– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The Great Indian Family Movie Review

सुरुवातीला काही दिग्दर्शकांची नावे मला तुम्हाला सांगायची आहेत. संजय गढवी, शाद अली, कुणाल कोहली, सिद्धार्थ आनंद, शिमीत अमीन, प्रदीप सरकार, अनुराग सिंग, कबीर खान, विजय कृष्ण आचार्य, मनीष शर्मा, अली अब्बास जफर इत्यादी इत्यादी. आता तुम्ही विचाराल या सर्व दिग्दर्शकांची नावे आज इथे सांगण्याची गरज काय? सांगतो. यशराज फिल्म्स या बॉलिवूडमधील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बॅनरने जेंव्हा २००० च्या दशकाच्या सुरुवातीला बाहेरील दिग्दर्शकांना संधी देण्यास सुरुवात केली तेंव्हा गेल्या २० वर्षात जी नावे समोर आली ती ही दिग्दर्शकांची नावे आहेत. यातीलच एक नाव आहे विजय कृष्ण आचार्य यांचे. टशन या फसलेल्या प्रयोगानंतर विजयने यशराज साठी धूम-३ हा सुपरहिट चित्रपट दिला. ठग्ज ऑफ हिंदुस्तान ला मिळालेल्या दारुण अपयशानंतर विजय पुन्हा एकवार यशराज साठी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर येऊन बसलाय. सिनेमा आहे ‘दि ग्रेट इंडियन फॅमिली’. 

मला या सिनेमाचे १० दिवसांपूर्वी अचानक आलेले ट्रेलर बघून आश्चर्य वाटले होते. एवढ्या मोठ्या बॅनरचा सिनेमा असूनही असा कुठला सिनेमा येतोय याची फारशी कल्पना कोणाला नव्हती आणि या बॅनरने गेल्या १० दिवसात सिनेमाच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी सुद्धा काहीच मेहनत न घेतल्याचे चित्र आहे. म्हणजे आज दुसऱ्या दिवशी मी सिनेमा बघायला गेलो तर आधी नो ऑडियन्स मुळे सिनेमा कॅन्सल आहे असे मला सांगण्यात आले. माझ्या नंतर कसेबसे ५-६ लोकं आली आणि मग शो सुरु झाला. विकी कौशल सारखा प्रतिभावान अभिनेता मुख्य भूमिकेत असूनही असे का केले गेले देव जाणे? शिवाय चित्रपटाचे शूटिंग संपून जवळपास दोन वर्षे झाली आहेत मग इतक्या दिवस कशाची वाट होती हे सुद्धा कळले नाही. असो.

असे बऱ्याच सिनेमांसोबत होते की सिनेमाची कथा-पटकथा ही बरी असते पण असे असुनही त्याला प्रेक्षक मिळत नाहीत. त्याला अनेक कारणे असतात. त्या कारणांपैकी एक कारण तर ‘दि ग्रेट इंडियन फॅमिली’ या सिनेमाला आधीच मिळाले आहे. ते म्हणजे असा काही सिनेमा येतोय किंवा आता प्रदर्शित झालाय याची कोणीही दखल न घेण्यासारखी अवस्था. आता या बऱ्या सिनेमाकडे प्रेक्षक का ढुंकून बघणार नाहीत याच्या इतर करणाबद्दल बोलू यात. एकतर आऊटडेटेड कथा आणि त्याला दिलेली तेवढीच आऊटडेटेड ट्रीटमेंट. हिंदू-ब्राह्मण जन्मात वाढलेल्या मुलाला एक दिवस अचानक कळते की आपण जन्माने मुसलमान आहोत. मग त्याचा स्वतःच्या कुटुंबियांशी, समाजाशी आणि मुख्यतः स्वतःशी होत असलेला संघर्ष हा कथेचा मुख्य गाभा. यावर आधारलेली पटकथा आणि तिला दिलेली ट्रीटमेंट सुद्धा जुन्या वळणाची. म्हणजे ९० च्या दशकाच्या अखेरीस किंवा २००० च्या दशकाच्या मध्याला एकवेळ हे कथानक आले असते तर त्याची कोणी दखल तरी घेतली असती. पटकथेत लव्ह स्टोरी ला स्कोप असूनही त्याकडे लेखक-दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी दुर्लक्ष केले आहे. प्रीतम सारख्या संगीतकाराने एकही गाणे लक्षात राहील असे दिलेले नाही हा सुद्धा मोठा मायनस पॉईंट. कथेत अनेक भावनिक प्रसंगांची रेलचेल असूनही, त्याचे उत्तम चित्रण असूनही, हे प्रसंग मनात हात घालत नाहीत किंवा हे भावनिक प्रसंग बघतांना डोळे पाणावत नाहीत.

अख्खा चित्रपट विकी कौशल स्वतःच्या खांद्यावर वाहून नेतांना दिसतो. विकीचा अभिनय सुंदर झालाय मात्र त्याच्या जोडीला मनुशी छिल्लर सारखी नवखी आणि नुसतीच सुंदर  दिसणारी डॉल उभी केली आहे जिचा अभिनयाशी तरी कुठे संबंध येतांना दिसत नाही. विकी च्या वडिलांच्या भूमिकेत कुमुद मिश्रा आणि काकांच्या भूमिकेत मनोज पाहावा या दोघांची कामे छान झाली आहेत. विशेष करून कुमुद मिश्रा यांचा पंडित त्रिपाठी लक्षात राहण्यासारखा जमलाय. केवळ १ तास ५० मिनिटांची चित्रपटाची लांबी आहे. पटकथा फारशी कुठे कंटाळवाणी होत नाही. मध्यंतरानंतरचा काही भागाचा अपवाद वगळता. पण असे असूनही चित्रपट संपल्यावर मात्र आपल्या हाती यशराज सारख्या बॅनरने काहीतरी आऊटडेटेड प्रॉडक्ट दिले आहे याची जाणीव होऊन निराशा होते. कथेतून दिलेला सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश छान आहे पण मुळात कथा सांगण्याची पद्धतच जर जुनाट असेल तर त्याचा काय उपयोग? असे काहीसे घरी बसुन टीव्ही वरील मालिकेत बघायला बरे वाटते. नाही का?

या ‘दि ग्रेट इंडियन फॅमिली’ ला ५ स्टार पैकी मी देईल २ स्टार ज्यातला एक आहे केवळ विकी कौशल च्या सुंदर अभिनयासाठी. असो. अखेरीस तयार असूनही चित्रपट दोन वर्षांच्या गॅपने का प्रदर्शित झाला याचे उत्तर मला मिळाले याचा मला आनंद झाला. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment