– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The Vaccine War Movie Review

काही सिनेमे हे परीक्षणाच्या पुढचे असतात जेंव्हा ते सत्य कथा सांगतात. सत्य जे कटू असते असे आपण नेहमी म्हणतो. पण काही सत्य हे गोड सुद्धा असतात. खासकरून असे सत्य जे कहाणी सांगतात आपल्या भारत देशाच्या शूर शिपायांची. शिपाई म्हटले की डोळ्यासमोर चटकन उभे राहतात देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आपले वीर जवान. पण दरवेळी हे युद्ध सीमेवरच लढले जावे असे काही जरुरी नाही ना. दोनच वर्षांपूर्वी असेच एक मोठ्ठे युद्ध आपल्या सर्वांच्या नजरेदेखत आपल्या शास्त्रज्ञांनी जिंकलेले आपण सर्वांनी पाहिले आणि खरंतर आज आपण सर्व जण जिवंत आहोत ते सुद्धा या आपल्या शास्त्रज्ञांमुळेच नाही का? पण हे युद्ध जिंकण्यासाठी या आपल्या शास्त्रज्ञ रुपी सैनिकांना कुठल्या अग्निदिव्यातून जावे लागले याची सत्य कहाणी सांगणारा सिनेमा आज प्रदर्शित झालाय ज्याचे नाव आहे ‘दि व्हॅक्सिन वॉर’. 

व्हॅक्सिन वॉर यातली कथा जितकी सत्य आहे तितकीच सिनेमातील शास्त्रज्ञांची पात्रे सुद्धा. म्हणजे विवेक अग्निहोत्री यांनी कथानक लिहितांना अगदी प्रमुख शास्त्रज्ञांची नावे सुद्धा तशीच कायम ठेवली आहेत. कथानकाबद्दल एका ओळीत सांगायचे झाल्यास भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाची, जिद्दीची, मेहनतीची, हुशारीची शौर्यगाथा असे मी या कथेला म्हणेल. कथेबद्दल मी मुद्दाम इथे काहीही सविस्तर सांगणार नाही कारण एकतर ते स्पॉयलर ठरेल आणि दुसरे तुमची सिनेमा बघण्याची मजा सुद्धा कमी करेल.

यात विवेकने पडद्यामागे घडलेल्या आणि आपल्या सर्वांना अचंभित करणाऱ्या कहाण्या, अनेकडॉट्स, बिहाइंड सी सीन्स स्टोरीज एकत्र केले आहेत जे बघतांना अनेकदा अश्रू अनावर होतात. अंगावर रोमांच उभे राहतात. मनात कधी काळजी तर कधी चीड निर्माण होते आणि खूपदा सीटवरून उभे राहून टाळ्या आणि शिट्ट्या सुद्धा माराव्याशा वाटतात. अश्रू केंव्हा येतात असे तुम्ही विचाराल तर आपल्या शास्त्रज्ञांची प्रयत्नांची पराकाष्ठा बघतांना, रोमांच केंव्हा उभे राहतात त्यांच्या मेहनतीला जेंव्हा एकेका टप्प्यावर यश मिळत जाते, काळजी केंव्हा वाटते जेंव्हा त्यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतात किंवा मुद्दाम केले जातात, चीड केंव्हा निर्माण होते जेंव्हा मीडियातील कथित पत्रकार मंडळी विदेशातील फार्मा कंपन्यांसाठी त्यांनी दिलेला टूल कीट च्या आधारे बक्कळ पैसा कमवत स्वतःच्या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर  इमेज खराब करण्याचे षडयंत्र रचत असतात, आणि अखेरीस विजयी झाल्यावर, व्हॅक्सिन बनल्यावर, मात्र या सर्व शास्त्रज्ञांच्या टीम इंडियाचे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून अभिनंदन करावे वाटते.

नाना पाटेकरांनी यात आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चे हेड डॉ भार्गव यांची तर पल्लवी जोशी यांनी एनआयए अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी च्या हेड डॉ प्रिया अब्राहम यांची भूमिका साकारली आहे. आयसीएमआर च्या शास्त्रज्ञांच्या टीम मध्ये डॉ निवेदिता गुप्ता यांच्या भूमिकेत आहेत गिरीजा ओक गोडबोले, डॉ रमण गंगाखेडकर यांच्या भूमिकेत आहेत मोहन कपूर, एनआयए च्या टीम मधील शास्त्रज्ञ डॉ प्रग्या यादव म्हणून आहेत निवेदिता भट्टाचार्य. तसेच दि डेली वायर नावाच्या मीडिया वेबसाईट वरून या सर्व शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार रोहिणी सिंग धुलिया च्या भूमिकेत आहेत रायमा सेन.

या सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका इतकी चोख निभावली आहे की क्या कहने. आयसीमआर आणि एनआयए चे हेड म्हणून अनुक्रमे नाना आणि पल्लवी तर अक्षरशः त्यांची भूमिका जगले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चित्रपट संपल्यावर तर असे वाटते की या दोन भूमिका या दोन कलाकारांशिवाय इतर कोणीही इतक्या सफाईने करूच शकले नसते. कडक शिस्तीचे आणि कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असणारे डॉ भार्गव नानाने जबरदस्त ताकदीने साकारले आहेत. तर नानाच्या एकानंतर एक येणाऱ्या कडक ऑर्डर्स फॉलो करतांना जी भावनिक घालमेल होते ती पल्लवीने अतिशय सहज आणि सुंदर रित्या पेश केली आहे. या दोघानंतर जिने उत्कृष्ट असा अभिनय केलाय ती म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले हिने. डॉ निवेदिता गुप्ता च्या भूमिकेत गिरिजाने निव्वळ अफलातून काम केले आहे. घरातील आई, जिचा मुलगा सातत्याने आई घरात नसल्याने एका मानसिक धक्क्यातून चाललाय आणि आयसीएमआर मधील शास्त्रज्ञ जिला कधीही रात्री-अपरात्री आणि सतत कितीतरी दिवस ऑफिसमधून घरी येता येत नसते अशा  या दोन जबाबदाऱ्या सांभाळतांना डॉ निवेदिता गुप्ता यांना किती आवाहनांचा सामना करावा लागला हे गिरिजाने आपल्या सुंदर अभिनयाने यथार्थ साकारले आहे.

इतर सर्वच कलाकार म्हणजे खासकरून निवेदिता भट्टाचार्य आणि मोहन कपूर यांनीही त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. रायमा सेन या अभिनेत्रीचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. कारण हे एकमेव निगेटीव्ह पात्र आहे सिनेमातले जे बघतांना आपल्याला हिचा जबरदस्त राग येतो, चीड येते. रायमाने अगदी लीलया आणि सहज ही भूमिका साकारली आहे. रायमाच्या घरी मोलकरणीच्या भूमिकेत असलेल्या सुहिता थत्ते यांचा अभिनय सुद्धा मस्त झालाय. त्यांची भूमिका छोटी असली तरी ती प्रेक्षकांना जवळची वाटेल अशी आहे. मित्रांनो वेगवान अशी कथा-पटकथा, जबरदस्त पकड असलेले आणि गुंतवून ठेवणारे असे कथेचे सादरीकरण, उत्कृष्ट दिग्दर्शन काय असते याचा एक नमुना या सर्वांबद्दल विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. पार्श्वसंगीत, छायांकन, कला दिग्दर्शन, वेशभूषा अशा आणि इतर सर्व टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये सुद्धा सिनेमा परफेक्ट आहे. 

खरं सांगायचे झाल्यास मला तर कोणतीही ठळकपणे दिसून यावी अशी चूक किंवा उणीव मला यात सापडली नाही. आणि उगाच उणीवा शोधात बसाव्यात असा हा टिपिकल मसाला चित्रपट सुद्धा नाही. मुळात भारताची ही गौरवगाथा प्रेक्षकांना सहज-सोप्या भाषेत पण तितक्याच प्रभावी रित्या सांगणे अत्यंत गरजेचे होते. जे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ. आयसीएमआर आणि एनआयए च्या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये बहुतांश महिला शास्त्रज्ञांचा असलेला सहभाग हा या कथेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. ज्यामुळे हा चित्रपट महिलावर्गास प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे.

सहकुटुंब-सहपरिवार आपण सर्वजण जसे व्हॅक्सिन चा पहिला आणि दुसरा डोस घ्यायला गेलो होतो ना अगदी त्याच प्रकारे घरातील सर्वांनी निदान एकदा तरी तेही केवळ आणि केवळ सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा. अवश्य बघावा. कारण आपण हा सिनेमा चित्रपटात जाऊन बघणे म्हणजे या सर्व शास्त्रज्ञांच्या हिमालया एवढ्या मेहनतीला दिलेली एक छोटीशी अशी मानवंदना ठरणार आहे.

या सिनेमाला मी ५ पैकी ५ स्टार देईल. आणि हे स्टार सिनेमाला, विवेक अग्निहोत्री ना किंवा सिनेमातील कलाकारांना नसून हे स्टार आहेत आपल्या आयसीएमआर आणि एनआयए च्या शास्त्रज्ञांना आणि त्यांच्या टीम ला. उठा आणि थेट थिएटर गाठा . तेही सहपरिवार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment