– अजिंक्य उजळंबकर 

‘मर्दानी’ मध्ये राणी मुखर्जी ने एक लेडी इन्स्पेक्टर साकारतांना हिंदी सिनेमाच्या टिपिकल हिरो स्टाईलने गुन्हेगारी विरोधात आघाडी सांभाळली होती. अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर नुकताच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या ‘शेरनी’ (Sherni on Amazon Prime Video) या नावामुळे व त्यात विद्या बालन (Vidya Balan) सारखी चतुरस्त्र व प्रयोगशील अभिनेत्री असल्याने यातही तिने साकारलेली फॉरेस्ट ऑफिसर जंगलात हिरोईनीझम दाखविणार अशा साधारण अपेक्षा हिंदी सिनेमाच्या सामान्य प्रेक्षकांच्या असतात. माझ्याही होत्या. पण दिग्दर्शक अमित मासूरकर (Director Amit Masurkar) चा याआधीचा ‘न्यूटन’ (Newton) मी पहिला असल्याने अमित यात नक्कीच फिल्मी या सदरात मोडणारे दाखविणार नाही याचीही शक्यता वाटत होती. अखेर ‘शेरनी’ संपल्यावर सामान्य प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होण्याची माझी शक्यता खरी ठरली. दिग्दर्शकाने अतिशय संवेदनशीलतेने कुठल्याही टिपिकल फिल्मी चौकटीत न बसणारी कथा ‘शेरनी’ मध्ये दाखवली आहे. ‘न्यूटन’ची कथा पटकथा स्वतः अमित मासूरकर चीच होती इथे मात्र आस्था टिकू यांनी ती जबाबदारी सांभाळली आहे. ‘विकासामुळे पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल’ हा नागरिक म्हणून आपल्या सर्वांचा अनास्थेचा विषय असल्याने बॉलिवूडमधील व्यावसायिक निर्माता-दिग्दर्शक मंडळी सुद्धा अशा विषयावर तेही नॉन-फिल्मी पद्धतीने चित्रपट बनविण्याची जोखीम उचलत नाहीत. टी-सिरीज कंपनीचे भूषण कुमार, कृष्ण कुमार सोबत विक्रम मल्होत्रा व अमित मासूरकर स्वतः यांनी ही जोखीम उचलली आहे याबद्दल खरंतर त्यांचे अभिनंदन व कौतुक करावयास हवे. २ तास १० मिनिटांच्या या जंगल सफरीत तुम्हाला कॅमेऱ्याची किमान एक चौकटतरी व्यावसायिक भासावी. पण नाही. पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल या विषयाचे ज्यांना खरंच गांभीर्य आहे अशा सुजाण व सुशिक्षित प्रेक्षकांसाठी बरेच काही ‘बिटवीन-दि-लाईन्स’ सांगणारा हा सिनेमा आहे. याला सिनेमा बघण्यापूर्वी दिलेली चेतावनी समजा हवं तर. (Movie Review: Sherni)  

चित्रपटात एका सुजाण तरुण शेतकऱ्याच्या पात्राच्या तोंडी एक संवाद आहे चित्रपटात, ” शेर है तो जंगल है .. जंगल है तो .. बारीश है .. बारीश है तो खेत है.. और खेत है तो हम है!” कथाकार व दिग्दर्शकाला शेरनी मधून काय सांगायचे आहे याचे हे सार होय. विद्या विन्सेट ही मध्यप्रदेशातील एका जंगलात नव्याने रुजू झालेली डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसर असते. विद्या स्वतः अतिशय शिस्तीची, तत्वाची, प्रामाणिक, एकदम कडक पण तितकीच संवेदनशील व मुख्य म्हणजे निसर्गावर प्रेम करणारी महिला असते. चार्ज घेतल्यावरच तिच्या खालचे व वरचे अधिकारी, जंगलातले कामे घेणारे गुत्तेदार यांचे संगनमत असल्याने आपण इथे काही विशेष काम करू शकणार नाही ही बाब तिच्या लक्षात येते. त्यात पुरुषप्रधान समाजातील हा सारा अधिकारी वर्ग एका महिला अधिकाऱ्याला कमी लेखून तिच्या क्षमतेवर व तिच्या काम करण्याच्या शिस्तबद्ध पद्धतीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतो. त्यात भर म्हणून या साऱ्या अधिकारी वर्गाचे सत्तेत व विरोधी पक्षात असलेले राजकारणी यांच्याशी असलेले संबंध विद्याला अजूनच खटकत असतात. या सर्वाना निसर्गाशी, पर्यावरणाशी, जंगलाशी व त्यातील प्राण्यांशी काही एक देणेघेणे नाहीए व प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी, प्रगतीसाठी आपापला स्वार्थ बघतोय हे बघून विद्या अधिकच निराश होते. जंगलातील ‘टी ट्वेल्व्ह’ नावाची एक वाघीण अर्थात शेरनी हिंसक बनून जंगलाच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना व त्यांच्या गाई-म्हशी-शेळी इत्यादी प्राण्यांसाठी धोकादायक व जीवघेणी बनलेली असते. तिला न मारता तिथून हुसकावून लावत परत जंगलात पाठवण्याची मोहीम विद्या व संबंधित अधिकाऱ्यांनी हातात घेतलेली असते. शेरनी ला वाचविणे व सुखरूप जंगलात परत पाठविणे या कामात अधिकारी वर्ग व राजकारणी यांच्या संगनमतात शेरनी चा कसा दुर्दैवी शिकार होतो इतके साधे-सरळ चित्रपटाचे कथानक आहे. 

Still from Vidya Balan's Sherni
Still from Vidya Balan’s Sherni

आस्था टिकू यांनी लिहिलेली ही कथा चित्रपट सुरु झाल्यावर जवळपास तास-सव्वा तास अत्यंत संथ गतीने पुढे सरकते. पात्रांची ओळख, कथेची प्राथमिक मांडणी हे सर्व एखाद्या समांतर सिनेमा प्रमाणे चालू असते. त्यामुळे सिनेमा अजिबात पकड घेत नाही. विद्याने साकारलेल्या फॉरेस्ट ऑफिसरकडून व्यवस्थेविरुद्ध काहीतरी धमाकेदार अथवा नाटकीय असे घडेल याची अपेक्षा असते मात्र लेखकाने कथेला अखेरपर्यंत रिऍलिस्टिक टच ठेवल्याने असे काहीही अगदी अखेरपर्यंत होत नाही. अखेरच्या अर्ध्या-पाऊण तासात वाघीणीचा जीव कसा जातो व तिला वाचविण्यासाठी विद्या कशी प्रयत्न करते हा सर्व भाग काहीसा गतिमान झाला आहे पण तोही म्हणावा तितका  नाही. 

चित्रपटाचा एकंदर डाऊन-टू-अर्थ व नॉन फिल्मी रिऍलिस्टिक अप्रोच सांभाळत दिग्दर्शक अमित मासूरकरने एक विद्या सोडली तर इतर कुठलाही मोठा कलाकार घेतलेला नाही. घ्यावा असे कुठले पात्रही चित्रपटात नाही. शरत सक्सेना यांनी साकारलेला जंगलातील शुटर पिंटू हे एकमेव पात्र दिग्दर्शकाला काहीसे फिल्मी अथवा मनोरंजक पद्धतीने दाखविता आले असते किंवा विद्या व पिंटू मधील संघर्ष अधिक रंजक व करमणूक करणारा दाखविला असता तर चित्रपटाचा इम्पॅक्ट अधिक होऊ शकला असता पण तसे का होऊ दिलेले नाही हे मात्र अनाकलनीय आहे. पटकथेत असलेला हा दोष दिग्दर्शकाने दूर करणे अपेक्षित असते .. निदान जर तुम्ही एखादा व्यावसायिक चित्रपट बनवीत असाल तर इतकी तरी काळजी ही घ्यावीच लागते. इथे मात्र अमित नक्कीच कमी पडला आहे.विद्याने साकारलेली फॉरेस्ट ऑफिसर विद्या ही तिच्या प्रचंड अभिनय क्षमतेला नव्याने आव्हान देणारी नाही. उलट विद्याची प्रतिभा याठिकाणी अंडर युटिलाईज झाल्यासारखी वाटते. स्वतःला इतकी ऍडजेस्ट करणारी फॉरेस्ट ऑफिसर विद्या साकारणे हे अभिनेत्री विद्यासाठी काही फार मोठी बाब नाही. विद्याने ती अतिशय सहजतेने साकारली आहे. 

कथेत गीत-संगीताला काहीही स्थान नाही. जंगलातील दृश्यांच्या दरम्यान वापरण्यात आलेले पार्श्वसंगीत सुद्धा म्हणावे तितके प्रभावी नाही. शिवाय ऍक्शन, रोमांच ही वैशिष्ट्ये जंगलकथांना अधिक आकर्षक बनवितात जी इथे अजिबातच नाहीत. राकेश हरिदास यांचे जंगलातील छायाचित्रण मात्र खूपच प्रभावी आहे. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यातला.. नव्हे प्रत्येक फ्रेम मधील लाईट-इफेक्टस अगदी फर्स्ट रेट आहेत. खासकरून कॅमेऱ्याने  बर्ड व्यूह ने टिपलेले घनदाट जंगलातले अद्भुत शॉट्स तर लाजवाब आहेत. विजय राज, ब्रिजेंद्र काला, नीरज काबी या कलाकारांचे काम चांगले झाले आहे. 

एका चांगल्या उद्देशाने बनविलेला शेरनी हा एका समांतर सिनेमा सारखा आहे ज्यात कथाकार व दिग्दर्शकाचा उद्देश व देण्यात आलेला संदेश हा अतिशय स्तुत्य असतो मात्र करमणुकीसाठी आतुरलेल्या सामान्य प्रेक्षकांसाठी त्यात विशेष काही नसते. अशा वेळी शेरनी असे फिल्मी नाव अजूनच अपेक्षभंग करते. न्यूटन सारखे काहीतरी नॉन फिल्मी अपेक्षा न वाढविणारे नाव का बरे सुचले नसेल अमितला?

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment