– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Attack Movie Review सुपरहिरो … आर्टिफिशियल इंटेलिजन्स.. सुपरकॉप अथवा सुपर सोल्जर .. हे शब्द अथवा या कल्पना हॉलिवूड चित्रपटांमधून उसन्या घेऊन त्याला टिपिकल बॉलिवूड रेसिपी चा तडका लावतांना आपले निर्माता-दिग्दर्शक जो घोळ घालतात (मनातील शब्द-त्याची वाट लावतात) त्याला खरंच चॅलेंज नाही. याची असंख्य उदाहरणे इथे विस्ताराने सांगण्यात अर्थ नाही. परंतु सातत्याने विकसित होणारे अत्याधुनिक स्पेशल इफेक्टस चे तंत्रज्ञान म्हणजेच व्हीएफएक्स चे सादरीकरण जर गांभीर्याने केले आणि त्याला सशक्त कथानकाची जोड असेल तर त्याचे भारतीय प्रेक्षक निश्चित स्वागत करतो याचीही उदाहरणे आहेत. गेल्या काही वर्षात प्रदर्शित व आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सोप्या भाषेत रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित रोबोट आणि २.० या भारतीय सिनेमांमध्ये असा टिपिकल इंडियन तडका प्रेक्षकांनी अनुभवला आहे. जॉन अब्राहम अभिनीत आज प्रदर्शित झालेला अटॅक या हिंदी चित्रपटाने सुपरहिरो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही कल्पनांना एकत्र आणलं आहे आणि महत्वाची बाब म्हणजे या दोन कल्पनांचे मिश्रण करतांना त्याला टिपिकल बॉलिवूड रेसिपी म्हणून पेश केलेले नाही. म्हणजे कथानकाला नायक-नायिकेच्या प्रेमाची, त्यांच्या गाण्यांची, नायकाच्या प्रखर देशभक्तीची जोड इथेही आहे पण वेगवान पटकथा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना दाखविलेली प्रगल्भता आणि गांभीर्य यामुळे हा ‘अटॅक’ हा टिपिकल बॉलिवूड चित्रपट वाटत नाही. 

कथानकाचा अत्यंत प्रेडिक्टेबल असा अंदाज सहज बांधता येईल असे अटॅक चे ट्रेलर होते हे खरे पण याच ट्रेलरमध्ये एक स्पार्क जाणवत होता. थोडक्यात कथानक असे … अर्जुन शेरगील (जॉन अब्राहम) हा भारतीय सैन्यातील एक शूर शिपाई. २०१० साली  दहशतवादी हल्ल्यात  पॅरेलाईज झालेला अर्जुन आता कायमचा व्हील-चेअर वर आहे. याच हल्यात अर्जुनने आपल्या प्रेयसी आयशा (जॅकवेलीन फर्नांडिज) ला सुद्धा गमावलेले असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून अत्याधुनिक लढायांसाठी भारतीय सैन्याला तयार करण्याच्या पहिल्या प्रयोगासाठी अर्जुन ची निवड होते.  एआय च्या या प्रोग्रामची हेड आहे डॉ सबाह कुरेशी (रकुल प्रीत सिंग). अर्जुनाच्या शरीरात एआय तंत्रज्ञान यशस्वीरीत्या इंस्टॉल केल्यानंतर थोड्या दिवसातच पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी हामिद गुल हा भारताच्या संसदेवर हल्ला करतो आणि पंतप्रधानांसह जवळपास ३५० खासदारांना बंधक बनवून आपल्या मागण्या भारत सरकारसमोर ठेवतो. या अटॅक मधून अर्जुन कसा सर्वांना सोडवतो हा कथानकाचा पुढील प्रवास. 

चित्रपटाचा नायक आणि सहनिर्माता असलेला जॉन कथेचा लेखकही आहे. त्याला पटकथेत रुपांतरीत केले आहे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्य राज आनंद यांच्यासोबत सुमित बठेजा आणि विशाल कपूर यांनी. दहशतवाद्यांनी निर्माण केलेल्या बंधक परिस्थितीतून देशाला सोडविणारा नायक हे मुळात घासलेले कथानक आहे. मग असे असूनही अटॅक चे वेगळेपण काय? तर ते आहे त्याची अत्यंत वेगाने पुढे चालणारी पटकथा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेचा चा पचनी पडेल व वेगळेपण जाणवेल इतकाच केलेला वापर, अत्यंत प्रभावी अशी ऍक्शन दृश्ये व सर्वात मुख्य म्हणजे आरिफ शेख यांचे शार्प एडिटिंग ज्याने दोन तासाचा अटॅक केंव्हा संपतो कळत नाही. अधूनमधून डोकावणारी कुमार यांनी लिहिलेली व शाश्वत सचदेव यांनी संगीतबद्ध केलेली गाणी तशी अनावश्यक वाटतात व ती हिट कॅटेगिरी मध्ये मोडणारी पण नाहीत. जॉन आणि जॅकवेलीन च्या प्रेमकथेचा हा पार्ट अटॅक ला एका टिपिकल बॉलिवूड चित्रपटाकडे उगाच ओढतोय असे वाटते जे खरंतर टाळता आले असते पण त्याला मर्यादित ठेवण्याचा शहाणपणा दिग्दर्शकाने दाखविला आहे हेही नसे थोडके. पुढे काय होणार याचा अंदाज असूनही ते कसे होणार यात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शक लक्ष्य राज आनंद यांनी आपले लक्ष्य साध्य केलं आहे. विल हॅम्परीस यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायांकन हा सुद्धा सिनेमाचा मोठा प्लस पॉईंट आहे. त्यांना साथ दिली आहे भारताचे सुप्रसिद्ध छायाचित्रकार पी.एस. विनोद व सौमिक मुखर्जी यांनी. 

जॉन अब्राहमने सोल्जर अर्जुनची भूमिका अत्यंत मेहनतीने आणि प्रगल्भतेने साकारली आहे. जॅकवेलीन आणि रकुल या दोघींचे कामही छान झाले आहे. इतर प्रभावी कलावंतांमध्ये प्रकाश राज (भारत सरकारमधील अधिकारी), एलहम अहसास (दहशतवादी हामिद गुल) व रत्ना पाठक शाह (जॉनची आई) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.  

अपेक्षेपेक्षा कितीतरी चांगला, प्रामाणिक आणि प्रगल्भ असलेल्या या अटॅक बद्दल नायक आणि निर्माता जॉन अब्राहम चे अखेरीस अभिनंदन. हा पार्ट-१ असल्याने आता निश्चितच पार्ट-२ ची प्रतीक्षा असेल. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.