– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Brahmāstra: Part One – Shiva Movie Review. प्राचीन असे धार्मिक संदर्भ असलेले कथानक आजच्या तरुणाई समोर सादर करतांना ते तितकेच कंटेम्पररी म्हणजे समकालीन असणे अत्यंत आवश्यक असते. संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिकेत २००४ साली रुद्राक्ष नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक मणीशंकर यांना या चित्रपटात काय जमले नसेल तर त्या कथानकाला समकालीन दाखविणे. अर्थात १८ वर्षांपूर्वीचा प्रेक्षक आणि आजचा मार्व्हल सिनेमांचा चाहता प्रेक्षक यांच्या मानसिकतेत जमीन-अस्मानाचा फरक आहे हे सुद्धा तितकेच खरे. पण जे हेरण्यात मणिशंकर फसले नेमके तेच हेरण्यात आज दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना यश आले आहे. आपण आपला प्रॉडक्ट नेमक्या कोणत्या मार्केट मध्ये विकायला नेतोय आणि आपला नेमका ग्राहक कोण असणार आहे हे गणित ज्याला समजते त्यालाच उत्तम बिझनेसमॅन/व्यावसायिक म्हणतात. अयान मुखर्जी यांना मी उत्तम दिग्दर्शकापेक्षा एक उत्तम व्यावसायिक म्हणेन ज्याला त्याच्या ग्राहकांना काय हवे आहे पेक्षाही कसे हवे आहे हे कळलंय. बॉयकॉट च्या प्रचंड गोधळात आज अयान चा ४०० कोटींचा ग्रँड शो ‘ब्रम्हास्त्र’ प्रदर्शित झालाय. 

कथानक अगदी साधे. आजच्या मॉडर्न तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा असा शिवा (रणबीर कपूर), जो अनाथ आहे, त्याचे अग्नीशी विशेष नाते आहे. श्रीमंत आणि सुंदर ईशा (आलिया भट्ट) म्हणजे शिवाचे प्रेम. शिवा मध्ये जन्मजात अग्नीतत्व आहे ज्यामुळे त्याला अग्नी जाळू शकत नाही. शिवाय त्याच्याकडे सर्वशक्तिमान समजले जाणारे शस्त्र म्हणजेच ब्रह्मास्त्र जागृत करण्याची शक्ती देखील आहे. हे सर्व शिवा ला माहित नसते पण आपण एका दैवी शक्तीसोबत जोडलेले आहोत याची सातत्याने जाणीव शिवाला होत असते. दुसरीकडे वाईट शक्तींची राणी जुनून (मौनी रॉय) देखील ब्रह्मास्त्राच्या शोधात असते. तीन भागात विभागलेले ब्रम्हास्त्र जुनून ला हवे आहे. ते तीन भाग कोणाकडे आहेत आणि या तीन भागांचे काय होते हे इथे विस्ताराने सांगितल्यास तुम्हाला केवळ व्हिज्युअल इफेक्ट्स बघण्यासाठी सिनेमागृहात जा म्हटल्यासारखे होईल. त्यामुळे सविस्तर न सांगणेच योग्य. 

सुरुवातीला थोडेसे कथानकाबद्दल. कथानकाची संकल्पना नावीन्यपूर्ण आहे. ब्रम्हास्त्र मिळविण्यासाठी होणारा संघर्ष अशा प्रकारचे कथानक यापूर्वी हिंदी चित्रपटात दिसलेले नाही. पण ज्या प्रेक्षकांना हॉलिवूडचे अव्हेंजर्स सिरीज चे सिनेमे, सुपरहिरो फिल्म्स, शिवाय लॉर्ड ऑफ दि रिंग्ज, हॅरी पॉटर, मॅट्रिक्स, अवतार, गेम ऑफ थ्रोन्स इत्यादी सारख्या सिनेमांची सवय आहे त्यांना कथानकात फारसे नावीन्य जाणवणार नाही. पटकथा मात्र काहीशी निराशाजनक आणि रटाळ आहे. गुड व्हर्सेस बॅड असा नेहमीचाच असा शक्ति संघर्ष आहे ज्याची हाताळणी सरळधोपट मार्गाने केली आहे. मग यात वेगळेपण काय? असे विचाराल तर त्याचे उत्तर आहे, जबरदस्त गतीने मांडलेली पटकथा, हॉलिवूडच्या तोडीस तोड असे अत्युच्च दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि त्याचे प्रभावी सादरीकरण, प्राचीन संदर्भांना समकालीन पद्धतीने दाखविणारे उत्तम दिग्दर्शन आणि सर्व प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय. 

‘वेक अप सिड’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ सारख्या शहरी प्रेक्षकांना जवळच्या वाटणाऱ्या चित्रपटानंतर दिग्दर्शन अयान मुखर्जी याने ब्रम्हास्त्र द्वारे खूपच महत्वाकांक्षी आणि तितकेच जोखमीचे असे पाऊल उचलले आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन. कथानकात प्रत्येक पात्राला आणखी व्यवस्थितपणे समजावून सांगण्याची गरज होती. यात मात्र अयान खूपच कमी पडला आहे. कथेचा नायक शिवा, अमिताभ बच्चन यांनी रंगविलेले गुरुजी हे पात्र, शास्त्रज्ञ मोहन भार्गव (शाहरुख खान) आणि नंदी अस्त्र अनिश शेट्टी (नागार्जुना) असे सर्व प्रमुख व त्यांचा तपशील देण्यात अयान मुखर्जी खूपच कमी पडला असल्यामुळे प्रेक्षकांना या पात्रांसोबत कनेक्ट होण्यास एकतर वेळ लागतो किंवा होतच नाही. कथानक मध्यंतरापूर्वी प्रचंड वेगाने पुढे सरकते.

मध्यंतरानंतर मात्र काही ठिकाणी थोडेसे रेंगाळते पण प्रि-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स परत रंगत आणतो. शेवट काहीसा विचित्र वाटतो खरा पण हा सिनेमा तीन भागात निघणार असल्याने बऱ्याच प्रश्नांचे उत्तर पुढील दोन भागात मिळेल अशी आशा आहे. हुसेन दलाल यांनी लिहिलेल्या संवादांचा इथे प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. प्राचीन कथानकाला आजच्या प्रेक्षकांशी जोडणारे संवाद हा ब्रम्हास्त्रचा मोठा प्लस पॉईंट आहे. ब्रम्हास्त्र चा खरा विनर आहे त्याचे अत्यंत कमालीचे असे व्हीएफएक्स, अर्थात स्पेशल इफेक्ट्स. हॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत खूपच मर्यादित बजेट हातात असूनही अगदी त्यांच्या तोडीस तोड असे व्हिज्युअल इफेक्ट्स सादर केल्याबद्दल आणि त्यावर गेल्या ४ वर्षांपासून मेहनत घेतल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन. 

छायांकन सुद्धा खूपच नेत्रदीपक झाले आहे. सिनेमॅटोग्राफर व्ही. मणिकंदन, पंकज कुमार, सुदीप चॅटर्जी, विकास नौलखा आणि पॅट्रिक ड्युरोक्स या पाचही जणांनी प्रत्येक फ्रेम सुंदर टिपली आहे. सायमन फ्रँग्लेन यांचे पार्श्वसंगीत मात्र अजूनही प्रभावी होऊ शकले असते. बऱ्याचशा दृश्यात ते उगाच गोंगाट वाढविणारे वाटते. चित्रपटाचा आणखी एक प्लस पॉईंट आहे संगीतकार प्रीतम यांचे संगीत. केसरीया आणि देवा देवा ही दोन्ही गीते कमालीची गोड आणि सुश्राव्य झाली आहेत. पडद्यावर त्यांचे चित्रणही सुरेख आहे. बऱ्याच दिवसांनी प्रीतम फॉर्मात आल्याचे दिसत आहेत. आता अभिनयाच्या बाबतीत. सर्वच्या सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. रणबीर टॉप क्लास, आलिया खूपच क्युट, मौनी रॉय परिणामकारक, अमिताभ बच्चन एकदम संयमित, शाहरुख खान मस्त. एकच कलाकार जो कमी दिसला याची खंत वाटते तो म्हणजे नागार्जुना. त्याची भूमिका अजून मोठी हवी होती हे प्रकर्षाने जाणवते. पण त्यातही नागार्जुनाने छान काम केले आहे. डिम्पल कपाडिया ला लहानशा रोलमध्ये का वेस्ट केले आहे कळले नाही. 

ब्रम्हास्त्राची उपलब्धी काय असे विचाराल तर तो बॉक्स ऑफिसवर हिट होईल, कित्येक कोटी कमावेल, अखेरीस नफ्यात राहील की नाही हे सर्व मला दुय्यम वाटते. महत्वाचे हे आहे की आजचा हॉलीवूडचा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स बघणारा खासकरून तरुण प्रेक्षक, भारतीय हिंदू धर्मातील विविध अस्त्रांच्या युनिव्हर्स मध्ये सकारात्मक रित्या प्रवेश करतोय आणि त्यावर आधारित कथानक बघण्याची इच्छा त्याला होते आहे हे महत्वाचे आहे. भले त्यात काही उणीवा असतील, काही चुकीचे संदर्भ असतील. कथानक काल्पनिक आहे त्यामुळे हे सर्व चालत राहणार. पण दिग्दर्शक अयान मुखर्जी याने नेमक्या याच प्रेक्षकाला समोर ठेऊन हे कथानक गुंफले आहे आणि त्याच सिनेमांच्या दर्जाची बरोबरी करणारी निर्मिती केली आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या कथानकांवर आधारित सिनेमांचे मोठे विश्व बॉलिवूडची खुले होणार आहे. काहीतरी ओरिजिनल द्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे द्या अशी ओरड बॉलिवूडवर अशात नेहमी होत असते. त्याला दिलेले हे उत्तर आहे. आता त्याला प्रतिसाद किती आणि कसा द्यायचा हे प्रेक्षकांवर अवलंबून आहे.

मर्यादित अपेक्षा ठेऊन जा, ब्रम्हास्त्र तुम्हाला अजिबात निराश करणार नाही. आणि हो, हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याचे चुकवू नका. असा भव्यदिव्य अनुभव घरी बसून मोबाईल अथवा कॉम्प्युटर वर घ्यायचा नसतो. गो फॉर इट. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment