– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Laal Singh Chaddha Movie Review. विन्स्टन ग्रूम या अमेरिकन साहित्यिकाने १९८६ साली ‘फॉरेस्ट गम्प’ नावाची कादंबरी लिहिली ज्यावर आधारित १९९४ साली याच नावाचा अमेरिकन चित्रपट प्रदर्शित झाला. टॉम हँक्स च्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाला न केवळ प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले तर ऑस्कर सारख्या प्रतिष्ठित पुरस्कांमध्येही एकूण ६ पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. मूळ कादंबरीतील कथा आणि या चित्रपटातील कथा यात बऱ्यापैकी बदल करण्यात आले होते. जवळपास १० वर्षांपूर्वी अभिनेता अतुल कुलकर्णी ने लेखणी हातात घेऊन याच ‘फॉरेस्ट गम्प’ चे भारतीय व्हर्जन लिहून ठेवले होते. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर ने हे स्क्रिप्ट ऐकावे म्हणून अतुल आमिर चा सातत्याने फॉलो अप घेत होता पण आमिर ला अतुलच्या लेखन कौशल्यावर विश्वास नव्हता. अखेरीस अतुल च्या प्रचंड आग्रहाला कंटाळून आमिरने हे स्क्रिप्ट ऐकले आणि त्वरित हा प्रोजेक्ट करण्याचे ठरले. चित्रपटाच्या अधिकृत हिंदी रिमेकचे अधिकार मिळवता मिळवता तब्बल ७-८ वर्षांचा कालावधी गेला आणि मार्च २०१९ मध्ये याची अधिकृत घोषणा झाली. जवळपास ३ वर्षे मेकिंग मध्ये गेल्यानंतर आज हा भारतीय फॉरेस्ट गम्प अर्थात ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित झाला आहे. २०१६ सालच्या ‘दंगल’ नंतर गेली ६ वर्षे हिट चित्रपटाच्या शोधात असलेल्या आमिर खान च्या करिअर साठी महत्वाचा मानला जाणारा असा ‘लाल सिंग चड्ढा’ हा परफेक्शनिस्ट आमिर च्या करिअर मधील असा पहिला चित्रपट आहे जो मोठ्या प्रमाणावर रसिकांच्या रोषाचा आणि बॉयकॉट चा सामना करीत सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

‘फॉरेस्ट गम्प’ चा अधिकृत आणि हुबेहूब रिमेक असल्या कारणाने लाल सिंग चड्ढा च्या कथानकातील प्रत्येक फ्रेम ही फॉरेस्ट गम्प ची झेरॉक्स कॉपी आहे केवळ इथे त्याचे भारतीयकरण करण्यात आले आहे इतकेच. कथेचा प्रवास लाल सिंग चड्ढा (आमिर खान) च्या बालपणीतून सुरु होतो. लहानपणापासूनच लाल हा एक कमी आयक्यू पण मनाने तितकाच खरा आणि स्वच्छ अंतःकरणाचा मुलगा आहे. रूपा (करीना कपूर) ही त्याची बालपणीची पहिली आणि एकमेव जवळची मैत्रीण. आई (मोना सिंग) नंतर लाल च्या आयुष्यात महत्वाचं कोण असेल तर ती आहे रूपा. कमी आयक्यू सोबतच लाल च्या दोन्ही पायात अपंगत्व असते. लाल चे रूपावर मनापासून प्रेम असते ज्याची कबुली तो अनेकदा रुपाला देतो परंतु रूपा ला मुंबईच्या ग्लॅमर जगताचे मोठे आकर्षण असते आणि मोठी स्टार होण्याची तिची इच्छा असते. स्वतःच्या अपंगत्वावर मात करीत किशोरवयीन व नंतर महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करेपर्यंत लाल हा प्रचंड वेगाने धावणारा आघाडीचा धावपटू झालेला असतो ते केवळ रूपा च्या प्रेमाने आणि आईच्या प्रेरणेने. त्याचे हेच धावणे त्याला नंतर आर्मी मध्ये प्रवेश घेण्यामागचे प्रमुख कारण बनते. आर्मीत गेल्यावर त्याचा एक जिवलग मित्र बनतो बाला (नागा चैतन्य). आता आई आणि रूपा नंतर लाल च्या आयुष्यात कोणी महत्वाचा आहे तर तो आहे त्याचा जिवलग मित्र बाला. बाला चा एक पिढ्यान पिढ्या चालत आलेला व्यवसाय असतो चड्डी-बनियान बनविण्याचा. आपण आर्मीतून निवृत्ती घेतल्यावर दोघे जण मिळून हा व्यवसाय करू यात असे बाला आणि लाल ठरवितात सुद्धा पण दुर्दैवाने कारगिल युद्धात बाला शहीद होतो. दुसरीकडे रूपा सुद्धा मुंबईच्या ग्लॅमर जगतात स्वतःच हरवून गेलेली असते. अचानक पणे लाल च्या आयुष्यात खूप एकाकीपण आलेले असते. यातून परत एकवार स्वतःला सावरत लाल कसा एक यशस्वी उद्योजकांपर्यंतचा पल्ला गाठतो हा कथानकाचा पुढील कथाभाग.

ज्यांनी ‘फॉरेस्ट गम्प’ पाहिलाय अशा प्रेक्षकांना लाल सिंग चड्ढा बघतांना सातत्याने त्याची आठवण येत राहील इतकी समानता जवळपास प्रत्येक फ्रेम मध्ये आहे. या सर्व कथेला बॅकग्राउंड मध्ये घडणाऱ्या राजकीय घटनांची पार्श्वभूमी देण्यात फॉरेस्ट गम्प प्रमाणेच याही ठिकाणी कथाकार अतुल कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. म्हणजे लाल च्या बालपणात सुरु झालेला हा प्रवास, इंदिरा गांधी यांच्या १९७७ सालच्या आणीबाणी उठविल्यानंतर साधारण सुरु होतो. त्यानंतर लाल च्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला त्या त्या काळातील होणारी राजकीय उलथापालथ आणि त्याने घडणारे-बिघडणारे समाजमन कसे जबाबदार असते हे मोठ्या सुंदरतेने कथाकार आणि दिग्दर्शकाने दाखवले आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ मध्ये सुद्धा असेच होते.

कथानकाचा मध्यंतरा पर्यंतचा प्रचंड वेगाने होणारा प्रवास, मध्यंतरानंतर मात्र करकचून हॅन्ड ब्रेक लावल्याप्रमाणे नुसता मंदावत नाही तर जवळपास थांबतोच आणि इथेच नेमकी लाल सिंग चड्ढा ची माशी शिंकली आहे. मध्यंतरानंतर लाल आणि रूपा चे जे काही प्रसंग आहेत ते अतिशय कंटाळवाणे आहेत आणि कथाकार आणि दिग्दर्शकाला नेमके काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. रूपा हे पात्रच मुळात अतिशय गोंधळलेल्या असते आणि अशाच अवस्थेत चित्रपटभर भरकटत जाते. रूपा चे मुळात लाल वर खरोखर प्रेम आहे कि नाही आणि आहे तर ती त्याचा स्वीकार इतक्या उशिरा का करते हे पटवून देण्यात पटकथाकार आणि दिग्दर्शक कमी पडले आहेत. मध्यंतरापर्यंत मस्त वेगाने आणि करमणूक करीत पुढे जाणारी कथा, अर्ध्या प्रवासानंतर मात्र कमालीची भरकटली आहे.

कथानकाच्या या भागात लाल सिंग हे पात्र भारतभर जवळपास चार वर्षे कुठल्याही करणाविना आणि कुठल्याही दिशेविना पळतांना दाखवले आहे. कथानकाचे सुद्धा अगदी तसेच झाले आहे. चित्रपटाचे सुमार संगीत हा सुद्धा मोठा मायनस पॉईंट. मोहन कन्नन याने गायलेले कहाणी हे एकमेव गीत अतिशय सुंदर जमलंय ( अमिताभ भट्टाचार्य यांच्या सुंदर बोलासह) बाकी गाण्यात संगीतकार प्रीतम यांचा कुठेच स्पेशल टच जाणवत नाही. निराश करणारे संगीत सेकंड हाफ ला अजूनच ड्रॅग करते हे विशेष. चित्रपटाची २ तास ४५ मिनिटांची कंटाळवाणी लांबी आटोक्यात आणण्यात लेखक-दिग्दर्शक जोडीला आणि त्यांच्यासोबत निर्माता आमिर खान ला सुद्धा अपयश आले आहे. छायांकन, पार्श्वसंगीत आणि इतर तांत्रिक बाबतीत चित्रपट खूप उजवा आहे.

अभिनयाच्या बाबतीत आमीर बद्दल काय बोलावे? नेहमीप्रमाणे यातही जास्तीत जास्त परफेक्शन ने लाल सादर करण्यात आमिर कमालीचा यशस्वी झाला आहे. फॉरेस्ट गम्प ज्याप्रमाणे एकट्या टॉम हँक्स ने आपल्या खांद्यावर उचलला होता, त्याही पेक्षा सहजतेने आमीर ने लाल रंगविला आहे. अभिनेता म्हणून आमिर ला परत एकवार हॅट्स ऑफ. करीना ने काम छान केले आहे पण तिचे पात्र इतके गोंधळलेले आहे की करीना चा सुंदर अभिनयाचा सुद्धा काही उपयोग होत नाही. नागा चैतन्य ने साकारलेला बाला प्रेक्षकांना त्याच्या प्रेमात पाडणारा आहे. आमिर च्या आईच्या भूमिकेत मोना सिंग सुद्धा उत्तम. मानव वीज ने साकारलेला मोहम्मद सुद्धा प्रभावी झालाय.

लाल सिंग चड्ढा हा फॉरेस्ट गम्प प्रमाणेच एक सुंदर प्रयोग होऊ शकला असता पण लेखक नसलेल्या अतुल कुलकर्णीच्या लेखणीला मध्यंतरानंतर ना सापडलेली दिशा (मुळात जसाच्या तसा रिमेकच करायचा आहे म्हटल्यावर येणारे बंधन या कारणाने) आणि नवख्या असलेल्या दिग्दर्शक अद्वैत चंदन या दोघांमुळे एक छान संधी हुकली आहे हे मात्र मान्य करावे लागेल. निराशाजनक.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment