– अजिंक्य उजळंबकर 

Movie Review Chandigarh Kare Aashiqui; आयुष्मान खुराणा या अभिनेत्याला खरंतर सतत ‘आउट ऑफ दि बॉक्स’ आणि बॉलिवूडच्या नायकांच्या ‘टिपिकल कम्फर्ट झोन’ च्या बाहेरील भूमिका साकारण्यासाठी मानावं लागेल. २०१२ च्या ‘विकी डोनर’ मधील स्पर्म डोनेशन करणारा नायकापासून सुरु झालेल्या व त्याने अगदी ठरवून केलेल्या या प्रवासात अनेक ऑड अशा व कुठलाही चौकटीत राहून काम करणारा अभिनेता  स्वीकारण्याची हिम्मत करणार नाही अशा भूमिका आयुष्मानने अतिशय सहजतेने साकारल्या आहेत. वेगळं पाहण्याची आवड असलेल्या प्रेक्षकांना व खासकरून आजच्या तरुण पिढीला त्यामुळेच आयुष्मान खूप कूल वाटतो हेही तितकेच खरे. आतापर्यंत नौटंकी साला, दम लगाके हैशा, आधी आलेला शुभ मंगल सावधान व आता आलेला ज्यादा सावधान, अंधाधुन, बधाई हो, ड्रीम गर्ल, बाला, आर्टिकल १५ या त्याच्या एकाही चित्रपटात आयुष्मान टिपिकल चौकटीतला बॉलिवूड नायक म्हणून दिसला नाही. प्रत्येकवेळी एक सरप्राईज अथवा धक्कातंत्र घेऊन हा अभिनेता तयार असतो. याहीवेळी ‘चंदिगढ करे आशिकी’ द्वारे एक नवीन धक्का घेऊन हा अभिनेता उभा आहेच. 

बहुतांश वेळा आयुष्मान ने साकारलेला नायक काही ना काही धक्का देत असतो. चंदिगढ करे आशिकी मध्ये मात्र हा धक्का कथेच्या नायिकेने दिला आहे. तो धक्का काय ते इथे सांगणे अथवा त्या धक्क्याचा इथे उहापोह करणे योग्य ठरणार नाही. नायक मनू (आयुष्मान) हा चंदिगढ मधील टॉप टेन जिम ट्रेनर आहे. बॉडी बिल्डिंगच्या अत्यंत प्रेमात असल्याने ३० च्या वर वय जाऊनही या मनूचे अजून लग्न झालेले नाही. घरात वडील, आजोबा व दोन बहिणी आहेत. आई लहानपणीच हे जग सोडून गेलेली. मनूची ओळख होते मानवीशी (वाणी कपूर). मूळची अंबाला येथील मानवी ही एक झुंबा डान्स टीचर आहे. चंदिगढ येथे जागेच्या शोधात असलेली मानवी मनूच्या जिममध्ये क्लासेस सुरु करते. दोघांचे प्रेम जुळते. मनू जेंव्हा आपल्या प्रेमाची कबुली देतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो त्यावेळी मानवी स्वतःबद्दलचे एक कटू सत्य मनूला सांगते जे ऐकून मनूला जबरदस्त धक्का बसतो. या धक्क्यातून मनु कसा सावरतो हा पुढील कथाप्रवास. 

सुप्रतिक सेन, तुषार परांजपे आणि अभिषेक कपूर (जे स्वतः सिनेमाचे दिग्दर्शक पण आहेत) या त्रिकुटाने लिहिलेल्या कथानकास पटकथेत रूपांतर करण्याचे काम सुप्रतिक आणि तुषारने केले आहे. कथेत नावीन्य आहे हे कबूल मात्र तरीही अगदी १ तास ५५ मिनिटांची अत्यल्प लांबी असलेला सिनेमा सुद्धा जर तुम्हाला खिळवून ठेवण्यात कमी पडत असेल तर ‘कुछ तो गडबड है दया!’ आता हे कमी पडणे ‘पटकथा बांधणी’ व  ‘दिग्दर्शन’ या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये आहे.

दोन प्रमुख पात्र म्हणजे नायक आणि नायिकेच्या व्यक्तिरेखा पुरेशा व व्यवस्थित डिफाईन करतांना लेखक मंडळी गोधळलेली आहेत. दोघांचे एकमेकांवर अतूट प्रेम आहे हे अगदी शेवटपर्यँत एस्टॅब्लिश होतच नाही. परिणाम हा की प्रेक्षक या दोघांच्या प्रेमकथेशी एकरूप होतच नाहीत. मग नायिकेने स्वतःबद्दल केलेल्या गौप्यस्फोटाचा परिणाम सुद्धा तितकासा होत नाही. नायकाचे पात्र अतिशय गोंधळलेल्या मनस्थितीत दाखवले आहे हा सुद्धा मायनस पॉइंट. 

नायिकेबद्दलची धक्कादायक सत्यस्थिती कळल्यानंतर असा गोंधळलेल्या अवस्थेत असलेला नायक बघणे हे प्रेक्षकांना सहसा आवडत नाही. अभिषेक कपूर यांचे दिग्दर्शनही यात फारशी सुधारणा करू शकलेले नाही. कथेतून मिळणारा सोशल मेसेज महत्वाचा पण त्याला अनुसरून कथेची बांधणी झाली असती तर एकंदरीत परिणाम जास्त होऊ शकला असता. 

प्रेमकथा असूनही चित्रपटातील एकही गाणे जमलेले नाही हा व्यावसायिक दृष्ट्या सर्वात मोठा मायनस पॉईंट आहे. संगीत दिग्दर्शक सचिन जिगर यांचा हा दोष असला तरी प्रेमकथेला आवश्यक हिट संगीत त्यांच्याकडून काढून घेणे याची जबाबदारी दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचीही असते. त्यातही ते फेल झाले आहेत. ही जबाबदारी याआधी यशस्वीरीत्या सांभाळला काय पो छे, रॉक ऑन वाला (एवढंच कशाला केदारनाथ चे संगीतही) दिग्दर्शक आभिषेक कपूर इथे अगदीच मिसिंग आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सिरीज या नामवंत व संगीतासाठी ओळखल्या जाणाऱ्या कॅसेट कंपनीने केलेली असूनही एकही गाणे न जमणे हे मोठे आश्चर्याचे आहे. 

अभिनयापेक्षा आयुष्मान ने यावेळी स्वतःच्या बॉडी बिल्डिंगवर घेतलेली मेहनत ठळकपणे दिसून येते. वाणी कपूरचा अभिनय ऍव्हरेज. ग्लॅमरस वाणीच्या ऐवजी ताकदीची अभिनय क्षमता असणारी अभिनेत्री घेणे इथे अपेक्षित होते पण तसे झालेले नाही. या दोघांशिवाय चित्रपटातील इतर कलावंतांपैकी प्रभावी असे कोणीही नाही. 

‘चंदिगढ करे आशिकी’ अगदीच टाकाऊ जरी नसला तरी याहीपेक्षा कित्येक पटीने चांगला बनू शकला असता. ऍव्हरेज. 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment