– अजिंक्य उजळंबकर

पहिल्या पिढीकडून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी म्हणून समाजाच्या नीतिबंधनाविरोधात काही पाऊले उचलली जातात…ती उचलतांना आपल्याच पुढच्या पिढीकडे नकळत दुर्लक्ष होते..या दुर्लक्षामुळे दुसऱ्या पिढीसोबत लहानपणी काही अप्रिय घटना घडतात. या सर्वाचा एकत्र परिणाम म्हणजे दोन पिढ्यांमध्ये निर्माण झालेला व कधीही न भरून निघणारा असा मोठा दुरावा. हा दुरावा हळुवारपणे राग आणि नंतर द्वेषात बदलल्याने ही दुसरी पिढीसुद्धा नकळतपणे अशीच कुठल्याही बंधनाला न जुमानणारी, प्रॅक्टिकल व करिअर ओरिएंटेड बनते ज्याचा परिणाम तिच्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या पिढीवरही होतो… पण सुदैवाने आधीच्या दोन पिढ्यांची कहाणी ऐकून, बघून ही तिसरी पिढी वेळीच स्वतःला सावरते व समाजाच्या काही बंधनांसोबत स्वतःला जुळवून घेते ….  तन्वी आझमी, काजोल व मिथिला पालकर या त्या तीन महिलांच्या पिढ्या. या तीन पिढ्यांचे कथानक घेऊन आलाय त्रिभंग. नेटफ्लिक्सवर. ज्याचं दिग्दर्शन केलंय अभिनेत्री रेणुका शहाणे हिने.

 
पहिल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत नयनतारा आपटे (तन्वी आझमी) ज्या लोकप्रिय साहित्यिक आहेत. १९८० च्या दशकातल्या. पितृसत्ताक विचारांना न मानणाऱ्या, समाजाने आखून दिलेल्या चौकटीला न जुमानणाऱ्या अशा स्त्रीवादी, पुरोगामी स्वतंत्र विचारांच्या. लिखाणावर इतके प्रेम की त्यावर येणारी बंधने बघून आपला एक मुलगा व मुलगी यांना घेऊन घरातून व संसारातून बाहेर पडलेल्या. ‘माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी व मुलांसाठी केलंय तरी काय म्हणून मी माझ्या मुलांना त्याचं नाव द्यावं?’ म्हणून मुलगी अनुराधा (काजोल) ला लहानपणी शाळेत सुद्धा वडिलांचे व सासरचे जोशी हे आडनाव न देत ‘अनुराधा नयनतारा आपटे’ हे नाव न देतात. शाळेत यावरून अनुराधा उर्फ अनुचे शिक्षक व मित्र तिच्यावर व भाऊ रॉबिन्द्रो (वैभव तत्ववादी) वर हसतात. त्याचदरम्यान नयनतारा यांच्या आयुष्यात विक्रमादित्य नावाचा एक फोटोग्राफर येतो जो नयनतारा यांच्या माघारी शाळकरी लहान अनुचे लैंगिक शोषण करत असतो. या सर्व घटनांचा एकत्र परिणाम होत अनुच्या मनात नयनतारा यांच्याबद्दल हळूहळू इतकी चीड व घृणा निर्माण होते की आज अनु जेंव्हा मोठी बॉलिवूड अभिनेत्री व प्रसिद्ध ओडिसी नर्तिका झाली आहे, मात्र ती आईला आई न म्हणता नयन नावाने हाक मारत असते. आज अनुला सुद्धा एक मुलगी आहे जी तिच्या रशियन बॉयफ्रेंड पासून झाली आहे जिचे नाव आहे माशा (मिथिला पालकर). माशाचे लग्न झालेय परंतु माशा एका टिपिकल रूढी परंपरा पाळणाऱ्या एकत्रित कुटुंबात नवऱ्यासोबत अड्जस्ट करीत संसार करत आहे. हे टी जाणीवपूर्वक करत असते. माझ्याकडे आईने खूप दुर्लक्ष केले असे म्हणून आईवर सतत गरळ ओकणाऱ्या अनुचे सुद्धा नकळत माशाकडे लहानपणी दुर्लक्ष झालेले असते. माशा जेंव्हा स्वतःवरील आपबीती अनुसमोर मांडते तेंव्हा कुठे अनुला आपली चूक लक्षात येते. नयनतारा स्वतःचे आत्मचरित्र त्यांचा विद्यार्थी मिलन (कुणाल रॉय कपूर) यास कथन करीत असतांना ही सर्व भूतकाळातील कथा प्रेक्षकांसमोर उलगडत जाते.

चित्रपटात काजोलला बॉलिवूड हिरोईनसोबतच ओडिसी नृत्यनिपुण नर्तिका पण दाखवलं गेलंय. या नृत्यप्रकारात असलेल्या तीन पोजिशन बद्दल एका दृश्यात अनु म्हणजे काजोल खुलासा करते व या तीन पोजिशन म्हणजे आमच्या या तीन पिढ्या आहेत असे मिलन ला सांगते. अभंग म्हणजे नयनतारा, समभंग म्हणजे माशा व त्रिभंग म्हणते अनु म्हणजे ती स्वतः. दिग्दर्शनासोबत चित्रपटाचे लेखन सुद्धा रेणुका शहाणे यांचेच आहे आणि सर्वप्रथम तिन्ही पात्र व्यवस्थित डिफाईन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. चित्रपटाची एकूण लांबी केवळ दीडच तास ठेवल्याबद्दल दुहेरी अभिनंदन. अतिशय प्रगल्भ दिग्दर्शकाची आवश्यकता असलेली ही कथा आपल्या दिग्दर्शनाच्या दुसऱ्याच प्रयत्नात (पहिला – रीटा)  अतिशय प्रभावीपणे मांडल्याबद्दल दिग्दर्शिका रेणुका शहाणे यांचे त्रिवार अभिनंदन. 

त्रिभंग मध्ये उगाच स्त्रीवाद, पुरोगामीत्व, स्त्रीची वैचारिक स्वतंत्रता यावर कुठलीही भाषणबाजी ना करता सरळसोप्या भाषेत तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांची कहाणी सांगितली गेली आहे. कथानक शेवटाला पोहोचेपर्यंत दोन्ही पिढयांना आपली झालेली चूक लक्षात येते व त्यातून धडा घेणारी तिसरी पिढी कशी स्वतःला ऍडजस्ट करते हे रेणुका यांनी खूपच पॉजिटीव्ह नोट वर संपविले आहे. बरं यात कुठेही आरडाओरडा नाही… ना नाटकीपणा. हां अनुच्या तोंडी असलेल्या यथेच्छ शिव्या कौटुंबिक प्रेक्षकांना आवडणार नाहीत. या खरंतर टाळता आल्या असत्या किंवा त्याची इंटेन्सिटी कमी करता आली असती पण चित्रपट ओटीटी वर लागणार म्हणून म्हणा किंवा अनुचे पात्र रिऍलिस्टिक वाटावे म्हणून पण शिव्या तिच्या तोंडी भरपूर कोंबल्या आहेत. पार्श्वसंगीत, छायाचित्रण, संकलन बाबतीतही चित्रपट उत्तम जमलाय. 

काजोल हा चित्रपटाचा प्राण आहे. ही कथा किंवा अनुचे फटाकडे पात्र केवळ आणि केवळ काजोलच करू शकते. काजोल मुळातच अशी फटाकडी, बिनधास्त असल्याने तिने हे पात्र अतिशय सहजतेने साकारले आहे हे चित्रपट पाहतांना जाणवते. त्रिभंग बघतांना कुछ कुछ होता है मधली काजोल आठवल्या शिवाय राहत नाही. त्रिभंग गोज टू काजोल. तन्वी आझमी यांनी रंगविलेली नयनतारा सुद्धा अतिशय परफेक्ट व तितकीच गोड मिथिला पालकरची माशा. तन्वी व काजोल समोर मिथिलाच्या पात्राला थोडे कमी महत्व दिल्या गेल्याचे लक्षात येते. इतर कलाकारात वैभव तत्ववादी व कुणाल रॉय कपूर या दोघांनीही छान काम केले आहे. 

एकुणात त्रिभंग हा काजोलच्या अभिनयाच्या फॅन्ससाठी एक ट्रीट आहे.. अर्ध्या तासाने अजून लांबी वाढली असती तरी चालले असते पण असो. स्टार्ट टू एन्ड एक अभंग अनुभव आहे त्रिभंग. गो फॉर इट. ऑन  नेटफ्लिक्स. 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.