– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Movie Review 83 The Film; ९ जून ते २५ जून १९८३ दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मधील भारतीय संघाची  परतीची तिकिटे मात्र २० जून या तारखेची अधिकृतरीत्या बुक होती. कारण २० जून नंतर सेमीफायनल होती २२ जून रोजी आणि फायनल मॅच होती २५ जूनला. इंग्लंडच्या साहेब लोकांच्या समजल्या जाणाऱ्या खेळात त्यांच्याच गावी जाऊन त्यांना आणि त्याहीपेक्षा अशक्य अशा वेस्ट इंडीज (या आधीच्या दोन वर्ल्ड कप चे सलग विनर) ला अंडरडॉग्ज समजल्या जाणाऱ्या  व कधीही कुठलीही मॅच जिंकू ना शकणारी अशी इमेज असलेल्या भारतीय टीम कडून पराभव पत्करावा लागेल याचा कोणी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. पण … पण …. पण २५ जून च्या फायनल ला अवकाश असतांना ९ जून रोजी जेंव्हा पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅचमध्ये भारतीय संघाने विश्वविजेत्या वेस्ट इंडिज ला ३४ रनांनी हरविले तेंव्हा मात्र ‘आम्हाला हलक्यात घेऊ नका’ हा स्पष्ट संदेश कपिल देव च्या नेतृत्वाखाली लढायला आलेल्या संघाने मँचेस्टर च्या मैदानातून जगाला पहिल्यांदा दिला होता. लॉर्ड्सला म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीला पुढच्या १५ दिवसात नवा विठोबा मिळण्याच्या चमत्काराची ही सुरुवात होती. हा चमत्कार घडतांना फार कमी भारतीयांनी पाहिलाय कारण बहुतांश भारतीयांनी तो ऐकलाय. 

कारण टेलिव्हिजन युग भारतात सुरु झालेल्या ८० च्या दशकातील हे सुरुवातीचे दिवस असल्याने हा ‘इडियट बॉक्स’ अजून सर्वांच्या बैठकीत सजला नव्हता परंतु रेडियो मात्र बहुतांश घरात ऐकले जायचे. १९४७ साली म्हणजे ३६ वर्षांपूर्वी साहेबांना देशातून हाकलून लावल्यानंतर त्यांच्याच देशाच्या मैदानावर (तेही लॉर्ड्सवर) मिळवलेल्या विश्वविजेतेपदाचा आनंद जणू दुसऱ्या स्वातंत्र्या सारखा जल्लोषात देशभर साजरा करण्यात आला होता. आज कबीर खान या प्रतिभाशाली दिग्दर्शकाने ते सर्व ऐतिहासिक क्षण पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न ८३ नावाच्या सिनेमाद्वारे केला आहे. त्या क्षणाच्या ३८ वर्षानंतर आज जेंव्हा क्रिकेटच्या विश्वपटलावर ‘इंडिया’ या टीमची चलती आहे व आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, अशा वेळी हे फारसे न अनुभवता आलेले सुवर्णक्षण रुपेरी पडद्यावर बघणे हा केवळ दुग्धशर्करा योग आहे. 

आता सिनेमाविषयी. सर्वात आवडलेली बाब. ८३ चा वर्ल्ड कप कसा झाला, त्यात कोणत्या टीम होत्या, त्यांच्या मॅचेस कशा झाल्या इत्यादी वर अजिबात लक्ष न देता दिग्दर्शक कबीर खान याने या वर्ल्ड कपमध्ये ग्रुप बी मध्ये असलेल्या भारतीय संघाच्या केवळ त्यांच्या ग्रुपमध्ये झालेल्या मॅचेस, सेमी-फायनल आणि नंतर फायनल बस्स एवढ्यावरच लक्ष केंद्रित केलंय. वर्ल्ड कप सुरु होण्याच्या आधी अजिबात अपेक्षा नसलेला ते सुरुवातीच्या दोन मॅचेस मध्ये आधी वेस्ट इंडिज आणि नंतर झिम्बाब्वे ला हरवून सर्वांना सुखद धक्का देणारा भारतीय संघ .. परंतु नंतरच्या दोन मॅचेसमध्ये वेस्ट इंडिज आणि आस्ट्रेलिया कडून झालेल्या दारुण पराभवानंतर कमालीचा हताश झालेला संघ या निराशेतून कसा बाहेर पडतो याचे अतिशय जलद, सुरेख आणि अत्यंत परिणामकारक चित्रण कबीर खान यांनी केलंय. २० जून रोजी परतीची तिकिटे बुक असलेला संघ १८ तारखेला झिम्बाब्वे ला आणि २० जूनला ऑस्ट्रेलिया ला पराभूत करून कसा सेमीफायनल फेरीत प्रवेश करतो हे पडद्यावर बघतांना अंगावर शहारे, डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आनंद अशी थ्रिलिंग अनुभव देणारी रोलर-कोस्टर राईड आहे. 

या सर्व मॅचेस दरम्यान संघातील प्लेयर्स चे वैयक्तिक आयुष्यातील व आपापसातील भावुक करणारे काही क्षण व एकमेकांची टिंगल करणारे, टांग खेचणारे हलकेफुलके मजेदार क्षण तुम्हाला विचार करायला अजिबातच वेळ देत नाहीत. आपली टीम अखेरीस फायनल जिंकलेलीच आहे या माहित असलेल्या कथेला प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या पटकथेत रुपांतरीत करणे हे खरंतर मोठे अवघड आव्हान असते. पण टीममधील प्रत्येक प्लेयर्सची असलेली वैशिष्ट्ये खुलवत लिहिलेल्या पटकथा आणि अत्यंत प्रभावी संवादांनी हा प्रवास अतिशय रंजक केला आहे. 

यात प्रामुख्याने कपिल देव (रणवीर सिंग), सुनील गावस्कर (ताहीर राज भसीन), के श्रीकांत (जिवा), मोहिंदर अमरनाथ (साकेब सलीम), यशपाल शर्मा (जतीन सरना), बलविंदर संधू (एमी विर्क), रॉजर बिन्नी (निशांत दहिया) व सय्यद किरमाणी (साहिल खट्टर) या खेळाडूंच्या व्यक्तिरेखा आणि त्यासाठी त्या त्या अभिनेत्याने  केलेला सुंदर अभिनय अगदीच कमाल आहे. रणवीर सिंग तर क्या कहने! हा रोल केवळ त्याच्यासाठीच लिहिला गेलाय इतका जिवंत त्याने तो केलाय. एरवी ओव्हर ऍक्ट करणारा, नाहक माकड उड्या मारणारा रणवीर इथे मात्र कपिलच्या भूमिकेत अतिशय संयमी, शांत बघतांना खूपच आश्चर्य वाटते. ही रणवीरच्या करिअरमधील माईलस्टोन भूमिका आहे आणि यासाठी रणवीरला बऱ्याच पुरस्कारांचे व्यासपीठ चढावे लागेल हे नक्की. हॅट्स ऑफ! 

पंकज त्रिपाठी ने रंगविलेला टीम मॅनेजर मन सिंग ही सिनेमातील दुसरी अशी व्यक्तिरेखा आहे जी तुम्हाला तिच्या प्रेमात पाडतेच. खास हैदराबादी टोन मध्ये हिंदी बोलणारा पंकज त्रिपाठी बघणे म्हणजे ८३ नावाच्या सुंदर केकवरील जणू चेरी आहे. रोमी भाटीया या कपिल देवच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका पदुकोणने छोट्याशा रोलमध्येही आपली उपस्थिती जाणवेल याची काळजी घेतली आहे. इतर खेळाडूंच्या भूमिकेत असलेले आदिनाथ कोठारे (दिलीप वेंगसरकर), धैर्य करवा (रवी शास्त्री), चिराग पाटील (संदीप पाटील), दिनकर शर्मा (कीर्ती आझाद), हार्डी संधू (मदन लाल) या सर्वांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. सिनेमा बघतांना संगीत, पार्श्वसंगीत, छायांकन या सर्व डिपार्टमेंट कडे फारसे लक्ष जात नसले तरी यातही सिनेमाला मेरीटचे मार्क्स द्यावे लागतील. 

भारतीय टीमचा फायनल प्रवेश निश्चित झाल्यावर इकडे भारतात काही भागात धार्मिक दंगली उसळलेल्या असतात. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्देशानुसार फायनल मॅचचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर होणार असते शिवाय धार्मिक दंगलीवरून लोकांचे लक्ष कमी करण्यासाठी फायनल चा हा दिवस एखाद्या उत्सवासमान साजरा व्हावा असेही निर्देश असतात. एका शहरात कर्फ्यू असतो पण तरीही एक मुस्लिम कुटुंब गच्चीवर कसाबसा अँटेना सेट करून आत मॅचचा आनंद लुटत असते. मॅचचा फिव्हर इतका वाढलेला असतो की घरातील टीव्हीचा आवाज ऐकून बाहेर गस्त घालणारे पोलीस त्या गरीब मुस्लिम कुटुंबियांचे दार ठोठावतात व विचारतात ” भाई, स्कोअर क्या हुवा है?” 

माझ्या मते भारतात दोन प्रमुख धर्म आहेत .. एक क्रिकेट आणि दुसरा सिनेमा. या दोन धर्मांचे करोडो कट्टर अनुयायी भारतात आहेत. हे असे धर्म आहेत जे सर्वांना एकत्र आणतात. एकत्र बसवतात ..एकत्र हसवतात.. एकत्र रडवतात.  खेळाडू आणि अभिनेते हे जणू या अनुयायांसाठी देवासमान आहेत. वरील दोन्ही पैकी तुम्ही कुठल्या एका धर्माचे जरी अनुयायी असाल तर ८३ हा सिनेमा तुमच्यासाठी मंदिर किंवा मस्जिदीप्रमाणे एक पवित्र प्रार्थनास्थळ आहे आणि जर तुम्ही दोन्ही धर्म तेवढ्याच कट्टरतेने फॉलो करत असाल तर ८३ हा सिनेमा तुमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. मास्टरपीस! डोन्ट ओन्ली वॉच… हॅव्ह या फील !

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment