– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Tiku Weds Sheru Movie Review

चित्रपट घोषित झाला तेंव्हा ऐकण्यात आले होते की यात प्रमुख नायक म्हणून इरफान खान आणि नायिका म्हणून कंगना राणावत काम करणार होते. म्हणजे २०१६ सालची ही गोष्ट. डिव्हाईन लव्हर्स असे नाव आधी ठरले होते. पण दिग्दर्शक साई कबीर यांच्या तब्बल तीन-चार वर्षांच्या आजारपणामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला आणि जेंव्हा २०२० साली परत सेटवर गेला तेंव्हा दुर्दैवाने इरफान हे जग सोडून गेला होता. पण आज अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित सिनेमा बघून असे वाटले की बरं झालं २०१६ साली हा सिनेमा इरफान सोबत फ्लोअर वर जाऊ शकला नाही, नाहीतर इतक्या सुमार भूमिकेत इरफान सारख्या अभिनेत्याला बघतांना खूपच वाईट वाटले असते. 

कथानक थोडक्यात – टिकू वेड्स शेरू ही कथा आहे शिराज खान अफगानी उर्फ शेरूची (नवाजुद्दीन सिद्दीकी) जो मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करीत असतो. शेरूने शाहिद भाई (विपिन मिश्रा) कडून चित्रपट बनवण्यासाठी 10 लाखांचे कर्ज घेतलंय. पैसे परत ना करू शकणाऱ्या शेरूला शाहिदचे गुंड त्याचे मुंबईतील घर ताब्यात घेण्याची धमकी देत असतात. दरम्यान, शेरूचा भोपाळ येथील काका त्याला कळवतो की तस्लीम खान उर्फ टिकू (अवनीत कौर) नावाच्या मुलीच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीचे लग्न शेरूशी लावण्याची इच्छा आहे. आणि हुंडा म्हणून 10 लाख देण्याची तयारी सुद्धा आहे. शेरू टिकूचा फोटो पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. टिकू मात्र सुरुवातीला शेरूशी लग्न करण्याच्या विरोधात असते कारण तिचे बिन्नी अरोरा (राहुल) नावाच्या माणसावर प्रेम आहे, जो मुंबईचा आहे. अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल म्हणून तू या लग्नाला होकार दे आणि मुंबईला ये असे बिन्नी ने सांगितल्यावर टिकू या लग्नासाठी तयार होते आणि लग्न करून शेरू सोबत मुंबईला येते. आपण साधे ज्युनिअर आर्टिस्ट आहोत हे सत्य शेरूने टीकूपासून लपवून ठेवलेले असते तर टिकू जी बिन्नी पासून प्रेग्नन्ट आहे, मुंबईला येताच त्याला भेटण्यासाठी म्हणून शेरुच्या घरातून पळून जाते. दोघांचे सत्य एकमेकांना कळल्यावर टिकू आणि शेरू पुढे काय करतात हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- अवनीत कौर च्या अभिनयाशिवाय काहीही विशेष नाही. प्रमुख नायिका म्हणून आपल्या पदार्पणातच अवनीत ने छान काम केलंय.

नावीन्य काय?- शून्य.

कुठे कमी पडतो? – साई कबीर आणि अमित त्रिवेदी यांचे अत्यंत रटाळ असे कथानक आणि त्याहून सहनशीलतेची परीक्षा घेणारे असे साई कबीर यांचे बालिश असे दिग्दर्शन असल्याने चित्रपट सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत कुठेच पकड घेण्याचे नाव घेत नाही. थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही हे उत्तम कारण मोबाईलवर निदान हा पुढे पुढे सरकवून तरी बघता येतो. लेखकाने चित्रपटात बऱ्याच ट्रॅक्स वर एकसाथ काम केलंय आणि नुसता गोंधळ उडवला आहे. टिकू आणि शेरू या दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा अत्यंत तकलादू आहेत आणि त्यांचे वागणे चित्रपटभर हास्यास्पद आणि चमत्कारिक आहे ज्यामुळे प्रेक्षक कुठेच त्यांच्या भावनांशी एकरूप होऊ शकत नाही. संवादांमध्ये शिव्यांची मुक्त उधळण आहे म्हणून फॅमिली सोबत बघण्याच्या लायकीचा पण हा चित्रपट नाही. कथानक भरकटणे याचे अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे हा चित्रपट म्हणता येईल. रिव्हॉल्वर राणी नावाचा कंगना चा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? त्याचे असेच वाटोळे याच दिग्दर्शक साई कबीर ने केले होते. दोन तासांपेक्षाही कमी लांबी असूनही मध्यापर्यंत आल्यावरच चित्रपट इतका काही रटाळ होत जातो कि ज्याची एकही लिमिट नाही. क्लायमॅक्स पर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर असे समजा कि जगातील तुम्ही दुर्मिळ सहनशक्ती असलेल्या प्रेक्षकांपैकी एक आहात. नवाझुद्दीन सिद्दीकी सारख्या प्रतिभावान अभिनेत्याने असला टुकार सिनेमा स्वीकारणे आश्चर्यकारक आहे. त्याचा सध्या असाही बॅड पॅच चालू आहे म्हणा. असो. गीत-संगीत, छायांकन, पार्श्वसंगीत अशा इतर कोणत्याही बाबतीत हा सिनेमा तुम्हाला इम्प्रेस करू शकत नाही. सर्व काही ऍव्हरेज सोडा अगदीच बिलो ऍव्हरेज किंवा वाईट. निर्माती म्हणून कंगना राणावत हिचा हा अत्यंत खराब चित्रपट म्हणून ओळखला जाईल.

पहावा का?- अजिबात नाही. ओटीटी वर आहे, घरी बसल्या पाहता येत असला तरीही नाही.

स्टार रेटींग – १ स्टार.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment