– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Subhedar Movie Review

लेखक-निर्माता-दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचे शिवराज अष्टक म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या शौर्यगाथेमधील महत्वाच्या अशा सर्व घटनांचा, व्यक्तींचा आढावा घेणारी आठ चित्रपटांची शृंखला. आताच्या हॉलिवूडमधील मार्व्हल अथवा दक्षिण भारतातील लोकेश या सिनेमॅटिक युनिव्हर्स च्या सोप्या अथवा ट्रेंडिंग भाषेत बोलायचे झाल्यास मी या अष्टकाला छत्रपती शिवाजी सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणेन. शॉर्ट फॉर्म दिगपाल चे सीएससीयु.  या युनिव्हर्स मधील पाचवा सिनेमा सुभेदार काल प्रदर्शित झाला.  फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड, शेर शिवराज नंतर आता सुभेदार. अर्थातच सुभेदार तान्हाजी मालुसरे च्या पराक्रमाची गाथा. 

प्रमुख भूमिकांमध्ये तान्हाजी च्या भूमिकेत आहेत अजय पुरकर, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, आई जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, शेलार मामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी, उदयभान च्या भूमिकेत दिग्विजय रोहिदास आणि तान्हाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र यांची वर्णी लागली आहे. कथानकाबद्दल फार काही विस्ताराने सांगण्याची आवश्यकता मला इथे वाटत नाही. नुकतीच म्हणजे २०२० साली आलेल्या अजय देवगण च्या तान्हाजी मध्ये ही  कथा भव्यदिव्यते मध्ये आणि भरपूर सिनेमॅटिक स्वातंत्र्य घेत, अगदी व्यवसायिकतेने पेश केलेली आपण पाहिली. सुभेदार मध्ये मात्र अगदी उलट आहे.  दिगपाल आणि त्याच्या टीमने येथे वेगळी वाट निवडली आहे. इथे भव्यदिव्यतेला आणि व्यवसायिकतेला बाजूला ठेऊन कथेला जास्त अभ्यासपूर्ण रीतीने, विस्ताराने, सादरीकरण फिल्मी न होऊ देता, कथेची नाळ जास्तीत जास्त जमिनीशी घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.

म्हणजे तान्हाजी यांचे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात येणे, त्यांचा सरदार ते सुभेदार हा प्रवास, कोंढाण्याला जिंकण्याचा निर्धार, घरी असलेले रायबाचे लग्न बाजूला ठेऊन मोहिमेला निघणे आणि अखेरीस कोंढाण्यावरील पराक्रम हे सर्व २ तास ३५ मिनिटांच्या लांबीत लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी दाखवले आहे. पण हे सर्व विस्ताराने सांगण्याच्या प्रयत्नामुळे मध्यंतरापर्यन्त चित्रपट अत्यंत संथ गतीने पुढे सरकतो. पटकथा लिहिताना खरंतर आजच्या प्रेक्षकाला अनुसरून खूपच क्रिस्पी, फास्ट पेस्ड असेल याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे जे सुभेदार मध्ये टोटली मिसिंग आहे. इव्हन मध्यंतरानंतरचे सुद्धा काही सीन्स आणि गाणी अनावश्यक वाटतात. अखेरीस शेवटच्या पाऊण तासात सिनेमा गती पकडतो. अजय पुरकर ने रंगविलेला तान्हाजी दमदार जमलाय मात्र त्याच्या समोर उभा केलेला खलनायक म्हणजेच उदयभान हे पात्र मात्र तान्हाजी च्या टक्करचे वाटत नाही. हे पात्र पटकथेत लिखाणात सुद्धा गडबडले आहे आणि कलाकाराच्या निवडीत सुद्धा. अभिनेता दिग्विजय रोहिदास च्या ऐवजी खलनायक म्हणून तेवढ्याच ताकदीच्या अभिनेत्याची निवड केली असती तर मजा आली असती. मराठी सिनेमा असल्याने हातात बजेट कमी असणार हे अपेक्षित आहेच त्यामुळे ऍक्शन, फोटोग्राफी यात भव्यता नसल्याचे जाणवत असले तरी खटकत निश्चित नाही. पण पटकथा लिखाण आणि कलाकारांची निवड, शिवाय ऐतिहासिक सिनेमा ला आवश्यक असे धारदार संवाद या सर्व गोष्टींचा बजेट शी काहीही संबंध नाही मग यात का कमी पडावे हे अनाकलनीय आहे.

तुम्ही फिल्मी आणि तद्दन व्यावसायिक अप्रोच ठेवला नाहीये हे कौतुकास्पद आहे, कथेचे विस्ताराने आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण केले आहे याचेही कौतुक आहे पण मुळात प्रेक्षक थिएटरमध्ये येतो तो मनोरंजनासाठी हे विसरून कसे चालेल. मग पटकथा बांधणीत जास्तीत जास्त रंजकता, उत्कंठा वाढवतील असे सीन्स, २ तास ३५ मिनिटांच्या लांबीत मग तितकेच श्रवणीय असे संगीत,  कलाकारांची निवड खासकरून खलनायक उदयभान  यावर आणखी मेहनत का नाही घेतली गेली? असो. अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, बहिर्जी नाईक च्या भूमिकेत स्वतः दिगपाल लांजेकर  आणि इतर सर्वच कलाकारांनी आपापली कामे उत्तम केली आहेत. अजयने खासकरून तान्हाजी साकारताना आपल्या शरीरयष्टीवर घेतलेली मेहनत दिसून येत आहे. अजयचा अभिनय लाजवाब झाला आहे. 

म्हणजेच छत्रपती शिवाजी सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील सुभेदार हे पाचवे पुष्प तुम्हाला अगदीच आवडणार नाही असे नाही पण खूपच आवडेल असेही नाही. मुळात तुम्हाला काय बघायचं आहे यावर डिपेंड आहे की  सुभेदार तुम्हाला आवडेल की नाही ते? अभ्यासपूर्ण असं विस्ताराने बघायचं असेल तर सुभेदार तुम्हाला आवडेल, पण मनोरंजन या  एकमेव उद्देशाने जाल तर तुम्हाला संथ पटकथा निराश करेल. 

आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला ३ स्टार देईल . अजय ने रंगविलेला तान्हाजी, दिगपाल ची या युनिव्हर्स वर असलेली श्रद्धा, मेहनत आणि चिकाटी यासाठी हे ३ स्टार आहेत.. लिखाणात उणिवा असल्या तरीही. 

हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment