– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Jaane Jaan Movie Review

जपानमधील सुप्रसिद्ध रहस्य कथा-लेखक कायगो हिगाशिनो यांना त्यांच्या २००५ सालच्या दि डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स नावाच्या कादंबरीने अनेक सन्मान मिळवून दिले आहेत. त्यांच्या याच कथेवर आधारित व सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जान’ नावाचा मर्डर मिस्ट्री जॉनरचा सिनेमा नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालाय. विद्या बालन अभिनीत कहानी हा दिग्दर्शक म्हणून आजही सुजॉय घोष च्या सिनेमांच्या लिस्ट मधील सर्वात जास्त पॉप्युलर प्रॉडक्ट आहे. पण पटकथाकार म्हणून मर्डर मिस्ट्री जॉनरचे अभिषेक बच्चन चा बॉब बिस्वास आणि अमिताभ-तापसी पन्नू चा बदला हे सिनेमे सुजॉय मधील प्रतिभाशाली पटकथाकार म्हणून पावती देणारे आहेत.

करीना कपूर खान हिचा ओटीटी डेब्यू म्हणून ज्याकडे पाहिले जाते असा ‘जाने जान’ ही एका खुनाची रहस्य कथा असल्याने कथेविषयी इथे विस्ताराने बोलणे असेही योग्य नाही. तारा डिसुझा या आपल्या १५ वर्षीय मुलीसोबत पश्चिम बंगाल मधील कलिंपोंग येथे राहणारी माया डिसुझा (करीना कपूर खान) ही एक छोटेसे रेस्टोरंट चालवत असते. मायाचा शेजारी व शहरातील एका शाळेतील गणिताचा हाडाचा शिक्षक असा अति-हुशार नरेन (जयदीप अहलावत) हिचे मायावर अव्यक्त असे प्रेम असते. मायाला याची जाणीव असते. १४ वर्षानंतर एके दिवशी अचानक मायाचा पती अजित म्हात्रे (सौरभ सचदेवा) मायाला कलिंपोंग येथे गाठतो. दोघांमध्ये वाद होतात. दुसरीकडे मुंबई पोलिसात कामाला असलेला इन्स्पेक्टर करण आनंद (विजय वर्मा) हा अजित म्हात्रे च्या शोधात कलिंपोंग येथे पोहोचतो. पण एके दिवशी कलिंपोंग पोलिसांना जळून खाक झालेली डेड बॉडी सापडते जी अजित ची असते. मग अजित चा खून कोणी, का आणि कसा केला याचा शोध करण लावतो ज्यात अनेक धक्कादायक घटना समोर येतात. 

‘जाने जान’ हा चित्रपट पाहतांना आपण काही जगावेगळे बघत नाही आहोत याची जाणीव आपल्याला असते. पण तरीही रुटीन वाटणारी ही कथा तुम्हाला पुरती गुंतवून ठेवते याची मुख्य दोन कारणे आहेत. पहिले कारण याची पटकथा आणि दुसरे प्रमुख कलाकारांचा अभिनय. सुजॉय चा या जॉनर वर असलेला हातखंडा जाने जान बघतांना पदोपदी जाणवतो. एकतर दोन तासांची शॉर्ट अँड क्रिस्पी पटकथा आहे जिचे लिखाण आणि सादरीकरण हटके आहे त्यामुळे रुटीन अशी मर्डर मिस्ट्री असूनही तुम्हाला सुजॉय गुंतवून ठेवतो. पटकथा जितकी वेगवान आहे तितकीच सादरीकरणात सुद्धा हटके आहे. म्हणजे अजित चा खून कोणी व का केला हे प्रेक्षकांना माहीत असूनही पुढे काय आणि कसे होणार याची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. कथेच्या प्रवाहात येणारे ट्विस्ट कथेचे गूढ टिकवून ठेवतात. क्लायमॅक्स ला दिलेला धक्का सुद्धा छान आहे.

पटकथेनंतर तुम्हाला बांधून ठेवतो तो जयदीप आणि करीना या दोघांचा सुंदर अभिनय. खासकरून जयदीपचा. त्याचा गेट-अप आणि त्याचा अभिनय दोघेही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. जयदीपच्या करिअरमधील हा परफॉर्मन्स वन ऑफ दि बेस्ट ठरावा. हुशार, शांत, अबोल, संयमित असा मॅथ्स टीचर वेळ आल्यावर एकदम खतरनाक असे रूप कसे धारण करतो हे एकदम टोकाचे ट्रान्सफॉर्मेशन जयदीपने मोठ्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने साकारले आहे. करीना ने रंगवलेली माया उर्फ सोनिया डिसुझा छान जमली आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री असलेल्या करीना च्या वाट्याला इतकी इंटेन्स भूमिका बऱ्याच वर्षांनी आली आहे. सिनेमातील तिच्या पात्राचे वय व तिचे सध्याचे खरे वय हे मॅच होते त्यामुळे करीना या भूमिकेत चपखल फिट्ट बसते. इन्स्पेक्टर करण आनंद च्या भूमिकेत विजय आनंद या अभिनेत्याने छान रंग भरले आहेत. एकीकडे अजितच्या खुनाच्या शोधात असलेला करण, दुसरीकडे माया च्या आकर्षणात कसा ओढला जातो हे बघतांना रंजक वाटते. अजित म्हात्रे च्या भूमिकेत सौरभ सचदेवा याचेही काम छान झाले आहे.

सुजॉय ने कथेची कलिंपोंग या हिलस्टेशनवरील वातावरण निर्मिती सुंदर केली आहे. शहरातील लाईट इफेक्टस, रेस्टोरंट मधील स्पेशल डिशेस,  छोट्याशा शहरातील सुंदर निसर्ग दाखविताना त्याचा सिनेमाच्या डार्क जॉनर नुसार केलेला वापर, त्यासाठी अविक मुखोपाध्याय यांची आकर्षक सिनेमॅटोग्राफी म्हणजेच छायांकन मस्त झाले आहे. बीजीएम अर्थात पार्श्वसंगीत ठीक आहे पण याहीपेक्षा जास्त इम्पॅक्टफुल होऊ शकले असते. कथेत गीत-संगीताला वाव अजिबात नाहीये. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या आ जाने जान या हेलन वर चित्रित ७० च्या दशकातील इंतकाम सिनेमातील गाण्याचा वापर याठिकाणी पटकथेला व करीना च्या पात्राला परफेक्ट कनेक्ट होणारा आहे. सुजॉय ने अगदी योग्य ठिकाणी योग्य शीर्षक गीत वापरले आहे. 

स्टार रेटिंग च्या भाषेत सांगायचे झाल्यास ५ पैकी ३ स्टार मी याला नक्की देईल. एक स्टार वेगवान आणि हटके अशा पटकथेसाठी, दुसरा जयदीप च्या अभिनयासाठी आणि तिसरा सुजॉय च्या दिग्दर्शनासाठी. रुटीन अशी ही मर्डर मिस्ट्री तुम्ही एक वेळा बघून निराश नक्कीच होणार नाहीत. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment