– अजिंक्य उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
Jawan Movie Review
तुमच्या समोर घडणाऱ्या म्हणजे पडद्यावर घडणाऱ्या अशक्यप्राय अशा घटना जेंव्हा तुम्हाला नुसत्याच शक्य न वाटता त्याचा तुम्ही टाळ्या, शिट्ट्या आणि आरडाओरडा करीत आनंद घेता ना तेंव्हा असे समजायला हरकत नसते की ही जादू आहे. नाही का? सुप्रसिद्ध जादूगाराच्या जादूच्या प्रयोगांमध्ये सुद्धा असेच असते अजून काय? जादूगार आपल्या हातचलाखीने जे काही प्रयोग करतोय ते सर्व खोटे आहेत, अशक्य आहेत हे माहित असूनही आपण ते आ वासून आश्चर्याने, आनंदाने, हसत खेळत, मध्येच दचकत, घाबरत, शॉक होऊन एकटक बघत राहतो आणि अखेरीस ते प्रयोग संपल्यावर टाळ्या ठोकतो. हे सर्व स्वतःच्या खिशातले पैसे देऊन. आज प्रदर्शित झालेला शाहरुख खान आणि दिग्दर्शक एटली जोडीचा जवान बघतांना आणि संपल्यावर मला अगदी हीच नेमकी फीलिंग होती. या दोन जादूगारांच्या एकत्र येण्याने आज बॉलिवूडच्या २०२३ सालातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर प्रदर्शित झालाय.
यापैकी पहिल्या जादूगाराबद्दल आधी बोलू यात. शाहरुख खान. ट्रेलर नंतर यात काही स्पॉयलर राहिलेले नाही म्हणून सांगण्यास हरकत नाहीये. शाहरुख चा डबल रोल आहे. बाप आणि मुलाच्या भूमिकेत. अमिताभ बच्चन चा बाप और बेटा असा डबल रोल असलेला ८० च्या दशकातील ‘आखरी रास्ता’ चा ‘जवान’ हा स्मार्टफोन च्या भाषेत बोलायचे झाल्यास अल्ट्रा प्रो मॅक्स लेटेस्ट व्हर्जन आहे.
कथेत काहीसे बदल करून स्टोरी ची एकंदरीत आऊटलाईन अगदी तशीच आहे. या दोन्ही रोल्समध्ये शाहरुख खान नावाच्या जादूगाराने अक्षरशः कमाल केली आहे. चेहऱ्यावर वय दिसत असूनही त्याचा प्रभाव त्याच्या अभिनयावर, एनर्जी लेव्हल वर, स्टाईल स्टेटमेंट वर, संवादफेकीवर, ऍक्शन वर कुठेही जाणवत नाही. विक्रम राठोड या आपल्या एक्स आर्मी ऑफिसर चा बदला पूर्ण करणारा मुलगा आझाद जो एका महिला कैदीच्या जेलचा जेलर आहे या दोन्ही भूमिकेत शाहरुख ने जान ओतली आहे. चित्रपटभर त्याचा असलेला वावर, त्याच्या तोंडी असलेल्या टोटल मास डायलॉग्ज वर त्याने केलेला सहज पण तेवढाच ताकदीचा अभिनय हे सर्व बघतांना मजा येते. इंटरव्हल पॉईंट ला या दोघांचे एकत्र येणे आणि त्यानंतर एकाच फ्रेम मध्ये त्या दोघांना बघतांना तर शाहरुख चे फॅन्स थिएटरमध्ये अक्षरशः गोंधळ घालतील. वयाच्या साठीच्या जवळ पोहोचलेला हा सुपरस्टार अजूनही जेंव्हा थट्टेने चाहिए तो आलिया भट्ट असे म्हणतो किंवा खलनायकाला म्हणतो तो काली नो डील, किंवा बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर तेंव्हा हा माणूस अजूनही बॉलिवूडचा बाप का आहे हे जाणवते.
आता बोलू यात दुसऱ्या जादूगाराबद्दल. डायरेक्टर एटली. तामिळ भाषेतील ४ ब्लॉकबस्टर सिनेमे ज्याच्या नावावर जमा आहेत अशा अरुण कुमार उर्फ एटली याने दिग्दर्शक म्हणून हिंदीतील पाहिल्याचा सिनेमात सिक्सर मारलाय. तोही अगदी स्टेडियमच्या बाहेर. बरं नुसतं अप्रतिम दिग्दर्शन एवढ्यावर हा माणूस या सिनेमाचा जादूगार ठरत नाही. आपल्या सर्व टीमकडून म्हणजे सिनेमॅटोग्राफी असो, स्पेशल इफेक्टस असो, ऍक्शन सीन्स असो, बीजीएम म्हणजे बॅकग्राउंड म्युझिक असो, संवाद असो, शाहरूख व्यतिरिक्त इतर कलाकारांचा अभिनय असो या सगळ्या डिपार्टमेंट्स कडून त्यांच्यातले बेस्ट काढून घेण्याची जबाबदारी या जादूगाराने लीलया पार पाडली आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम छायांकनाच्या बाबतीत कमाल आहे. जी के विष्णू यांची नेत्रदीपक सिनेमॅटोग्राफी, सहा ऍक्शन डायरेक्टर्सनी एकत्र येऊन कोरिओग्राफ केलेले धमाल ऍक्शन सीन्स, त्याला तेवढ्याच तोडीचे व्हीएफएक्स म्हणजे स्पेशल इफेक्टस, एटली ने आधीच एकदम टाईट लिहिलेल्या पटकथेला तेवढेच क्रिस्पी असे रूबेन यांचे एडिटिंग, अनिरुद्ध चे बीजीएम, त्यात अध्येमध्ये सतत डोकावणारे सुमित अरोरा यांचे एकदम मास असे टाळ्या, शिट्ट्या ओढणारे फिल्मी डायलॉग्ज अशी ही सर्व रेसिपी इतकी काही सुंदर जमून आली आहे की क्या कहने.
पटकथा स्टार्ट टू एन्ड एखाद्या बंदुकीतील बुलेट च्या वेगाने पुढे सरकत असते. इंटरव्हल ला दिलेला ट्विस्ट आणि क्लायमॅक्स च्या आधी असलेला एका मोठ्या कलाकाराचा गेस्ट एपियरन्स अजून मजा आणतो. जवान ३०० कोटींच्या भव्य स्केलवर बनलेला असल्याने प्रत्येक फ्रेम लार्जर दॅन लाईफ आणि लॅव्हिश आहे. शाहरुख शिवाय ज्या कलाकारांनी मजा आणली आहे त्यात विजय सेतुपाती आणि नयनतारा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सेतुपती चा काली हा खलनायक जमून आलाय. नयनतारा जितकी ग्लॅमरस दिसली आहे तितकीच कमाल तिने ऍक्शन ‘सीन्स मध्ये पण केली आहे. दीपिका पदुकोण आणि प्रियामानी यांच्याही भूमिका छान झाल्या आहेत. शिवाय सान्या मल्होत्रा, रिधि डोग्रा, सुनील ग्रोव्हर इत्यादी सर्वच कलाकारांनीं आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. मित्रांनो शेवटी बोलेन अनिरुद्ध या संगीतकाराबद्दल. लास्ट बट नॉट दि लिस्ट. माझ्यासारख्या अनिरुद्ध च्या चाहत्यांची गाणी आल्यापासून काहीशी निराशा झाली होती म्हणजे गाणी वाईट नाही आहेत पण मजा नव्हती आली पण चित्रपट बघतांना या गाण्यांचा तितकासा निगेटिव्ह इम्पॅक्ट जाणवत नाही. याउलट आता ही गाणी रिपीटेटीव्ह ऐकून बरी वाटत आहेत त्यातल्या त्यात चेलिया हे गाणे.
तर असा आहे आज प्रदर्शित शाहरुख चा जवान. शाहरुख च्या करिअरमधील एक मेगा ब्लॉकबस्टर. तुम्हाला अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे तद्दन फिल्मी मसाला मास अशी ऍक्शन एंटरटेनर बघण्याची आवड असेल तर जवान हा तुमच्यासाठीचा चित्रपट आहे. उत्तरेतील शाहरुख आणि दक्षिणेतील एटली हे दोन जादूगार एकत्र येण्याने येत्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर काय जादू घडेल हे आपण सर्व बघूच. एक मोठ्ठ अगदी भलं मोठ्ठ वादळ येऊन धडकले आहे आज बॉक्स ऑफिसवर ज्याचे नाव आहे जवान. आउट ऑफ फाईव्ह मी जवान ला ४ स्टार देईल.
इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा