– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The Kashmir Files Movie Review असं का होतंय सिनेमा बघतांना माझं मलाच कळत नव्हतं ….जे बघतोय तसं काही या आधी बघितलं नव्हतं का? हा प्रश्न विचारला मग स्वतःला. अर्थातच उत्तर हो बघितलं आहे असंच होतं. गेल्या काही वर्षात ओटीटी माध्यमांमुळे तर हिंसाचाराचा अतिरेक बघणं ही जणू रोजची दिनचर्या झाली आहे. आपल्या सर्वांचीच. मग तरीही पडद्यावरील हिंसाचाराची दृश्ये बघतांना पोटात गोळा का येत होता. एका अनाकलनीय भीतीचा. तुम्ही कधी एमआरआय मशीन मध्ये झोपला असाल तर ती सुरु झाल्यावर एक खडखडात ऐकू येत असतो जो काहींना सहन होतो तर काहींना नाही … पडद्यावरील दृश्यांमधील जिहाद च्या घोषणा नंदनवनातील रस्त्यावर देत फिरणारी माथेफिरू टोळकी बघून माझ्या मेंदूत जणू तसाच काहीसा खडखडाट चालू होता. जो सहन होत नव्हता. पडद्यावर सिनेमाचे नाव झळकण्यापूर्वी दहा मिनिटांचा व कथेत अतिशय महत्वाचा असलेला एक इंट्रो सीन आहे. हा सीन तुम्हाला पुढचे २ तास ५० मिनिटे काय बघायचे आहे आणि त्याची तीव्रता काय असणार आहे यासाठी तयार करतो. हा सीन संपल्यावर मला जाणवलं की दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित दि कश्मीर फाईल्स बघण्यासाठी आपण मानसिक रित्या पुरेसे तयार नाही आहोत. भीती, अस्वस्थता, दुःख आणि यानंतर येणारी प्रचंड चीड या भावनांचा कल्लोळ एक साथ तुमच्या मनात निर्माण करणारा व अखेरीस मनात असंख्य अनुत्तरीत प्रश्न निर्माण करणारा अनुभव म्हणजे ‘दि कश्मीर फाईल्स’. 

विवेक अग्निहोत्री यांचा ‘ताशकंद फाईल्स’ चा अनुभव घेतलेल्या सुजाण प्रेक्षकांची अर्थातच ‘कश्मीर फाईल्स’ कडून मनोरंजनाची अपेक्षा निश्चितच नाही. याउलट या विषयावरील कधीही बाहेर न आलेले नग्न सत्य बाहेर यावे हीच आहे आणि साहजिकच असावीही. ज्यांनी ताशकंद फाईल्स पाहिलेला नाही व कश्मीर फाईल्स कडून ज्यांना करमणुकीची अपेक्षा आहे अशा प्रेक्षकांसाठी सूचनावजा दोनच शब्द. दूर रहा. आणि हो जर मुळात सिनेमा करमणूकप्रधान नाही आणि  केवळ सत्यकथनासाठी असेल तर चित्रपटावरील या लिखाणाला तटस्थ समीक्षण या नजरेने न बघितलेले बरे. असो. 

१९८९ साली काश्मिरात स्थानिक हिंदूंना हुसकावून लावण्याचे आणि काश्मीरला पाकिस्तानात सामील करण्याचे पाकिस्तानी षडयंत्र जोर धरायला लागले होते. पाकिस्तानी अतिरेक्यांचा नंगा नाच काश्मीरच्या रस्त्यावर सुरु होता. एक तर मुस्लिम धर्म स्वीकारा, नाही तर मरा नाहीतर काश्मीरमधून चालते व्हा असा हुकूम पंडितांना दिला गेला होता. या षडयंत्रात तेथील राज्य सरकार, स्थानिक नेते, स्थानिक मुस्लिम रहिवाशी, प्रशासकीय अधिकारी हे सर्व सामील होते आणि त्याकाळचे केंद्रातील सरकार हा सर्व तमाशा निमूटपणे केवळ बघत होते. या सर्व परिस्थितीत १९ जानेवारी १९९० रोजी लाखो काश्मिरी पंडितांनी काश्मीरमधून पलायन केले. त्या काळ रात्री काश्मिरात मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंच्या हत्या झाल्या, महिलांवर बलात्कार झाले. लहान मुले असोत वा वृद्ध कोणालाही अतिरेक्यांनी सोडले नाही. काश्मीर फाईल्स ची सुरुवात त्या रात्रीच्या अशाच एका दृश्याने होते ज्यात जेकेएलएफ चा खतरनाक अतिरेकी फारूक दार उर्फ बिट्टा (चिन्मय मांडलेकर) आपल्या साथीदारांसह पुष्करनाथ च्या कुटुंबाला संपवायला येतो. 

कथानकाच्या केंद्रस्थानी प्रातिनिधिक स्वरूपात आहे पुष्कर नाथ पंडित (अनुपम खेर) या कश्मिरी पंडिताचे कुटुंब. आपला मुलगा करण, सून शारदा व नातू शिवा आणि कृष्णा यांच्यासोबत राहणाऱ्या पुष्कर यांचे कुटुंब अतिरेक्यांच्या हिटलिस्ट वर असते. पुष्कर पंडित यांचे चार जिवलग मित्र असतात. एक आहेत ब्रम्हा दत्त (मिथुन चक्रवर्ती) जे आयएएस अधिकारी आहेत, दुसरे आहेत डेप्युटी जनरल ऑफ पोलीस हरी नारायण (पुनीत इस्सार), तिसरे आहेत स्थानिक सरकारी दवाखान्यात नियुक्त डॉ महेश कुमार (प्रकाश बेलवडी) व चौथे आहेत टीव्ही पत्रकार विष्णू राम (अतुल श्रीवास्तव). अतिरेकी बिट्टा हा पुष्कर पंडित यांचा विद्यार्थी असूनही त्या रात्री पुष्कर यांच्या मुलाची निर्घृण हत्या करतो. सून शारदा, आठ-दहा वर्षांचा नातू शिवा व अगदीच काही महिन्यांचा छोटासा नातू कृष्णा यांच्यासोबत पुष्कर त्यारात्री पलायन करतात व शरणार्थी शिबीरात आश्रय घेतात. या घटनेच्या वेळी छोटा असलेला नातू कृष्णा (दर्शन कुमार) आता मोठा झालेला आहे व ३० वर्षानंतर दिल्लीतील जेएनयू मध्ये शिक्षण घेतोय. तेथे त्याची भेट होते  सो-कॉल्ड पुरोगामी लिबरल विचारांच्या व मानवतावादाच्या आडून अतिरेक्यांना अपेक्षित असलेल्या विचारांचा प्रोपागंडा चालविणाऱ्या प्राध्यापिका राधिका मेनन (पल्लवी जोशी) यांच्याशी. राधिका जेएनयू मध्ये आझादी चा अतिरेकी अर्थ आजच्या तरुणाईला समजावून सांगण्यात पटाईत असतात. तोच अर्थ त्या कृष्णा सुद्धा समजावून सांगतात आणि त्यामुळे कृष्णाच्या मनात सुरु होते विचारांचे द्वंद्व जे पुढे कसे संपते याचा प्रवास प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेला चांगला. 

या विषयावर दोन वर्षांपूर्वी विधू विनोद चोप्रा यांचा शिकारा हा चित्रपट आला होता. स्वतः काश्मिरी पंडित असूनही या अत्यंत संवेदनशील विषयाला अतिशय बोथटपणे, पुळचटपणे, सेक्युलर व फिल्मी पद्धतीने सादर केल्याबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती जी अतिशय योग्यही होती. काश्मीर फाईल्स मधून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शिकारा मधील उणीव केवळ भरून न काढता या विषयाची दाहकता प्रेक्षकांपर्यंत नेमकी कशी पोहोचेल याची पुरेपूर काळजी घेतली आहे ज्यात ते पूर्णपणे यशस्वी देखील झाले आहेत. पुष्कर नाथ पंडित यांच्या ४ मित्रांच्या व्यक्तिरेखा यात अतिशय महत्वपूर्ण ठरतात. 

प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या या ४ व्यक्तिरेखा ज्यात एक आयएएस अधिकारी, एक पोलीस अधिकारी, एक डॉक्टर आणि एक पत्रकार आहेत, या सर्वांची या सर्व घटनाक्रमात झालेली असह्य अशी मानसिक घुसमट दिग्दर्शक विवेक यांनी नेमकी टिपली आहे. लोकशाहीचे प्रमुख आधारस्तंभ जाणाऱ्या सर्वांसमोर काश्मीरमधील लोकशाहीचा अंत, अतिरेक्यांचा नंगा नाच व हिंदूंचे पलायन व नरसंहार निमूटपणे बघण्याशिवाय कसा पर्याय राहिला नव्हता हे विवेक यांनी कथानकात अतिशय सुस्पष्ट पद्धतीने मांडले आहे. ‘कश्मीर जल रहा है, खुले आम हिन्दुओं का कत्ले आम हो रहा है’ हे  स्थानिक आयएएस अधिकारी ब्रम्हा दत्त केंद्राला वारंवार कळवितात पण त्याचा काहीही उपयोग होत नाही, पत्रकार विष्णू राम सत्य काय ते आपल्या बातमीपत्रात चित्रित करून हेड ऑफिसला पाठवूनही ते दाखवले जात नाही, स्थानिक पोलीस अधिकारी हरी नारायण यांना सुद्धा कशी केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते आणि सरकारी दवाखान्यातले डॉक्टर महेश कुमार यांना दवाखान्यातही हिंदूंवर उपचार न करण्याच्या अतिरेकी फर्मानाचे कसे पालन करावे लागते हे सर्व बघतांना प्रेक्षकांच्या मनात असहाय्यतेची भावना निर्माण करण्यात विवेक यशस्वी ठरले आहेत.

राधिका मेनन या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून सध्याचे सो-कॉल्ड लीबरल/पुरोगामी  आपला अजेंडा कसा राबवत आहेत हे सत्य तितक्याच स्पष्टपणे सांगतांना विवेक जराही डगमगले नाहीत. हिंदूंच्या नरसंहाराची दृश्ये ज्या परिणामकारक रीतीने दाखवली आहेत  (खासकरून अंतिम दृश्य) त्याबद्दल विवेक यांच्यातील धैर्याला मानावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून विवेक यांना अनोळखी लोकांपासून धमक्यांचे फोन/ई-मेल्स का येत आहेत याचे उत्तर चित्रपटातील ही दृश्ये पाहिल्यावर येतो. हॅट्स ऑफ टू यु विवेक. सर्वात मुख्य बाब म्हणजे ज्या असहाय व अत्यंत वेदनादायी घटनाक्रमातून काश्मिरी हिंदूंना जावे लागले होते ते सर्व तितक्याच दाहकतेने विवेक यांनी मांडले आहे. काही दृश्ये तर अक्षरशः अंगावर काटा आणतात व काही दृश्ये बघतांना तुमचा हुंदका दाटून येतो. 

अभिनयाच्या बाबतीत चित्रपटाचा विनर आहे अनुपम खेर. अनुपम स्वतः काश्मिरी पंडित आहेत आणि या हे दुःख त्यांनी स्वतः अनुभवले आहे त्यामुळे त्यांनी साकारलेला पुष्करनाथ पंडित अतिशय सहजतेने समोर येतो. या भूमिकेसाठी अनुपम यांना राष्ट्रीय सन्मान मिळावा इतकी परफेक्ट ती जमली आहे. त्यानंतर चिन्मय मांडलेकर ने साकारलेला अतिरेकी बिट्टा एकदम खतरनाक. चिन्मयने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. चिन्मय नंतर लक्षात राहते ती पल्लवी जोशीने साकारलेली राधिका मेनन. लाजवाब. दर्शन कुमार ने साकारलेला कृष्णा सुद्धा छानच जमलाय. यानंतर मिथुन चक्रवर्ती, प्रकाश बेलवडी, पुनीत इस्सार व अतुल श्रीवास्तव या चौघांचेही काम सुंदर झाले आहे. चित्रपटाचे प्रभावी संवाद हा त्याचा नेमका परिणाम करण्यात यशस्वी होतात. छायांकन, पार्श्वसंगीत व इतर तांत्रिक बाबतीत सिनेमा तितकाच दर्जेदार आहे. 

सिनेमाच्या बाबतीत एकच खटकणारी गोष्ट म्हणजे त्याची लांबी. २ तास ५० मिनिटांची लांबी  कमी करता आली असती हे निश्चित पण तसे करतांना विषयाची मांडणी आणि त्याचा परिणाम यावर नक्कीच फरक पडला असता. 

दि काश्मीर फाईल्स हा कुठल्याही परिस्थितीत चुकवू नये असा अनुभव आहे हे मात्र निश्चित. कुठल्याही स्टार रेटिंग च्या वरचा. गो फॉर इट.  

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment