– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Dream Girl 2 Movie Review

कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, कपिल शर्मा यांचे नाव घेतल्यावर जर तुमच्या गालावर हसू येत असेल तर त्याचे कारण आहे राज शांडिल्य हा व्यक्ती. कारण हाच तो लेखक आहे ज्याने लिहिलेल्या स्क्रिप्ट्स वाचून ही सर्व मंडळी स्टॅन्ड-अप कॉमेडी मधील आज हुकुमी एक्के म्हणून ओळखले जातात. ६०० हुन अधिक स्क्रिप्ट्स लिहिल्यानंतर राज शांडिल्य ची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नोंद झाली आहे. ४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ साली ड्रीम गर्ल या सिनेमाद्वारे  दिग्दर्शक म्हणून राजने आपल्या पहिल्याच बॉल वर सिक्सर मारला होता. आणि आता राज त्याच ड्रीम गर्ल चा दुसरा भाग घेऊन आलाय. 

सुरुवातीला थोडेसे कथानकाबद्दल. गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी कथेचा नायक करम (आयुष्यमान खुराणा) पूजा होण्याच्या म्हणजे स्त्री होण्यामागचे कारण त्याच्यासमोर असलेला कर्जाचा डोंगर हेच आहे. फरक इतकाच की गेलाय वेळी करम पूजा हे नाव धारण करून केवळ फोनवर चॅटिंग करीत असतो मात्र यावेळी तो प्रत्यक्ष स्त्री वेष परिधान करून एका बार मध्ये डान्स गर्ल म्हणून जॉईन होतो आणि इथून पुढे कथानक वेग धरते. अर्थातच करम चे हे पूजा होण्याचे आणखी एक प्रमुख कारण त्याची प्रेयसी परी (अनन्या पांडे) असते कारण परीच्या वडिलांनी ६ महिन्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे चॅलेंज करमला दिलेले असते आणि ते पूर्ण झाले तरच करम चे लग्न परिसोबत होणार असते. करम च्या या पूजा होण्याच्या नाटकात त्यासोबत सामील असतात त्याचे वडील जगजीत (अन्नू कपूर) आणि जिवलग मित्र स्माईली (मंजोत सिंग) पण या बाबत परीला करम काहीही सांगत नाही. हॉटेल मधील डान्स बार गर्ल चे काम सुरु केल्यावर करम च्या आयुष्यात एकानंतर एक अनेक पात्रांची एंट्री होते ज्यात सोना भाई म्हणजे विजय राज, अबू सलीम म्हणजे परेश रावल, शौकिया म्हणजे राजपाल यादव, जुमानी म्हणजे सीमा पाहावा आणि शाहरुख सलीम म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश असतो. यातील काही करम चे चाहते असतात तर काही पूजा चे. म्हणजेच पूजा चे रूप धारण केलेल्या करम चे. या सर्व सावळ्या गोंधळातून करम कसा मार्ग काढतो हा पुढील कथाभाग. 

काय विशेष?- राज शांडिल्य आणि नरेश कथुरिया जोडीने लिहिलेल्या कथा-पटकथा मधील खुमासदार आणि खुसखुशीत संवाद ही ड्रीम गर्ल २ ची एकमेव विशेषता आहे असे मी म्हणेल. सिच्युएशनल कॉमेडी तीही काहीशी अडल्ट जॉनर कडे झुकणारी असल्यावर त्यात वन-लायनर असो वा डबल मिनिंग जोक्स असो अत्यंत महत्वाचे असतात. राज आणि नरेश या जोडीने संवाद तर खळखळून हसवणारे लिहिलेच आहेत पण डबल मिनिंग असूनही त्यांना अश्लीलतेकडे झुकू न देण्याची योग्य काळजी घेतली आहे. मध्यंतरापर्यंत तर कथानक अतिशय वेगवान पद्धतीने पुढे सरकत जाते. गडबड थोडी प्री-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स मध्ये झाली आहे. ती काय ती नंतर सांगतो. राज शांडिल्य यांचे दिग्दर्शन सुद्धा ठीक आहे. आयुष्यमान चा अभिनय याही वेळी बहरला आहे. स्त्रीवेषात आयुष्यमान चे दिसणे आणि अभिनय दोन्ही आकर्षक झालेय. आयुष्यमान नंतर अन्नू कपूर यांनी कमाल केली आहे. अगदी पहिल्या भागाप्रमाणेच. त्यांच्या अभिनयात असलेली सहजता कमालीची आहे. अनन्या पांडे च्या वाट्याला फारसे काम आलेले नाही आणि जेवढे आहे त्यातही ती फारशी इम्प्रेस करू शकलेली नाही. परेश रावल सारख्या दिग्गज अभिनेत्याचा वापर त्यांच्या पूर्ण क्षमतेपेक्षा खूप कमी केला गेलाय असे मला जाणवले. असाच कमी क्षमतेने वापरले गेलेले दुसरे नाव अभिषेक बॅनर्जी. कथेतील हे पात्र इतके वीक असल्यावर त्यासाठी अभिषेक सारखा प्रतिभावान अभिनेता निवडायची काय गरज होती हे कळले नाही. इतर कलाकारांमध्ये सीमा पाहावा यांनी जोरदार अभिनय केलाय. त्यानंतर विजय राज, मंजोत सिंग, राजपाल यादव सुद्धा ओके आहेत. 

कुठे कमी पडतो?- मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे गडबड थोडी प्री-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स मध्ये झाली आहे. मध्यंतरापर्यंत आणि मध्यंतरानंतरही जवळपास अर्धा तास बऱ्यापैकी स्पीड मेंटेन ठेवलेले कथानक नेमके कसे एन्ड करावे याचा नीट विचार न केल्यामुळे असेल पण या पॉइंटला येऊन चित्रपटाचा वेग मंदावतो आणि चित्रपट संपल्यावर त्याचा म्हणावा तसा ओव्हरऑल इम्पॅक्ट सुद्धा येत नाही. इतकी सारी विनोदी पात्रे असून व केंद्रस्थानी पूजा चे स्त्री पात्र आहे, जिच्या मागे हे सर्व जण लागले आहेत, असे असूनही याचा फिनाले जसा ग्रँड आणि धम्माल व्हायला हवा होता तसा होत नाही. संगीताच्या बाबतीत सुद्धा चित्रपट कमी पडतो. मेरे दिल का टेलिफोन या आधीच्याच भागातील गाण्याच्या पुण्याईवर याही वेळी चित्रपट पुढे सरकतो. अर्थात असे असले तरीही याचा म्हणजे प्री क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स अपेक्षेइतका चांगला नसल्याचा परिणाम इतकाही निगेटिव्ह होत नाही की ज्यामुळे आधी जमलेल्या चित्रपटाचा भाग सर्व वाया जाईल. मग काय होतं तर ड्रीम गर्ल २ उत्तम होण्याच्या मेरीटचा चित्रपट असूनही ऍव्हरेज ते गुड ऍव्हरेज च्या मध्ये कुठेतरी येऊन थांबतो आणि यापेक्षा आधीचा ड्रीम गर्ल जास्त प्रभावी होता असे वाटून जाते.  

पहावा का? – टाईमपास म्हणून हरकत नाही. पण अगदी चित्रपटगृहात जाऊनच बघावा असेही नाही. ओटीटी वर आल्यावर बघितला तरी हरकत नाही. 

स्टार्स-  २.५ स्टार्स आउट ऑफ ५ स्टार्स 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment