– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

HIT: The First Case Hindi Movie Review. २०२० साली कोवीड चे पहिले लॉक-डाऊन लागण्याच्या बरोबर एक महिना अगोदर म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आलेल्या एका तेलगू सिनेमाने अनपेक्षितपणे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचीही पसंती मिळवली होती. अनपेक्षित यासाठी की सिनेमाचा दिग्दर्शक नवखा होता म्हणजे अगदीच फर्स्ट टायमर आणि कलाकार सुद्धा दिग्गज श्रेणीत मोडणारे नव्हते, यामुळे फारशा अपेक्षा नव्हत्या. ‘हिट-दि फर्स्ट केस’ हे त्या तेलगू सिनेमाचे नाव. विश्वाक सेन या तेलगू अभिनेत्याचा नायक म्हणून हा मोजून चौथा सिनेमा तर दिग्दर्शक सैलेश कोलानु यांनी तर दिग्दर्शनाची धुरा पहिल्यांदाच सांभाळली होती. पण पटकथा दमदार होती जी आधी समीक्षकांना आणि नंतर प्रेक्षकांना सुद्धा भावली. लॉक डाऊन च्या गडबडीत मात्र नंतर काहीसा दुर्लक्षिला गेला. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशामुळे याचा हिंदी रिमेक करण्याचे ठरले शिवाय तेलगू मध्ये त्याचा दुसरा भाग काढण्यावरही लगेच काम सुरु झाले. आज या सिनेमाचा याच नावाचा अधिकृत हिंदी रिमेक प्रदर्शित झालाय. शिवाय तेलगू भाषेतील याचा दुसरा भाग येत्या २९ जुलै रोजी प्रदर्शित होतोय. आज प्रदर्शित हिंदी रिमेक मध्ये राजकुमार राव व सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असून याचे दिग्दर्शन सैलेश कोलानु यांनीच केले आहे. ऍक्शन थ्रिलर अथवा सस्पेन्स थ्रिलर या प्रकारात मोडणारी सिनेमाची पटकथा स्टार्ट टू एन्ड तुम्हाला खुर्चीवर जखडून ठेवते यात शंका नाही. 

कथानक थोडक्यात. विक्रम (राजूकमार राव) हा जयपूर, राजस्थान येथील गुन्हे अन्वेषण विभागातील ‘होमिसाईड इंटरव्हेंशन टीम’ (HIT/एचआयटी) मधील एक खूप हुशार आणि प्रचंड क्षमता असलेला पोलीस अधिकारी आहे. त्याचे नेहा (सान्या मल्होत्रा), त्याची सहकारी आणि फॉरेन्सिक अधिकारी, हिच्यावर प्रेम आहे. विक्रम च्या आयुष्यात पूर्वी एक दुर्दैवी घटना घडलेली असते ज्यामुळे विक्रम पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या मानसिक असंतुलनातून जगत असतो ज्यातून बाहेर येण्यासाठी नेहा त्याला साथ देत असते. विक्रम या तणावातून बाहेर पडण्यासाठी म्हणून सुटी घेऊन स्वतःच्या गावी गेलेला असतांनाच  एक घटना घडते. प्रीती नावाची एक तरुणी जयपूर एक्स्प्रेस हायवे वरून स्वतःच्या कारने प्रवास करत असतांना अचानक बेपत्ता होते. तिचा शोध घेणे चालूच असते तर दोन महिन्यानंतर विक्रम ला त्याच्या सहकाऱ्याचा फोन येतो आणि नेहा सुद्धा काही दिवसांपासून मिसिंग आहे हे तो विक्रम ला कळवतो. विक्रम च्या पायाखालची जमीन सरकते. विक्रम त्वरित परत येतो आणि प्रीती आणि नेहा च्या बेपत्ता होण्यामध्ये कारण आणि त्यामागची व्यक्ती एकच असण्याची शक्यता लक्षात आल्यावर तो स्वतः या केस ला हातात घेतो. काही दिवसांनी प्रीती चा मृतदेह सापडतो पण नेहा चा काहीच पत्ता लागत नाही. यातून विक्रम कसा पुढे जातो आणि केसमधील गुंतागुंत कशी वाढत जाते हा पुढील कथाभाग. 

हिट च्या पटकथेची लांबी केवळ २ तास १५ मिनिटांची आहे. या सव्वा दोन तासात एकानंतर एक येणारा नाट्यमय, धक्कादायक आणि वेगवान घटनाक्रम तुम्हाला एक क्षणही विचार करायला वेळ देत नाही. याबद्दल दिग्दर्शक आणि पटकथाकार म्हणून फर्स्ट टायमर असलेले सैलेश कोलानू यांचे कौतूक करावेच लागेल. एखाद्या नवख्या व्यक्तीकडून इतक्या परफेक्शन ची अजिबात अपेक्षा नसते. चित्रपटाच्या अगदी शेवटच्या सीन च्या शेवटच्या फ्रेम पर्यंत कथेतील गूढ काय असेल याची उत्सुकता ताणून धरण्यात सैलेश बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. सोबतीला  ऍक्शन आणि थ्रील या दोन्ही एलिमेंटचा तडका सुद्धा व्यवस्थित लागलाय. चित्रपटाच्या अखेरीस उलगडणारे हत्येमागचे कारण काही प्रेक्षकांना आवडणार नाही किंवा काहीसे ऑड वाटू शकणारे आहे. 

दिग्दर्शक सैलेश यांच्या या मेहनतीला, आपल्या कमालीच्या अभिनय प्रतिभेने ज्याने चार चांद लावले आहेत तो म्हणजे अभिनेता राजकुमार राव. विक्रम या आपल्या व्यक्तिरेखेला साकारतांना राजकुमार ने घेतलेली मेहनत प्रत्येक सीन मध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येते. खासकरून जेंव्हा त्याला मेंटल डिसऑर्डर चे झटके येतात ते सीन तर राजकुमारने कमाल साकारले आहेत. तुझ्या यापूर्वीच्या एकूण एक भूमिकेनंतर याही भूमिकेसाठी तुला ‘अगेन हॅट्स ऑफ’ राजकुमार! सान्या मल्होत्रा च्या वाट्याला फारसे काम आलेले नाही पण तरी तिने साकारलेली नेहा लक्षात राहते.

इतर कलावंतांमध्ये दिलीप ताहील, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला आणि जतीन गोस्वामी यांच्या अभिनयाचे सुद्धा कौतुक करावे लागेल. गिरीश कोहली यांचे संवाद प्रभावी. सस्पेन्स सिनेमांचे गूढ वाढविण्यास आवश्यक असलेले व रोमांच कायम ठेवणारे पार्श्वसंगीत इथे जॉन स्टीवर्ट यांनी दिले आहे. कथेत तशी गीत संगीताची आवश्यकता भासत नाही आणि संगीतकार मिथुन आणि मनन भारद्वाज यांचे संगीत पाट्या टाकण्याचे तेवढे काम करते. चित्रपटाच्या अखेरीस अचानक नायकावर अज्ञात व्यक्तीने चालवलेली गोळी दुसऱ्या भागाची घोषणा करते. 

हिट चा सस्पेन्स काय आहे यापेक्षा एका नवख्या दिग्दर्शकाने तो किती सफाईने तो उलगडलाय हे विशेष आहे. शिवाय राजकुमार राव चा टॉप नॉच परफॉर्मन्स हा सुद्धा चित्रपट न चुकविण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. बघाच. जमलं तर सिनेमागृहात नाहीतर ओटीटी वर येईल तेंव्हा. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment