– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Movie Review

थोडक्यात कथानक- दिल्ली स्थित धनाढ्य अशा रंधावा नामक पंजाबी फॅमिली चा एकुलता एक वारस आहे रॉकी (रणवीर सिंग). आणि एका सेल्फ मेड, सुशिक्षित मध्यमवर्गीय चॅटर्जी नामक बंगाली फॅमिली च्या आजच्या जनरेशन ला रिप्रेझेंट करते राणी (आलिया भट्ट). रॉकीच्या फॅमिली मध्ये आहेत त्याचे दादाजी (धर्मेंद्र), दादी धनलक्ष्मी (जया बच्चन), वडील तिजोरी रंधावा (आमिर बशीर), आई पूनम (क्षिती जोग) आणि बहीण गायत्री (अंजली आनंद), तर दुसरीकडे राणी च्या घरी आहे तिची दादी जमिनी (शबाना आझमी), वडील चंदन (तोता रॉय चौधरी) आणि आई अंजली (चर्नी गांगुली). आता रॉकी आणि राणी दोघांचे प्रेम जमते. पण दोघांच्या कुटुंबामध्ये आहे अगदी जमीन आसमान का फरक वैगरे. दोघांना आयुष्याचे साथीदार तर व्हायचे आहे पण दोघांचेही आपापल्या फॅमिली सोबत एवढे टाईट बॉण्डिंग आहे की त्यांना दुखवून अथवा सोडून काही करायचे नाहीये. मग मध्यममार्ग निवडत, एकमेकांच्या संस्कृतीला समजावून घेण्यासाठी, घरातील लोकांच्या स्वभावांची ओळख होण्यासाठी म्हणून दोघे काही दिवसांकरिता स्वतःच्या घरांची अदलाबदल करीत, रॉकी राणीच्या घरी आणि राणी रॉकीच्या घरी राहायला जाते. अर्थातच इथून पुढे मग खटके उडायला सुरुवात होते. अखेर यातून हे दोघे कसा मार्ग काढतात हा पुढील कथाभाग. 

काय विशेष- इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय या त्रिकुटाने रुटीन असलेल्या कथानकाला पटकथेमध्ये आणि इशिता मोईत्रा हिने संवादांमध्ये असं काही अफलातून पद्धतीने गोवलं आहे की बस्स. अशा प्रकारचे चावून चोथा झालेल्या विषयातही फॅमिली ड्रामा, फॅमिली भावना, घरकामात आणि परंपरेत अडकलेल्या महिलांचे सशक्तीकरण याद्वारे याला काही उप-कथानकाचे ट्रॅक्स लावले आहेत त्यामुळे बघायला मजा येते. शिवाय मध्यंतरापर्यंत कथानकाला दिलेला जुन्या हिंदी सिने-संगीताचा तडका तर खूपच सुंदर आहे. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या ट्रॅकला दिलेला हा रेट्रो फील मस्तच. त्याबद्दल इथे सविस्ताराने बोलणे स्पॉईलर्स ठरेल. पटकथा आणि संवाद यानंतर काय कमाल आहे असे विचाराल तर ते आहे करण जोहर चे दिग्दर्शन. एकीकडे कथेतील सीन्स आणि संवाद हसवतात तर अगदी त्याचवेळी येणारा इमोशनल सीन नकळतपणे तुमच्या डोळ्यात अश्रू केंव्हा आणतो कळतही नाही. कॉमेडी आणि इमोशन्सची ही रोलर कोस्टर राईड अखेरपर्यंत चालू राहते हे विशेष.

२ तास ५० मिनिटांची लांबी असूनही चित्रपट कुठेच बोर होत नाही हे विशेष. तेही रुटीन असे कथानक असूनही. या बोर न होऊ देण्यात अर्थात सिंहाचा वाटा आहे रणवीर आणि आलिया या दोघांच्या कमाल अभिनयाचा. आजची कॉलेज गोइंग तरुणाई या दोघांची आधीपासून वेडी तर आहेच पण या सिनेमानंतर त्यात अजून वाढ होईल हे नक्की. कोण एकमेकांपेक्षा छान अभिनय करतो अशी जणू काही दोघात स्पर्धा लागल्यासारखा परफॉर्मन्स दिलाय दोघांनी. आलिया चे रणवीरला “तुम क्या हो यार?” हे म्हणण्याची स्टाईल तर क्या कहने. नाही कॉलेजच्या तरुणाईच्या तोंडी ही लाईन बसली तर बघा. रणवीर सिंग एकदम झक्कास आणि तोडफोड परफॉर्मन्स. दोघेही दिसले पण तितकेच छान. अभिनयाच्या बाबतीत या दोघानंतर कमाल केली आहे ती जया बच्चन यांनी. कथेतील एकमेव एक्सस्ट्रीम निगेटिव्ह वाटणारे हे पात्र आणि जयाजींनी त्यात जीव ओतला आहे. धर्मेंद्र यांच्या वाट्याला फारसे सीन नाहीत पण तरीही त्यांना स्क्रीनवर बघायला छान वाटते. शबाना आझमी यांचाही अभिनय मस्त जमलाय.

इतर कलाकारांमध्ये रणवीर च्या आईच्या भूमिकेत क्षिती जोग आणि वडिलांच्या भूमिकेत आमिर बशीर, तसेच आलिया च्या आईच्या भूमिकेत चर्नी गांगुली आणि वडिलांच्या भूमिकेत तोता रॉय चौधरी या चारही कलाकारांनी आपापल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. प्रत्येक तांत्रिक डिपार्टमेंट मध्ये सिनेमा अति-उत्तम आहे. ज्यात करण चा प्रत्येक चित्रपट असाही असतोच.  अम्रिता नकाई यांचे कला दिग्दर्शन असो ज्यात भव्यदिव्य सेट्स आले, मनुष नंदन यांचे छायांकन असो ज्यात नेत्रदीपक अशी प्रत्येक फ्रेम आली, मनीष मल्होत्रा यांचे सुंदर असे कॉस्च्युम्स म्हणजे वेशभूषा  असो  किंवा परिणामकारक असे प्रीतम याचे पाश्वसंगीत असो, नृत्य दिग्दर्शन असो इत्यादी ..सर्वकाही फर्स्ट रेट आहे.  

नावीन्य काय?- कथेत काही एक नावीन्य नाहीये. पण हो पटकथेत मात्र कूटकूट के भरे हुए फॅमिली इमोशन्स, स्त्री सशक्तीकरणाचा मेसेज, रेट्रो बॉलिवूडचा फ्रेश माहोल हे सर्व करण जोहरने अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने सादर केले आहे. 

कुठे कमी पडतो?- संगीतात. हो तुम्ही जर करण जोहरच्या या आधीच्या सिनेमांच्या संगीताशी तुलना केली तर हा त्याचा आत्तापर्यंतचा विकेस्ट अल्बम ठरेल. तुम क्या मिले ही एकमेव गाणे श्रवणीय व हिट कॅटेगिरी मध्ये मोडणारे आहे. सांगेतकार प्रीतम यांचा यावेळी आणि नेमक्यावेळी म्हणजे इतके सारे जमून आल्यानंतर जेंव्हा संगीताची साथ हवी होती तेंव्हाच ती मिसिंग आहे. व्हॉट झुमका आणि धिंडोरा बाजे ही गाणी बरी जमली आहेत पण इन्स्टंट हिट नाहीत. 

पाहावा का? – नक्की बघावा. फुल्ल ऑफ रोमान्स, इमोशन्स, फॅमिली ड्रामा, कॉमेडी असा हा टिपिकल करण जोहर स्टाईलने जाणार सिनेमा आहे. तुम्ही त्याच्या सिनेमांचे चाहते असाल तर नक्की बघा आणि तुम्हाला त्याचे सिनेमे आवडत नसतील किंवा फॅमिली, इमोशन्स किंवा रोमान्स हा तुमच्या आवडीचा विषय नसेल तर मात्र दूर रहा. 

स्टार रेटिंग – ३ स्टार आउट ऑफ फाईव्ह. खरंतर ४ दिले असते पण संगीताने आणि नावीन्य नसलेली कथा असल्याने काहीशी निराशा होते. म्हणून ३ इज ओके. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment