-अजिंक्य उजळंबकर

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मराठीचा डंका अजून म्हणावा तसा वाजत नाहीए. काही तुरळक वेब सीरिज चा अपवाद वगळता या माध्यमावर हिंदी सोबत तामिळ, तेलगू अथवा अन्य प्रादेशिक भाषांचे सध्यातरी वर्चस्व आहे.  त्यामुळे नुकत्याच लॉन्च झालेल्या ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या व केवळ मराठीला वाहिलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म कडून निश्चितच अपेक्षा उंचावल्या आहेत. एमएक्स प्लेयर (MX Player OTT) वर गेल्या वर्षी स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) च्या समांतर या वेब सीरिजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्यामुळे त्याच्या दुसऱ्या सीझन ची (Samantar Web Series Season 2) प्रेक्षक खऱ्या अर्थाने आतुरतेने वाट बघत होते याची जाणीव सातत्याने सोशल मीडियावर होत होती. अशात अशा प्रकारची आतुरता हिंदी वेब सिरीज मधील मनोज बाजपाई अभिनीत ‘दि फॅमिली मॅन’ च्या दुसऱ्या सीझन बद्दल होती. समांतर च्या सीझन १ चे दिग्दर्शन सतीश राजवाडे याचे होते तर यावेळी मात्र ही जबाबदारी समीर विद्वांस (Director Sameer Vidwans) यांनी उचलली आहे. लेखक सुहास शिरवळकर (Suhas Shirwalkar) यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित ही वेब सिरीज असल्याने साहजिकच यात बोल्ड अँड हॉट कन्टेन्ट आणि मुक्त उधळणारी भाषा व शिवीगाळ असणार ही काही अनपेक्षित बाब निश्चितच नाही कारण सुहास शिरवळकरांच्या लेखनाची मुळात ओळखच ती आहे आणि त्यात वेब सीरिज म्हटल्यावर हा आता एक अघोषित नियमच झाला आहे. पहिला सीझन ६ एपिसोडस चा होता तर दुसरा मात्र १० भागांचा आहे तेही लांबी बऱ्यापैकी मोठी असलेले भाग.(Web Series Review Samantar Season 2)

समांतर च्या पहिल्या भागात कुमार महाजनची (स्वप्नील जोशी) ची भेट सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) शी होते ज्याचा भूतकाळ म्हणजे कुमार चे भविष्य आहे. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्याच्या कथा अगदी समांतर असतात. चक्रपाणीने काही डायऱ्यांमध्ये लिहिलेले स्वतःचे आयुष्य तो कुमारकडे सुपूर्द करतो. अट असते रोजच्या घटनेचे एकच पान वाचायचे तेही आदल्या रात्री. पहिल्या सीझन च्या अंतिम भागात कुमारच्या आयुष्यात एक स्त्री प्रवेश करणार इथपर्यंत येऊन थांबलेली कथा दुसऱ्या सीझन मध्ये मीरा (सई ताम्हणकर) च्या येण्याने पुढे सरकते. साहजिकच ३० वर्षांपूर्वी चक्रपाणी च्या आयुष्यातही अशीच स्त्री अचानक आलेली असते ज्यात तो अडकत जातो जिचे नाव असते सुंदरा. डायरीत लिहिल्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेल्या मीरा पासून दूर राहण्याचा कुमार खूप प्रयत्न करतो. कुमारची बायको निमा ला सुद्धा याची चाहूल लागते व त्यासाठी ती स्वामींची मदत घेते परंतु कुमार व निमा यांचे सर्व प्रयत्न विफल होऊन मीराच्या आयुष्यात येण्याने कुमार एका खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी म्हणून अडकतोच. यातून तो स्वतःला सोडवू शकतो का आणि नियतीचे विधान बदलू शकतो का याचे उत्तर आपल्याला या सीझन मध्ये बघावयास मिळते. 

हा सीझन तब्बल १० भागांचा आहे ज्यांची लांबी सुद्धा बऱ्यापैकी आहे पण असे असूनही अतिशय वेगवान असलेली पटकथा अखेरपर्यंत बांधून ठेवते. ज्यांनी समांतर चा पहिला सीझन पाहिलेला नाही अशा प्रेक्षकांसाठी या सीझनच्या पहिल्या एपिसोड मध्ये त्याचा धावता आढावा घेण्यात आलाय. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातील अनुक्रमे चक्रपाणी आणि कुमार यांच्या आयुष्यातील समांतर प्रसंग या सीझनभर दिग्दर्शकाने ज्या बखुबीने व समांतरतेने दाखवले आहे त्याचे कौतुक करावे लागेल. संकलकाने त्याच्या कात्रीचा कमालीचा वापर केलाय.

दुसऱ्या एपिसोडमध्ये  आपल्या आयुष्यात स्त्री येणार या भविष्याने हादरलेला, गोंधळलेला कुमार स्वप्नीलने मस्तच रंगविला आहे. दुसऱ्या एपिसोड मधील सई ताम्हणकरच्या एंट्रीने कथेतील रंगत वाढवली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या एपिसोडचा वेग काहीसा मंदावला आहे मात्र  पाचव्या एपिसोडमध्ये झालेल्या खुनाने आणि कुमारच्या अटकेने कथानक पुन्हा गतिमान होते. चक्रपाणी आणि कुमार यांच्यावर भूतकाळात आणि वर्तमानकाळात चाललेल्या कोर्टातील खटल्याने सहाव्या एपिसोडनंतर कथेबाबत उत्सुकता वाढत जाते.

पुस्तकावरील कथानकावरून एपिसोड्सचे लिखाण करतांना लेखक अंबर हडप हे  प्रत्येक एपिसोड्सचा शेवट रंजक ठेवण्यात व आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल याची उत्सुकता कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये चक्रपाणी वगळता प्रत्येक पात्राच्या तोंडी असलेली (खासकरून कुमारच्या) मुक्त शिवीगाळ व काही ठिकाणी शिवराळ भाषा मात्र  खटकते. वेब सिरीज आहे म्हणून हिंदीप्रमाणे मराठी मेकर्स नी त्याची पुनरावृत्ती करावी हे काही पटत नाही. पाचव्या एपिसोडमधील कुमार आणि मीरा मधील बोल्ड लव्ह मेकिंग सीन सुद्धा वेब सीरिजच्या टू मच लिबरल गुणधर्माला अनुसरून घेतला आहे. उत्कृष्ट छायाचित्रण व वेगवान पटकथेच्या गतीने वाजणारे प्रभावी पार्श्वसंगीत हे या दुसऱ्या सीझनचा हायलाईट ठरावेत. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी अखेरच्या एपिसोडपर्यंत पकड फारशी लूझ होऊ दिलेली नाही. 

समांतर चा हा दुसरा सीझन आहे स्वप्नील जोशीचा. कमाल काम केलंय. लाजवाब. खरंतर त्याच्या गुडी-गुडी, चॉकलेटी आणि फॅमिली इमेजला ब्रेक देणारी ही भूमिका आहे तरीही स्वप्नीलने त्यात अक्षरशः जीव ओतला आहे. हॅट्स ऑफ स्वप्नील. स्टार्ट टू एन्ड समांतर गोज टू स्वप्नील. त्यानंतर क्रेडीट गोज टू सई ताम्हणकर. शी इज सरप्राईज डबल हॉट धमाका. भूतकाळातील गावरान पाखरू सुंदरा आणि वर्तमानकाळातील मोहक मीरा …दोन्हीही अप्रतिम. अफलातून सहजतेने तिने या दोन्ही भूमिका रंगविल्या आहेत. तेजस्विनीने साकारलेली असहाय्य निमा पण मस्तच जमली आहे. नितीश यांचा चक्रपाणी सुद्धा यावेळी जास्त परिणामकारक व  पहिल्या सीझन पेक्षा जास्त  स्क्रीन प्रेझेन्स असलेला आहे. 

कथेत कुठेही गीत-संगीत अथवा विनोदाला जागा नसतांनाही केवळ कथेच्या जोरावर तेही तब्बल १० एपिसोड प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे खूपच अवघड काम आहे. ते अगदी सहजतेने केलेल्या समांतर च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. या सीझन च्या अखेरीस तिसरा सिझन पण येणार याचेही संकेत या टीमने दिले आहेत. 

हेही वाचा – MOVIE REVIEW SHERNI: शेरनी
Website | + posts
Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.