– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Drishyam 2 Movie Review. २०१५ पूर्वी २ ऑक्टोबर हा दिवस केवळ गांधीजी आणि शास्त्रीजी यांचा जन्मदिन म्हणून ओळखला जात असे. आजही जातो. २०१५ नंतर मात्र यात आणखी एका घटनेने भर घातली, ज्या घटनेचे मिम्स गेली ७ वर्षे या दिवशी हमखास सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मोबाईलवर येऊन धडकतात. “लक्षात आहे ना आज २ ऑक्टोबर आहे, आजच्याच दिवशी विजय साळगावकर आणि त्याचे कुटुंबीय गोव्याला गेले होते स्वामी चिन्मयानंदजींच्या सत्संगला, आणि तिथून परत येतांना त्यांनी पाव भाजी खाल्ली आणि सिनेमा बघितला.” हा मेसेज आणि त्यासोबत दृश्यम चित्रपटातील अजय देवगण चा फॅमिली फोटो दिवसभर व्हॉट्स अप वर फिरत असतो. बॉक्स-ऑफिसवर तर दृश्यम यशस्वी ठरला होताच परंतु त्यानंतरही रसिकांनी टेलिव्हिजन वर त्याची इतकी पारायणे केली ज्याची परिणीती आता २ ऑक्टोबर हा सोशल मीडियावर दृश्यम डे म्हणूनही ओळखला जातो. असो.  जोक्स अपार्ट पण त्याचा परिणाम असा झाला की दृश्यम-२ ची घोषणा झाल्यानंतर आता या विजय साळगावकर कुटुंबियांचे पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता रसिकांमध्ये कमालीची वाढली आहे. आयएमडीबी वेबसाईटच्या पाहणीत ज्या सिनेमाच्या प्रदर्शनाची  सध्या रसिक आतुरतेने वाट बघत आहेत त्यात दृश्यम-२ प्रथम स्थानावर आहे. ज्या मल्याळम सिनेमावरून दृश्यम चा हिंदी रिमेक केला गेला होता त्याचा मल्याळम भाषेतील दुसरा भाग गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर सबटायटल्स सह प्रदर्शित झाला. समीक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले आणि रसिकांना सुद्धा तो आवडला हे बघून त्याचा हिंदी रिमेक करण्याचे ठरले आणि आज तो चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय.

आधीच्या कथानकात आता ७ वर्षानंतर पुढे काय घटना घडतात ते थोडक्यात: विजय साळगावकर (अजय देवगण), त्याची पत्नी नंदिनी (श्रिया सरण) आणि दोन मुली अंजु आणि अनु ( इशिता दत्ता आणि मृणाल जाधव) हे कुटुंबीय गोव्यात आजही घडलेल्या गुन्ह्याच्या दडपणात जगत आहेत. अंजुच्या लग्नासाठी मुलाचा शोध चालू आहे. काही वर्षांपूर्वी या कुटुंबियांच्या शेजारी जेनी (नेहा जोशी) ही नवीन शेजारीण राहिला येते जिचा दारुडा नवरा पैशासाठी म्हणून कायम तिला मारहाण करीत असतो. थोड्याच दिवसात जेनी आणि नंदिनी ची छान मैत्री होते आणि नंदिनी तिला मनातले सर्व सांगत असते. गोव्यात नव्याने इन्स्पेक्टर जनरल म्हणून पदभार स्वीकारलेला तरुण अहलावत (अक्षय खन्ना) हा परत एकवार विजय ची केस रिओपन करतो आणि नव्याने चौकशी सुरु करतो. इन्स्पेक्टर गायतोंडे (कमलेश सावंत) आणि इन्स्पेक्टर सावंत (योगेश सोमण) यांना पुन्हा एकवार या केसवर घेतले जाते. पडद्याआड ही सर्व चौकशी पुन्हा सुरु करण्यात पुढाकार घेतलेला असतो मृत सॅम ची आई आणि निवृत्त आयजी मीरा देशमुख (तब्बू) हिने. कुठल्याही परिस्थितीत विजयने सॅम च्या बॉडीचे नंतर काय केले, कुठे पुरले याचा शोध लावायचाच आणि विजयला आणि त्याच्या सर्व कुटुंबियाला तुरुंगात टाकायचे या ध्येयाने मीराला आणि आयजी तरुण ला पछाडलेले असते. यासाठी २४ तास विजयच्या कुटुंबियांवर गेल्या काही वर्षांपासून पाळत ठेवण्याचे काम अत्यंत गोपनीयरित्या तरुण आणि त्याचे सहकारी करीत असतात. विजयने सॅम चा मृतदेह दुसरीकडे हलविला आहे एवढी माहिती यातून पोलिसांना मिळते पण नेमका कुठे आणि कसा हलविला याच्या शोधात पोलीस असतात. अशा वेळी अचानकपणे एक असा साक्षीदार पोलिसांच्या हाती लागतो ज्याने ३ ऑक्टोबर च्या रात्री विजयला बांधकाम चालू असलेल्या पोलीस स्टेशन च्या जागी विजयला पाहिले आहे. या साक्षिदाराला माहीत आहे की विजयने सॅम चा मृतदेह कुठे पुरला आहे. या साक्षीदाराने दिलेल्या पोलीस जवाबाच्या आधारे विजय आणि त्याच्या कुटुंबियांना ताब्यात घेतले जाते आणि नंतर एकानंतर एक अनेक धक्कादायक घटना पोलिसांसमोर येतात. त्या कोणत्या हा पुढील कथाभाग. शिवाय पोलीस विजयवर पाळत ठेवण्यासाठी कोणाची मदत घेतात हे सुद्धा अत्यंत धक्कादायक असते. यातून विजय अंडी त्याचे कुटुंबीय सहीसलामत सुटते का हे पडद्यावर बघणे खूपच रंजक आहे.

जितू जोसेफ यांनी दृश्यम-१ आणि २ या मल्याळम सिनेमांची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच आहे. हिंदीत रिमेक करतांना दृश्यम-१ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी ज्याने अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळली होती तो होता निशिकांत कामत. दुर्दैवाने निशिकांतच्या निधनामुळे या दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक पाठक यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. मूळ मल्याळम चित्रपटाच्या पटकथेत आमिल खान यांच्यासोबत काही किरकोळ बदल करून अभिषेक पाठक यांनी हिंदीची पटकथा लिहिली आहे. मूळ मल्याळम पटकथा अत्यंत ताकदीची असल्याने तुम्ही दृश्यम-२ हा प्राईम व्हिडिओवर सबटायटल्स सह जरी बघितला तरी तुम्हाला तो अजिबात विचार करायला वेळ देत नाही आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो याचा अनुभव मी घेतला आहे.

अक्षय खन्ना ने रंगविलेल्या आयजी च्या भूमिकेला हिंदीत काहीसे ग्लोरिफाय करण्यात आले आहे आणि अक्षय विरुद्ध अजय असा काहीसा संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न इथे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी केलाय. २ तास २० मिनिटांची अत्यंत माफक अशी लांबी असलेली पटकथा तितक्याच परिणामकारकरीत्या आणि वेगाने पुढे सरकत जाते. मध्यंतरानंतर व  विशेषकरून शेवटच्या २० मिनिटांमध्ये लागणारे धक्के प्रेक्षकांना कमालीचे गुंतवून ठेवतात. विजयने सॅम ची बॉडी पोलीस स्टेशनात पुरून ठेवली आहे हे कळल्यानंतरचा घटनाक्रम लेखकाने जितका धक्कादायक, नाट्यमय ठेवलाय तितकाच तो तार्किकतेच्या आधारावर सुद्धा खरा वाटणारा झालाय.दृश्यम च्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागात सुद्धा चित्रपटभर लॉजिक कुठेच बॅक सीटवर जाऊन बसत नाही हे विशेष. दृश्यम चा सर्वात मोठा प्लस पॉईंट हाच आहे. गीत-संगीतात अजिबात वेळ घालविलेला नाही ही आणखी एक जमेची बाजू. छायांकन छान आहे पण पार्श्वसंगीत मात्र अधिक परिणामकारक असू शकले असते. आमिल खान यांनी लिहिलेले संवाद सुद्धा पटकथेप्रमाणेच प्रभावी आणि अर्थपूर्ण आहेत.

अभिनयाच्या बाबतीत अजय देवगण ने रंगविलेला विजय छान. अक्षय खन्ना अभिनयात सुदृढ पण लुक्स मध्ये खूपच अशक्त आणि दुबळा दिसलाय. तब्बू ला या भागात फारसे काम नाही तरी तिचा प्रवाहावं जाणवतो. श्रिया सरण आणि इशिता दत्ता यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करावयास हवे. इतर कलाकारांमध्ये कमलेश सावंत चा इन्स्पेक्टर गायतोंडे करमणूक करून जातो. सौरभ शुक्ला, रजत कपूर आणि नेहा जोशी यांचा अभिनय सुद्धा उत्तम.

सर्व उत्तम असूनही ज्यांनी मूळ मल्याळम चित्रपट पाहिलाय अशा प्रेक्षकांना हा हिंदी रिमेक काहीसा डावा वाटेल हेही तितकेच खरे. मलाही वाटला. पण काहीसाच. पण ज्यांचा मूळ बघायचा राहिलाय त्यांना मात्र हा दृश्यम-२ एक अत्यंत उत्तम कलाकृती वाटेल यात शंका नाही. एखाद्या गुन्ह्याचा तार्किक शेवट कसा असावा याचे अतिशय उत्तम उदाहरण. पण हा शेवट आहे की नाही? का भविष्यात तिसरा भागही आहे ?

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार लेखक जितू जोसेफ यांना तिसऱ्या भागाचा शेवट काय असेल हे सुचले आहे. त्यावर आधारित अशीच लॉजिकल पटकथा लिहायला किमान ३ वर्षे तरी लागतील असे त्यांचे म्हणणे आहे. तोपर्यंत दरवर्षी २ ऑक्टोबर हा दृश्यम डे म्हणूनच साजरा केला जाईल. बघाच. अर्थात बघणारच आहात हे माहीत असूनही उगाच फुकटचा सल्ला.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.