– अजिंक्य उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
Scam 2003 The Telgi Story Web Series Review
‘रिस्क है तो इश्क है’ हा संवाद लोकप्रिय होवोस्तर बहुतांश प्रेक्षकांना प्रतीक गांधी नावाचा कुणी अभिनेता आहे याची कल्पना सुद्धा नव्हती. पण सोनी लिव्ह वर ऑक्टोबर २०२० रोजी ‘स्कॅम १९९२; दि हर्षद मेहता स्टोरी’ ही वेब सिरीज प्रीमियर झाल्यानंतर, त्याला मिळालेल्या प्रचंड यशानंतर, प्रतीक गांधी या नावाने, त्याच्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज १ सप्टेंबर २०२३ ही तारीख आहे. आणि आज बरोबर ३ वर्षानंतर सोनी लिव्ह याच सिरीज ची पुढील स्कॅम फ्रॅन्चायझी घेऊन आली आहे जिचे नाव आहे ‘स्कॅम २००३: दि तेलगी स्टोरी’. आणि जे प्रतीक गांधी च्या बाबतीत घडलं ना तेच आता घडणार आहे गगन देव रियार या अभिनेत्याबद्दल अशी मला आता जवळपास खात्री झाली आहे.
एक स्पॉईलर आहे.. आता सांगण्याच्या ऐवजी अखेरीस सांगतो. काळजी करू नका, स्पॉईलर असा नाहीये की तुमची सिरीज बघण्याची मजा कमी होईल. तर मित्रांनो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अर्थजगतामधील सर्वात मोठा घोटाळा म्हणून ज्याकडे पहिले जाते असा ३० हजार कोटींचा स्टॅम्प पेपर अथवा मुद्रांक घोटाळा. आणि या घोटाळ्याचा कर्ता करविता आणि प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगी ज्याची भूमिका या वेब सिरीज मध्ये साकारली आहे गगन देव रियारने. कथेबद्दल विस्ताराने बोलणे इथे शक्य होणार नाही आणि असेही ते स्पॉयलर पण ठरेल.
सिरीज च्या पहिल्या एपिसोडमध्ये तेलगीचा कर्नाटकमधील खानापूर येथे रेल्वेतील एक फळ विक्रेता ते मुंबई हा प्रवास आणि अखेरीस स्टॅम्प घोटाळा करण्याची कल्पना इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या एपिसोडमध्ये तेलगी ने स्टॅम्प पेपर च्या जगात सुरु केलेले प्राथमिक टप्प्यातील घोटाळे, स्टॅम्प व्हेंडर म्हणून लायसन्स मिळविण्याच्या कामानिमित्त सिस्टीम मधील पोलीस अधिकारी, सरकारी अधीकारी, राजकारणी यांच्याशी झालेली त्याची जवळीक यावर प्रकाशझोत ठेवण्यात आला आहे. एकदा का स्टॅम्प पेपर व्हेंडर म्हणून स्टॅम्प विकण्याचा परवाना तेलगी ला मिळाला त्यांनतर त्याने राजकीय लोकांशी संगनमत करून या घोटाळ्याचा विस्तार कसा केला, आणि मग याच धूर्त राजकारण्यांनी तेलगी ला बळीचा बकरा बनवून त्याची आर्थर रोड जेलमध्ये कशी रवानगी केली हे सर्व विस्ताराने तिसऱ्या भागात बघायला मिळते. याच भागाच्या अखेरीस या कथानकाचा महत्वाचा टप्पा येतो जिथे नाशिक येथील सेक्युरिटी प्रेस मध्ये तेलगी कशी एंट्री मिळवतो हा भाग दाखवला गेलाय.
चौथ्या भागात ही कहाणी अगदी दिल्ली दरबारापर्यंत पोहोचते आणि खऱ्या अर्थाने तेलगी या सर्व साम्राज्याचा राजा बनतो. त्याचे साम्राज्य देशभरात पसरते ज्यात राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांची त्याला साथ असते. एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल अशा स्टाईलने तेलगी आपला व्यवसाय चालवीत असतो ज्यात दिवसेंदिवस त्याची भूक वाढतच जाते , त्याचा अहंकार वाढत जातो, पैशाचा माज वाढत जातो.. तो इतका वाढतो की एका तो ज्या डान्स बार मध्ये नियमित जात असतो तिथे त्याच्या खास आवडीच्या बार डान्सर वर एकाच रात्री तो ९० लाखाची कॅश उधळतो ज्याची मीडियामध्ये मोठी न्यूज बनते आणि तेलगी अचानक सगळ्यांच्या डोळ्यात येतो. हे सर्व मी तुम्हाला केवळ वरवर सांगतोय, ऍक्च्युअल मध्ये सर्व खूप विस्ताराने दाखवले आहे. तर आता वळू यात स्पॉयलर कडे. तर हा पाचवा भाग संपल्यावर घोषणा होते दुसऱ्या सिझन ची जे येणार आहे नोव्हेंबर मध्ये उरलेले एपिसोड्स घेऊन. ज्यात तेलगी चा शेवट कसा झाला इथपर्यंत चित्रण असणार आहे. या दुसऱ्या सिझन चा टिझर पण आहे अखेरीस. तर हा आहे स्पॉयलर .. ज्यांना असे अपेक्षित होते की एकाच सिझन मध्ये सर्व एपिसोड्स येणार आहेत.
थोडक्यात बोलू यात अभिनय, दिग्दर्शन आणि इतर गोष्टींबद्दल. तेलगी च्या प्रमुख भूमिकेत अभिनेता गगन देव रियार ने अक्षरशः कमाल केली आहे. त्याची चालण्याची, बोलण्याची स्टाईल, त्याचे लुक्स, त्याचा गेट-अप हे सर्वच मस्त जमून आलंय. पाचही भागात त्याचा आत्मविश्वसाने भरलेला वावर आणि सहजता वाखाणण्याजोगी आहे. संवादफेकेत तर तो जसे सीनमधील समोरच्या पात्राला गप्प करतो त्याचप्रकारे प्रेक्षकाला शुद्ध जिंकतो. प्रतीक गांधी नंतर सिरीज च्या निर्मात्यांनी याही वेळी एका अचूक अभिनेत्याची निवड केली आहे. करण व्यास आणि किरण यज्ञोपवीत यांनी लिहिलेली पटकथा वेगवान आहे. कुठेही फारशी रेंगाळत नाही. ८० आणि ९० च्या दशकाची वातावरण निर्मिती स्कॅम ९२ प्रमाणेच इथेही काबील ए तारीफ आहे. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली गेल्याचे जाणवते. त्या वातावरणाला अनुकूल अशी सिनेमॅटोग्राफी म्हणजेच छायांकन आहे. त्यामुळे बहुतांश सीनमध्ये स्कॅम ९२ ची आठवण येते. तुषार हिरानंदानी यांचे दिग्दर्शन उत्तम आहे. यात त्यांना हंसल मेहता यांचे मार्गदर्शन लाभले असले तरी दिग्दर्शक म्हणून पूर्ण जबाबदारी तुषार यांच्यावरच आहे ज्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. पाश्वसंगीत, संकलन आणि इतर तांत्रिक बाबतीत सुद्धा सिरीज उत्तम आहे.
तर मित्रांनो एकंदरीत आपल्यापैकी बहुतांश प्रेक्षक जे स्कॅम ९२ सीरिजचे फॅन आहेत अशा सर्वांना स्कॅम २००३ चा हा पहिला सिझन अगदी स्कॅम ९२ इतका जरी आवडला नाही तरी नाराज करेल असा अजिबात नाही. मला तरी तो छान वाटला. आता वाट आहे पुढच्या सिझन ची जो नोव्हेंबर मध्ये येणार आहे. या पहिल्या सिझन ना आउट ऑफ फाईव्ह मी ३ स्टार नक्की देईन. वाटलंच तर गगन देव रियार साठी अर्धा अजून वाढून देतो. गो फॉर इट.
हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा