– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Adipurush Movie Review

कथानक थोडक्यात – सांगायची खरंच गरज आहे का? रामायण आहे हे सर्वश्रुतच आहे. रामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या कृती सॅनॉन, लक्ष्मणाच्या सन्नी सिंग, हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान. दिग्दर्शक आहेत ओम राऊत तर संगीत आहे अजय-अतुल यांचे.

विश्लेषण – संगीतकार अजय अतुल यांचे संगीत आणि संचित आणि अंकित बल्हारा यांचे पार्श्वसंगीत हा सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. स्पेशल इफेक्टस अपेक्षेपेक्षा बरेच बरे आहेत. (बरे या शब्दाचा अर्थ बरे एवढाच निघतो तो चांगले/छान/उत्तम असा करून घेऊ नये.) म्हणजे पहिले टिझर पाहिल्यानंतर जी रिएक्शन आली होती तिचा विचार करून ६ महिने थांबून व्हीएफएक्स वर काम करण्याचा निर्णय घेतला ते अतिशय योग्य होते. पण तरीही काही ठिकाणी गरज नसतांना घुसवलेले व्हीएफएक्स सिनेमाचे हसे करून घेतात. खासकरून रावण आणि त्याच्याशी संबंधित सर्वच सीन्स. रावणाचा दाढीवाला लूक, त्याची काळी लंका…म्हणजे गरजेपेक्षा जास्तच काळी, रावणाच्या भोवती सापांचा वेढा घातलेला सीन, त्याच्या दहा डोक्याचे ऍनिमेशन, सीताहरणाच्या वेळी आणि नंतर त्याचे वाहन म्हणून दाखवलेला गलिच्छ पक्षी, सीतेला हरण करतांना पाशवी वेढा घालून प्रेतासारखे नेतानांचे दृश्य, त्याचे विचित्रासारखे चालणे आणि बोलतांना त्याच्या आवाजाला दिलेला घोगरा इफेक्ट, गिटार वाजविल्यासारखी त्याची वीणा वाजविण्याची विचित्र पद्धत, मास्क लावून कुठल्याशा त्याच्या आर्मर फॅक्टरी मध्ये काम करतानाचे दृश्य असे बरेच व्हीएफएक्स खटकणारे आहेत आणि हे नक्कीच एकतर टाळता आले असते अथवा अजून चांगल्या म्हटल्यापेक्षा योग्य रित्या दाखवता आले असते. मनोज मुंतशीर शुक्ला यांनी लिहिलेली गीते तर अर्थपूर्ण आहेत पण संवाद मात्र काही सीन्स वगळता फिके पडले आहेत. राम सेतू बांधतांना आणि लंका आक्रमणाच्या वेळी रामाच्या तोंडी असलेले संवाद जोशपूर्ण आहेत पण काही सीन्स मधील संवाद फारच हास्यास्पद आहेत. म्हणजे हनुमानाच्या शेपटीला आग लावल्यावर हनुमानाच्या तोंडी एक डायलॉग आहे की “कपड़ा तेरे बाप का! तेल तेरे बाप का! जलेगी भी तेरे बाप की”, तसेच रावणपुत्र इंद्रजीत च्या तोंडी असलेले डायलॉग्ज, “मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है” किंवा “तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया” हे संवाद एखाद्या सडकछाप बॉलिवूड चित्रपटाला शोभणारे आहेत. पण हे खटकणारे व्हीएफएक्स आणि संवाद याकडे एकवेळ डोळे झाक करता येते पण मला सर्वात मोठा आदिपुरुषचा निगेटिव्ह पॉईंट जो वाटला तो म्हणजे महत्वाच्या सीन्स मध्ये पूर्णतः मिसिंग असे इमोशन्स. उदाहरणार्थ राम आणि हनुमानाच्या पहिल्या भेटीत प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे म्हणजे पाहिजेच, सीतेला हरण करून नेल्यानंतर तिच्या विरहात व्याकुळ रामाला बघून सिनेमाहॉल मधील निदान महिला वर्ग तरी रडलाच पाहिजे, हनुमान आणि सीतेच्या अशोक वनातील पहिल्या भेटीच्या सीन मध्ये तर डोळ्यात आसवे आणि गालावर हसू असे एकत्र भाव यायला पाहिजेत, राम आणि शबरी यांचा बोरं खातांना चा भावनिक संवाद सुद्धा तितकाच भावस्पर्शी हवा. पण यापैकी एकही सीनमध्ये असे होत नाही आणि याला एकमेव जबाबदार व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक ओम राऊत. ओम ला मुळात या सीन्स चे महत्वच कळले नाही असे वाटते. पण हा इमोशनल डिस्कनेक्ट आजच्या तरुण पिढीला कितपत जाणवेल याची मला शंका आहे पण हो ज्यांनी रामानंद सागर यांचे दूरदर्शनवरील रामायण पाहिले आहे त्या पिढीला हे नक्कीच खटकेल.

चित्रपटाची कंप्लिट तीन तासांची लांबी विशेषकरून मध्यंतरानंतर सहन करणे जड जाते. मध्यंतरापर्यंत खरंतर सिनेमाचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी ठेवण्यात ओम राऊत यशस्वी झालाय पण मध्यंतरानंतर मात्र उरका उरकी झालेली दिसते, आणि सर्व लक्ष व्हीएफएक्स कडेच दिल्याचे जाणवते. म्हणजे इंद्रजीत आणि कुंभकर्ण यांचा शेवट हा भाग अगदी उरकला आहे. पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की चित्रपटाला शेवटपर्यंत वाचवणारी एकमेव बाब म्हणजे अजय अतुल चे संगीत आणि संचित आणि अंकित बल्हारा यांचे पार्श्वसंगीत. कार्तिक पलानी यांची सिनेमॅटोग्राफी म्हणजे छायांकन उत्तम आहे. नचिकेत बर्वे यांची वेशभूषा आहे आणि ज्यात सिनेमा तोंडावर आपटलाय. रमझान बुलूट आणि प्रद्युमन कुमार यांचे फाईट सीन्स चित्तथरारक आहेत. अभिनयाच्या बाबतीत प्रभास, कृती, देवदत्त नागे, सन्नी सिंग आणि सैफ अली खान पाचही जणांची कामे अगदीच ठीक या सदरात मोडणारी आहेत.


थोडक्यात काय ? पहावा का?- आवर्जून पाहावाच असाही नसला तरी एकदा पाहायला हरकत नाही इतका बरा आदिपुरुष नक्कीच आहे. गडबड फक्त रावणाच्या बाबतीत झाली आहे, बाकी सर्व ओके ओके जमले आहे. भव्यता असलेली दृश्ये सिनेमागृहात आणि ३ डी मध्ये बघण्यासारखी आहेत. पण २ डी मध्ये बघितले तर उत्तम कारण सिनेमा आधीच गरज नसतांना खूप डार्क केला आहे, मग त्यात ३ डी च्या गॉगल मध्ये तो डार्कनेस अजून काळवंडतो. निर्मात्या दिग्दर्शकांनी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य भरपूर घेतली असल्याने आपल्याला अरुण गोविल च्या रामायणासारखे भावनिक आणि भक्तिरसाने युक्त बघायला मिळेल ही आशा घरी ठेऊन मग थिएटरकडे वळा. क्योंकि ये कहानी फ़िल्मी नहीं सही पर कहानी सुनानेका अंदाज एकदम फ़िल्मी है.

स्टार रेटींग – ३ स्टार.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment