– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Bachchhan Paandey Movie Review सर्व अवॉर्ड्स मध्ये वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये मिळून एकूण ३० च्या आसपास नामांकनं. त्यातून १७ जिंकले. १७ पैकी २ राष्ट्रीय पुरस्कार. इंजिनिअरिंग संपवून सिनेमा दिग्दर्शनाकडे वळलेला व त्यावेळी अवघ्या ३१ वर्षांचा असलेल्या दिग्दर्शक कार्तिक सुब्बराज याने ही कमाल केली होती २०१४ साली. तेही आपल्या दुसऱ्याच चित्रपटात. सिनेमा होता तामिळ भाषेतील ज्याचे नाव होते ‘जिगरथंडा’. या सिनेमात बॉबी सिम्हा या कलाकाराने साकारला होता मदुराई येथील एक गँगस्टर सेथु. सेथु या भूमिकेसाठी बॉबी ला विजय अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड व अखेरीस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता या ‘जिगरथंडा’ नावाच्या सिनेमाचा रिमेक ‘बच्चन पांडे’ नावाने हिंदीत आलाय ज्यात बॉबीने साकारलेल्या गँगस्टर च्या भूमिकेत आहे अक्षय कुमार. ‘जिगरथंडा’ ला मिळालेले नामांकनं आणि पुरस्कार यांची संख्या बघता नक्कीच तो तितका दर्जेदार असेल यात शंका नाही. मी स्वतः ‘जिगरथंडा’ पाहिलेला नसल्याने त्याची तुलना ‘बच्चन पांडे’ सोबत नाही करू शकणार परंतु हा हिंदीतील एका डोळ्याचा बच्चन पांडे त्याच्या आसपास पण पोहोचू शकलेला नाही इतकं मी माझे दोन्ही डोळे बंद करून सांगू शकतो. 

मायरा (क्रिती सॅनोन) ला सिने दिग्दर्शक म्हणून सेन्सेशनल ब्रेक हवाय. त्यासाठी म्हणून ती उत्तर प्रदेशातील खतरनाक गँगस्टर बच्चन पांडे (अक्षय कुमार) वर बायोपिक करण्याचे ठरवते. मायरा ला यात तिला मदत मिळते तिचा मित्र विशू (अर्शद वारसी) ची. सुरुवातीला बच्चन पांडे च्या भीतीने व त्याच्या नकळत त्याच्याबद्दल असलेली माहिती मिळविण्याचे काम हे दोघे करीत असतात परंतु त्यात हे दोघे फसतात व बच्चन पांडे ला सत्य कळते. आता बच्चन पांडे ला स्वतःवर सिनेमा बनविण्यावर आक्षेप नाहीए परंतु त्या सिनेमात मुख्य भूमिका मीच साकारणार ही त्याची अट असते जी मायरा ला अमान्य असते. मायरा आपला हा महत्वाकांक्षी पहिला प्रोजेक्ट गुंडाळून परत जायला निघते तेंव्हा तिला बच्चन पांडे च्या भूतकाळातील काही घटनांबद्दल कळते आणि ती बच्चन ला प्रमुख भूमिकेत घेण्यास तयार होते. भूतकाळातील या घटना कोणत्या असतात आणि पुढे बच्चन पांडे वरील सिनेमाचे काय होते यावर इथे सविस्तर भाष्य करणे अयोग्य. 

दक्षिणेतील एखाद्या दर्जेदार कलाकृतीचा हिंदी रिमेक करताना त्याला तितकाच दर्जेदार करणं जरी जमले नसेल तरी निदान ऍव्हरेज सुद्धा बनवता येऊ नये याची अनेक उदाहरणे हिंदी सिनेमाने पाहिली आहेत. बच्चन पांडे आता त्यात आणखी एक भर. कथानक अतिशय साधारण. परंतु तरीही पटकथेत रुपांतरीत करताना एक चांगला करमणूक प्रधान मसालापट बनण्याची नक्कीच क्षमता यात आहे. जिगरथंडा या मूळ तामिळ कलाकृतीला समीक्षक, प्रेक्षक या दोघांचेही मिळालेले प्रेम तेच सिद्ध करते. पण तब्बल सहा लेखकांनी मिळून बच्चन पांडे ची हिंदी पटकथा लिहिली आहे आणि सगळा घोळ इथेच झालाय. अतिशय लाऊड असलेली मध्यंतरापर्यंत ची वाटचाल निदान त्याच्या फास्ट पेस मुळे सहनही होते परंतु मध्यंतरानंतर मात्र दिग्दर्शकाची (फरहाद सामजी) चित्रपटावरची पूर्ण पकड सुटते. बच्चन पांडे चे चित्रपटात काम करणे, अभिनेता पंकज त्रिपाठी चे या सर्व गँगस्टर टोळीसाठी अभिनयाचा शिक्षक म्हणून येणे, मायराने बच्चन च्या नकळत विनोदी सिनेमा बनविणे हा सर्व भाग अत्यंत विचित्र, बालिश, अविश्वसनीय आणि हास्यास्पद वाटतो. 

छायांकन, पार्श्वसंगीत, ऍक्शन व इतर तांत्रिक बाबतीत सिनेमाची निर्मिती मूल्ये अप टू स्टँडर्ड आहेत. मसाला पट असूनही गीत-संगीताच्या बाबतीत मात्र परिस्थिती निराशाजनक आहे. अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुमार बऱ्याच ठिकाणी खूपच लाऊड वाटतो. अर्शद वारसी व पंकज त्रिपाठी सारख्या अभिनेत्यांचा व त्यांच्या चित्रपटातील भूमिकेला साजेशा अशा त्यांच्या कॉमिक इमेजचा प्रभावी वापर करता आलेला नाही हे प्रेक्षकांचे दुर्दैव. क्रिती सॅनोन ने वाट्याला आलेल्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न नक्की केलाय. इतर कलाकारांमध्ये जॅकवेलीन फर्नांडिज, अभिमन्यू सिंग, प्रतीक बब्बर, संजय मिश्रा यांचे अभिनय ठीक या सदरात मोडणारे. 

सिंगल स्क्रीन सिनेमांच्या मास ऑडियन्स ला समोर ठेऊन बनविण्यात आलेला असला तरीही बच्चन पांडे त्या प्रेक्षकांना सुद्धा पैसा वसूल फिलिंग देऊ शकेल याची शक्यता अजिबात नाही. ‘दि कश्मीर फाईल्स’ नावाचे सध्या बॉक्स ऑफिसवर घोंघावत असलेले तुफान आणि पुढच्याच आठवड्यात येणारा बाहुबली च्या टीम चा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘आरआरआर’, एका डोळ्याच्या या बच्चन पांडे समोरील अडचणी अजून वाढवतील, हेही मी पुन्हा दोन्ही डोळे बंद करून सांगू शकतो.  

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment