– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Uunchai Movie Review. कथेत नावीन्य नसणे, दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक करतांना मुख्य कलाकारांची निवड चुकणे, वास्तवाच्या अति-जवळ जाण्याच्या नादात हिंसा-सेक्स यांना प्राधान्य देत समोर बसलेला प्रेक्षक भारतीय आहे हे पूर्णतः विसरणे, आपली संस्कृती, कौटुंबिक मूल्ये यांना अजिबात महत्व न देणे  ही काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे आजच्या प्रेक्षकांनी बॉलिवूडपासून सुरक्षित अंतर ठेवले आहे असे माझे मत आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी एका चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना झाली होती. देशाच्या अमृत महोत्सवासोबत त्या निर्मिती संस्थेचाही अमृत महोत्सव साजरा होतोय. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील ही एकमेव अशी चित्रपट निर्मिती संस्था आहे जिच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांच्या यादीत तुम्हाला एकही चित्रपट असा सापडणार नाही ज्यात हिंसा/सेक्स/व्यभिचार यांचा चवीपुरता सुद्धा वापर केला गेलाय. ती निर्मिती संस्था म्हणजे राजश्री प्रॉडक्शन्स. सुरुवातीला उल्लेख केलेल्या ज्या कारणांमुळे आजचा प्रेक्षक हिंदी चित्रपटापासून दुरावल्याचे चित्र आहे, त्या सर्व बाबींचा विचार करून राजश्री चे सुरज बडजात्या तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाच्या रोलमध्ये परत आले आहेत. ‘उंचाई’ या आज प्रदर्शित सिनेमाद्वारे. चित्रपटाची घोषणा झाल्यावर “हा काय सिनेमा आणतायत सुरजजी म्हाताऱ्यांना घेऊन ?!” असा काहीसा आश्चर्याने आणि खूपसा निराशेने भरलेला प्रश्न माझ्या मनात आला होता. प्रेमकथा, कौटुंबिक नाट्य, लग्नसोहळे, श्रवणीय गाणी या चौकटीत अत्यंत संयमाने आणि संस्काराने वागणारे सर्व कलाकार हा सुरज बडजात्या या दिग्दर्शकाचा राजश्री ला साजेसा असा  मूळ पिंड आहे. ट्रेलर बघून यावेळी सुरजजींनी स्वतःचीच चौकट मोडून वेगळा प्रयोग केलाय हे लक्षात आले होते पण तरीही मला व्यक्तीशः खूप उत्साहवर्धक असे काही सिनेमात असेल असे वाटले नव्हते. चार वयोवृद्ध जिवलग मित्रांची कथा आहे, ज्यातील एकाचे अचानकपणे निधन होते आणि मग उरलेले तिघे गेलेल्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत चढाई करतात एवढे सरळ कथानक आहे असे स्पष्टपणे सांगणारे ट्रेलर होते. मग आता यात काय अजून दाखवणार? असा अपरिपक्व प्रश्न घेऊन मी आज चित्रपटगृहात गेलो. उत्तर एका प्रगल्भ दिग्दर्शकाकडून मिळणार हे माहित असूनही. 

कथानक थोडक्यात. अमित श्रीवास्तव (अमिताभ बच्चन), ओम शर्मा (अनुपम खेर), जावेद सिद्दीकी (बोमन इराणी) आणि भूपेन (डॅनी) हे वयाची साठी-पासष्टी च्या घरात असलेले जिवलग मित्र. यातील अमित हा एक सुप्रसिद्ध लेखक आहे, ओम शर्मा चे पुस्तकांचे दुकान आहे, जावेद चे कपड्यांचे दुकान आहे. यातील भूपेन मूळचा नेपाळचा आहे आणि ट्रेकिंग म्हणजे आयुष्य असलेल्या भुपेनला आपल्या मित्रांसोबत एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत चढत जाण्याची इच्छा असते. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भूपेन मनातील ही इच्छा इतर तिघांना बोलून दाखवतो आणि दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याचा मृत्यू होतो. भुपेनच्या निधनानंतर अमितला एव्हरेस्ट बेस कॅम्प च्या ट्रेकची भूपेन ने आपल्या या चार मित्रांसाठी बुक केलेली तिकिटे सापडतात. ती बघून अमित असे ठरवतो की आपण भूपेन ची अखेरची इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि भुपेनच्या अस्थींना घेऊन एव्हरेस्ट बेस कॅम्प ची चढाई पूर्ण केली पाहिजे. अर्थातच सुरुवातीला ओम आणि जावेद याला विरोध करतात पण अखेरीस मित्राच्या प्रेमाखातर त्यांचा हा अत्यंत कठीण असा  प्रवास सुरु होतो. यात त्यांची ट्रेक इन्स्ट्रक्टर असते श्रद्धा (परिणीती चोप्रा).  जावेदची बायको शबीना (नीना गुप्ता) ला या ट्रेकची सुरुवातीला माहिती नसते पण जेंव्हा कळते तेंव्हा ती सुद्धा याचा स्पष्ट विरोध करते. चार मित्रांच्या या कठीण प्रवासात आणखी एक ज्येष्ठ महिला प्रवासी पण सोबत येते जी असते माला त्रिवेदी (सारिका). ती या  मित्रांना का जॉईन करते आणि हे तिघे हा धोकादायक प्रवास कसा पूर्ण करतात हे इथे विस्ताराने सांगणे अयोग्य ठरेल. शिवाय या प्रवासात एव्हरेस्ट चढाई शिवाय इतरही अनेक धक्के या तिघांना बसतात ज्यामुळे या तिघांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलतो. ते कोणते ते सुद्धा चित्रपटात बघणे योग्य. 

सुरुवातीलाच एक गोष्ट नमूद करतो कि ज्या प्रेक्षकांना राजश्री प्रॉडक्शन चे सिनेमे खूप मिळमिळीत वाटतात, कुठलेही चित्र-विचित्र वळणे न घेता सरळमार्गाने जाणारी कथा बघण्याची सवय नाही, ज्यांना भारतीय संस्कृतीत महत्वाचे असणारे कौटुंबिक नातेसंबंध त्यातील मूल्ये, संस्कार, जिवाभावाची मैत्री इत्यादी गोष्टी पडद्यावर बघण्याचा कंटाळा येतो त्या प्रेक्षकांनी उंचाई च्या वाट्याला जाऊ नये. सुनील गांधी यांनी लिहिलेल्या नावीन्यपूर्ण कथानकाची गुंतवून ठेवणारी पटकथा आणि अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत अभिषेक दीक्षित यांनी. ज्येष्ठ नागरिक मित्रांचे एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत चढाई करणे हा कथेचा विषय नावीन्य असलेला आहे. पण मुळात ट्रेक करतांना त्यांच्या चढाईत येणारे अडथळे, नैसर्गिक संकटे हा दिग्दर्शकाचा हेतू नाहीच हे चित्रपट बघतांना पदोपदी जाणवते. वयाच्या पासष्टीला टिकून असलेले मैत्रीचे नाते, आजच्या पिढीचे घरातील आई-वडिलांसोबत दुरावलेले नाते, यात दोन्ही पिढ्यांच्या भूमिका, मैत्रीसोबतच तीन भावांच्या पिढीजात एकत्र कुटुंब पद्धतीत आलेला दुरावा, ज्येष्ठतेच्या वळणावर नवरा -बायको च्या संबंधात टिकून असलेला प्रेमाचा ओलावा अशा अनेक बाबींवर लेखक सुनील गांधी आणि पटकथाकार अभिषेक दीक्षित यांनी भाष्य केले आहे. स्वतःच स्वतःला आवाहन देऊन, त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांना तोंड देत असतांना जीवन जगण्याचे तत्वज्ञान उलगडून सांगणारे हे कथानक आहे. दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी या कथानकास अतिशय संवेदनशीलतेने हाताळले आहे.

काही उणीवा आहेत. चित्रपटाची लांबी ही मुख्य उणीव. २ तास ५० मिनिटांची पटकथा सुरुवातीचा एक तास खूप हळुवारपणे पुढे सरकत जाते. कथानकातील अमिताभ यांनी रंगविलेले पात्राचा आणि त्याच्या पत्नीच्या नात्यात आलेल्या दुराव्याचे कारण काहीसे नीट उलगडत नाही. पण याहीपेक्षा मोठी उणीव म्हणजे चार मित्रांची मैत्री कशी जिवाभावाची आहे हे दाखविण्यात लेखक आणि दिग्दर्शक कमी पडला आहे. चित्रपट सुरु होतो, त्यांची मैत्री आहे हे दिसते आणि लगेच काही वेळातच भूपेन चा मृत्यू होतो. हे सर्व इतके जलदगतीने होते त्यामुळे यांची मैत्री खुलत नाही आणि ज्यायोगे भुपेनसाठी जीवावर उदार होणारे मित्र हा कथाभाग हृदयास तितक्याशा तीव्रतेने येऊन भिडत नाही. मध्यंतरानंतर मात्र कथानक वेग घेते. एकीकडे  मित्रांमधील हलकफुलके विनोदी संवाद तुमच्या गालावर हसू आणतात तर दुसरीकडे कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणारे भावस्पर्शी व अर्थपूर्ण संवाद नकळतपणे व अलगद डोळ्यात पाणी सुद्धा आणतात हे विशेष. अर्थातच कौटुंबिक नातेसंबंधावर भाष्य करतांना प्रेक्षकांना भावनिक कसे करायचे, विशेषतः महिला प्रेक्षकांच्या डोळ्यात हमखास अश्रू कसे आणायचे  यात दिग्दर्शक सुरज बडजात्या यांची मास्टरकी आहे हे आपण सर्व जण जाणतोच. २०१५ साली प्रेम रतन धन पायो द्वारे रुळावरून घसरलेली सुरज बडजात्या यांची गाडी उंचाई मध्ये परत रुळावर आल्याचे बघून समाधान वाटते. 

लेखन आणि दिग्दर्शनासोबतच अमित त्रिवेदी यांचे संगीत सुद्धा चित्रपटाची जमेची बाजू आहे. केटीको केटीको, जिंदगी को हां कर दे ही दोन गीते छानच जमली आहेत. गीतकार इर्शाद कामिल यांनी लिहिलेली सर्वच गीते अर्थपूर्ण आहेत आणि कथेला, त्यातील पात्रांना अनुसरून आहेत. मनोज कुमार खटोई यांचे छायांकन सुद्धा छान व चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू. संकलनात मात्र आणखी कात्री लागणे आवश्यक होते असे वाटते. अभिनयाच्या बाबतीत काय बोलावे? सुरजजींनी कलाकारांची निवडक इतकी काही परफेक्ट केली आहे की बस्स. अमिताभ, अनुपम, बोमन, नीना गुप्ता, सर्वच लाजवाब. सर्वांच्या अभिनय कारकिर्दीत अत्यंत महत्वाचा म्हणून या सिनेमाकडे भविष्यात बघितले जाईल. नेहमीप्रमाणे सहज सुंदर अभिनयासाठी विशेष करून लक्षात राहील तो अनुपम यांनी रंगविलेला ओम शर्मा. खरंतर अनुपम, अनुपम आणि बोमन यांना एका फ्रेममध्ये बघणे ही एक ट्रीट आहे. ट्रेक इन्स्ट्रक्टर म्हणून परिणितीने सुद्धा उत्तम काम केलंय. एव्हरेस्ट बेस कॅम्प चढतांना दाखविलेली साहस दृश्ये आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत यात मात्र अजून सुधारणेला स्कोप होता. 

उंचाई हा ज्येष्ठांसाठीचा सिनेमा आहे. आणि त्यात तो राजश्रीचा आहे. त्यामुळे त्याला येणारा प्रेक्षक लिमिटेड असणार यात शंका नाही. पण येणारा प्रत्येक प्रेक्षक खूप दिवसांनी काही तरी मिनिंगफ़ुल पाहिले या समाधानाने घरी जाईल हे नक्की. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment