव्हा अत्यंत आवश्यकता होती तेंव्हा हा धक्का मिळाला होता. इतकी वर्षे होऊनही आज दे धक्का टीव्ही वर आपला रिपीट ऑडियन्स टिकवून आहे हे विशेष. असो. वर्षे सरली.. काळ पुढे निघून गेला तसा प्रेक्षकही बदलला. प्रेक्षकांची टेस्ट बदलायला जसा १४ वर्षे हा काळ काही फार मोठा नाही हे जरी खरे असले तरी गेल्या ३ ते ४ वर्षात म्हणजे ओटीटी च्या आगमना नंतर मात्र यात खूप फरक पडलाय हेही तितकेच खरे. दाक्षिणात्य सिनेमांच्या लाटेसमोर आज जिथे हिंदी सिनेमाची अवस्था दयनीय वाटतेय तिथे मराठी सिनेमा तर कुठे गिनती मध्येच नाहीये. थोडक्यात आज पुन्हा २००८ सारखीच परिस्थिती आहे. वर उल्लेख केलेल्यांपैकी सर्वांनाच परत एका सुखद धक्क्याची गरज आहे. आणि नेमका अशा वेळी त्याच टीमचा दे धक्का-२ प्रदर्शित झाला आहे. 

दे धक्का चे कथानक काय होते? असे विचाराल तर मी म्हणेल काहीच नाही. दे धक्का हा एका रंगतदार प्रवास होता. काही धम्माल पात्रांनी सोबत केलेला असा  फुल्ल टू टाईमपास जर्नी. मकरंद जाधव (मकरंद अनासपुरे) नावाच्या खेड्यात राहणाऱ्या मोटार मेकॅनिक ने आपल्या लेकीला डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता यावा म्हणून कोल्हापूर ते मुंबई केलेला असा सहकुटुंब सांगीतिक प्रवास. मकरंद च्या या कुटुंबात मकरंद चा दारुड्या बाप सूर्यभान जाधव (शिवाजी साटम), जिथे तिथे वस्तू चोरणारा क्लिप्टोमेनिया ग्रस्त मेव्हणा धनाजी (सिद्धार्थ जाधव), मकरंद ला संकट काळी साथ देणारी बायको सुमी (मेधा मांजरेकर), पहेलवान होण्यासाठी दिवसभर व्यायाम करणारा आणि अंडी खाणारा मुलगा किस्ना (सक्षम कुलकर्णी) आणि नृत्यात प्रावीण्य मिळवलेली मुलगी सायली (गौरी वैद्य) यांचा समावेश होता. मुळात दे धक्का चे कथाकार महेश मांजरेकर यांनी ही पात्रे अफलातून लिहिली होती. या कुटुंबाचा मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास रंजक करण्यात विशेष करून मकरंद आणि त्याचे वडील सूर्यभान यांच्यामधील तू-तू-मै-मै आणि धनाजी आणि मकरंद मधील विनोदी प्रसंग यांचा सिंहाचा वाटा होता. लॉजिकला बॅक सीटवर बसवून केवळ निखळ करमणूक करणारा हा धक्का आता नव्या रूपात आपला दुसरा भाग घेऊन आलाय. 

यावेळी हे कुटुंब लंडनला निघाले आहे. मकरंद आता गरीब मेकॅनिक न राहता त्याने पहिल्या भागात बनवलेल्या इंजिन च्या पार्ट मुळे तो एक मोठा उद्योगपती वैगरे झालाय. लंडनला यशस्वी उद्योजक म्हणून मकरंद चा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार आहे आणि त्याकरिता हे कुटुंब परत एकवार प्रवासाला निघाले आहे. लंडनला पोहोचल्यावर मात्र एका संकटात हे कुटुंब सापडते. भारतात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून लंडनला फरार झालेला बिझनेसमॅन नीरज डेढिया उर्फ एनडी (विद्याधर जोशी ) च्या जाळ्यात हे कुटुंब अडकते. मकरंद ने बनवलेल्या इंजिनच्या पार्ट वर एनडी स्वतःचा हक्क सांगतो आणि अचानक हे सर्व कुटुंब परत एकवार रस्त्यावर येते. पण यावेळी लंडनच्या. शोध सुरु होतो या एनडीचा. पुन्हा एकदा गाडीला धक्का मारण्याची आणि प्रवासाची वेळ या कुटुंबावर कशी येते आणि हा प्रवास कसा संपतो हा पुढील कथाभाग. 

पात्र सर्व तीच आहेत. फक्त मकरंद ची मुलगी सायलीच्या भूमिकेत यावेळी महेश मांजरेकर यांची कन्या गौरी इंगवले हिची वर्णी लागली आहे. सुदेश मांजरेकर यांच्यासोबत अतुल काळे यांनी पहिल्या धक्क्याचे दिग्दर्शन केले होते. यावेळी मात्र सुदेश मांजरेकर सोबत स्वतः महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शनाची धुरा हातात घेतली आहे. कथा-पटकथा महेश यांचीच असल्याने कथेचा आत्मा म्हणजे या सर्व कुटुंबीयांचा एकत्रित प्रवास असाच ठेवण्याचा प्रयत्न महेश यांनी केलाय. परंतु दुर्दैवाने हा प्रयत्न यावेळी सपेशल गंडलाय. मध्यंतरानंतर (आणि मध्यंतरापूर्वी सुद्धा काही ठिकाणी) कथानक इतके काही भरकटले आहे की ते अगदी शेवट आला तरी रुळावर येताच नाही. मध्यंतरात महेश जेंव्हा स्वतः एका सुपारी किलर च्या भूमिकेत येतात तिथून पुढे कथानकाची वाटचाल अगदी प्रेक्षकांना मूर्ख समजून अगदी वाटेल त्या दिशेने भरकटत जाते. मुळात पहिल्या भागात सुद्धा लॉजिकला फाट्यावर मारण्यात आले होते पण इथे तर लॉजिक चे अस्तित्वच दिसत नाही. मकरंद आणि त्याचे वडील सूर्यभान यांच्यामधील तू-तू-मै-मै यावेळी कुठे रंगतदार होतच नाही. धनाजी च्या दिसेल त्या वस्तू चोऱ्या करण्याच्या प्रसंगांचा इथे अतिरेक वाटतो.  संवादलेखक गणेश मतकरी यांनी लिहिलेले संवाद खरपूस आहेत पण मुळात पटकथेत उभे केलेले अनेक प्रसंग  इतके काही बाळबोध आहेत की हे खरपूस संवाद सुद्धा त्यात रंगत आणू शकत नाहीत. चित्रपटाची एकूण लांबी २ तासांची मर्यादित असूनही मध्यंतरानंतर हा प्रवास केव्हा एकदा संपेल असे वाटते. 

अभिनयाच्या बाबतीत मकरंद अनासपुरे सह सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम यांच्या कामाचे कौतुक करावे लागेल. मकरंद बऱ्याच दिवसांनी जुन्या फॉर्मात दिसून आला आहे. महेश मांजरेकर कन्या गौरी इंगवले हि एक छान नर्तिका आहे. तिच्यासाठी म्हणून महेश यांनी पांघरूण या सिनेमाची निर्मिती केली होती. यातही तिचे डान्सिंग स्किल्स दाखविण्यासाठी म्हणून गरज नसतानाही महेश मांजरेकर यांनी केलेली प्रसंगांची निर्मिती स्पष्टपणे दिसून येते. असो. इतर कलावंतांमध्ये मेधा मांजरेकर, सक्षम कुलकर्णी, विद्याधर जोशी यांनी बरे काम केले आहे. प्रवीण तरडे सारखा ताकदीचा कलाकार एका दुय्यम आणि केविलवाण्या भूमिकेत वाया घातला आहे. संजय खापरे ठीक. हितेश मोडक यांनी दिलेल्या संगीतात अजिबात पंच नाही. छायांकन आणि इतर तांत्रिक बाबतीत चित्रपटाचा दर्जा ठीक आहे. 

दे धक्का हा खरोखरच एक धक्का होता पण सुखद असा. दे धक्का २ मात्र निराश करणार अशी शंका ट्रेलर वरून आली होती. टी खरी ठरली त्यामुळे निराशेचा धक्का सुद्धा थोडा कमी तीव्रतेचा होता. शेवटची दहा-पंधरा मिनिटे चित्रपट सोडून आलो यातच सर्व आले. 

इतर मराठी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.