– अजिंक्य उजळंबकर 

लक्ष्मणगढ नावाच्या खेडे गावात, शिक्षकांनी फारसे काही न शिकविलेल्या शाळेतील एक मुलगा, शाळा तपासायला आलेल्या अधिकाऱ्याला फाडफाड इंग्रजी बोलून दाखवितो. ते ऐकून अवाक झालेला अधिकारी मग मुलांना विचारतो की “जंगल में ऐसा कौनसा अनोखा जानवर है जो कई पीढ़ियों में सिर्फ एक ही बार जन्म लेता है?”  त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तोच  गरीब घरातील, पिछड्या जातीचा पण हुशार मुलगा “दि व्हाईट टायगर” असे देतो तेंव्हा या मुलाला ते अधिकारी म्हणतात की “तुमही हो वो व्हाईट टायगर! मैं पूरी कोशिश करूंगा के तुम्हे दिल्लीके किसी अच्छे स्कुल में पढ़ाई करने का मौक़ा मिले”. दुर्दैवाने हे शक्य होत नाही. त्या मुलाचे वडील टीबीच्या आजारात इलाजाअभावी अकाली मरण पावतात. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे  हा मुलगा लहान वयातच आपल्या खेडेगावात हॉटेलात काम करायला लागतो. बलराम नाव असलेल्या या मुलाला आता मोठेपणी सगळे बलराम हलवाई नावाने ओळखत असतात. परंतु बलरामची स्वप्ने मोठी असतात. आपल्यावर नियतीने लादलेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेच्या विरोधात जाऊन त्याला मोठं व्हायचं असतं, पैसा कमवायचा असतो … मग तो चुकीच्या मार्गाने का होईना. लेखक-पत्रकार अरविंद अडिगा यांनी लिहिलेल्या व २००८ साली प्रकाशित ‘दि व्हाईट टायगर’ या पुस्तकाला बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याच कथेवर व याच नावाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे  दिग्दर्शक रमीन बहरानी यांचा सिनेमा नेटफ्लिक्स वर दाखल झाला आहे. 

मुळात भारतात असलेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेची खोली दर्शविणारी ही कथा. यात कथेचा नायक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जात आपल्याच मालकाचा बळी घेत कसा मोठा बिझनेसमॅन होतो हे दाखवलं गेलंय. अशा प्रकारच्या कथा हिंदी सिनेमात यापूर्वीही अनेकदा आलेल्या आहेत. समाजातील गरीब व पिछड्या जातीच्या लोकांचा श्रीमंत व उच्चवर्णीय लोक आपल्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी कसा फायदा घेतात हे दाखविण्याचा आधी ‘दि व्हाईट टायगर’ या पुस्तकातून व आता सिनेमातून प्रयत्न करण्यात आलाय. इथे बलराम हलवाई (आदर्श गौरव) हा कथेचा नायक, त्याच्या गावातील धनाढ्य जमीनदार (महेश मांजरेकर) व त्याचा अमेरिकेहून परतलेला मुलगा अशोक (राजकुमार राव) व त्याची बायको पिंकी (प्रियांका चोप्रा) यांचा ड्रायव्हर म्हणून काम मिळवतो. हा नायक इथे नुसताच ग्रे नाही, तर डार्क ग्रे वा ब्लॅक  शेड मध्ये आहे. जमीनदाराचे कुटुंब एका अपघाताच्या घटनेनंतर आपला गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्यावर हा नायक संधी मिळताच आपली चाल खेळतो.. त्यात तो कायदा हातात घेत गुन्हा करतो व  पुढे कसा मोठा व्यवसायिक होतो हा प्रवास यात दिग्दर्शकाने दाखविला आहे. 

सिनेमा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत कथेचा नायक स्वतःची कथा स्वतःच्या आवाजात प्रेक्षकांना सांगतांना दिग्दर्शकाने दाखवलं आहे. पडद्यावर ही कथा तो भारतभेटीला येत असलेल्या चीनच्या पंतप्रधानांना एका ईमेल द्वारे सांगत असतो. मी सामाजिक व आर्थिक विषमतेतून मोठा व्यावसायिक कसा झालो हे सांगतांना नायक केवळ स्वतःचाच दृष्टिकोन प्रेक्षकांना सांगत असतो. अर्थात चांगल्याला चांगलं तर वाईटाला वाईट कबूल करणारा हा नायक जरी असला तरी कथा एकाच अंगाला झुकल्यासारखी व मोनोटोनस झाल्याचा सातत्याने फील येत राहतो. शिवाय अनेक प्रसंग, संवाद हे डार्क ह्युमर पद्धतीने हाताळले आहेत. त्यामुळे स्टार्ट टू एन्ड एका अस्वस्थतेचा  अनुभव चित्रपट बघतांना येतो. समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दाखवतानाच दिग्दर्शकाने उच्चभ्रू लोकांकडून गरिबांचे होणारे शोषण, भ्रष्ट राजकीय व्यवस्था या गोष्टीही कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. ‘दि व्हाईट टायगर’ या पुस्तकात लेखक अरविंद अडिगा यांनी कथन केलेल्या सर्वच प्रसंगांना पडद्यावर आणतांना दिग्दर्शक रमीन बहरानी यांनी आपल्या प्रतिभेने पूर्ण न्याय दिला आहे असे म्हणता येईल. 

the white tiger movie stills

‘दि व्हाईट टायगर’ सिनेमाने एक सरप्राईज विनर हिंदी सिनेमाला मिळवून दिला आहे व तो म्हणजे आदर्श गौरव हा अभिनेता. आपल्या पहिल्याच चित्रपटात या तरुण मुलाने कमालीचा अभिनय केला आहे. राजकुमार राव व प्रियांका चोप्रा सारखे कलाकार असूनही लक्षात राहतो तो केवळ आदर्श गौरव. अर्थात कथा पूर्णतः त्याच्याच पात्राभोवती गुंफलेली असल्याने इतर पात्रांना तेवढे महत्वही यात नाही. खरंतर आदर्शला मिळालेली ही सुवर्णसंधी होती जिचे त्याने सोने केले आहे. आदर्श व गौरव वाटावा असा अभिनय. राजकुमार रावचा प्रेझेन्स जाणवला नाही असे बऱ्याच दिवसांनी झाले आहे. प्रियांकाचेही तसेच. पुस्तकाला अनुसरून चित्रपट बनविण्याचे बंधन असल्यामुळे पटकथेत बऱ्याच त्रुटी राहिल्या आहेत ज्या पुस्तकातून सिनेमा माध्यमात जातांना दूर करणे अपेक्षित होते. एकत्र कौटुंबिक आनंद घेण्यासारखा हा सिनेमा नाही. 

‘दि व्हाईट टायगर’ नाव असले तरी शेवटपर्यंत सर्व सहन करत कथेचा नायक अगदी अखेरीस एकदाच दहाड मारतो. हेही काही पटले नाही. पण हा दोष दिग्दर्शकाचा नाही तर मूळ पुस्तकाचा. वेळ मिळाला तर हा अनुभव घ्यावा पण अगदी बघावाच असं काही नाही.  

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.