– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

गेल्या १६ वर्षात तामिळ चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे नाव कमावणारा तरुण दिग्दर्शक म्हणजे विष्णूवर्धन. संतोष सिवान या नामांकित सिनेछायाचित्रकाराच्या हाताखाली काम शिकलेल्या विष्णूवर्धन याने २००३ साली म्हणजे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी दिग्दर्शनात पदार्पण केले व आज वयाच्या ४४ व्या वर्षी त्याच्या खात्यात ७ तामिळ (त्यातले ६ सुपरहिट), १ तेलगू व आता आज प्रदर्शित शेरशाह (Shershaah Movie) नामक पहिला हिंदी चित्रपट जमा आहेत. कारगिल युद्धात आपल्या शौर्याने शत्रूला जेरीस आणणारेव मरणोत्तर परमवीर चक्र ने सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह हा युद्धपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. युद्धपट म्हटले की ३-३:१५ तासाची मोठी लांबी हे गणित साधारणतः अपेक्षित असते मात्र दिग्दर्शक विष्णूवर्धन ने केवळ २ तास १५ मिनिटे, इतकी आटोपशीर ठेवलेली लांबी हा शेरशाह चा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. शिवाय कारगिल युद्धावर याआधी निघालेले सिनेमे प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत याचे भानही विष्णूवर्धन ला आहे हे चित्रपट बघतांना जाणवते. (Movie Review Shershaah) 

कारगिल युद्धातील महत्वाचे दोन शिखरे…  पॉईंट ५१४० आणि ४८७५ वर यशस्वी चढाई करून शत्रूला धूळ चारणारे ऑपरेशन लीड करणारे कॅप्टन विक्रम बत्रा. आर्मी जॉईन करण्याआधी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनाक्रमाचा वेध शेरशाह मध्ये घेण्यात आलाय. ‘ये दिल मांगे मोर’ हा त्यांचा पॉइंट ५१४० सर केल्यानंतरचा कोडवर्ड नंतर भारतभर चर्चेचा विषय ठरला होता. इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून पास आउट झाल्यावर लेफ्टिनंट म्हणून १३ जम्मू अँड काश्मीर रायफल बटालियन जॉईन करणारे कप्तान बत्रा, त्यांच्या आयुष्यातील प्रेम-कहाणी, कारगील युद्ध सुरु होण्याआधी कश्मीर पोस्टिंग वर असतांना झालेल्या वेगवेगळ्या दहशतवाद विरोधातील ऑपरेशन्स मध्ये त्यांनी दाखविलेले साहस या सर्वांचा धावता आढावा शेरशाह मध्ये घेण्यात आलाय. कॅप्टन बत्रा यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा असून त्याची प्रेयसी डिम्पल च्या भूमिकेत कियारा अडवाणी आहे. लेखक संदीप श्रीवास्तव यांनी लिहिलेली कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी होते. मध्यंतरापर्यंतचा एक तास कॅप्टन बत्रा यांचे लहानपण, आर्मी जॉईन कारण्यापर्यंतचे आयुष्य, प्रेमकथा व कारगिल युद्ध सुरु होण्याआधीचे त्यांचे काश्मीर मधील साहसी ऑपरेशन्स इथपर्यंत येऊन ठेपतो तर नंतरचा एक तास कारगिल युद्धावर केंद्रित आहे. कुठेही लामण न लावणारी एकदम क्रिस्पी पटकथा (जी एरवी अशा युद्धपटात हमखास लामण लावणारी असते), काश्मीर चे अतिशय मनमोहक व नेत्रदीपक छायाचित्रण, युद्धा दरम्यानची  व त्याआधीच्या लोकल ऑपरेशन्सचे बांधून ठेवणारी साहस दृश्ये या जोरावर शेरशाह तुम्हाला दोन तास चांगलाच खिळवून ठेवतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध संकलक ए श्रीकर प्रसाद यांनी केलेल्या संकलनास याचे तेवढेच श्रेय जाते. हे सर्व पाहतांना केवळ एक उणीव जी जाणवते ती म्हणजे अशा प्रकारच्या देशभक्तीपर चित्रपटात असणारे स्फूर्तीदायक संवाद. कारगिल युद्धापूर्वीचे अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे ऑपरेशन्स बघतांना उरी सिनेमातील दृश्यांची आठवण होते. कॅप्टन बत्रा यांच्या प्रेमकथेत अथवा त्यायोगे येणाऱ्या रोमँटीक गीत-संगीतातही दिग्दर्शकाने जास्त वेळ घेतलेला नाही हे विशेष. शिवाय कॅप्टन बत्रा यांच्याभोवतीच (म्हणजे इतर सैनिकाच्या पात्रांवर फोकस शिफ्ट न होऊ देता) कथा केंद्रित ठेवल्याने चित्रपट कुठेही भरकटत नाही. चित्रपटाच्या अखेरीस मात्र आवर्जून युद्धातील इतर सर्व हिरोंचा उल्लेख करायचे निर्माते-दिग्दर्शक विसरले नाहीत हे विशेष.  

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ने कॅप्टन बत्रा यांची भूमिका अतिशय सहजतेने व सुंदर साकारली आहे.  कप्तान बत्रा यांची दोन रूपे म्हणजे एकीकडे डिम्पल च्या प्रेमात आकंठ बुडालेला रोमँटिक-हँडसम तरुण व दुसरीकडे देशासाठी प्राणाची आहुती देणारा रफ अँड टफ साहसी सैनिक, सिद्धार्थने दोन्ही तितक्याच प्रगल्भतेने साकारली आहेत. सिद्धार्थच्या करिअरमधील शेरशाह हा एक माईलस्टोन सिनेमा ठरेल यात शंका नाही. कियारा अडवाणीने सुद्धा आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. जितकी सुंदर ती दिसली आहे तितकाच संयमित व सुंदर अभिनय तिने केला आहे. 

१५ ऑगस्टच्या देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात सिनेमागृहात जाऊन मोठ्या पडद्यावर, टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजात व भारत माता की जय या जयघोषात असे सिनेमे बघण्याची मजा काही औरच असते. शेरशाह चे मेकिंग सुद्धा त्या लेव्हलचे ग्रँड आहे. परंतु कोविडमुळे दुर्दैवाने हा अनुभव घेता येणार नाहीए. असो. घरी बसून का होईना पण कॅप्टन बत्रा च्या शौर्याचे हे सुंदर चित्रण आवर्जून बघावेच असे आहे. 

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.