– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Zara Hatke Zara Bachke Movie Review

कथानक थोडक्यात – इंदोर शहरात आपल्या जॉईंट फॅमिलीसोबत राहणाऱ्या आणि लव्ह मॅरेज करून आनंदी संसाराची दोन वर्षे पूर्ण केलेल्या कपिल दुबे (विकी कौशल) आणि सौम्या दुबे (सारा अली खान) या मध्यमवर्गीय जोडप्याला घ्यायचंय एक स्वतःचं स्वप्नातलं घर. पण अर्थातच बजेट कमी पडतंय. केंद्र सरकारच्या आवास योजनेतील घर कसंतरी बजेटमध्ये बसतंय पण त्यासाठी असलेल्या अटींमुळे यातून कसा मार्ग काढावा असा प्रश्न या जोडप्याला पडलाय. या योजनेत घर घेण्यासाठी जुगाड करून देणारा एक मध्यस्थ भगवान दास (इनामुलहक ) या दोघांना भेटतो. घर घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये हे दोघेही बसत नसल्याने दोघांनी केवळ कागदोपत्री घटस्फोट घ्यावा आणि मग सौम्या च्या नावावर घर घ्यावे, त्यानंतर परत एकत्र यावे असा विचित्र मार्ग भगवान दास यांना सांगतो. एकमेकांवर असलेल्या प्रेमापोटी दोघे हा पर्याय स्वीकारतात पण नंतर दोघांनाही याचा पश्चाताप होतो. का होतो? अशी काय परिस्थिती निर्माण होते आणि यातून ते बाहेर कसे पडतात हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मैत्रेय बाजपाई आणि रमीझ खान यांच्यासोबत चित्रपटाची कथा पटकथा सुद्धा लिहिली आहे. चित्रपट स्वच्छ आहे. इतका की आजकाल फारच दुर्मिळ झालाय. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी ह्रिषीकेश मुखर्जी यांच्या सिनेमांची आठवण यावी एवढा हा चित्रपट स्वच्छ आहे. कथा आणि ती सांगण्याची पद्धत अगदी साधी आणि टिपिकल आहे शिवाय काहीशी प्रेडिक्टेबल पण आहे. इतकी कि अशा प्रकारची स्टोरीटेलिंग पाहण्याची आता प्रेक्षकांना सवय नाही व ती अगदीच मिडिओकर म्हणजे अत्यंत साधारण वाटू शकते. ७० च्या दशकातील ह्रिषीदा, बासू चॅटर्जी यांच्या जॉनर चा हा सिनेमा आहे आणि अशात हे सर्व दुर्मिळ झाल्याने हेच विशेष आहे असे मला वाटते. पण हे असे असणे तेंव्हा सुद्धा अव्यावसायिक होते आणि आजही. विकी कौशल आणि सारा अली खान या दोघांनीही आपापल्या भूमिका छान साकारल्या आहेत. मध्यमवर्गीय नवविवाहित जोडपे आणि विशेष करून जॉईंट फॅमिली मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना चित्रपट जवळचा वाटेल. क्लायमॅक्स ला आणलेला इमोशनल फॅमिली पंच महिलावर्गास आवडेल असा आहे. चित्रपटाची एकूण लांबी केवळ दोन तासांची आहे ही सुद्धा दिलासादायक बाब आहे. सचिन जिगर यांचे संगीत श्रवणीय आहे आणि कथानकाला सोबत घेऊन जाणारे आहे.

नावीन्य काय?- खरं सांगायचे तर मला यात काही नावीन्य वाटले नाही. कथेच्या नायक नायिकेत अंतर निर्माण होण्यासाठी कारण इथे वेगळे असले तरी ओव्हरऑल कथानकात फ्रेशनेस नाही हे मान्य करावे लागेल.

कुठे कमी पडतो? – मध्यंतरापर्यंत काही कॉमिक पंचेस मुळे करमणूक करणारी कथा, इंटरव्हल नंतर मात्र बऱ्याच ठिकाणी रटाळ व रिपीटेटिव्ह वाटायला लागते. इथे दिग्दर्शकाने नॅरेशन स्टाईल म्हणजे कथा सांगण्याची पद्धत हटके ठेवली असती तर चित्र निश्चितपणे वेगळे असू शकले असते. संवादांमध्ये अपेक्षित कॉमिक आणि इमोशनल टच कमी पडलाय. लुका छिपी आणि मिमी या लास्ट दोन चित्रपटांच्या मानाने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन सुद्धा साधारण आहे.

पहावा का?- पहिला तरी हरकत नाही… नाही पहिला तरी खूप काही मिस कराल असेही नाही. ह्रिषीकेश मुखर्जी टाईप स्टोरीटेलिंग ची आवड असलेल्या रसिकांना आवडण्याची शक्यता आहे. पण अगदी थिएटरमध्येच पहावा असाही नाही.

स्टार रेटींग – २. ५ स्टार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment